Tuesday, 17 December 2019


Reflection for the Homily of Fourth Sunday of Advent (22-12-2019) By Br. David Godinho






आगमन काळातील चौथा रविवार


दिनांक: २२/१२/२०१९
पहिले वाचन: यशया ७:१०-१४
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १:१-७
शुभवर्तमान: मत्तय १:१८-२४





विषय: इम्मानुएल’ देव आम्हां बरोबर.

प्रस्तावना:
          आज आपण आगमन काळातील शेवटचा; म्हणजेच चौथा रविवार साजरा करीत आहोत. येशू ख्रिस्ताच्या जन्मावर मनन चिंतन करण्यास देऊळमाता आपणास बोलावीत आहे. कारण दिवस समीप येत आहेत. आपण ख्रिस्तजयंती साजरी करणार आहोत.
          आजची तिन्ही वाचने ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आम्हां मध्ये देव’ ह्या सुवार्तेविषयी सांगत आहे. सुमारे ७५० (साडेसातशे) वर्षापूर्वी यशया संदेष्टयाने प्रभू ख्रिस्ताच्या जन्माविषयी भाकीत केले होते. तसेच संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की, ज्या सुवार्तेविषयी शास्त्रात पूर्वीच सांगितलेले होते ती सुवार्ता प्रभू येशू ह्याच्याविषयी आहे. शुभवर्तमानात पुन्हा एकदा संत मत्तय येशू ख्रिस्ताच्या जन्माचे वर्णन करून सांगतो की, प्रभूने संदेष्टयांद्वारे केलेले ‘इम्मानुएल’ चे भाकीत ख्रिस्ताच्या येण्याने पूर्ण झाले आहे.
          आगमन काळातील ह्या शेवटच्या रविवारास ‘प्रेमाचा रविवार’ असे ही संबोधले जाते. कारण हा रविवार आपणास देवाच्या प्रेमाची आठवण किंवा जाणीव करून देतो. प्रभू येशूचा जन्म आपणास परमेश्‍वरी प्रेमाची आठवण करून देतो. ह्या प्रेमळ देवाची शुभवार्ता (सुवार्ता) आपल्या कृतीद्वारे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी कृपा परमेश्वराजवळ मागूया व सर्वांना देवप्रितीचा ओलावा देऊया.
 सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ७:१०-१४
          राजा आहाजने इ.स.पूर्व. ७३५ पासून ते ७१६ मध्ये यरुशलेमवर राज्य केले. तो चांगला राजा नव्हता. परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले नव्हते ते केले (२ राजे. १६:२) आणि म्हणून देवाने त्यास अरामी लोकांच्या राजाच्या हाती दिले. त्यांनी त्यास जिंकून पुष्कळ लोक दिमिष्कास नेले (२ इति. २८:५) आणि मदतीसाठी परमेश्वराकडे न वळता राजा आहाज असीरिया कडे गेला. तेव्हा संदेष्टा यशया त्यास असिरियावर नव्हे, तर परमेश्वरावर विश्वास ठेवण्यास सांगितले.
          यशया प्रवक्त्याने एवढे सुद्धा राजाला सांगितले की, “जर राजाने परमेश्वराजवळ कोणतीही चिन्हे मागितले तरी परमेश्वर त्यास ती देईल” असे आश्वासन दिले. (यशया ७:१०) परंतु आहाज म्हणाला, “मी ते मागणार नाही, आणि परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. (यशया ७:१२) प्रत्यक्षात हा त्याचा प्रतिसाद म्हणजे; दैवी मदतीस दिलेला नकार होता. कारण त्याला असीरियाची मदत नाकारायची नव्हती. म्हणून दैवी योजना स्वीकारण्यास तो तयार नव्हता. म्हणून खुद्द परमेश्वर त्यास एक चिन्ह देतो. (यशया ७:१४) ही एक सर्वात विशेष असे जुन्या करारातील भविष्यवाणीपैकी एक भविष्यवाणी किंवा भाकीत होय.
दुसरे वाचन; रोमकरांस पत्र १:१-७
          संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात तो स्वतःस सुवार्तेकरिता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास म्हणून संबोधतो.(रोम. १:१) मी जी सुवार्ता घोषविणार आहे, ती प्रभू येशूच्या जन्माविषयीची आहे, ती म्हणजे देवाचा पुत्र मानवी देह धारण करून ह्या भूतलावर अवतरला. ह्या देव पुत्राला अनुसरण्यास आणि त्याचे सुवार्तिक होण्यास प्रत्येकाला पाचारण केलेले आहे. असे संत पौल त्याच्या पत्रातून आपणास बोध करत आहे.
शुभवर्तमान: मत्तय १:१८-२४
          मत्तयच्या शुभवर्तमानातून घेतलेल्या ह्या उताऱ्यात आपणास आढळते की, परमेश्वराचा दूत, लुकच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे मरीयेला संदेश देण्याऐवजी योसेफच्या स्वप्नात येऊन ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता घोषवितो. कारण येशू हा दाविदाच्या कुळातील आहे, हे दाखविण्याचा ह्या मागचा मत्तयचा हेतू होता. ह्याचा अर्थ असा नव्हे की, मत्तय स्त्रियांना कमी महत्त्व देतो. कारण प्रभू येशूच्या वंशावळीत आपण पाच स्त्रियांची नावे वाचतो. ती म्हणजे तामार, राहाब, रुथ, बेथशेबा आणि मरिया. अशाप्रकारे योसेफला ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा देऊन, पुन्हा एकदा मरियेला आपली पत्नी कशी घेऊन देवाच्या तारणाच्या योजनेत सहभागी केले.
मनन चिंतन:
          ‘आगमन काळ’ हा तयारीचा काळ म्हणून ओळखला जातो. ही तयारी ख्रिस्ताच्या येण्यासाठीची तयारी होय. ह्या आगमन काळाच्या शेवटच्या रविवारी आजची उपासना आपणा समोर परमेश्वराच्या येण्याविषयी, किंबहुना त्याची आपल्यामध्ये असलेल्या उपस्थिती विषयी सांगत आहे. हा परमेश्वर कोठे दूर आकाशात राहणारा परमेश्वर नाही; परंतु एका हाकेच्या अंतरावर असलेला देव आहे. कारण यिर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकात आपण वाचतो की, परमेश्वर म्हणतो, “मला हाक मार; म्हणजे मी तुला उत्तर देईन.” (यिर्मया ३३:३) तसेच इस्रायल प्रजेचा हाच अनुभव होता, ते म्हणतात, “कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो, तेव्हा तो आमच्या जवळ असतो. त्याच्या सारखे, देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?” (अनुवाद ४:७) शेवटी आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे हा परमेश्वर ‘इम्मानुएल’ म्हणजे आमच्या सानिध्य देव असा आहे. (यशया ७:१४, मत्तय१:२४)
ईश्वराचा शब्द झाला माणूस ||
जना मध्ये वास त्याने केला ||
          ह्या सुंदर अशा गीताच्या ओवी आजच्या उपासनेचा सारांश आपल्यासमोर ठेवतात. आजची तिन्ही वाचने आपणास ह्याच गोष्टीची आठवण करून देतात. तसेच आजची उपासना आपल्यासमोर तीन गोष्टी ठेवत आहेत.
१) परमेश्वर त्याच्या वेळेनुसार त्याचे वचन पूर्ण करतो.
           सुमारे इ.स.पूर्व. साडेसातशे वर्षांपूर्वी परमेश्वराने यशया संदेष्ट्याद्वारे एक अभिवचन दिले होते की, ‘एक कुमारी गर्भवती होऊन, पुत्र प्रसवेल.’ ते वचन देवाचं किंवा ती भविष्यवाणी साडेसातशे वर्षानंतर प्रभू येशूच्या येण्याने पूर्ण झाली आहे. तसेच जेव्हा लाजारस मरण पावला होता, तेव्हा प्रभू येशू त्याच्या थडग्याजवळ चार दिवसानंतर पोहोचतो, आणि लाजारस मेलेल्यातून उठवितो. (योहान ११:३९-४४) म्हणजेच मनुष्याच्या योजनेनुसार नव्हे, तर देव त्याच्या योजनेनुसार व वेळेनुसार सर्व गोष्टी पूर्ण करीत असतो. म्हणून देवाच्या योजनेस आपण सतत तयारीत राहणे फार गरजेचे आहे. विशेषतः जेव्हा आपली आशा-निराशा होते, तेव्हा देवावर विश्वास किंवा श्रद्धा ठेवणे फार महत्वाचे आहे. कारण असे म्हणतात,
 “भगवान के घर मे देर है, अंधेर नही|
२) परमेश्वर त्याची योजना पूर्ण करण्यास मानवाची निवड करत असतो.
          आपण आताच ऐकलं की, नाझरेथ गावातील मरियेची परमेश्वराने त्याच्या पुत्राची आई होण्यास निवड केली होती. अनेक अशा कुमारीका नाझरेत गावात राहत होत्या, परंतु परमेश्वराने मरियेची निवड केली व योसेफास सुद्धा मरियेचा पती व ख्रिस्ताचा पिता होण्यास निवडले होते. तसेच सुवर्तिक होण्यासाठी पौलाची निवड केली होती. अशा प्रकारे अनेक अशा व्यक्तींची परमेश्वराने त्याची योजना पूर्ण करण्यास निवड केली होती. काही व्यक्तींची यादी मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो:
          रुथ विधवा होती, एस्थेर परदेशी स्त्री होती, पेत्र कोळी होता, थोमा संशयी होता, सारा असहनशील होती, मोशेने खुन केला होता, योना परमेश्वरापासून दूर पळाला होता, पौल खुणी होता, अब्राहम वयस्कर होता, आणि मरिया कुमारी होती. सर्वांजवळ काही ना काही निमित्त होते. आज परमेश्वर आपणा प्रत्येकास त्याची सुवार्ता पसरविण्यासाठी पाचारण करीत आहे, त्याच्या योजनेला होकार देण्यास आपण तयार आहोत का? असा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण वर दिलेल्या उदाहरणाद्वारे आपल्या लक्षात येईल की, परमेश्वराच्या योजना आपल्या आकलना पलीकडे असतात. त्या आपल्याला बहुतेक वेळी समजत नाहीत. अशा वेळी, ह्या सर्व व्यक्तीप्रमाणे व विशेषतः मरिये व योसेफ प्रमाणे विश्वासाने देवाच्या योजनेस होकार देणे गरजेचे असते.
३) वैवाहिक जीवनात मरिया व योसेफचा आदर्श.
          तिसरी गोष्ट म्हणजे योसेफ व मरिया आपणासमोर वैवाहिक जीवनाचा आदर्श ठेवत आहेत. ज्याप्रमाणे मरिया व योसेफने परमेश्वराच्या इच्छेस त्यांच्या जीवनात प्राधान्य दिले. त्यांनी एकमेकाला मरेपर्यंत साथ दिली, व एक सुखी, शांततामय व प्रार्थनामय कुटुंब घडवून आणले. त्याचप्रमाणे देवाच्या आज्ञेत राहून प्रत्येक पती-पत्नीने एक आदर्श कुटुंब घडविण्याचा प्रयत्न करण्यास आजची उपासना आपणास पाचारण करत आहे. अनेक वेळा जेव्हा कुटुंबात संशयाचे, अशांततेचे, निराशेचे, प्रसंग उद्भवतात; तेव्हा परमेश्वराच्या योजनेस प्राधान्य देण्यास, त्याच्या योजनेची ओळख करण्यास, पवित्र कुटुंब आपणासमोर आदर्श ठेवत आहे.
          शेवटी देव हा प्रभू येशूच्या रूपाने आपल्यामध्ये हजर आहे. त्याने युगाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक दिवस आपल्या सोबत असण्याचे अभिवचन दिलेले आहे. (मत्तय २८:२०) तर त्या ख्रिस्तावरील आपली श्रद्धा दृढ होण्यासाठी आणि योग्य रीतीने त्या परमेश्वराच्या आगमनास आपण तयार असण्यासाठी परमेश्वराची कृपा मागूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू तुझ्या स्वागतासाठी आमची हृदये तयार कर.

१. आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु आणि सर्व व्रतस्थ ह्यांना प्रभूचा विपुल आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून जगाला ख्रिस्ताचा शुभसंदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. लवकरच आपण ख्रिस्त जयंती साजरी करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी योग्यरित्या मनाची व अंतःकरणाची आध्यात्मिक तयारी करावी आणि ख्रिस्त आपला तारणारा ह्याला आपल्या जीवनात स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. नव-विवाहित दांपत्यांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण फार वाढत आहे, अशा देवाविरोधक निर्णयाला परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा एकदा परमेश्वरामध्ये एक होऊन त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. पिक भरपूर आहे परंतू कामकरी थोडेच आहेतम्हणून मरीयेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन अनेक तरुण तरुणींनी ईश्वराच्या हाकेला प्रतिसाद देऊन प्रभूमळ्यात सेवा करण्यास स्व-ईच्छेने पुढे यावे, म्हणून आंपण प्रार्थना करूया.
५. आपला सर्वांचा देवावरील विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा व आपण सर्वांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून ख्रिस्त आपला तारणारा आहे ह्याची साक्ष आपण इतरांना दयावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक गरजा प्रभूचरणी मांडूया.

No comments:

Post a Comment