Sunday, 22 December 2019


Reflection for the Homily of Christmas Vigil Mass (25/12/2019) By: Br. Roshan Rosario 



   ख्रिस्त जयंतीनाताळ  (मध्यरात्रीची मिस्सा)

   


दिनांक: २५/१२/२०१९
पहिले वाचन: यशया ९:१-६
दुसरे वाचन: तीताला पत्र २:११-१४
शुभवर्तमान: लुक २:१-१४


प्रस्तावना:

          ‘अंधकारात चालणाऱ्या लोकांनी एक मोठा प्रकाश पाहिला आहे.’ (यशया ९:२अ) डिसेंबर महिना हा वर्षाचा शेवटचा व सर्वात काळोखाचा महिना आहे. ह्या वेळेला आपल्याला प्रकाशाची किंमत कळते. ख्रिस्ती लोकांसाठी नाताळ म्हणजे; ह्या जगाच्या अंधकारमय वातावरणात देवाचे प्रकाशमय आगमन होय. जर ख्रिस्ताचा  प्रकाश या जगात आला नसता, तर या जगात अंधकार किती पसरला असला असता? ख्रिस्ताचा प्रकाश आपणाला आरोग्य, मुक्ती व जीवन घेऊन येत असतो. आपण देवाची लेकरे आहोत.
          आज आपण  देवाकडे असे विनवूया की, ज्या प्रकारे गव्हाणीत मेंढपाळांना आनंदाचा अनुभव आला होता व त्यांचे जीवन प्रकाशमय झाले होते त्याच देवाचे प्रकाशमय तेज आपल्या भोवती प्रकाशित व्हावे व नाताळाचा हाच आनंदमय अनुभव आपणास  मिळावा म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलिदाना मध्ये मागुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ९:१-६

          आजच्या पहिल्या वाचनात झबलून व नफताली हे प्रांत येथे विशेष महत्त्वाची आहेत. यशया संदेष्टा हा राजा आहाजला भेटल्यानंतर थोड्याच वेळात ती दोन्ही प्रांते आशरच्या हाती पडले. इस्रायली लोकांना प्रथमच गौरव पहावयास मिळणार होता. परंतु या लक्षणीय भाकीताकडे पुढे त्यांचे दुर्लक्ष झाले. पहिल्या वाचनामधून सुटकेचे आश्वासन आणि वाढता हर्ष दिसून येतो, कारण युद्धाची आणि विध्वसांची चिन्हे दूर झाली आहेत. मुक्ती देणाऱ्याला पाहावयास आम्ही उत्सुक आहोत. पुढच्या येणाऱ्या काळात गीदोना सारखा एखादा वीर नव्हे, तर बाळच आम्हाला दिसेल, आणि इम्मानुएल या नावाने तो ओळखला जाईल.

दुसरे वाचन: तीताला पत्र २:११-१४

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौलाने आपले लक्ष येशूच्या दुसऱ्या येण्याकडे केलेले आहे.  आपले वर्तन कसे असावे याचा उल्लेख यात केलेला आहे. येशूचे आगमन सार्वत्रिक महत्त्वाचे आहे व हे निर्विवाद सत्य आहे. देवाने आपल्या कृपेने तारणाची देणगी सर्वांना मिळने शक्य केलेले आहे. अभक्तीला आळा घालने हा देवाच्या कृपेचा एक मुख्य हेतू आहे. देवाच्या कृपेचा आधार नसेल तर संयमित आचरण ठेवणे शक्यच नाही असे संत पौल आपल्याला उद्देशून सांगत आहे.

शुभवर्तमान: लुक २:१-१४

 आजचे शुभवर्तमान आपल्याला मानवासाठी दिलेल्या सर्वात अमूल्य भेटीविषयी (प्रभू येशू ख्रिस्त) सांगत आहे.
1.      योसेफ हा मरिया हिला बरोबर घेऊन बेथलेहेम गावी नावानिशी लिहून देण्यासाठी जातो. नाझरेथ व बेथलेहेम या मधील अंतर हे ८० की.मी आहे. दूरवरून येणाऱ्या लोकांनी स्वतःसाठी जेवण व खाद्यपदार्थ आणले होते. बेथलेहेम हे शहर गर्दीने तुडुंब भरलेले होते. त्यामुळे गाईच्या गोठ्यात जेथे जनावरांना खाद्य दिले जाते अशी जागा त्यांना मिळाली. प्रभूयेशुला या भूतलावर असताना दोनच ठिकाणी  जागा मिळाली: गोठ्यात आणि क्रुसावर. (crib/ cross)
2.   तारणाऱ्याच्या जन्माची पहिली सुवार्ता मेंढपाळांना समजते. मेंढपाळ हे कोण होते?समाजात कमी समजले जाणारे लोक ज्यांना समाजात जास्त मान सन्मान नव्हता. ते साधे-सामान्य लोक होते. हे जे मेंढपाळ होते हे मंदिरात होमार्पणासाठी कोकरू अर्पण करीत असत. त्यांच्या कडून अर्पणासाठी कोकरू विकत घेतले जात असत. त्याच मेंढपाळांना जगात येणाऱ्या खऱ्या कोकराची ओळख किंवा शुभवार्ता देण्यात आली.

बोधकथा:

          एके दिवशी सेनेमध्ये भरतीसाठी उमेदवार सेनेच्या कार्यालयात जमले होते. ठरलेला वेळ निघून गेला होता. परंतु जनरलच्या कार्यालयातून कोणाला पण बोलावणे आले नव्हते. तसेच ऑफिसमधून सतत टाईपरायटरचा आवाज येत होता. थोडे उमेदवार एकमेकांशी गप्पा गोष्टी करून वेळ घालवत होते तर काहीजण वर्तमानपत्र वाचण्यात रमले होते. तेव्हा एक उमेदवार उठून थेट कार्यालयाचे दार उघडून आतमध्ये शिरला. कार्यालयातून एक चिटणीस (secretary) आली आणि अशी घोषणा केली की, कामासाठी उमेदवार निवडलेला आहे. त्या टाईपराईटरच्या माध्यमातून ह्या सर्व उमेदवारांना एक गुप्त संदेश देण्यात आला होता, की ज्यांना मुलाखत द्यायची आहे त्यांनी आत यावे. पण या आदेशाचे आकलन फक्त एका उमेदवारा शिवाय  कोणीहि केले नाही, आणि तोच उमेदवार योग्य उमेदवार म्हणून निवडलेला गेला आहे.
बोध: आपल्याला संदेष्ट्याद्वारे तारणाचा संदेश देण्यात आला आहे परंतु आपण तो स्वीकारला आहे का? व त्याला प्रतिसाद दिला आहे का?

मनन चिंतन:

          माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो आजच्या ह्या शुभ रात्री देवाने आपल्यावर प्रभू येशूच्या  जन्माद्वारे प्रेमाचा संदेश दिला आहे व त्यावर आपला प्रतिसाद कसा ह्या विषया वर मनन चिंतन करूया. गोष्टींमध्ये ऐकलेल्या उमेदवाराने जसा प्रतिसाद दिला त्याच प्रमाणे आपणही द्यायला हवा. इतिहासात असेच बरेच व्यक्ती आहेत की ज्यांनी ही देवाच्या हाकेला निःसंशय प्रतिसाद दिला.
          पहिल्या प्रथम आपल्यासमोर मरीयेचे उदाहरण आहे. मरीयेने दूताच्या वचनावर विश्वास ठेवून येशू ख्रिस्ताला आपल्या तारणासाठी जन्म देण्यास होकार दिला. इतकेच नव्हे तर मरीयाने  देवाच्या योजनेला निःसंशयास  सतत होकार दिला.
          दुसरा प्रतिसाद आहे तो म्हणजे जोसेफचा. मरीयेचे गर्भधारण जोसेफला स्वीकारण्यास अवघड व कठीण होते पण त्याने देवाच्या योजनेवर विश्वास ठेवून, त्यानेही देवाच्या इच्छेला  ऊस्फ़ुर्त प्रतिसाद दिला. जोसेफ ने आपली जबाबदारी निष्ठापूर्वक, कुरकुर न करता स्वीकारली व ती पार ही पाडली.
          तिसरा प्रतिसाद म्हणजे मेंढपाळांनी देवाच्या इच्छेला दिलेला होकार दिला. त्यांनी येशूच्या जन्माचा  संदेश स्वीकारला व त्याला शोधाण्याचे कष्ट घेतले. त्यांच्या प्रतिसादामुळे त्यांना जगाच्या तारणार्‍याचे दर्शन झाले. नंतर ते मेंढपाळ ह्या सर्व गोष्टी पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले. जो कोणी देवाच्या इच्छेला प्रतिसाद देतो; देव आशीर्वादाने भरून टाकतो. देव त्याचा संदेश नेहमी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे देतो. कधी तो आपल्या बरोबर पवित्र पुस्तकाद्वारे किंवा मित्रमंडळीने दिलेल्या सल्ल्याद्वारे तर कधी आई-वडिलांनी, शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनाद्वारे आपल्याला संदेश देतो. जे अध्यात्मिक असतात ते देवाची इच्छा ओळखतात व त्याला योग्य प्रतिसाद देतात. देवाची इच्छा ओळखणे ही सोपी गोष्ट नाही. विशेष करून जेव्हा आपला प्रतिसाद आपल्या कडून मोठ्या त्यागाची अपेक्षा करतो. परंतु आपल्या ह्या  प्रतिसादातून देव नेहमीच आपणाला सुख व समृद्धीची खात्री देत नाही. आपल्यासमोर संत मदर तेरेजा सारखे उदाहरण आहे.  त्यांनी आपले कॉन्व्हेंटचे सुखी-सुरक्षित वातावरण सोडून देवाच्या हाकेला प्रतिसाद दिला व त्यांना सर्व प्रकारचे कष्ट व गरिबी सोसावे लागले. विशेष करून कलकत्त्याच्या रस्त्यावर आपले जीवण अनाथ निराधार लोका सोबत घालवताना त्यांना देवा शिवाय दुसरा कोणताही आधार नव्हता. पण देवाने त्यांच्या ह्या  प्रतिसादला व त्यागमय जीवन यामुळे त्यांना आनंदाने व ध्यैर्याने भरले.
          आपल्या समोर आजच्या समाजात अशे भरपूर उदाहरणे आहेत.  महात्मा गांधी, बाबा आमटे विशेष करून असिसिचे संत फ्रान्सिस व अन्य संत हयांनी जीवनात देवाला दिलेल्या होकाराला मुळे कष्ट व विरोध सहन केले. आज आपण आपल्या जीवनात पाहिले तर जे लोक आपले दैनंदिन जीवन देवाला निसंशयसप्त  पणे प्रतिसाद म्हणून देतात; देव त्यांना शांती व आनंदाने भरतो.  
          दुर्दैवाने आजच्या ह्या आधुनिक जगात देवाची हाक कोणी ओळखत नाही व त्याला प्रतिसाद देत नाही. उलट बहुसंख्य लोक आज क्षणिक सुख देणाऱ्या वस्तू कडे जास्त आकर्षित होतात. आपणही बऱ्याच वेळी अशाच क्षणिक सुखाच्या मागे जातो.  नवनवीन फॅशन व गोष्टीच्या मागे जातो. अधिका अधिक संपत्ती व यश प्राप्त कसे करायचे ह्या स्पर्धेत आहोत. तरीही आज बरेच लोक यश व संपत्ती प्राप्त करून निराश का आहेत? तर ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपण आपली वाट भरकटलेले आहोत. देवाच्या योजनेला प्रतिसाद न देता आपण स्वतःचे  ऐकूण मनात येते तसे करतो.  देवाची वाट सोडल्या मुळे व आपल्या योजनेला प्राधान्य दिल्यामुळे आपण देवाच्या सुख-शांती, आनंद व प्रेमापासून वंचित झालो आहोत.
          आज हा नाताळाचा सण साजरा करताना आपणही दोन हजार वर्षापूर्वी जसे मरिया-जोसेफ व मेंढपाळानी देवाच्या हाकेला प्रतिसाद दिला त्याचप्रमाणे होकार देण्यासाठी आपल्या मनाची व ह्रदयाची तयारी करूया. बाळ येशूचे ज्यांनी दर्शन घेतले त्याची मन व हृदये आनंदाने भरले होते. आज पुन्हा एकदा बाळ येशू आपल्यासमोर त्याच्या प्रेमाचा व शांतीचा संदेश घेऊन आला आहे.  आपणही त्याच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव घेऊया व त्याच्या पाचारणाला व इच्छेला प्रतिसाद द्यायला तयार होउया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू तुझ्या प्रेमाने आम्हाला भरून टाक.

१. आज आपण पवित्र ख्रिस्त महासभेचे सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनी साठी प्रार्थना करूया की जसे बाळ येशू आज शांती व प्रेमाचा  संदेश घेऊन जन्माला आला आहे  तसेच आपणही त्याच्या  प्रेमाचा व शांतीचा संदेश जगात पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज आपण विशेष करून सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना करूया ज्या राष्ट्रांमध्ये युद्ध व अशांती आहे तेथील सर्व अधिकारी व पुढारी लोकांनी येशूच्या शांतीचा अनुभव घेऊन सतत शांती साठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आज आपण सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना करू या विशेष करून,  जे कुटुंब काही कारणास्तव विभक्त झाले आहेत अशा कुटुंबानी पवित्र कुटुंबाचा आदर्श घेऊन घरात शांतीचे वातावरण निर्माण करावे म्हणून आपण  प्रार्थना करूया.
४. जे कोणी जीवनात निराश आहेत, अशांती व अंधकारात आहेत त्यांनाही  बाळ येशूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व  त्यांचे जीवन आनंदाने भरावे तसेच त्यांच्या जीवनात बद्दल घडून यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आज आपल्या सर्वाना इथे जमले असताना बाळ येशूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व आपले जीवन संपन्न व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment