Reflection for the
Feast of Holy Family (29/12/2019) By Br. Suhas Fereira.
पवित्र
कुटुंबाचा सोहळा
दिनांक: २९/१२/२०१९
पहिले वाचन: बेनसिरा ३:२-६,१२-१४
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१२-२१
शुभवर्तमान: मत्तय २:१३-१५,१९-२३
विषय: “जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते, ते
कुटुंब एकत्र राहते.”
प्रस्तावना:
आज देऊळमाता
पवित्र कुटुंबाचा सोहळा साजरा करीत आहे. योसेफ आणि मरिया यांच्या जीवनवेलीवर
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ‘ख्रिस्त’
हे फुल उमटलेले आहे. योसेफ आणि मरिया दोघांच्याही प्रेमामध्ये प्रभू
येशू वाढत गेला. प्रभू येशूच्या जीवनाविषयी वाचल्यास आपणाला कळते की, प्रभू येशू हा फक्त योसेफ आणि मरियेच्या जीवनाचाच नव्हे; तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा, कुटुंबाचा
केंद्रबिंदू बनला आहे.
आपले कुटुंब
ही ख्रिस्त संस्काराची शाळा आहे. या शाळेत आपल्याला चांगल्या गुणांचे बाळकडू पाजले
जाते. आपल्या सामाजिक जीवनाची जडण-घडण ही प्रथमतः कुटुंबातच होत असते. जसे आपण
आपल्या कुटुंबांमध्ये घडविले जातो, तसेच पुढे जाऊन आपण समाजामध्ये वावरत असतो.
आज आपण या
मंदिरामध्ये एकत्रित जमलो असताना, आपण
सर्वांना देवाची भरपूर अशी कृपा लाभावी, तसेच एक पवित्र
कुटुंब म्हणून सर्वांनी एकोप्याने नांदावे आणि ख्रिस्ताच्या प्रेमाचा संदेश
इतरांना द्यावा म्हणून प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: बेनसिरा ३:२-६,१२-१४
आजच्या
पहिल्या वाचनामध्ये आपणास आपल्या आई-वडिलांविषयी आदर-सन्मानाने वागण्यासाठी सल्ला
दिलेला आहे. जे आपल्या आई-वडिलांना मानाने वागवतात व ज्यांच्यावर आपल्या
आई-वडिलांचा आशीर्वाद आहे, तेच खरे
श्रीमंत मनुष्य होत.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१२-२१
आजच्या
दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपणा सर्वांना प्रेमाने, मायेने, करुणेने,सौम्यतेने
वागण्यासाठी बोध करत आहे. कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीने इतरांना समजून घेऊन
एकमेकांशी सलोख्याने वागले पाहिजे, तसे केल्यानेच आपण
इतरांना ख्रिस्ती होण्याची शाश्वती देऊ शकतो.
शुभवर्तमान: मत्तय
२:१३-१५,१९-२३
आजच्या
शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो की, कशाप्रकारे
देवाच्या दूताने योसेफाला स्वप्नामध्ये संदेश दिला आणि मरिया व बाळ येशू ह्यांना
घेऊन इजिप्त देशामध्ये पलायन करण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा शास्त्रलेखात
लिहिल्याप्रमाणे योसेफ येशूला घेऊन पुन्हा गालीलात स्थिरावला.
बोधकथा:
एकदा एक धर्मगुरु एका
घरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेले होते. सुंदर, भव्य-दिव्य असा बंगला बघून धर्मगुरूंना अतिशय आनंद झाला. घरामध्ये
प्रार्थना करून धर्मगुरू लहान मुलांशी गप्पा-गोष्टी करू लागले. गप्पा-गोष्टी
करता-करता धर्मगुरूंनी सहजच लहान मुलाला प्रश्न विचारला, “हे
बाळा; तुला आई जास्त आवडते की बाबा?” त्यावर
मुलगा म्हणाला, “दोघेही नाही. मला तर आजी-आजोबा जास्त
आवडतात. परंतु मम्मी सांगते, आजी-आजोबाकडे जायचे नाही,
ते दोघे वृद्धाश्रमामध्ये चांगले राहतील. घरचं जेवण त्यांना पचत
नाही.” त्यावरून धर्मगुरूंना घरातील तालमोल बरोबर नसल्याच
समजलं आणि धर्मगुरूंनी मुलांच्या आई-वडिलांना मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामाचा
धडा शिकविला. तसेच घरात मोठ्या माणसांची सावली किती महत्त्वाची असते, हे ही पटवून सांगितले. त्यावर दोघांनीही धर्मगुरूंची माफी मागितली आणि
त्यांना त्यांची चूक समजली.
मनन चिंतन:
आई-वडिलांसारखं
जीवापाड प्रेम करणारे या जगात दुसरे कोणीही नसतात. रात्रीचे दिवस करून आपल्या
मुलाबाळांसाठी अतोनात कष्ट सहन करणाऱ्या ह्या आई-वडिलांच्या कौतुकाला बोल नाहीत.
आई-वडिलांविषयी जितके बोलावे तितके कमीच आहे. आई-वडील हे देवाचे रूप असते. असे
म्हणतात की, देव सर्वत्र हजर राहू शकत
नाही, म्हणून त्याने आई आणि वडील ह्यांची निर्मिती केली.
परंतु आज ह्या
दैवी प्रतिमेला फारसे महत्त्व उरले नाही. आज अनेक कुटुंबांमध्ये म्हाताऱ्या
आई-वडिलांकडे मुलांचे दुर्लक्ष होत चालले आहे. मुलांना त्यांचे आई-वडील ओझे बनलेले
आहेत. लग्न झालं की, बायकोच्या
विचारांना होकार देत नवरा आपल्या जन्मदात्या आई-वडीलांना शिवीगाळ करत घराच्या
बाहेर हाकलून देतो. कधी-कधी वृद्धाश्रमात एका कोपऱ्यात बसलेल्या त्या आईच्या
डोळ्यातील अश्रू पाहून रडायला येते. आज कितीतरी तरुण-तरुणी आपल्या स्वार्थापायी,
आपल्या स्वतःच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला आहे.
महिन्यातून एकदा तर सोडाच परंतू वर्षातून एकदा भेटण्यासाठी ही आजच्या पिढीकडे वेळ
नाही. पैसा, संपत्ती, जागतिक मोह
ह्यामध्ये आजची पिढी ही फारच भरकटून गेली आहे.
आपल्या
म्हातार्या आई-वडिलांची सेवा करणे, त्यांना मान-सन्मान देणे ह्या गोष्टीची आज अत्यंत गरज आहे. ज्याप्रमाणे
बिनसिराच्या पुस्तकामध्ये म्हटली आहे, “संपूर्ण मनाने तुझ्या
पित्याला मान दे, आणि आईने सोसलेल्या प्रसव वेदना विसरू नको,
त्यांनी तुला जन्म दिला आहे त्यांची आठवण ठेव.” (बेनसिरा ७:२७) प्रत्येक कुटुंब हे एक मंदिर असते. त्या मंदिरामध्ये आपल्या
वयस्कर व्यक्ती ह्या त्यात देवाचे रूप असतात. म्हणून त्यांचा मान राखणे, आदर, सन्मान करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. ह्या
मंदिरांमध्ये अहंकारापेक्षा नम्रतेला जास्त महत्व असते. आज सुखापेक्षा
आत्मत्यागाला जास्त किंमत असते. म्हणून अशा कुटुंबाचे महत्त्व लक्षात घेऊन अशा
कुटुंबांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे. ‘जसे आपण पेरणार तसेच उगवणार.’ आज जर आपण आपल्या
आई-वडिलांना घराबाहेर काढून टाकणार आहोत तर, उद्या आपली
मुलं-बाळं सुद्धा आपल्याला घराबाहेर काढून टाकणार.
आपण पवित्र
मरिया, जोसेफ व येशू ह्यांच्या पवित्र कुटुंबाकडे पाहिले
तर आपल्याला भरपूर काही शिकावयाला मिळते. ह्या कुटुंबांमध्ये शांती, प्रेम, सलोखा होता; कारण
त्यांनी देवाच्या इच्छेला प्रथम स्थान दिले होते. जेव्हा-जेव्हा त्यांच्यावर दुःख
प्रसंग आले, तेव्हा-तेव्हा त्यांनी देवाकडे प्रार्थना केली.
त्यामुळे त्यांच्यावर देवाची कृपा सदैव होती. फादर पेयटोन असे म्हणतात की,
“जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते, ते कुटुंब
एकत्र राहते.” आपणा सर्वांच्या कुटुंबामध्ये नित्यनियमाने
प्रार्थना व्हावी; तसेच आपणा सर्वांचे कुटुंब देवाचे
निवासस्थान बनावे, म्हणून आज आपण विशेष करून प्रार्थना
करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: ‘हे प्रभू तुझ्या पवित्र कुटुंबाचा आदर्श आम्हाला लाभू
दे.’
१. आपले परम-गुरुस्वामी, महा-गुरूस्वामी, कार्डिनल्स,
सर्वधर्मगुरू आणि व्रतस्थ; तसेच येशूची
सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे सर्व प्रापंचिक या सर्वावर प्रभूचा
आशीर्वाद राहावा व त्यांना त्यांचे काम व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरिता देवाची
कृपा नेहमीच लाभावी म्हणून प्रार्थना करूया.
२. इथे उपस्थित असलेल्या आपल्या
सर्वांच्या कुटुंबात शांती, प्रेम सतत
नांदावे तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर देवाचा आशीर्वाद नेहमी राहावा
म्हणून प्रार्थना करूया.
३. आपल्या घरात असलेल्या वृद्ध
आई-वडिलांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या आजारपणात त्यांना परमेश्वराच्या
कृपेने चांगेले स्वास्थ नेहमी लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
४. जे तरुण-तरुणी योग्य
साथीदाराच्या शोधामध्ये आहेत, त्यांना
योग्य अशा साथीदाराची जोड मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडा वेळ शांत राहून
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि
सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment