Friday, 30 October 2020


Reflections for the All Saints Day (01/11/2020) 

by Br. Julius Rodrigues

 

सर्व संत सोहळा

 

दिनांक: ०१/११/२०२०

पहिले वाचन: प्रकटीकरण ७:२-४, ९-१४

दुसरे वाचन: १ योहान ३:१-३

शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२अ

 

 

 

प्रस्तावना:

आज ख्रिस्त सभा सामान्य काळतील एकतिसावा रविवारी एक महत्त्वाचा सण साजरा करत आहे आणि तो सण म्हणजे सर्व संतांचा सण. संतांच्या जीवनाद्वारे आपल्याला येशूकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा होत असतो आणि म्हणूनच  ख्रिस्तसभा आज आपणास ही संधी प्राप्त करून देत आहे. पहिल्या वाचनात आपणास सांगण्यात येत आहे की देवाने त्यांच्या लोकांची निवड करून त्यांना शुभ्र, पावित्र्यचा झगा परिधान करण्यास दिला. तसेच दुसऱ्या वाचनात आपणास आठवण करून देण्यात येत आहे की, आपण देवाची मुले आहोत आणि जसा ख्रिस्त आहे तसेच आपण देखील आहोत. तर शुभवर्तमानद्वारे आपण आपल्या जिवनात कश्याप्रकारे आनंद प्राप्त करू शकतो किंवा मिळवू शकतो ह्याचे शिक्षण येशू देत आहे. जर आपण ही शिकवण अंगिकारली, तर आपण देखील त्या संतगणात सामिल होवु. ही शिकवण आपल्या जीवनात आपणांस पाळता यावी म्हणून लागणारी कृपा आणि शक्ती ह्या मिस्साबलिदानात मागुया.

 

पहिले वाचन: प्रकटीकरण ७:२-४, ९-१४

पहिल्या वाचनात संत योहान याने आपल्याला अखेरच्या दिवसातील देवाच्या लोकांचे दोन दृष्टांत सांगितले आहेत आणि आपणास एकाच गोष्टीची आठवण करून देत आहे आणि ती म्हणजे देव आपल्या लोकांवर आपला क्रोध आणत नाही, इज्राएल लोकांचा नाश होऊ नये म्हणून परमेश्वराने आपला देवदूत पाठवून त्यांचे संरक्षण केले आणि तोच परमेश्वर आपला पुढे देखील बचाव करणार आहे याची शाश्वती हे वाचन आपल्याला देते.

 

दुसरे वाचन: १ योहान ३:१-३

दुसऱ्या वाचनात योहान सांगत आहे की ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुले हे नाव देवाने दिलेले आहे आणि यावरून आपल्याला देवाची प्रीती ही किती महान आहे व किती श्रेष्ठ आहे याची प्रचिती होते. जेव्हा ख्रिस्त स्वतः प्रकट होईल, तेव्हा देवाची मुले बदलली जातील त्यांच स्वरूप बदलेल. ख्रिस्ताला खुद्द पाहून हा बदल त्यांच्यात दिसून येईल याची महती आपल्याला या ठिकाणी दाखवून देण्यात येत आहे.

 

शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२अ

आजच्या शुभवर्तमानाला ‘डोंगरावरील प्रवचन’ या नावाने देखील ओळखले जाते. आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपल्याला खरा आनंद काय आहे आणि कशात आहे हे संत मत्तय सांगत आहे. जर आपण ह्या सांगितलेल्या गोष्टीचे पालन आपल्या जीवनात केले, तर आपल्याला अध्यात्मिक प्रतिफळे मिळणार आहेत. आणि अश्या रीतीने आपण देवाशी अगदी जवळ जाऊ शकतो. संत मत्तयं येशू ख्रिस्ताने सांगितलेले आठ धन्यवाद या ठिकाणी नमूद करत आहे.

 

मनन चिंतन:

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्तसभा सर्व संतांचा सण साजरा करीत आहे. आजचा दिवस हा आनंदाचा आणि सौभाग्याचा आहे. प्रत्येक पिढीने ख्रिस्तसभेला अनेक संत दिलेले आहेत. ज्याद्वारे ख्रिस्तसभेमध्ये संतांची जणू आकाशगंगाच तयार झाली आहे. ख्रिस्तसभेच्या नियमावलीनुसार संतांना the venerable आदरणीय, the beatified परमानंदीय आणि the canonized संत अश्या तीन विभागात मांडणी केली आहे, ज्याद्वारे आपल्याला ख्रिस्ती जीवन जगण्याचे मार्गदर्शन लाभते. आपण सर्वजण परमेश्वराने बनवलेले नमुने आहोत. परंतु संत म्हणजे परमेश्वराचे उत्कृष्ट अअसे नमुने आहेत. संत अगस्तीन म्हणतात, to fall in Love with God is the greatest romance, to seek Him is the greatest adventure and to find Him is the greatest achievement.” “देवावर प्रेम करणे म्हणजे सर्वोत्कृष्ट प्रणय होय, त्याला शोधणे म्हणजे सर्वोत्कृष्ट साहस आणि तो सापडणे म्हणजे सर्वात मोठे यश होय.”

सर्व संतांमध्ये आपल्याला देवाची एक वेगळीच झलक पहायला मिळते. एक वेगळी वृत्ती, एक वेगळं धाडस, एक वेगळं साहस आणि जगावेगळा दृष्टिकोन अशा अनेक सद्गुणांची जोपासना आपल्याला प्रत्येक संतांमध्ये जाणवते. प्रत्येक संत हा प्रभूच्या प्रेमासाठी व्याकूळ असलेला आपल्याला जाणवते. प्रत्येक संताने आपले जीवन हे देवाच्या प्रेमाखातर व्यक्त केले आहे. आज आपण फक्त त्याच संतांचा सण साजरा करीत नाही ज्यांची नावे आपण वारंवार ऐकत असतो किंवा ज्यांची नावे ठळक अक्षरांमध्ये लिहिली गेली आहेत. उदा. संत फ्रांसिस, संत अगस्तीन, संत मदर तेरेसा संत गोन्सालो गार्सिया किंवा संत पोप जॉन पॉल दुसरे, परंतु आपण सर्व संतांना आहुती वाहतो, ज्यांची नावे कुठेही नमूद केलेली नाहीत. परंतु ते स्वर्गामध्ये परमेश्वराबरोबर जल्लोष करत आहेत. अशी कितीतरी माणसे होऊन गेली जे आपलं जीवन परमेश्वराच्या नियमानुसार जगून इतरांसाठी व्यथित केलं. परंतु त्यांचं नाव कुठेही नमूद करण्यात आलेले नाही. आपल्यातील शुद्धतेची जाणीव हेच ईश्वराचे रूप आहे. याचा साक्षात्कार सगुणोपासतेतून, निरुगुणाकडे गेल्यावर संताना झाला. म्हणूनच असे म्हटले आहे की, “संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे येथे” म्हणजेच संताच्या संगतीने ईश्वरदर्शन होते. अखंड आनंदाची अवस्था म्हणजेच ईश्वर दर्शन, आत्मज्ञान, ज्ञानदीप होय. 

प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले आजचे पहिले वाचन आपणा सर्वांस सांगत आहे की, परमेश्वर हा प्रजेचा पाठिराखा आहे. कितीही संकटं, दुःखे, कष्ट सोसावी लागली, तरी तो परमेश्वर आपल्यावर मरणाची वेळ आणू देणार नाही; किंबहुना तो आपला तारक बनेल, आपले संरक्षण करेल आणि आपल्याला शुद्ध करून एक नवीन जीवन देईल. ह्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आज आपणास सांगत आहे की, जरी आज जगावर करोना विषाणूचे संकट उद्भवले असले, तरी भिऊ नका, विश्वासू रहा कारण तुमचे तारण करावयास मी येईन. तुम्हाला नवजीवन मी देईन. मी माझ्या देवदूतांना तुमच्यासाठी पाठविन.

त्याचप्रमाणे दुसऱ्या वाचनात संत योहान आपणास ‘आपण कोण आहोत?’ याची जाणीवकरून देत आहे. आपण सर्वजण ‘देवाची मुले’ आहोत हीच आपली खरी ओळख आहे. परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याची मुले म्हणून संबोधले आहे आणि म्हणून आपल्या प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी आहे, ती म्हणजे देवाच्या वचनाचं पालन करून ते अंगीकारणे आणि एक पवित्र जीवन जगून, संतासारखे धार्मिक मार्गावर चालून दुसऱ्यांना दर्शवून देणे की, खरोखरच मी देवाचा पुत्र किंवा कन्या आहे. ‘भविष्यात आपले काय होईल याची आपणास कल्पना नाही’, असे आवाहन आपणासमोर संत योहान पुढे ठेवत आहेत. कारण कोणाला मोजता येणार नाही असा मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व लोकसभेसमोर उभा राहिलेला योहानाच्या दृष्टीस पडला. हा मोठा लोकसमुदाय म्हणजेच आज सर्व "संतगण" देवाची लेकरे यांनी आपले कपडे कोकराच्या रक्तात घेऊन शुद्ध केले आहेत. याचा अर्थ असा होतो की, ज्या लोकांनी आपल्या जीवनातील सर्व संकटावर मात करून विजय मिळवला आहे, त्याच संताचा सण आज आपण साजरा करीत आहोत.

शुभवर्तमानदेखील आपणास हेच सांगत आहे की, रोजच्या जीवनात परमेश्वराने दिलेल्या आज्ञा आपण पाळल्या आणि त्याच्या शिकवणुकीनुसार जर आपण वागलो, तर नक्कीच आजच्या ह्या संतांच्या सणांमध्ये आपणही एक दिवस सहभागिता दर्शवू शकतो आणि हीच अपेक्षा आज परमेश्वर आपणा सर्वांकडून ठेवत आहे. शेवटी ह्या उपासनेद्वारे आपल्याला तीन गोष्टीची आठवण करून देण्यात येत आहे आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यास आजची उपासना आवर्जून आपणास सांगत आहे:

१) आपला परमेश्वर हा आपला पाठीराखा आहे. २) आपली देवाची मुले म्हणून गणती झालेली आहे. ३) प्रत्येक जण संत होण्यासाठी योग्य व पात्र आहे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा दया करून तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

. आपले परमगुरु फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांना देवाचे वचन अधिकारवाणीने सांगता यावे त्यासाठी त्यांनी चिंतन करावे म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.

. संतांचा आशीर्वाद आपल्या सर्वावर येऊन आपण आपले जीवन पवित्र, शुद्ध, करून वाईट जीवन सोडावे म्हणून परमेश्वराकडे विनवणी करूया.

. आपल्या पॅरिशमधील जे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, दुःखात आहेत, जीवनाला कंटाळलेले आहेत अशा सर्व लोकांवर प्रभूचा आशीर्वाद यावा आणि त्यांना लवकरात लवकर या सर्व त्रासातून मुक्तता मिळावी व नवीन जीवन जगण्याचा मार्ग दिसावा म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

. आपल्या देशातील धार्मिक, राजकीय व सामाजिक प्रश्नावर सखोल चिंतन व्हावे विधायक मार्ग शोधण्यासाठी सर्वस्तरावर चांगला सुसंवाद घडावा म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.

. आपण प्रत्येक जण देवाची मुले आहोत ह्याचे स्मरण करून आणि त्याप्रमाणे सतत एक सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न आपल्याकडून व्हावा म्हणून आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

६. आज संपूर्ण विश्वात ज्या लोकांना करोना विषाणूने पछाडलेले आहे आणि त्यामुळे ते आजारी झालेले आहेत अशा सर्व लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हावा व त्यांना लवकरात लवकर देवाच्या मध्यस्थीने बरे होता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.


Wednesday, 21 October 2020

    Reflections for the 30th Sunday in Ordinary Time (25/10/2020) by Fr. Suhas Pereira 




सामान्य काळातील तिसावा रविवार

 


दिनांक: २५/१०/२०२०

पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६

दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस १:५-१०

शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०  



प्रस्तावना:

          प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वराने नियमशास्त्राद्वारे दिलेल्या सर्वात महत्वाच्या आज्ञेवर मन चिंतन करून ती आज्ञा आपल्या जीवनात पाळण्याचं आवाहन करत आहे. नियमशास्त्रातील सर्वात महत्वाची आज्ञा आहे: प्रभु तुमचा देव याजवर प्रीति करा. तुम्ही त्याजवर पूर्ण हृदयाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने प्रीती करा.’ आणि  ‘जशी आपणावर तशी इतरांवर प्रीति करा. एक बायबलपंडित हेनरी हम्मान या आज्ञेबद्दल सांगतात की, प्रभू येशूने देवप्रीती ही शेजारप्रीतीपासून वेगळी केली नाही; कारण शेजारप्रीतीचा उगम देवप्रीतीमध्ये होतो आणि शेजारप्रितीशिवाय देवप्रीती अशक्य आहे.  देवप्रीती आणि शेजारप्रीती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे आहेत. शेजारप्रीती आणि देवप्रीती हे प्रेमाचे दोन पैलू आहेत आणि नियमशास्त्रातील सर्व आज्ञा या पैलूंवर आधारित आहेत. आजची तिन्ही वाचने आपल्याला हेच सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

 पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६

          आजचे पहिले वाचन आपणास सांगते की, इस्रायली लोकांनी एकमेकांबरोबर आणि खास करून गरीब, गरजू आणि समाजातील दुबळ्या लोकांबरोबर प्रेमाचे संबंध आणि नाते स्थापन केले होते. या गरीब लोकांमध्ये युद्ध, पीडा किंवा दुष्काळ यासारख्या परिस्थितीमुळे ज्यांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले होते, तसेच आपला देश सोडून आलेली बेघर लोकसुद्धा होती. परमेश्वर इस्रायली लोकांना आठवण करून देतो की, इस्रायली लोकसुद्धा मिसर देशात बेघर आणि परके होते. परंतु परमेश्वराने त्यांचा सांभाळ केला. आता नियमशास्त्र सांगते त्याप्रमाणे इस्रायली लोकांनी समाजातील गरीब आणि परक्या लोकांना मदत करणे, अनाथ आणि विधवांची काळजी घेणे ही त्यांची नैतिक जबादारी आहे. त्या जबाबदारीची आठवण परमेश्वर त्यांना करून देतो. परमेश्वर इस्रायली लोकांना सांगतो की जर त्यांनी त्याच्या आज्ञांचे पालन केले तर त्यांना परमेश्वराचा आशीर्वाद लाभेल.

 दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस १:५-१०

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलनीका येथील भाविकांना ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास सांगत आहे. पहिल्या शतकातील थेस्सलनीकाचे ख्रिस्ती भाविक मुख्यत: मूर्तिपूजक शहरात राहत असत. परंतु ख्रिस्ती विश्वासात जगण्याचा त्यांचा उत्साह इतका प्रचंड होता की हे भाविक आपल्या उत्साहाने इतरांना ख्रिस्ताकडे आकर्षित करु शकले. म्हणूनच, प्रभूच्या शेजारप्रीती आणि देवप्रीतिची आज्ञा पाळल्याने इतर लोकांवर झालेल्या सकारात्मक परिणामाबद्दल पौल थेस्सलनीकाकरांचे अभिनंदन करतो.

 शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०  

          शास्त्री आणि रुशी हे येशूच्या शिकवणुकीविरुद्ध होते. त्यामुळे प्रत्येक वेळेला येशूला नियमशास्त्रासंबंधित आणि कायद्यासंबंधित वेगवेगळे प्रश्न विचारून ते येशूला आपल्या पेचात पाडण्याचा आणि आपल्या विळख्यात पकडण्याचा प्रयत्न करीत. आजच्या शुभवर्तमानातसुद्धा आपण वाचतो की परूश्यानी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला: गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा सर्वांत महत्त्वाची आहे?” येशू अनेकदा लोकांच्या प्रश्नांची उत्तरं प्रतिवादाद्वारे किंवा स्वत: एक प्रश्न विचारून देत असे. पण या प्रकरणात तो सरळ उत्तर देतो. येथे त्याने दोन आज्ञा एकत्रित करून त्यांच्या प्रश्नाला त्वरित उत्तर दिले. त्याने त्यांना सांगितले: “तुम्ही आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने आणि संपूर्ण मनाने प्रीति करा.” ख्रिस्ताचे उत्तर एकदम स्पष्ट होते की, देवावरील प्रीति आणि शेजारप्रीतिची आज्ञा जुन्या कराराचा सार आणि नवीन कराराचा आधार आहे.

 मनन-चिंतन:

          एक यहुदी तत्वज्ञानी मार्टिन बुबर यांनी आपल्या डायलॉजिकल प्रिन्सिपलया पुस्तकात लिहिले आहे कीशेजाऱ्यांमध्येपरमेश्वराचे दर्शन आपल्याला होते. हे खरोखर बायबलमधून आपल्याला ठाऊक असल्यासारखेच एक विधान मार्टिन बुबरने केलेले आहे: माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.” (मत्तय २५, ४०)

          प्रेम म्हणजे काय. करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात प्रेम हे सहनशील, दयाळू आणि नम्र म्हणून वर्णन केले आहे. कारण ते बढाई मारत नाही. मत्तयच्या शुभवर्तमानात (मत्तय २२, ३४-४०) येशू सांगतो की, प्रेम हे आपल्या सर्व कृत्यांचं मूळ असलं पाहिजे आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे जीवनाचा गाभा बनलं पाहिजे. खरं पाहता प्रभू येशू परुशाच्या प्रश्नाचं उत्तर देऊन सांगत नाही की अमुक-तमुक आज्ञा ही सर्वात महत्वाची आज्ञा आहे. येशू हा परुशांना अपेक्षित असं उत्तर देत नाही. त्याऐवजी येशूला असं  सांगायचं होतं की, प्रत्येक आज्ञेला प्रेमाच्या दृष्टिकोनातूनच महत्व प्राप्त होते. प्रेमरूपी (देवप्रीतीचा, शेजारप्रीतीचा आणि स्व:प्रीतीचा) चष्मा डोळ्यांवर घालूनच नियमशास्त्रातील आणि संदेष्टयांनी दिलेल्या सर्व आज्ञांचा खरा अर्थ आपण लावू शकतो.

          आज प्रेम या शब्दाचा आपल्या समाजात बहुतेक वेळा अनर्थ केला जात आहे. प्रेम या शब्दाचं मूल्य त्याद्वारे कमी आणि हळूहळू नष्टसुद्धा होत आहे. या गोष्टीला आपण कारणीभूत अहोत. अनेक वेळा आपण प्रेमाबद्दल बोलतो आणि वाचतो परंतु खऱ्या अर्थाने प्रेम कृतीत आणणे आपल्याला अवघड जाते. म्हणूनच ख्रिस्त आज आपल्याला आजच्या शुभवर्तमानद्वारे खऱ्या प्रेमाचा, ख्रिस्ती प्रेमाचा अर्थ सांगत आहे. आणि प्रेमाचं आपल्या मानवी जीवनातील ऱ्हास पावत चाललेलं महत्व प्रेमाला परत देण्यासाठी आमंत्रण देत आहे. ख्रिस्त ज्या प्रेमाचा संदेश आपल्याला देतो, त्या प्रेमाची काही वैशिष्ठये आहेत:

 ) ख्रिस्ती प्रेम हे सार्वत्रिक आहे. याचा अर्थ असा की, ख्रिस्ताची प्रेमाची आज्ञा आपल्याला फक्त आपल्या कुटुंबावर आणि स्नेह्यांवर आणि आप्तेष्टांवरच प्रेम करायला सांगत नाही तर, इतर लोकांना आणि खास करून गरजू, गरीब व्यक्तींना आपले बंधू-भगिनी मानण्यास आमंत्रण देते. येशूने सांगितलेल्या दयाळू शोमरोनी मनुष्याच्या दाखल्यात (लूक १०, २५-३७) आपल्याला या वैशिष्ठ्याचं दर्शन होतं.

) ख्रिस्ती प्रेमाचे दुसरं वैशिष्ठय म्हणजे, ख्रिस्ती प्रेम हे एक प्रमाण किंवा मापक आहे ज्याच्या आधारे आपल्या ख्रिस्ती जीवनाची पारख आणि पडताळणी केली जाईल. आपण प्रेमाबद्दल किती चांगलं बोललो किंवा किती मोठी कामं आपल्या जीवनात केली आणि काय साध्य केला त्याद्वारे परमेश्वर आपला न्याय करणार नाही, तर आपण आपल्या जीवनात ख्रिस्ताची प्रेमाची आज्ञा किती आणि कशी पाळली त्यावर आधारित आपला न्याय होईल.

) ख्रिस्ती प्रेमाचं तिसरं  वैशिष्ठय म्हणजे, देवप्रितीशिवाय शेजारप्रीती नाही. ख्रिस्ती प्रेम केवळ दान करण्यापुरते मर्यादित असू शकत नाही. देवप्रेमसुद्धा आवश्यक आहे आणि म्हणूनच येशू म्हणतो, पहिली आणि सर्वात महत्वाची आज्ञा म्हणजे देवावरचे प्रेम. देवप्रीती ही शेजारप्रीतीचा उगम आहे, शेजारप्रीतीचं मूळ आणि शेजारप्रीतीसाठी लागणारी शक्ती आहे.

          जनसेवा ही ईशसेवेपासून म्हणजेच परमेश्वरी उपासना आणि परमेश्वराच्या आराधनेपासून विभक्त केली जाऊ शकत नाही. जो कोणी असे करतो तो, शेजारप्रीतीसाठी लागणारं शक्तोस्रोत बंद करतो. जेथे-जेथे प्रार्थना आणि उपासनेद्वारे देवप्रीतिची जोपासना होत नाही, तेथे-तेथे शेजारप्रीतीसुद्धा हळू-हळू कमी होत जाते आणि तिचं महत्व आणि मूल्य कमी होत जातं. देवप्रितीशिवाय शेजारप्रीती आपली प्रेरणा गमावून बसेल आणि लवकरच फक्त आणि फक्त सुंदर शब्दांपर्यंत मर्यादित होईल. कृत्याविना शब्द हे व्यर्थ आणि अप्रभावी आहेत हे आपल्या सर्वाना चांगलं ठाऊक आहे. परंतु खरी शेजारप्रीती ही वेगळीच असते.

          अस्सीसीचा संत फ्रान्सिस, संत व्हिन्सेंट दे पॉल, मदर तेरेसा  ह्या अशा व्यक्ती होत्या की त्यांनी फार मोठे आणि जगाला प्रभावित करणारी प्रवचने आणि शब्द आणि अलंकार त्यांच्या संभाषणात वापरले नाहीत. तरीसुद्धा ह्या व्यक्ती प्रार्थनामय आणि देवाशी अतूटपणे जुडलेल्या व्यक्ती होत्या. ह्या सर्वानी आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी इतरांमध्ये आपला शेजारी ओळखला, आपला गरजू बंधू, आपली पीडित भगिनी ओळखली आणि त्यांच्या सेवेद्वारे खरा शेजारधर्म पाळला. कारण ते संत पौलसारखं सांगू शकले, की ख्रिस्ताचे प्रेम आम्हाला भाग पाडते ( करिन्थिकरांस , १४). ख्रिस्ताचे प्रेम हे आमचे प्रमाण आहे.

          देवप्रीती आणि शेजारप्रीती क्रुसाच्या दोन खांबाप्रमाणे आहेत. उभा खांब हा आपल्या देवावरील प्रेमाचे आणि देवाबरोबर असलेल्या आपल्या नात्याचे चिन्ह आणि आडवा खांब हा आपलं लक्ष आपल्या शेजाऱ्याकडे, इतरांकडे वेधून घेतो आणि आपल्याला जणू सांगतो की शेजारप्रितीशिवाय देवप्रीती ही व्यर्थ आणि निर्जीव आहे. आपण क्रूसाचे दोन खांब एकमेकांपासून विभक्त करू शकत नाहीत. कारण जर सं झाल, तर क्रूस क्रूस राहत नाही. त्याचप्रमाणे आपण प्रभुने आजच्या शुभवर्तमानात दिलेली आणि देव आणि मनुष्याला जोडणारी प्रेमाची श्रेष्ठ आज्ञा तोडू किंवा विभक्त करू शकत नाहीत. यासंदर्भातसुद्धा आपण येशूचे शब्द आठवू शकतो, कीजे देवाने एकत्र केले आहे, मनुष्याने वेगळे करु नये” (मत्तय १९, ).

          आजच्या समाजात प्रेम या शब्दाचा दुरुपयोग होऊन या शब्दाचं महत्व आणि मूल्य कमी होत आहे. जर आपल्या प्रेमाचं रूपांतर ख्रिस्ताच्या प्रेमाच्या प्रतिमेत होऊ शकलं, तर प्रेमाला पुन्हा त्याचं महत्व आणि मूल्य प्राप्त होऊ शकतं. जर आपलं प्रेम दोन्ही दिशा ओळखू शकलं, तरचं ते खरं, ख्रिस्ती आणि ख्रिस्ताच्या प्रेमासारखं होऊ शकतं. त्या दोन दिशा आहेत: देवाकडे दर्शविणारी दिशा आणि मानवाकडे दर्शविणारी दिशा.

          आपल्याला ख्रिस्ताने आजच्या शुभवर्तमानात दिलेल्या श्रेष्ठ आज्ञेचा खरा अर्थ समजावा आणि आपणसुद्धा आपल्या जीवनात देवप्रीतीचा आणि तितकाच शेजारप्रीतीचं किंवा जनसेवेचा ध्यास घ्यावा म्हणून प्रभू परमेश्वराची कृपा आणि सहाय्य  मागू या.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो, आम्हाला प्रेमळ बनव.

) आपले परमगुरु फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी, व्रतस्थ आणि ख्रिस्तसभेच्या कार्याची धुरा स्वीकारलेल्या सर्वानी प्रभूची देवप्रीती आणि शेजारप्रीतिची आज्ञा समजून आपल्या जीवनाद्वारे आणि कार्याद्वारे या प्रेमाच्या आज्ञेची शिकवणूक इतरांना द्यावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू या.

 ) आपल्या समाजातील आणि कुटुंबातील ज्या व्यक्ती आजारी आहेत तसेच सर्व कोरोनाग्रस्तांना प्रभुने स्पर्श करावा आणि त्यांना बरे करावे म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू या.

 ) कोरोना साथीच्या रोगामुळे अनेक लोक बेघर, निराधार झाली आहेत आणि अनेकांची नोकरी गेल्यामुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची उपासमार होत आहे. प्रभूच्या शेजारप्रीतिची शिकवणूक आपल्या आचरणात आणून आपल्याला सुद्धा अशा लोकांना आपल्या परीने होईल, तितके सहाय्य करण्यास प्रभूची कृपा आणि प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

 ) कोरोनाला आळा घालण्यासाठी लागणाऱ्या औषधावर संशोधन करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांना आणि वैद्यांना त्यांच्या प्रयत्नात प्रभूचे सहाय्य आणि लवकरच यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

 ) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक सामाजिक गरजा आपण प्रभुचरणी मांडूया.