Reflection
for the Homily of Solemnity of Mary, Mother of God and of New
Year (01/01/2020) By: Br. Brian V. Motheghar
देवमातेचा
सोहळा
दिनांक: १/१/२०२०
पहिले वाचन: गणना: ६: २२-२७
दुसरे वाचन: संत पैलाचे गलितीकरांस पत्र: ४:४-७
शुभवर्तमान: लूक: २:१६-२१
प्रस्तावना:
“देव माते मारिया माते, अमूची तू
कैवारी.”
आज आपण नवीन वर्ष २०२० ह्याला सुरुवात करत आहोत. आजच्या दिवशी संपूर्ण
देऊळ माता आपल्या आईचा सोहळा साजरा करीत आहोत; म्हणजेच देव मातेचा सोहळा साजरा करत आहेत. त्याच
देव मातेला आपण आपले येणारे नवीन वर्ष समर्पित करून वर्षांची सुरुवात करूया.
जेणेकरून त्याच मातेचा वरदहस्त आपल्यावर सदैव असावा.
आजची उपासना आपल्याला देवाने दिलेल्या आशीर्वादा विषयी सांगत आहे. आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर इस्राएली
लोकांना म्हणजेच; निवडलेल्या प्रजेला त्याचा भव्य - दिव्य आशीर्वाद
देतो. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला देवाला अब्बा, बाप
या नावाने हाक मारायला हक्क प्रभू येशू द्वारे मिळाला आहे, ह्याविषयी
सांगण्यात आले आहे. त्याच प्रमाणे आजच्या शुभवर्तमानात आपल्याला संत लूक प्रभु
येशूचे पहिले साक्षीदार व सुवार्तिक; म्हणजेच 'पवित्र मरिया, संत योसेफ, व
मेंढपाळ' ह्यांच्या सुवार्तिक कार्याविषयी सांगत आहे.
आजच्या मिसाबलिदान सहभागी होत असताना, आपण प्रभूकडे प्रार्थना करूया की, हे नवीन वर्ष त्याच्या
मातेच्या मध्यस्थीने सुख - समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि एकमेकांवर परमेश्वराची दया, प्रेम,आणि स्नेह दाखविण्याचे
जावो.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: गणना: ६: २२-२७
पहिले वाचन: गणना: ६: २२-२७
प्रस्तुत उताऱ्यात देव
मोशे मार्फत इस्राएली लोकांना त्यांच्याच कुळातील एका जातीच्या लोकांना म्हणजेच; देवाने
आज्ञा केलेल्या आरोनचे वंशज त्यांना लेवी किंवा याजकपण बहाल करतो, व त्याप्रमाणे देवाच्या लोकांसाठी विपुल असा आशीर्वाद मिळावा म्हणून;
देवाजवळ प्रार्थना करत आहेत असे सांगितले आहे. याजकांनी देवाच्या
लोकांना कोणता आशीर्वाद द्यावा? याविषयी ही सांगण्यात आले
आहे.
आशीर्वाद हे देवाने केलेल्या कराराचे
प्रतीक होते. त्याद्वारे लोक देवाबरोबर एकनिष्ठ राहणार याची शाश्वती ते देत होते.
आब्राहमाद्वारे केलेल्या कराराची पूर्णता एक दिवस होणार. त्यावेळी या आशीर्वादाची
ही पूर्णतः होणार, असे सांगण्यात आले आहे. ह्या आशिर्वादाद्वारे
परमेश्वर सदैव त्यांच्या बरोबर असणार आहे, हा त्यांचा
विश्वास होता. म्हणून अहरोन देवाच्यावतीने त्यांना आशीर्वाद देतो; तो असा की, अडीअडचणीच्या
आणि दुःखाच्या वेळी देव त्यांचा सांभाळ करणार; त्याच्या
मुख प्रकाशाने ते कृपावंत होणार. त्यांच्यावर परमेश्वर प्रसन्नतेने पाहणार व
त्याद्वारे त्यांच्या जीवनात शांती प्रस्थापित होणार. त्याद्वारे
परमेश्वराचे नाव सदैव त्यांच्या ओठावर व त्यांच्यामध्ये रुतले जातील. अश्याप्रकारे
परमेश्वर त्याच्या जनतेला आणि लेकरांना आशीर्वादीत करणार.
दुसरे वाचन: संत पैलाचे गलितीकरांस पत्र: ४:४-७
परमेश्वराने अनेक रित्या मानवजातीच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न केला. त्याने सृष्टीद्वारे व संदेष्ट्यांद्वारे त्यांना आशीर्वादित केले. जगात पाप वाढल्यामुळे आशीर्वादाची जागा शापाने भरली व मानवजात ही शापाने ग्रासली गेली. परंतु दयाळू देवाने मानवा बरोबरचा संबंध कधीही दुरावला नाही तर तो त्यांच्याबरोबर सदैव राहिला. काळाची पूर्तता होताच जुन्या करारात भाकीत केल्याप्रमाणे; त्याने आपला एकुलता एक पुत्र मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या रुपाने, पवित्र मरियेच्या उदरी आशीर्वाद म्हणून पाठविला. येशू मानवी रुपाने मानवाच्या तारणासाठी आला. जेणेकरून मानवाचा मानवा बरोबरचा व देवा बरोबरचा संबंध दृढ व्हावा व एकजुटीने, एका आवाजात देवाला आब्बा, बापा या नावाने हाक मारण्यास शिकवले. देव बापाने पुत्राच्या सामर्थ्याने गुलामगीरीचे राज्य नष्ट करून, पुत्राचे राज्य अस्तित्वात आणले. अशाप्रकारे पवित्र मरीयेच्या उदरी जन्मलेला येशू लोकांसाठी आशीर्वाद म्हणून या भुतलावर उतरला.
शुभवर्तमान: लूक: २:१६-२१
शुभवर्तमानकार संत लूक आपल्याला आजच्या शुभसंदेशात येशू जन्माची पुनरावृत्ती करत आहे. देवदूताने दिलेल्या संदेशाप्रमाणे मेंढपाळ, घाईघाईने गाईच्या गव्हाणीत गेले. त्यांना मार्गदर्शन केल्याप्रमाणे पवित्र मरिया, योसेफ व बाळ येशू त्यांच्या नजरेस पडले. येशूच्या दर्शनाने मेंढपाळ आशीर्वादित झाले व त्याचे गुणगान गाऊ लागले.
देवाच्या तारणदायी कार्यात पवित्र मरिया ही अग्रस्थानी आहे; हे आपल्याला दिसून येते. कारण पवित्र मरीयेच्या एका होकाराने देवाचा जन्म
ह्या भूतलावर संभव झाला. तिच्या जीवनात घडलेल्या अनेक प्रसंगाविषयी
व अनुभवाविषयी तिने ह्या सर्व गोष्टी आपल्या हृदयात साठवून ठेवल्या. तेच अनुभव व प्रसंग प्रभू मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना
त्यांचे सांत्वन करण्यासाठी व एकजुटीने राहण्यासाठी आशीर्वादाचे
प्रतीक बनावे म्हणून ती ते त्यांना व्यक्त करत असे.
सुंता करणे हे
अब्राहमाद्वारे केलेल्या कराराचे बाह्यरूप होते (उत्पत्ती १७:१२; लेविय १२:३) त्याद्वारे बाळाला नाव दिले जात
असे. येशू हे नाव इब्री भाषेत यहोशुआ (Joshuah) म्हणजेच
'सर्वसमर्थ देव रक्षण करतो' असे आहे. मत्तय १:२१ मध्ये ह्याचाच अर्थ योसेफाला स्वप्नात सांगितलेला आहे. ह्या सर्व गोष्टींची पूर्णता येशू जन्माने
आपल्यामध्ये झालेली आहे.
बोधकथा:
एकदा एक मनुष्य नौकाभंगामुळे एका बेटावर एकटा अडकलेला होता. त्याने त्याच्या परीने कितीतरी प्रयत्न केले, दुसऱ्यांना इशारा करून त्याच्याकडे बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणीही आले नाही. काही दिवस लोटल्यानंतर त्याने आपल्या उपजीविकेसाठी काही साधन व एक छोटीशी झोपडी बांधली व तो तिथे राहू लागला. उपजीविकेच्या अभावामुळे तो काही तरी शोधण्यास गेला असता; त्याला आढळले की त्याची झोपडी आगीने पेट घेत होती, ती जळून राख झाली होती. तो त्या रात्री देवावर क्रोधीत झाला होता. कारण त्याला वाटले की देवाने आपले वाईटच योजिले आहे. त्याच रागाने तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जहाजाच्या आवाजाने तो मनुष्य उठला. आश्चर्याने त्याने ते जहाज आपल्या जवळ येताना पाहिले. आश्चर्यचकित झालेल्या मनुष्याने जहाजाच्या मालकाला विचारले की, "तुम्हाला कसे काय ठाऊक की मी इथे आहे?" तेव्हा जहाजाच्या मालकाने त्याला उत्तर दिले की, "आम्ही धुराच्या इशाऱ्याने इथे आलो आणि आम्हाला समजले के कोणी तरी संकटात आहे. म्हणून आम्ही आलो." तेव्हा त्या माणसाला कळून चुकले की, जे काही होते ते सर्व भल्यासाठी होते. तो देवाचे आभार मानू लागला, कारण देवाने त्याच्यावर कृपादृष्टीने पाहिले होते.
बोध:
देवाची योजना ही मानवी योजना व विचारा पलीकडे आहे. कारण देव जे काही करतो ते मानवाच्या भल्यासाठी करतो व आपल्याला आशीर्वादाने भरून टाकतो.
मनन-चिंतन:
आज आपण पवित्र मरिया देव माता किंवा देवाची माता हा सोहळा साजरा करीत आहोत. पवित्र मरिया ही देवाची माता हे शीर्षक इ.स. ४३१ येथे घडलेल्या एफेसूस म्हणजेच वर्तमान काळात तुर्कस्थान ह्या ठिकाणी भरलेल्या परिषदेत देण्यात आले होते. याचा अर्थ असा की, पवित्र मरिया ही प्रभू येशूची आई; जो जगाचा तारणारा झाला, जो देवपुत्र होता, त्याची आई असे आहे. हा सन्मान मानवी योजने पलीकडे होता. तो खुद्द देवाने तिला बहाल केला आहे. जे मानवाला शक्य नाही ते देवाला आहे, असे आपल्याला ह्यावरून आढळते. ज्याप्रमाणे मारियेने गायिलेल्या स्तोत्र गीतात ती म्हणते, "देव जो माझा तारणारा; त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे; कारण 'त्याने' आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे." (लूक १:४७-४८) कारण देव तिला विसरला नाही; तर तिचा सन्मान केला आहे. जी आपल्या मधली साधीसुधी स्त्री होती तिला त्याने आशीर्वादित केले व महान केले आहे. कारण जुन्या करारात घडलेल्या सर्व गोष्टी म्हणजेच; देवाने निवडलेल्या प्रजेबरोबरचा संवाद, अब्राहमाला पाचारण, इजिप्त देशातून पलायन, याजकाची नेमणूक व त्यांचा भव्यदिव्य आशीर्वाद, हे सर्व देवाच्या अनंत आशीर्वादासाठीची जी योजना होती की प्रभु जन्माने पूर्णत्वास येणार होती. प्रभू येशूने मानवी रूप धारण केले की, त्याद्वारे तो आपल्याला आपल्या देव त्याच्याबरोबर एकनिष्ठ ठेवील. आपला देवा बरोबरचा संबंध अजून कनिष्ठ करणार. हे सर्व अस्तित्वात आणण्यासाठी देवाने एका साध्याभोळ्या मानवाची निवड केली. जेणेकरून जी परमेश्वराने भाकीत केलेली सर्व आश्वासने व आशीर्वाद मरियेद्वारे, ह्या भूतलावर पूर्णत्वास आली आहेत. मारियेच्या एका होकाराने हे शक्य झाले, "पहा मी प्रभूची दासी आहे; आपण सांगितल्या प्रमाणे माझ्या ठायी होवो." (लूक १:३८) त्याच क्षणी तिच्यामध्ये प्रभू येशूचा गर्भसंभव झाला. देवपुत्र तिच्या उदरी राहिला. ह्याचा पुरावा आपल्याला गाब्रियल देवदूताने केलेल्या अभिवादनात आढळते, "हे कृपा पावलेल्या स्त्रीये कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर आहे." (लुक १:२८) ह्याचा अर्थ असा की, ती देवाच्या पूर्ण घनिष्ठ मैत्रीत होती. देवाचा आशीर्वाद व वरदहस्त तिच्यावर होता. त्याने त्याचे मुख तिच्यावर प्रकाशित केले होते.
पुढे आलीशीबा मरीयेला "स्त्रियांमध्ये तू धन्य." (लूक १:४२) असा
आशीर्वाद देते; म्हणजेच देव तिच्याबरोबर आनंदित होता. ह्याच
कारणासाठी तिला निष्कलंक ठेवले होते. ती संपूर्ण मानवजातीतून निवडलेली होती.
जेणेकरून ती संपूर्ण मानवजातीची माता व संपूर्ण सृष्टीची माता म्हणून गणली जावी. या
दैवी प्रेमी कृपेद्वारे व अनुग्रहाद्वारे जगाचा तारणारा ह्या भूतलावर जन्माला आला.
आज आपल्या मानवजातीला मारियेच्या ह्या उत्कृष्ट उदाहरणाद्वारे नवीन स्थान प्राप्त
झाले आहे. तसेच अलौकिक स्तिथी ही आपल्याला देण्यात आली आहे; ते
म्हणजे आपण देवाची मुले म्हणून संबोधले जाते. देवाची प्रजा ह्यावरून आपण देवाची
मुले असे आपणाला देऊ केले आहे. कारण ख्रिस्त आपला बंधू व त्याच्या राज्याचे
वारसदार म्हणून आपण ओळखले जाते.
आजच्या ह्या आभार
बलिदानात आपण देवाचे आभार मानूया की, मारिये द्वारे मिळालेल्या
कृपादनांनी आम्हाला सुद्धा तीच कृपादाने मिळाली आहेत. देवाची माता होऊनही ती
सुद्धा आमची ही माता आहे. तिच्याकडे मध्यस्थीची प्रार्थना करू या की, माते ह्या जगात तिच्या मध्यस्थीशिवाय आमच्या जीवनाचा मार्ग सिद्ध होत
नाही. तिच्याकडे विनवणी करू या की, तिच्या प्रार्थनेने
आम्हाला स्वर्गात जाण्याचे मार्ग मोकळे व्हावेत व तिच्या मायेच्या पंखाखाली सतत
आमचे संरक्षण करावे म्हणून गाऊया: “तुझ्या मायेच्या पंखा खाली, आश्रय दे आम्हां
आई, आश्रय दे आम्हां.”
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: 'हे देवा ह्या नवीन वर्षात आम्हाला आशीर्वादित कर.'
१. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमचे
परमगुरु, महागुरु, धर्मगुरु, व व्रतस्थ यांना ख्रिस्तसभा योग्य मार्गाने चालविण्यासाठी आणि अखील जगात
आशीर्वादाचे प्रतीक होण्यासाठी लागणारी कृपा व शक्ती त्यांना प्राप्त व्हावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तू
जीवनाचा दाता व त्राता आहेस. ह्या नवीन वर्षात आम्हाला सर्वांना चांगले आरोग्य
प्राप्त व्हावे व देवाने आम्हाला सर्वांना आशीर्वादित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. देव मातीच्या मध्यस्थीने आम्ही अनाथ, निराधार,
परक्या, आणि पोरकयांसाठी आशीर्वाद मागतो. आमच्या दानशूर वृत्तीमुळे त्यांचे जीवन सदोदित आशीर्वादमय
व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.
४. ह्या नवीन वर्षात नवीन जीवनाची सुरुवात
करण्यास व नाविन्याने जीवन देव सेवेसाठी समर्पित करण्यास लागणारे कृपा-वरदान
आम्हाला प्राप्त व्हावे म्हणून, आपण प्रार्थना करूया.
५. ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा आपल्या मनात
बाळगून आहेत,
अशांवर देवाचा आशीर्वाद यावा व त्यांना मातृपद प्राप्त व्हावे
म्हणून, आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक,
व सामाजिक गरजा प्रभू चरणी समर्पित करूया.
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete