Reflection for the Homily of Third Sunday of Advent
(15-12-2019) By
Br. Julius Rodrigues
दिनांक: १५/१२/२०१९
दिनांक: १५/१२/२०१९
पहिले वाचन: यशया ३५: १-६,१०
दुसरे वाचन: याकोब ५: ७-१०
प्रस्तावना:
आनंद करा, हर्ष
करा, प्रभूच्या येण्याची तयारी करा. तो येणार आणि आपणास
शांती, सुख, प्रदान करणार आहे. परमेश्वराच्या
येण्याची वाट पहा, त्याच्या विजयी करुणेचा ध्यास धरा,
पण उतावीळ होऊ नका. तो येऊन आम्हा सर्वांस धीर देणार आहे आणि आमच्या
जीवनाचा कायापालट करणार आहे. तारणारा येणार आहे आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणणार
आहे. हेच आपल्याला आजच्या उपासनेद्वारे सांगण्यात येत आहे. जो आनंद खरा आहे तो
ख्रिस्ताचा आहे, म्हणून आपल्याला त्या ख्रिस्ताचा ध्यास
धरावयास बोलावीत आहे. अनेक अशा वेळेस आपण इतर गोष्टींचा ध्यास धरला असेल, तर त्या परमेश्वराकडून क्षमा मागूया आणि ह्या मिस्साबलीदानात भाग घेऊया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ३५: १-६,१०
आजच्या पहिल्या वाचनात
अनेक अशा गोष्टी आपणास पहावयास मिळणार आहेत. यशया संदेष्टा अगदी वैभवशाली, अलंकारीक,
स्फूर्तिदायक भाषा ह्या ठिकाणी वापरत आहे. सगळीकडे, सर्वत्र आनंद, जल्लोष, उत्साह साजरा केला जाणार आहे. यशया संदेष्टा
म्हणतोय की, "अरण्य व रुक्ष भूमी ही आनंदित होणार,
वाळवंट उल्लासेल, पण हे कसे शक्य आहे? कारण संदेष्टा आपणास सुचवत आहे की, या वाटेने देव
येणार आहे." पुढे ओवि '४' मध्ये
आपणास सांगतोय की, घाबरणाऱ्यांस म्हणा, धीर धरा, भिऊ नका, पहा तुमचा देव सुड घ्यावयास, अनुरूप असे प्रतिफळ द्यावयास येईल. तो (येशू) येईल व तुमचा उद्धार करेल.
त्याच्या आगमनाचे कारण ह्या मधून उघड होते. आपल्या लोकांना स्वतःकडे, घरी नेण्यासाठी तो येणार आहे. तर ओवी (५-६) ह्या मधुन नवयुगाची पहाट
झाल्याचे जाहीर होते. परमेश्वराचे आगमन अप्रत्यक्षपणे ह्या ओवीमध्ये दाखविले आहे.
नव्या निर्गमाचे भावपूर्ण चित्रण, स्वतः देवाचे आगमन,
सियोनेत पुन्हा लोकवस्ती आणि उद्धार पावलेल्या लोकांचा अखंड आनंद,
यातून भावी सुस्थितीचे पूर्वसंकेत आपणास दिले आहेत.
दुसरे वाचन: याकोब ५: ७-१०
ख्रिस्ती लोकांनी धीर धरावा
, ख्रिस्त
पुन्हा येईपर्यंत त्याच्या येण्याची प्रतीक्षा करावी. ह्या ठिकाणी आपणास सांगण्यात
येत आहे की, धीर हा सदगुण आहे. आपल्यामध्ये या गुणांची
जोपासना करा. तो परिपक्व होऊ द्या, उतावीळ होऊ नका, हेच याकोबाचे आपणास सांगणे आहे. ख्रिस्ती प्रतीक्षा कशासाठी तरी नसून ती
एका व्यक्तीची प्रतीक्षा आहे ती म्हणजे ख्रिस्ताची. याकोबाने प्रभूच्या आगमनाचा
उल्लेख दोन वेळा केला आहे. न्यायाधीश दाराजवळ उभा आहे, असे
त्याने एकदा म्हटले आहे. ह्याद्वारे आपणास दर्शविण्यात आले आहे की, त्याचा येण्याचा काळ जवळ आला आहे.
शुभवर्तमान: मत्तय ११: २-११
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला अटक व
तुरुंगवास या विषयीचा अखेरचा उल्लेख ह्या ठिकाणी मत्तय करत आहे. आपण ज्याच्यासाठी
मार्ग तयार केला, त्याच्या कार्याच्या प्रगतीवर, तो तुरुंगातुन लक्ष ठेवून होता, असे आपणास ह्या
वाचनाद्वारे आढळते. ह्या भागामध्ये येशूच्या सेवाकार्याचे योहानाचे केलेले
मूल्यमापन (२-६) आणि येशूने केलेले योहानाचे मूल्यमापन (७-१२) आणि त्या दोघांचे
स्वागत जन सामान्यांनी केले, त्याविषयीचे येशूचे विचार ह्या
ठिकाणी दिले आहेत. ह्या उताऱ्याद्वारे आपणास समजून येते की, येशूच्या
सेवाकार्याची एकंदर रीत पाहून योहानला खूप आश्चर्य वाटले, असे
त्याच्या प्रश्नाद्वारे आपणास समजते. त्याचप्रमाणे येशू खरा संदेष्टा म्हणून
योहानची तोंड भरून प्रशंसा करत आहे.
मनन चिंतन:
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज देऊळमाता आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजचा हा रविवार आपण (Gaudete) गावदेते रविवार म्हणून साजरा
केला जातो. (Gaudete) गावदेते म्हणजे लॅटीन भाषेत ‘आनंद’, म्हणजेच आनंदाचा रविवार. आज जर आपण समाजात पाहिले तर, आपल्याला आढळून येईल की, प्रत्येकजण आनंदाच्या शोधात आहे. प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत करतो, अनेकजण अशाप्रकारे जो तो आपल्या जीवनात आनंद
अनुभवायला अतोनात प्रयत्न करीत आहे. त्यासाठी तो झपाटलेला आहे. आज आनंद हा अगदी बाजार वस्तू प्रमाणे झालेला आहे. आपल्या प्रत्येकाला वाटते की; आपण मध्यमान केले की ते आपल्याला आनंदी बनवेल, किंवा ते आपणाला आनंद देईल. आपल्याला एखाद्या बाईची सोबत करावयाची आहे अश्या हेतूने की ती आपल्याला
आनंदी बनवेल. आणि इतर अनेक अश्या गोष्टी आहेत की; त्या करण्याने आपण आनंदी होऊ. पण ते असे काय आहे ते आपल्याला आनंदी ठेवेल? सुखी-समाधानी बनवेल? आज आपण गोंधळून गेलो आहोत. आपल्याला हेच माहित नाही आहे की, आपल्याला आनंद मिळणार तरी कुठे? आनंद म्हणजे काय? एक आनंदी मन दिसायला कश्या आहे? एक आनंदी मन म्हणजे काय? असे अनेक प्रश्न आपल्या मनात घुटमळत घालून
आहेत. असं
म्हणतात की, आनंदाचा शोध आत घ्या, आणि तो आपण कसा घेणार तर ख्रिस्ताला स्विकारून, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून, आणि त्याच्या हातात आपली जीवन सोपवून.
आज असे सिद्ध झाले आहे की; वैद्यकीय रित्या ही आपल्याला कळतं की वेदना एक प्रकारची केमिस्ट्री किंवा
रासायनिक अनुभव आहे. त्याच प्रमाणे परमानंद हा
वेगळ्या प्रकारचा रासायनिक अनुभव आहे. आज प्रत्येक माणसाला त्यांच्या अनुभवाला एक रासायनिक अनुभव असतो, परंतु तो रासायनिक अनुभव घेण्यासाठी आपल्याला त्या ख्रिस्ताजवळ व त्याच्या प्रेमात पडावे लागणार आहे. मग आपणास त्या परमानंदाचा अनुभव घ्यावयास मिळणार आ.हे
‘सतीच वाण’ ह्या मराठी चित्रपटातील हे सुंदर गीत मला ह्या ठिकाणी आठवत आहे. ‘किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंद, आनंद झाला, आज आनंद, आनंद झाला.’ होय आजची तिन्ही वाचणे आपणाला आनंदाविषयी माहिती करून देत आहे.
पहिल्या वाचनात यशया संदेष्टा अगदी
वैभवशाली भाषेचा वापर करत आहे. सर्वत्र आनंद, जल्लोष आणि जयजयकार केले जाणार आहे. सर्व भूमी वाळवंट हे
आनंदाने भरुन जाणार आहेत, अरण्य व रुक्ष भूमी ही देखील आनंदित होणार आहेत. अशाप्रकारे अगदी अतिशयोक्तीची भाषा या
ठिकाणी वापरण्यात आली आहे. जेव्हा परमेश्वर येणार त्यावेळेस तुमचे तारण होणार आहे; तुमचा उद्धार होणार आहे. म्हणून त्या घटनेची वाट
पहा, धीर धरा, खचून जाऊ नका. कारण तो आपल्याला स्वर्गीय नंदनवनात नेणार आहे, आणि खरा आनंद काय आहे तो आपणास अनुभवायला मिळणार आहे. परमेश्वराच्या येण्याने सर्व काही बदलून जाणार आहे.
आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकणार आहोत की, परमेश्वराच्या येण्याची वाट पहा, धीर धरा. अनेकदा अशावेळेस आपण आपल्या जीवनात उतावळेपणा, घाई-घाई करत असतो. मग याचा वाईट परिणाम देखील
आपल्याला भोगावा लागतो. म्हणूनच म्हणतात की, ‘वेळ आली की सगळे काही ठीक होईल’ आणि हे अगदी खरोखर आहे. त्या घटनेची वाट, वेळेचा धीर, आपण धरला पाहिजे आणि हाच संदेश आपणास देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, परमेश्वर हा त्याच्या वेळेनुसार येणार आहे; आणि म्हणून आपण हतबल होऊ नये, निराश होऊ नये, घाबरून जाऊ नये. तर त्याच्या येण्याची वाट पहावी अगदी डोळ्यात तेल टाकून.
आजच्या शुभवर्तमानात देखील आपल्याला सांगण्यात येत आहे की, परमेश्वर हा खरा मसीहा आहे. त्याचे आगमन होणार आहे. तो सर्व काही बदलून टाकणार आहे. यहुदी लोकांची अशी अपेक्षा होती की, मसीहा म्हणजे ख्रिस्त; शत्रू पासून मुक्त करणारा असेल. तसेच दुपाई नष्ट करून पापाबद्दल न्याय करील व आपले राज्य प्रस्थापित करील. आपणसुद्धा अगदी त्याच विचारात
गुरफटलेले आहोत. आज आपण देखील त्याच यहुदी लोकांप्रमाणे आपली वाटचाल
करीत आहोत. ख्रिस्त आपल्या हृदयात हजर आहे. त्याला आपण ओळखू शकत नाही. कारण त्याचा आपल्याला विसर पडला आहे. ख्रिस्त जो मसीहा; खरा आनंद आहे, त्याची आपल्याला जाणीव होत नाही.
आज आपण अनेक इतर अशा गोष्टीच्या मागे जाऊन आनंदित होण्याचा प्रयत्न करत
आहोत. सांगितल्याप्रमाणे ज्यांनी-ज्यांनी ख्रिस्ताला आपल्या जीवनात अनुभवले, अनुसरले त्यांना-त्यांना त्यांच्या हृदयात आनंदाच्या लहरी कोसळताना अनुभवल्या आहेत. म्हणून आजच्या उपासनेद्वारे आपणास एकच सांगण्यात येत
आहे की, खर्या आनंदाची गुरुकिल्ली
फक्त आणि फक्त ख्रिस्तामध्ये आहे. दुसरे सर्व काही क्षणिक, क्षणभंगुर आहे. म्हणून ख्रिस्ताच्या वाचनावर आपले जीवन, आपले घर उभारूया आणि त्याच्या प्रेमात आपण पडू या. तो येईल तेव्हा आपणास आनंदित करील यावर आपला विश्वास ठेवू या.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: ‘हे प्रभू दया कर व
तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.’
१.आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू व सर्व
व्रत्स्त ह्यांना परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे व त्यांनी परमेश्वराच्या
राज्याचा अनुभव लोकांना द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.आपल्या पॅरिश मधील जे लोक परमेश्वराच्या
वचनावर, त्याने केलेल्या महान कृत्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि अन्य देवावर
विश्वास ठेवतात व आनंद मानतात अश्या सर्वांना परमेश्वराने आपला गुणकारी स्पर्श
करावा व ते पुन्हा एकदा देवा जवळ वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.परमेश्वराच्या येण्याची तयारी आपण सर्वांनी
आनंदाने करावी व त्याच्या दर्शनासाठी सज्ज व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.पॅरिशमधील जे लोक आजारी आहेत, दुःखात,संकटात, त्रासात आहेत. अशा सर्वांना परमेश्वराने धीर
द्यावा आणि त्यांच्या गरजा पुरवाव्यात. म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.एक आनंदी, समाधानी, जीवन
जगण्यासाठी आज आपणा सर्वांना ख्रिस्त सभा आमंत्रण देत आहे. आपल्या मधील नैराश्य
दूर करून, ख्रिस्तात आपले जीवन आनंदमय करण्यास विशेष
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment