Thursday, 25 February 2021

       Reflection for the Homily of 2nd Sunday of Lent (28/02/2021) By Br. Aaron Lobo


प्रायश्चित काळातील दुसरा रविवार

दिनांक: २८/०२/२०२१

पहिले वाचन: उत्पत्ती २२:१-२,९-१३,१५-१८

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३१-३४

शुभवर्तमान: मार्क ९:२-१०





“देवाची वाणी ऐकणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जगणे.”

प्रस्तावना:

          आज आपण प्रायश्चित्त काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आब्राहमला, देव स्वदेश सोडून एका अनोळखी, नव्या जागेवर जायला सांगतो. जेणेकरून तो सर्वांसाठी देवाशीर्वाद बनेल. त्याच्याद्वारे इतरांचे कल्याण होईल. आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की प्रभूच्या रुपांतरणाच्या वेळेस दैवी वाणी झाली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याचे तुम्ही ऐका.” आज आपणाला ख्रिस्तसभा प्रभूची वाणी ऐकून त्याचे अनुकरण करण्यास पाचारण करत आहे. कारण जो कोणी त्याची वाणी ऐकतो तो खडकावर घर बांधणाऱ्यासारखा आहे, असे खुद्द प्रभू येशूख्रिस्त आपणास सांगतो (मत्तय ७:२४). याकोबाचे पत्र १:२२ मध्ये संत याकोब म्हणतो, “त्याची वाणी फक्त ऐकू नका तर अनुकरण करा.” जशी संत फ्रान्सिस असिसीकराने देवाला विचारलं की, “प्रभू मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”  आणि प्रभूची वाणी ऐकून त्याप्रमाणे आपलं जीवनाचारण ठेवलं, त्याच प्रमाणे आपण ही प्रभूची वाणी ऐकुया आणि त्याचे अनुकरण करू या.

पहिले वाचन: उत्पत्ती २२:१-२,९-१३,१५-१८

आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, परमेश्वर आब्राहामास इसाकाचा बळी देण्यास सांगतो. आब्राहाम देवाची आज्ञा पाळतो आणि त्याने सांगितल्या प्रमाणे इसाकाचा बळी देण्यास तयार होतो. परमेश्वर आब्राहामाची महान निष्ठा व विश्वास पाहून प्रसन्न होतो व देवदूताला पाठवून आब्राहामाला त्याच्या मुलाचा त्याग करण्यापासून थांबवितो व वचन देतो कि, तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी व समुद्रातील वाळू इतकी मी करीन.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३१-३४

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास परमेश्वराचे प्रेम हे ख्रिस्तामध्ये आहे, असे सुचवतो. परमेश्वराचे दैवी प्रेम हे येशू ख्रिस्ताच्या मानवी रुपात आपणास दिसून येते. दैवी प्रेमाचे हे नाते अतूट आहे व कुठली ही शक्ती आपल्याला त्याच्यापासून दूर करू शकत नाही.

शुभवर्तमान: मार्क ९:२-१०

आजच्या शुभवर्तमानात आपण येशू ख्रिस्ताच्या रुपांतराबद्दल ऐकतो. ह्या घटनेद्वारे येशू ख्रिस्ताची खरी ओळख, त्याची पवित्रता व त्याचा महिमा जाहीर होतो. ख्रिस्ताचे रुपांतर त्याचे भावी दुःख व त्याचा गौरव ह्या दोघांमधील दुवा आहे.

मनन चिंतन:

इस्त्राएल लोकांना समजले की बलिदान करणाऱ्याच्या रक्ताने पापांबद्दल प्रायश्चित करून आणि अपराध्याला किंवा पाप्याला शुद्ध करून तुटलेला दैवी-मानवी नातेसंबंध पुनर्वसीत होतो. देवाने अब्राहामाला महान बलिदान देण्यासाठी सांगून त्याची परीक्षा घेतली, परंतु तो खचून नं जाता, देवाला शरण जाऊन, त्याचा विश्वास  दृढ व्हावा यासाठी प्रयत्न करतो. आब्राहामाच्या विश्वासाला आणि आज्ञाधारकपणाला उत्तर म्हणून देवाने त्याला इसाहाकाचा त्याग करण्यापासून रोखले. देवाने येशूला ताबोर पर्वतावर एक भव्य बळी म्हणून सादर केले. येशू असहाय्य व दयनीय पीडित नाही, तर देवाने पाठविलेला, दैवी वस्त्र परिधान केलेला, वचन दिलेला आणि भविष्यवाणी केलेला मसीहा आहे, हे त्याने आपणास कळवावे अशी त्याची इच्छा आहे. येशू हा देवाचा प्रिय पुत्र आहे. इसाहाकाच्या जागी वेदीवर अर्पण केलेला कोकरा ख्रिस्तामध्ये वधस्तंभावर चढलेला आहे. त्याचे रक्त आणि त्याचे मरण हे आपल्या शुद्धीचे आणि पुनरूत्थानाचे प्रवेशद्वार बनले. आज, येशू ‘देवासमोर आपल्यासाठी मध्यस्थी करतो’. तो परमेश्वराने आपल्या पापांसाठी दिलेला यज्ञ आहे. परमेश्वर आपल्यासाठी आहे आणि येशू आपल्या बाजूने आहे या जाणिवेपासून शक्ती व धैर्य मिळविण्यासाठी संत पौल आपणास आमंत्रित करतो. आपण देवाचे निवडलेले या नात्याने त्याच्याशी  विश्वासू राहिल्यास, तो आपल्या सर्व शत्रूंचा नाश करील. प्रायश्चित्त, काळ हा आपणा स्वतःला वधस्तंभावर खिळून प्रभू येशूच्या बलिदानाची फळे परिपूर्ण प्रमाणात प्राप्त करण्यास योग्य काळ आहे, कारण जेव्हा तो आपल्याला निरागस किंवा निर्दोष ठरवितो तेव्हा कोणीही आपल्याला दोषी ठरवू शकत नाही.

          गेल्या रविवारच्या उपासनेत आपण प्रभू येशूच्या मोहांविषयी ऐकलं. आपल्याला झालेल्या सर्व मोहांवर प्रभू येशूने मात केली. त्याच्या ह्या विजयाने आज आपण त्याचे ताबोर पर्वतावर रुपांतर पाहतो. प्रायश्चित काळ आपल्यालाही प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास आमंत्रण करत आहे. प्रार्थना, उपवास व दान-धर्म ह्या शस्त्रांद्वारे आपण सुद्धा आपल्या जीवनातल्या मोहांवर मात केली पाहिजे व पापांच्या मार्गावर न चालता आपल्याही जीवनाचे रुपांतर केले पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या जवळ येण्यास आम्हांला सहाय्य कर.

१. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरु व धर्म-भगिनी व सर्व प्रापंचिक ह्यांनी त्यांच्या कार्याद्वारे प्रभू येशूची खरी ओळख संपूर्ण जगाला करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. ह्या उपवास काळात सर्व भाविकांनी अतिशय पवित्र जीवन जगावे व प्रभूच्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. दयाळू प्रभो आजच्या प्रभूरुपांतर सणाच्या दिवशी आमच्या हृदयाचे व मनाचे परिवर्तन कर. जेणेकरून, आम्ही तुझे कार्य पसरविण्यासाठी सदैव झटावे म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थना करतो.

४. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सदैव नांदत रहावे व आपण प्रभूच्या प्रेमाने भरून जावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.

५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. 

Thursday, 18 February 2021

         Reflection for the Homily of 1st Sunday of Lent (21/02/2021) By Br. Brijal Lopes 



प्रायश्चित काळातील पहिला रविवार

दिनांक: २१-०२-२०२१

पहिले वाचन: उत्पती ९:८-१५

दुसरे वाचन: १ पेत्र ३:१८-२२

शुभवर्तमान: मार्क १:१२-१५



प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा प्रायश्चित काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास पापमार्ग सोडून पवित्र जीवन जगण्यासाठी बोलावीत आहे. आजची तिन्ही वाचने आपणास प्रायश्चित संस्काराद्वारे आपले जीवन किती मौल्यवान बनते ह्याची आठवण करून देत आहे. जीवन शुद्ध व निरागस ठेवण्यासाठी आपण देवाच्या अधिकाअधिक जवळ यावे व देवाच्या प्रेमाचा, दयेचा व शांतीचा अनुभव घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

पहिले वाचन: उत्पती ९:८-१५

          आजच्या पहिल्या वाचनात देवाशी मानवाने केलेला आज्ञाभंग व बेईमानी व यांचा विपरीत परिणाम मानवी अस्तित्वावर कसा होतो, ह्याचा बोध आपणास होत आहे. महाप्रयलाची कथा सांगण्यामागचा हेतू म्हणजे परमेश्वराची दैवी दया व क्षमा. मानव पापी व दृष्ट बनला होता. पापी जीवन संपुष्टात आणण्यासाठी देवाने महाप्रयलाद्वारे सृष्टी नष्ट केली पण नोहा व त्याच्या कुटुंबाचा निष्पाप व देवभिरू स्वभाव  पाहून देवाने त्यांना वाचवले व नवजीवन दिले.

दुसरे वाचन: १ पेत्र ३:१८-२२

          देवाने मानवाच्या तारणाची केलेली योजना आजच्या वाचनात आपणास दिसून येते. देवाने आपल्या एकलुत्या एका पुत्राला ह्या धरतीवर पाठविले व तो आम्हासारखा मानव झाला. दुखःसहन, यातना व मरण सहन करून त्याने आपणास सार्वकालिक जीवन बहाल केले ह्यावर मनन चिंतन करण्यास संत पेत्र आपणास सांगत आहे.

शुभवर्तमान: मार्क १:१२-१५

          “पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा” हे ख्रिस्ताच्या जीवनाचे सार होते. पापापासून मुक्ती मिळविणे व देवाच्या सानिध्यात परत येण्यासाठी आपणास येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानाद्वारे सांगत आहे.

मनन चिंतन:

          थॉमस नावाचा एक गृहस्थ होता. तो एका व्यसनी वृत्तीने किंवा वाईट संगतीने जीवन जगत होता. मादक पदार्थाच्या सेवनाने तो पूर्णपणे बिघडला होता. त्यात तो एका खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात शिक्षा भोगत होता. एक दिवस असे झाले की, तो अंथरुणावर पडला असताना वाईट संगतीने व वाईट कृत्यांनी त्याच्या जीवनावर किती वाईट परिणाम झाला होता हे त्याला कळायला लागले. त्याला त्याचं फार दुःख वाटू लागले व त्यात त्याला प्रार्थना करण्याची इच्छा झाली. त्याने सर्वप्रथम गुडघे टेकले व प्रार्थना करू लागला. त्याच्या हृदयात असलेल्या सर्व गोष्टी तो देवाला सांगू लागला. त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा व ज्या गोष्टींची कमतरता होती, ते सर्व काही तो मुक्तपणे बोलत होता. एवढी वर्षे आपण काहीच चांगलं कार्य केले नाही त्यामुळे तो ढसाढसा रडू लागला. त्याला जाणवत होते की देव आपल्याबरोबर आहे पण मी देवाबरोबर नाही. आजच्या शुभवर्तमानात प्रभू आपणास सांगत आहे की, “पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.” आपण नम्र बनुन पश्चाताप करण्यास तयार आहोत का? आजच्या शुभवर्तमानात दोन ठळक मुद्दे आहेत.

          पहिला मुद्दा म्हणजे बदल: आपल्या जीवनाचा कायापालट करणे. पापी मार्ग सोडून पवित्र जीवन जगणे. आपल्या जीवनात स्वार्थ व गर्व ह्यांना स्थान न देता आपल्या पापाची जाणीव ठेवून, प्रायश्चित स्वीकारून देवाला शरण जाणे गरजेचे आहे. ह्या दृष्ट व पापी जीवनावर भर न देता त्याहून अधिक चांगले जीवन जगता येईल ह्यावर मनन चिंतन करावयाचे आहे.

          दुसरा मुद्दा म्हणजे सुवार्तेवर विश्वास ठेवणे: येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे आणि तो आपणास जीवन देण्यासाठी आलेला आहे ह्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. प्रायश्चित संस्काराद्वारे क्षमा व शांती मिळवून ख्रिस्ताकडे जाणे किंवा त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. आपल्या जीवनातील पापी वृत्ती ओळखून देवाकडे मदतीची धाव घेतली पाहिजे. देवाने त्याचा एकलुता एक पुत्र जगाच्या उद्धारासाठी समर्पित केला कारण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन लाभावे (योहान:३:१६). पाप्यांना तारण देण्यासाठी ख्रिस्त ह्या जगात आला. उपवास काळ आपणास स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते ज्याद्वारे आपण आपल्या जीवनाचे आध्यात्मिक बदल घडवून आणतो व आपण एक सुंदर व पवित्र जीवन जगतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आमचे आध्यात्मिक नुतनीकरण घडवून आण.

   १. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स व सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांना देवाने त्यांच्या कार्यात मदत करावी व त्यांच्याद्वारे ह्या उपवासकाळात देऊळमातेचे आध्यात्मिक नुतनीकरण घडवून यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. जे भाविक देवापासून दूर गेले आहेत, व्यसनाच्या आहारी गेले आहेत, एकाकी आहेत, मोह पाशात अडकलेले आहेत अशा सर्वांना परमेश्वराने धैर्य व शक्ती द्यावी व ह्या सर्वांतून बाहेर येण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. कोविड १९ च्या महामारीपासून आपणा सर्वांचे रक्षण व्हावे व जे ह्या आजाराने ग्रासलेले आहेत अशा सर्वांना परमेश्वराने बरे करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे व आपणा सर्वांना पर्यावरणाची नितांत गरज आहे. ह्या पर्यावरणाचे संरक्षण करण्यास व त्याचा बचाव करण्यास आपणास प्रेरणा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. परमेश्वराची दया व क्षमा आपणास मिळावी व आपणा सर्वांना देवाच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.




Monday, 15 February 2021


 Reflection for the Ash Wednesday (17/02/2021) By Br. Brian Motheghar.   





राखेचा बुधवार



 

दिनांक:१७/०२/२०२१

पहिले वाचन: योएल २:१२-१८

दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:२०-६:२

शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८

 



विषय: उपवासकाळ - अध्यात्मिक जीवनाचे नुतनीकरण

 

प्रस्तावना:

          आजपासून ख्रिस्तसभा आपल्याला नवीन जीवनाची सुरवात करण्यासाठी आमंत्रण करीत आहे. प्रायश्चित काळ किंवा उपवास काळ हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील महत्वपूर्व काळ आहे. या काळात आपण आपल्या पापमय जीवनाचा त्याग करून देवाच्या अधिक जवळ येण्यास प्रयत्न करत असतो. प्रायश्चित काळ किंवा उपवास काळाची सुरुवात राखेच्या बुधवारी राख कपाळावर फासून होते. हा चाळीस दिवसांचा आध्यात्मिक प्रवास आहे व तो पुनरुत्थानाच्या दिवशी समाप्त होतो. ह्या चाळीस दिवसाच्या कालावधीत खिस्तसभा आपल्याला योग्य असा वेळ देऊन आपल्याला आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभूकडे परत येण्यास संधी देत असते. येशूने सुद्धा ४० दिवस उपवास केला व सैतानाच्या मोहाचा सामना केला. उपवास काळाचा उगम इtheच आहे. या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आपण ४० दिवसाचा उपवास काळ पाळतो व पुनरुत्थानाची तयारी करत असतो. आज आपण आपले आत्मपरीक्षण करून अंत:करण शुद्ध करण्यास व पवित्र जीवन जगण्यास आणि ह्या प्रायश्चित काळात पात्र होण्यास देवाने आपणाला उपवास व दानधर्म करण्यास शक्ती द्यावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण विशेष प्रार्थना करूया. 

 

प्रायश्चित काळाची पार्श्वभूमी:

१)   उपवासकाळ कोणकोणत्या नावाने ओळखला जातो?

सहा आठवड्यांच्या या काळाला उपवासकाळ, प्रायश्चित काळ आणि स्थानिक भाषेत कोरेज्मा ह्या नावांनी ओळखले जाते. तसेच इंग्रजी भाषेत Lent हा शब्द हया काळासाठी वापरला जातो. प्रत्येक शब्दामागे एक पार्श्वभूमी दडलेली आहे.

अ) उपवासकाळ:  हया काळात उपवासाला अत्यंत महत्वाचे स्थान देण्यात आलेले असल्यामुळे त्याला उपवासकाळ असे म्हणतात. मराठी भाषेत या शब्दाची फोड पुढील प्रमाणे: ‘उप’ म्हणजे जवळ आणि ‘वास’ म्हणजे वस्ती. उपवास काळ हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा किंवा त्याच्या सहवासात राहण्याचा काळ असतो.

ब) प्रायश्चित्तकाळ: या काळामध्ये ज्या विविध प्रकारांची आध्यात्मिक साधना केली जाते तिच्यामागे भाविकांमध्ये पापांबद्दल प्रायश्चित्त घेण्याची भावना व पर्यायाने पश्चाताप करण्याची इच्छा दडलेली असते. त्यामुळे या काळाला प्रायश्चित्तकाळ म्हणतात.

क) कोरेज्मा: हा पोर्तुगीज शब्द असून, तो लॅटीनमधील क्वाँँड्राझिंटा (Quadraginta) या शब्दावरून आलेला आहे. त्याचा अर्थ 'चाळीस दिवसांचा कालावधी असा आहे.

ड) लेन्ट: जुन्या इंग्रजीमधील लेन्टेन ह्या शब्दाचा अर्थ वसंत ऋतू असा होतो. त्याचाच धागा पकडून उपवासकाळ हा अध्यात्माचा वसंतऋतू आहे असे उदगार संत महंतांनी काढलेले आहेत.

२)   उपवासकाळाचा मुख्य हेतू काय असतो?

प्रभूच्या पुनरुत्थानाची सणाची पूर्वतयारी करणे हा उपवासकाळाचा मुख्य हेतू असतो. तसेच आपल्या आध्यात्मिक व सामाजिक जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे ह्या उपवास काळाचे मुख्य हेतू आणि ध्येय ख्रिस्तसभा आपल्या समोर मांडत असते.

३)   उपवासकाळ हा चाळीस दिवसांचाच का असतो?

जसजसा ख्रिस्तसभेचा प्रसार झाला तसतसे नवनवीन प्रश्न उपस्थित झाले. त्यापैकी एक प्रश्न होता उपवासकाळ किती दिवसांचा असावा? हा प्रश्न इ. स. ३२५ साली नायसिया येथे झालेल्या विश्वपरिषदेमध्ये हाती घेण्यात आला व त्या ठिकाणी ४० या आकड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (नायसिया परिषद कॅनन ५). ४० हा आकडा ठरविताना बायबलमधील नोहाच्या काळातील चाळीस दिवसांचा जलप्रलय (उत्पत्ती ७:१२), मोशेचे सिनाय पर्वतावरील चाळीस दिवस (निर्गम २४:१८), इस्राएली लोकांची अरण्यातील चाळीस वर्षे (गणना ३३:३८), एलीया संदेष्ट्याने होरेब (म्हणजेच  सिनाय) पर्वताच्या दिशेने केलेला चाळीस दिवसांचा प्रवास (१ राजे १९:८), योना संदेष्ट्याने निनवेच्या लोकांना पश्चात्ताप करण्यासाठी दिलेला चाळीस दिवसांचा अवधी (योना ३:४) आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येशूने अरण्यात केलेला चाळीस दिवसांचा उपवास (मार्क १:१३) इत्यादींचा आधार घेतला गेला. ह्या चाळीस दिवसांची सुरुवात राखेच्या बुधवारी होत असते व इस्टरच्या जागरण विधीने त्याचा समारोप केला जातो.

४)   उपवासकाळात ख्रिस्ती चर्चमधील वातावरण कसे असते?

उपवासकाळ हा आपल्या पापांबद्दल प्रायश्चित्त घेण्याचा असल्यामुळे त्यासाठी आवश्यक ते वातावरण ख्रिस्ती मंदिरांत तयार केले जाते. ह्या दिवसांत देवळात फुले ठेवली जात नाहीत. उपासनेतील गायनात “परम ईशाला” हे स्तुतिगीत , “आल्लेलया” हा जयघोष वगळला जातो. गायनातील स्वर करुणरसाने भरलेला असतो. ह्या काळात देवळातील इमाजीपुढे मेणबत्त्या लावू नयेत असा प्रघात आहे कारण सर्व लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनावर असावे अशी ख्रिस्तसभेची धारणा आहे. येशूच्या दुःखसहनाची आठवण करून देणारी क्रुसाच्या वाटेची भक्ती वेदीसाठी आणि धार्मिक विधीसाठी वापरण्यात येणारी जांभळी वस्त्रे संध्याकाळची जादा प्रवचने (पास) आणि वैयक्तिक पापनिवेदन या घटकांमुळे देवळातील वातावरण अधिक गंभीर व गडद बनत जाते. ही वातावरणनिर्मिती भाविकांमध्ये केवळ अपराधीपणाची भावना निर्माण व्हायला नको तर पूर्ण पश्चात्तापाद्वारे जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केली जाते.

५)   उपवासकाळात क्रुसाच्या वाटेची भक्ती का केली जाते?

प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ख्रिस्ती झालेले यहुदी आपल्या परंपरेप्रमाणे वल्हांडण सणानिमिते जेरुशलेमच्या मंदिराला भेट देत असत. मात्र आता ह्या भेटीमागे प्रभू येशू ख्रिस्तावरील भक्तीची भावना व्यक्त करणे हा हेतू होता. त्यामुळे पिलाताचा राजवाडा ते कालवारीची टेकडी हा संपूर्ण मार्ग चालून येशूच्या दुःखसहनातील विविध घटनांवर चिंतन करण्याची पद्धत सुरू झाली. इ. स. १५०५ मध्ये बेल्जियममधील लुवेन येथील फ्रान्सिस्कन धर्मगरूनी चौदा स्थानांची आध्यात्मिकता प्रसारित करण्यास प्रारंभ केला, ही भक्ती इतकी लोकप्रिय झाली की ती केवळ जेरुसलेमच्या परिसरापुरती मर्यादित राहू शकली नाही. चौदा स्थानांची चित्रे त्यावर प्रार्थना व मनन चिंतन अगदी झपाट्याने सर्वत्र पसरले. आज कित्येक ख्रिस्ती चर्चमध्ये ह्या चौदा स्थानांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. बायबल व्यतिरिक्त ख्रिस्ती परंपरेतून चालत आलेल्या काही घटनांचा उल्लेख या चौदा स्थानांमध्ये करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ वेरोनिका तिचा उल्लेख नवीन करारात नाही. वेरोनिका (Verum + icon) या शब्दाचा अर्थ आहे वास्तव प्रतिमा. त्यावरून वेरोनिका बाईने येशूचा चेहरा पुसला व तिच्या रुमालावर येशूच्या चेहऱ्याचे चित्र उमटले अशी आख्यायिका तयार झाली. त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहन, मरण, पुनरुत्थान रहस्याशी भाविकांनी एकरूप व्हावे अशी अपेक्षा असते.  मूलगामी ख्रिस्ती समूहाच्या चळवळीमुळे आज ही भक्ती गावागावात केली जाते. तसेच पारंपरिक भक्तीव्यतिरिक्त पर्यावरण सामाजिक प्रश्न, महिलांचे प्रश्न, युवकांच्या समस्या, ज्येष्ठांच्या अडचणी, ह्या विविध विषयांशी सांगड घालून ह्या भक्तीचे वेगवेगळे प्रकार चर्चमधून व गावागावांमधून तसेच एका चर्चमधून दुसऱ्या चर्चमध्ये जाऊन साजरे केले जातात. तसेच काही धर्मग्रामात चौदा अतिशय आजारी विकलांग व्यक्ती निवडून त्यांच्या घरासमोर क्रूसाच्या वाटेची भक्ती करण्याची पद्धत सुरू झाली आहे.

 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: योएल २:१२-१८.

योएल संदेष्टा सांगतो की आपण पश्चातापी मनाने परमेश्वराकडे जाण्याची गरज आहे. कारण परमेश्वर दयाळू आहे व तो आपल्या पापांची क्षमा करणारा आहे. पश्चाताप करण्यासाठी तीन गोष्टी महत्वाच्या आहेत: १) उपवास २) शोक ३) रडणे, इत्यादी. ह्या सर्व गोष्टी आपणास आपल्या पापांची आठवण करून देतात. कपडे फाडणे, अंगाला राख लावणे ह्या सर्व गोष्टी पश्चातापाचे प्रतिक असले तरी ते फक्त बाह्य रूप आहे. म्हणून योएल संदेष्टा सांगत आहे की, अशा बाह्य गोष्टी परमेश्वरासाठी समाधानकारक ठरत नाहीत. तर आपल्या अंत:करणाने व हृदयाने केलेली तयारी समाधानकारक ठरते. कारण खरी पश्चातापाची इच्छा (आस्था) ही हृदयातून येते.

योएल संदेष्टा हा सियोनांत कर्ण वाजवण्यास सांगत आहे. हा कर्ण बहुतंशा जुबली किंवा सणानिमित वाजवला जात असे. परंतु ह्या कर्णाचा खरा अर्थ हा देवाच्या आगमनाचा आहे (निर्गम १९:१६,१९, २०:१८) म्हणून योएल हा कर्णाच्या आवाजाद्वारे देवाच्या जवळ येण्याची कल्पना मांडत आहे. कारण देवाचा काळ जवळ आला आहे म्हणून तो सर्वांना उपवास व शोक करून देवाची करुणा व प्रेम अनुभवण्यासाठी बोलावत आहे.

 

दुसरे वाचन: करिंथकरांस दुसरे पत्र ५:२०-६:२.

           संत पौल करिंथकरांस पश्चाताप करून देवाकडे वळण्यास सांगत आहे. कारण, येशू ख्रिस्त ज्याला पाप ठाऊक नव्हते  त्याने आपल्या रीता पाप असे केले; जेणेकरून आपण त्याच्या समोर पवित्र होऊ. म्हणून संत पौल आपणा सर्वांस आपल्या पश्चातापी अंतःकरणाने देवाकडे येण्यास सांगत आहे. तो आपणांस आशीर्वाद देतो परंतु, तो व्यर्थ जाईल असे करु नका. जर देवाचा आशीर्वाद तुम्हांस हवा असेल तर तुमची हृदये व मने स्वच्छ व देवासाठी आतुर ठेवा म्हणजेच त्याचा आशीर्वाद तुमच्यावर येईल. 

 

शुभवर्तमान: मत्तय ६:१-६, १६-१८.

शुभवर्तमानात येशू आपणास दान, धर्म व उपवास अशा ह्या तीन गोष्टी ज्या यहुदी परंपरेने केल्या जातात तशाच करावयास सांगत आहे. परंतु ह्या गोष्टी जसे शास्त्री व परुशी करतात तसे नाही; कारण त्यांचे हे वागणे ढोंग्यांचे स्वरूप आहे. जर आपणांस दानधर्म व उपवास करावयाचा असेल तर ते योग्य रीतीने करणे गरजेचे आहे. दुसरे आपणाला बघून आपली वाहवा (स्तुती) किंवा प्रशंसा करतील असे वागु नका; कारण लोकांची प्रशंसा आपणाला स्वर्ग राज्यात घेऊन जाणार नाही; कारण, ती प्रशंसा फक्त तात्पुरतीच असते. जर आपणांस सार्वकालिक सुख हवं असेल तर येशूख्रिस्त आपणास काय सांगत आहे ह्याच्याकडे आपले जास्त लक्ष असू द्या.

जेव्हा तुम्ही दानधर्म करणार तेव्हा तुमचे हे कृत्य दुसऱ्यांना कळता कामा नये. फक्त तुमच्या स्वर्गीय पित्याला जो स्वर्गातून तुम्हाला तुमचा वाटा देईल त्यालाच समजले पाहिजे. तसेच जेव्हा प्रार्थना करणार किंवा उपवास करणार तेव्हा ही तुमची हीच स्थिती राहिली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्याचा सार्वकाळीक आशिर्वाद मिळेल.

आज आपण प्रायश्चित्त काळात पदार्पण करत आहोत. हा काळ आपल्याला देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी प्रोत्साहित करतो. ह्या प्रायश्चित्त काळाचे महत्त्व म्हणजे फक्त उपवास करणे, किंवा काही वाईट गोष्टीपासून जसे दारू, सिगारेट ह्या पासून दूर राहणे एवढेच नव्हे तर दुसऱ्यांना क्षमा करणे, दुसऱ्यांना समजून कसे घ्यावे हे शिकवते. हा काळ आपणास देव किती दयाळू व क्षमाशील व प्रेमळ आहे हे सांगते. शत्रूवर प्रेम करा, वाईट करणाऱ्यांचे बरे करा व त्यांच्यासाठी प्रार्थना करा ही आपल्या प्रेमळ येशूची शिकवण आहे आणि आपण त्याच्या शिकवणीनुसार वागलो पाहिजे.

 

मनन चिंतन:

शुभवर्तमानामध्ये आपल्याला दान, धर्म व उपवास या यहुदी धर्मातील तीन मध्यवर्ती सूत्रांवर आधारित शिकवण प्रभू येशू देत आहे. हे सर्व येशूच्या शिष्यांना व आपणा सर्वांना लागू असल्याचे गृहीत धरले जाते. ह्या वाचनात आपण हे सर्व ‘करावे’ किंवा ‘का करू नये’ हे प्रश्न नसून ते ‘कसे’ व ‘का करावे’ हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण दानधर्म व उपवास करत असतांना प्रतिफळ मिळवण्याच्या हेतूने करू नये हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपण लोकांना दाखवण्यासाठी दानधर्म करू नये. तसेच प्रार्थना करताना निरर्थक बडबड न करता शांतपणे व एकांतात प्रार्थना करावी. तसेच आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा तो लोकांना न दाखवता एकांतात वास करणाऱ्या देवाला दिसला पाहिजे, म्हणजे आपला अदृश्य पिता आपणास उघडपणे त्याचे प्रतिफळ देईल, असे आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे.

कपाळाला राख का लावली जाते व त्या मागचे कारण काय?

राखेचा बुधवार हा प्रायश्चित काळातील (उपवास काळातील) पहिला दिवस. हा दिवस पुनरुत्थानाच्या (इस्टर) ४६ दिवसा अगोदर येतो. मत्तय, मार्क, व लुकलिखित शुभवर्तमानाद्वारे येशूने ४० दिवस अरण्यांत (वाळवंट) उपवास केला व सैतानाच्या मोहाचा सामना केला. उपवास काळाचा उगम इथेच आहे, या प्रसंगातून प्रेरणा घेऊन आपण ४० दिवसाचा उपवास काळ पाळतो व येशूच्या पुनरुत्थानाची तयारी करत असतो.

राखेच्या बुधवारी आपल्या कपाळाला राख लावली जाते. ही राख आपल्याला आपल्या वाईट कृत्यांची आठवण करून देते. ह्या राखेद्वारे आपल्याला आवाहन केले जाते की, “वाईट मार्ग सोडून चांगल्या जीवनास सुरुवात करा” “पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा” (मार्क १:१५) ह्या शब्दात आपले जीवन बदलण्यास आवाहन दिले जाते. काँस्टनटाईन राजाने ख्रिस्ती धर्मप्रसाराला परवानगी दिल्यानंतर रोम शहरात पश्चाताप्यांना जाहीररीत्या पश्चाताप देण्याची प्रथा सुरु झाली. जुन्या करारात अश्या प्रकारच्या पश्चातापाची प्रथा प्रचलित असल्याचे आपल्याला बायबल मधील विविध वचनांद्वारे कळते: “म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चाताप करीत आहे.” (ईयोब ४२:६). “हे वर्तमान मर्दखायच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोणताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठे आक्रदान केले...बहुतेक लोक गोणताट नेसून राखेत पडून राहिले.” (एस्तर ४:१-३). “माझ्या लोकांच्या कन्ये, कमरेला गोनताट गुंडाळ, राखेत लोळ...”(यिर्मया ६:२६). “तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकीला व डोक्यावर हात ठेऊन वाटेने ती रडत ओरडत चालली.”(२ शमुवेल १३:१९). “ते तुझ्या स्थितीमुळे लांब हेल काढून मोठ्या दु:खाने रडत आहेत; ते आपल्या डोक्यात धूळ घालीत आहेत आणि धुळीत लोळत आहेत.”(यहेज्केल २७:३०). “हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोनताट नेसणे व अंगावर राख उधळणे ही चालू केली.”(दनिएल ९:३), आपणाला नव्या करारात सुद्धा अनेक उदाहरणे दिसून येतात जेथे प्रभू येशू लोकांना सांगत आहे की, कशाप्रकारे अविश्वासी लोकांनी पश्चाताप केला असता तर ते वाचले असते. उदाहरणार्थ येशू म्हणतो, “खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणताट व राख अंगावर घेवून पश्चाताप केला असता” (मत्तय ११:२१; लुक १०.१३.)

कपाळाला राख फासणे हे आपल्याला अंत:करणातून करायच्या असलेल्या पश्चातापाचे बाह्य चिन्ह आहे. ह्या बायबल वचनांचा आधार घेऊन अश्या लोकांसाठी उपवासकाळाच्या पहिल्या दिवशी राख फासणे, गोनताट नेसणे व पवित्र गुरुवारी समेट होईपर्यंत श्रधावंतांपासुन दूर राहणे ह्या गोष्टी जाहीरपणे कराव्या लागत. आठव्या ते दहाव्या शतकादरम्यान ही प्रथा बंद पडली आणि केवळ कपाळाला राख लावायची प्रथा सुरु झाली. ह्या दिवशी राखेला आशीर्वाद देऊन (ही राख गत वर्षाच्या झावळ्याच्या रविवारी आशीर्वादित केलेल्या झावळ्यांच्या पात्यापासून बनवली जाते.) ती प्रत्येकाच्या कपाळावर फसली जाते व ही राख कपाळाला लावताना, “मानवा, तू पापी आहेस आणि पुन्हा मातीला मिळशील”(उत्पती ३:१९); किंवा “पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” (मार्क १:१५) हे शब्द उच्चारले जातात. खरे पाहता राख म्हणजे नाश, विध्वंस आणि नश्वरता! परंतु इस्टरच्या अग्नीमुळे ह्याच राखेला शुद्धीकरण, पश्चाताप व परिवर्तन ह्या सकारात्मक दृष्टीकोनाचं प्रतिक मानले गेलेले आहे.

आज आपण गोणपाट व अंगाला राख ओढण्या ऐवजी कपाळाला राख लावतो ही राख फक्त देखावा नाही तर आपल्याला आपल्या मानवी पापमुक्त जीवनाची आठवण करून देत आहे. आजपासून आपण चाळीस दिवसांचा तप ठेवणार आहोत हा तप कोणासाठी? कशासाठी? ह्याचा आपण कधी विचार केला आहे का? प्रभू येशूने अरंण्यात चाळीस दिवस उपवास केला व सैतानाच्या मोहाला बळी न पडता त्यावर विजयी झाला. आज आपणालासुद्धा हे चाळीस दिवस सैतानी कृत्ये विचार शब्द इत्यादी ह्यांच्यावर मात करण्यासाठी बोलावले आहे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू आमचे आत्मपरिवर्तन करण्यास सहाय्य कर.” 

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहनारे आपले परमगुरु पोप फ्रान्सिस तसेचे सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची सुवार्ता पसरविण्यास पवित्र आत्म्याचे सामर्थ लाभावे म्हणून आपण प्रभू चरणी प्रार्थना करू या.

   २. जे कुटुंब एकत्र प्रार्थना करते ते एकत्र राहतेहे उत्तम उदाहरण घेऊन आपण प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना करूयाप्रत्येक कुटुंबाने एकत्र यावे व प्रार्थना करावी जेणेकरून त्यांच्या  घरात प्रेमशांती व सौख्य नांदावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

    ३. जे  लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना ह्या उपवास काळात देवाचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावेम्हणून आपण प्रार्थना करू या.

    ४. जे आजारी आहेत त्यांना देवाने चांगले आरोग्य दयावे तसेच जे लोक आजाऱ्यांना मदत करतात त्यांना देवाने आशीर्वाद दयावाम्हणून आपण प्रार्थना करू या.

     ५. आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, आणि सामाजिक गरजासाठी आपण देवाजवळप्रार्थना करू या.




Thursday, 11 February 2021

6th SUNDAY IN ORDINARY TIME


Reflection for the 6th SUNDAY IN ORDINARY TIME (14/02/2021) By Br. Roshan Rosario.   





सामान्य काळातील सहावा रविवार




दिनांक: १४/०२/२०२१

पहिले वाचन: लेवीय १३:१-२, ४५-४६

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र १०:३१-११:१

शुभवर्तमान: मार्क १:४०-४५


 



प्रस्तावना:

आज आपण सामन्यकाळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्याला शिकवत आहेत की, दुसरी लोकं आपल्यापेक्षा कितीही भिन्न असली तरीही त्यांना त्यांचा हक्काचा सामाजिक मान मिळाला पाहिजे. पहिले वाचन लेवीय ह्या पुस्तकातून घेण्यात आले असून हे पुस्तक कुष्ठरोग्याला देण्यात आलेल्या वागणुकीबद्दल सांगते. कारण, त्या काळामध्ये कुष्ठरोग हा महारोग गणला जात होता. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो, ‘मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा.संत मार्कलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशू कुष्ठरोग्याला बरे करून त्याचा विश्वास दृढ करतो. आजचे वाचन आपणास हे देखील सांगत आहे की, आपली शारीरिक व अध्यात्मिक शुद्धी देवाकडून येते. ज्यांना समाजाने नाकारले, धिक्कारले किंवा सोडून दिले आहे; त्यांना येशू स्पर्श करण्यास तयार आहे. ख्रिस्ताचे अनुयायी बनुन आपण हा देवाचा अनुभव गरजवंत लोकांना द्यावा, ह्या हेतूसाठी आपण नम्र हृदयाने प्रभूचरणी याचना करूया.

 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: लेवीय १३:१-२, ४५-४६

लेवीय हे पुस्तक प्रार्थनेचे नियम, याजकगण, जबाबदारी व हक्क, जेवणाचे नियम, अशुद्धता व पवित्रता इत्यादी बाबींचा उल्लेख करते. तसेच, शारीरिक रोगाबद्दलसुद्धा हे पुस्तक नियम देते. आजचे पहिले वाचन लेवीय (१३:१-२, ४५-४६) ह्या पुस्तकातून घेतलेलं असून येथे विशिष्ट शारीरिक रोगांबद्दल याजकांनी लागू केलेल्या नियमांविषयी लिहिलेलं आहे. अश्या रोगाने ग्रस्त, पिडीत असलेल्या व्यक्तीस अशुद्ध घोषित केले जाते ज्याने शेजार्‍यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शंका असते.

 

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र १०:३१-११:१

दुसरे वाचन संत पौलने करिंथीकरांस पाठवलेल्या पहिल्या पत्रातून (१०:३१-११:१) घेतलेले आहे. संत पौल करिंथकरांस ख्रिस्ताच्या जीवनाचे महत्व पटवून देत आहे. तो म्हणतो, “तुमचे खाणे, पिणे किंवा जे काही तुम्ही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी असले पाहिजे”. संत पौल आपल्याला त्याचे अनुकरण करण्यास प्रोत्साहित करत आहे. कारण, त्याने स्वत: सुवार्तेसाठी व ख्रिस्तमंडळाच्या ऐक्यासाठी ख्रिस्ताचे अनुकरण केले आहे.

 

शुभवर्तमान: मार्क १:४०-४५

येशूने सुरुवातीलाच म्हणजेच मिशन कार्याच्या प्रारंभीस गालील येथे पिडीत लोकांना रोगमुक्त केले होते. तसेच, ज्यांचे जीवन वाईट / दृष्ट आत्म्याने भरले होते त्यांना देखील येशूने आपल्या स्पर्शाने बरे केले (मार्क १:२१-३४). दुसऱ्या दिवशी येशूने कुष्ठरोग्याला बरे केले, ह्याचे स्पष्टीकरण शुभवर्तमानकार (evangelist) मार्क सविस्तरपणे वरील उताऱ्यात देतो.

लेवीय पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, संत मार्क देखील कुष्ठरोगाविषयी आपल्याला सांगत आहे. त्याकाळी कुष्ठरोग हा महारोग गणला जात होता. ह्या काळामध्ये जी लोक त्या भयग्रस्त आजाराने पिडीत होते त्या लोकांना विशेष अशी वागणूक दिली जात असे. त्या वागणुकीबद्दल आपण लेवीय पुस्तकात वाचतो.

येशू आपल्या तारणासाठी ह्या भूतलावर आला. म्हणून तो कुष्ठरोगाने पिडीत व्यक्तीला समाजाच्या कठोर नियमांतून मोकळे करून स्वर्गाची वाट दाखवतो; म्हणजेच त्याला रोगमुक्त करून समाजाचा पुन्हा अविभाज्य घटक बनवतो. कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहा”. येशू त्याला म्हणाला, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो”. लगेच कुष्ठरोगी बरा झाला. येशूने त्याला याजकाला दाखव आणि आपल्या शुद्धीकरिता मोशेने नेमलेले अर्पण कर म्हणून सांगितले. पण त्याने येशूचे ऐकले नाही तर आपण बरे झालो आहोत ह्याची साक्ष तो सर्वांना देत राहिला. ह्या कारणास्तव येशूला उघडपणे शहरात जाता येईना म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला. तरीदेखील लोक रोगमुक्त होण्यासाठी मोठ्या संख्येने येशूकडे आले.

 

बोधकथा:

असिसीकर संत फ्रान्सिस, ह्यांना कुष्ठरोग्यांचं भयानक भय होतं, त्यांची किळस वाटत होती. एके दिवशी जेव्हा तो फिरायला बाहेर पडला तेव्हा, त्याने चेतावणीची घंटी ऐकली. संत फ्रान्सिसच्या काळात कुष्ठरोग्यांनी चेतावणीची घंटी वाजवणे हे गरजेचे होते. जेव्हा एक कुष्ठरोगीं झाडांच्या मागून बाहेर पडला तेव्हा संत फ्रान्सिसने पाहिले की, त्याचे मुख कुष्ठरोगाने विद्रुप झाले होते. त्याचे अर्धे नाक कुजलेले होते; त्याच्या हाताची बोटं त्या रोगाने झडून पडलेली होती, आणि त्याच्या ओठातून पू येत होता. ह्या विद्रुप माणसाला घाबरून मागे न जाता त्याच्या जवळ धावत जाऊन फ्रान्सिसने कुष्ठरोग्यास मिठी मारली व त्याचे चुंबन घेतले. त्या घटनेनंतर फ्रान्सिसचे आयुष्य पूर्वीसारखे राहिले नाही. इतरांसाठी एक नवीन संवेदनशीलता त्याच्या हृदयात निर्माण झाली, आणि त्याला सेवा करण्यास एक नवीन शक्ती प्राप्त झाली.

 

मनन चिंतन:

पुरातन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत, कुष्ठरोग ही देवाची शिक्षा मानली जात असे. हा आजार इतका भयंकर होता की, बायबलच्या काळात, कुष्ठरोग्यास गळयात बांधण्यास एक घंटी दिली जात असे; जेणेकरुन त्या घंटीच्या आवाजाने तो आपल्या जवळच्या लोकांना इशारा देऊन ओरडायचा की, “मी एक कुष्ठरोगी आहे, दूर रहा! मी एक कुष्ठरोगी आहे, दूर राहा!त्याचे जीवन अश्याप्रकारे भयानक होते. जिवंत असूनसुद्धा तो मृतासारखा होता. असं वाटायचं की, देव त्याला सोडून गेला आहे, आणि म्हणून लोकांनी त्यांच्या जवळ येऊ नये. अशा प्रकारे कुष्ठरोग हा एकांतात राहण्याचे प्रतीक होते. आपल्या सभोवतालच्या सर्व लोकांपासून दूर जाणे ही एक प्रकारची निराशेची परिस्थिती होती.

आजच्या शुभवर्तमानात आपण बघतो की, एक कुष्ठरोगी येशूकडे येऊन त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणतो, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करू शकता!. हा एक अत्यंत अर्धवट असा विश्वास आहे. “मला बरे करा!” असे म्हणण्या ऐवजी तो म्हणत आहे, “जर तुम्हाला खरोखर बरे करायचे असेल, जर तुम्हाला माहित आहे की, तुम्ही खरोखर हे करू शकता तर”. याचाच अर्थ असा की, ‘तुम्ही ते करणार आहात की, नाही हे मला माहित नाही. कारण दुसऱ्या कोणाबरोबर माझा लेनं देणं नाहीं. मी एकटा आहे, आणि मी एकटाच मरेन’. ही एक भयंकर अशी त्याची परिस्थिती होती. परंतु त्याने हे पण ऐकले आहे की, येशू बरे करतो. आणि म्हणूनच तो येशूकडे जातो. ही त्याच्या विश्वासाची एक खूण आहे. कारण, तो येशूकडे येतो आणि दुसऱ्या कुष्ठरोग्यांसारखा चेतावणीची घंटी वाजवून येशूपासून तो लांब राहत नाही. पण, तो येशू जवळ जातो, गुडघे टेकून म्हणतो; जर तुम्हाला खरोखरच बरे करायचे असेल तर, तुम्ही मला बरे करू शकता!. आणि अश्यावेळी येशू काय करतो? “नक्कीच, मी तुला बरे करू इच्छितो.असे म्हणून तो त्याच्या जवळ जातो, त्याला स्पर्श करतो.

आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला आपल्या समजण्यापलीकडे प्रेम करण्याचे आव्हान देत आहे. आपणा प्रत्येकामध्ये प्रेम करण्याची एक मोठी क्षमता आहे जी न वापरल्यामुळे वाया जाते. आपल्याकडे अशा लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे ज्यांना दररोज नकाराचा त्रास सहन करावा लागतो. आमच्या दयाळूपणाने आणि प्रेमळ कृत्याद्वारे आम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचू शकतो, आणि त्यांचे जीवन आशेने भरू शकतो. आज आपल्या जगात कुष्ठरोगी कोण आहेत का? गरीब, बहिष्कृत, एड्स सारख्या जीवनघेण्या आजाराने ग्रस्त लोक. एकदा माझ्यासमोर कोरोनाचा एक गंभीर रुग्ण डॉक्टरांनी घेतला तेव्हा आजूबाजूच्या प्रत्येकाने संरक्षक कवचं परिधान केली होती. असे वाटत होते की, हा आजारी माणूस आपल्या जवळच्या सगळ्या लोकांचा नाश करेल म्हणूनच त्यांना संरक्षणाची गरज होती. कोविड कक्षात डॉक्टरांशिवाय दुसऱ्या कुणालाही परवानगी नव्हती. कुटुंबातील सदस्यांनापण काहीही करण्यास परवानगी नव्हती. ह्या रोगाबद्दल प्रत्येकजण घाबरून गेले आहेत. आपण अनेक वेळा वाचले किंव्हा बघितले असेल, पाहिले की, कितीतरी मृतदेहांना प्लास्टिक पिशव्यामध्ये कचऱ्यासारखे बांधून खड्ड्यात टाकले गेले. आजपण आपणास असहाय्यता आणि निराशेने वेढलेले आहे. आणि अशा परिस्थितीत येशूचा एकच संदेश आहे. येशूला दु:ख किंवा वेदना काय असते हे माहित आहे, आणि इतरांच्या प्रेमासाठी त्यांने आपले जीवन वधस्तंभावर अर्पण केले आहे. दु:खातून देव मुक्तता आणतो म्हणूनच आज आपण त्या सर्व लोकांचा विचार केला पाहिजे ज्या लोकांना आपल्या मदतिची किंवा प्राथनेची गरज आहे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : “प्रभो, आमची प्रार्थना ऐक.”

१.    आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना आपल्या पाचारणाद्वारे ख्रिस्तसभेची निस्वार्थपणे सेवा करण्यास प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२.    आपले राजकीय नेते स्वत:च्या इच्छेचे गुलाम झालेले आहेत. लोकांची इच्छा न स्विकारता आपली इच्छा, योजना व कृतीला फार महत्व देतात. ह्या कारणाने समाजाच्या विकासाला अडथळा निर्माण झाला आहे. परमेश्वराच्या कृपेने त्यांनी मीपणा, अहंकार, नावलौकीकता, इत्यादींचा त्याग करावा व लोकांच्या इच्छा समाजाच्या प्रगतीसाठी स्विकाराव्यात म्हणून परमेश्वर चरणी प्रार्थना करूया.

३.    आज आपला समाज राग, द्वेष व अशांतेने व्यापून गेलेला आहे म्हणून आम्ही सर्व ख्रिस्ती भाविकांनी येशूचे अनुकरण करून आपल्या समाजात प्रेम, एकोपा व शांतीची ज्योत पेटवण्यासाठी सदैव तत्पर असावे म्हणून प्रभूकडे याचना करूया.

४.    ज्या लोकांना आपल्या प्रार्थनेची गरज आहे, विशेषकरून आजारी, गरीब, शोकांकीत, तुरुंगात अडकून पडलेले आणि व्यसनाधीन झालेले इत्यादी. ह्या सर्वांवर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आनंदाचा, कृपेचा आणि चांगल्या आरोग्याचा वर्षाव व्हावा म्हणून प्रभूकडे दयेची याचना करूया.

५.    थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.