Wednesday, 31 March 2021

                Reflection for the Homily of Easter Sunday (04/04/2021) By Fr. Ghonsalo D’Silva




पास्काचा सण

(सकाळची मिस्सा)

दिनांक: ०४/०४/२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४अ, ३७-४३

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४

शुभवर्तमान: योहान २०:१-९

विषय:  पुनरुत्थान प्रभू येशूचे: प्रारंभ ख्रिस्ती श्रद्धेचा

 

प्रस्तावना:

          आज जगाच्या कानाकोपऱ्यात सर्व ख्रिस्ती लोक प्रभू येशूच्या  पुनरुत्थानाचा सोहळा साजरा करीत आहेत. येशूचं पुनरुत्थान ही मानवी इतिहासातील एक आगळीवेगळी, असामान्य, अदिवतीय अशी घटना आहे. जगात अनेक धर्माचे विविध संस्थापक होऊन गेले. त्यांनी आपापल्यापरीने मानवजातीच्या कल्याणासाठी विधायक कार्य केलं आणि ते शारीरिकदृष्ट्या मृत्यू पावले. फक्त येशू नाझरेथकर जो देवपुत्र मानवजातीच्या तारणासाठी मानवी अवतार धारण करून या भूतलावर अवतरला होता तो त्याच्या शारीरिक मृत्यूनंतर तीन दिवसांनी पुन्हा उठला. हे आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचे रहस्य आहे.

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४अ, ३७-४३

          आजच्या पहिल्या वाचनात संत पेत्र म्हणतो कि देवाने येशूला तिसऱ्या दिवशी उठविले व त्याने प्रगट व्हावे असे केले या घटनेचे आम्ही साक्षी आहोत.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल सांगतो कि तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात. स्वर्गातील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका.

शुभवर्तमान: योहान २०:१-९

          संत योहान म्हणतो कि येशूने मेलेल्यांतून उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख येशूच्या शिष्यांना तोपर्यंत समजला नव्हता.

मनन-चिंतन

          खरंच प्रभु येशूची रिकामी कबर हि सर्वांनाच एक फार कुतुहलाची बाब वाटते. मानवी दृष्टीकोनातून पाहिलं तर आपल्याला असं वाटतं कि रिकाम्या जागेत काय एवढं महत्त्वाचं असतं. मुळात तिथं काहीच नसतं. आपल्या डोळयांना तिथं काहीच दिसत नाही. आपल्या मानवी बुद्धीला हे असं काही पटत नाही. विज्ञान ह्या असल्या गोष्टी काही मानत नाही. असं म्हणतात कि जेथे आपल्या मानवी बुद्धीचं क्षेत्र संपतं तेथे आपल्या श्रद्धेचं क्षेत्र सुरु होतं. येशूचं पुनरुत्थान हि आपल्या ख्रिस्ती श्रद्धेची बाब आहे. आपल्या श्रद्धेचा तो मुख्य गाभा आहे. आपल्या ख्रिस्ती धर्माची भव्य नि दिव्य इमारत हि येशूच्या पुनरुत्थानावर उभी आहे. तो आपल्या धर्माचा एक मजबूत पाया आहे.

          श्रद्धा हि मानवी बुद्धीने मोजली जात नाही, ती प्रयोगशाळेत पहिली जात  नाही. विज्ञानाने श्रद्धेची लांबी रुंदी मोजली जात नाही. कारण श्रद्धा हि ठेवायची असते आपल्या विचाराने ठरवायची नसतेमानव जातीच्या तारणासाठी येशूचा जन्म, दु:खसहन, क्रूसावरील मरण आणि शेवटी त्याचे मरणातून पुन्हा विजयी होऊन उठणे हि सारी दैवी योजना होती. दैवी योजना म्हणजेच आपल्या स्वर्गीय पित्याची आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी असलेली योजना होय.

          येशूचं पुनरुत्थान म्हणजेच नवजीवनाची सुरुवात, नवीन प्रारंभ, आपल्यासाठी एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण करण्याचा दिवस आहेआपल्या मराठीत गाणं आहे: "भले बुरे जे घडून गेले, विसरुनी जाऊ जरा क्षणभर. जरा विसावू या वळणावर, या वळणावर. होय माझ्या प्रिय भाविकांनो, आज येशूच्या पुनरुत्थानाचा सोहळा साजरा करीत असताना आपण आपल्या जीवनात आतापर्यंत जे काही बरं वाईट झालं, ज्या काही कडू गोष्टी घडल्या, हेवेदावे, रागरोष, भांडणतंटे त्या विसरून जाऊ या. आज नुसतं घोटभर प्यायची नि पोटभर जेवायचा विषय नाही. ते तर आपण केव्हाही करू शकतो. पण आज एका नवीन जीवनाला सुरुवात करण्यासाठी देवाने दिलेली एक नामी संधी आहे. गेलं वर्षभर आपण कोरोना महामारीमुळे किती त्रास सहन केला आणि अजूनही करत आहोत. आपल्या जीवनात किती समस्या आल्या. आपल्या प्रिय व्यक्ती मरण पावल्या, नोकरी गेली, सर्वकाही एकदम ठप्प झालं. ह्या एका कोरोना विषाणुने आपल्याला जणु गुडघ्यावर आणलं. पण आपण हिंमत हरवायची नाही, या करोना विषाणुसमोर कधी झुकायचं नाही, निराश आणि हताश बिलकुल व्हायचं नाही तर आपल्या पुनरुत्थित ख्रिस्ताला मनापासून आपल्या अंत:करणात स्वीकारून, एकमेकांना मदत करून या करोनावर व तसेच जीवनात येणाऱ्या दु:खावर मात करून सतत पुढे जाऊ या हाच खरा आजच्या सणाचा अर्थ आहे.

          आपण ख्रिस्ती लोक म्हणजे येशूचे सैनिक आहोत. सदैव सैनिका पुढेच जायचे न मागे तुला कधी न फिरायचे. येशू म्हणतो: "पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा आमची विनंती ऐक.

. आमचे परमगुरु फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरु, व्रतस्थ आणि ख्रिस्ती प्रापंचिक यांनी येशूच्या पुनरुत्थानावर मनापासून विश्वास ठेवावा आणि आपल्या रोजच्या जीवनात त्याची इतरांना साक्ष द्दावी म्हणून प्रार्थना करू या.

. जे कोणी वेगवेगळ्या पापाच्या कबरेत अजूनही पडून आहेत त्यांनी येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारावं आणि पापाचा त्याग करावा म्हणून प्रार्थना करू या.

. आपल्या आजूबाजूला जे कोणी कोरोना विषाणुमुळे निराश आणि हताश झालेले आहेत त्यांना परमेश्वराने आशेचा मार्ग दाखवावा व त्यांनी नवजीवनाचा अनुभव घ्यावा म्हणून प्रार्थना करू या.

. प्रभू येशू जसा दुखःसहनाला सामोरा गेला आणि त्याने आपल्या तारणासाठी देवाची योजना स्वीकारली तसे आपण आपल्या जीवनात देवाची योजना स्वीकारावी व येणाऱ्या लहान-सहान संकटाला सामोरं जावं म्हणून प्रार्थना करू या.

५. आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करू या. 

तुम्हा सर्वांना पास्काच्या सणाच्या हार्दीक शुभेच्छा!


               Reflection for the Homily of Easter Vigil (04/04/2021) By Fr. Benjamin Alphonso




पुनरुत्थान रविवार

(जागरण विधी)



दिनांक: ०४/०४/२०२१

पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२:२

दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८

तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१अ

चौथे वाचन: यशया ५४:५-१४

पाचवे वाचन: यशया ५५:१-११

सहावे वाचन: बारुख ३:९-१५,३२-४:४

सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८

आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११

शुभवर्तमान: मार्क १६:१-७



आजच्या ह्या विधीचे चार भाग आहेत:

पहिला भाग: प्रकाश विधी:- पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे हे आपण घोषीत करतो.

दुसरा भाग: प्रभुशब्दविधी:- येथे जुन्या व नवीन करारातील निवडक वाचने, जगाच्या सुरूवातीपासून देवाने मानवावर प्रेमाचा वर्षाव केला, त्याची आपणाला आठवण करून देतात.

तिसरा भाग: पाण्याला आशीर्वाद:- येथे बाप्तिस्म्यासाठी लागणाऱ्या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. पुनरुत्थानाचे पहिले गोड फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा अनन्य साधारण आशीर्वाद आहे.

चौथा भाग: ख्रिस्तशरीर स्विकारविधी:- येथे आपण ख्रिस्तशरीर स्विकारविधी साजरा करतो. स्वर्गीय भोजनाची चव ह्या ठिकाणी आपण घेतो.

प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, या पवित्र रात्री आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला. या शुभप्रसंगी ख्रिस्तसभा साऱ्या विश्वातील तिच्या मुलांना जागरण व प्रार्थना करण्यासाठी एकत्र बोलावीत आहे. हा आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा सर्वात मोठा (महान) सण आहे. प्रभूचे पुनरुत्थान हा आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा केंद्रबिंदू आहे. हा प्रभूच्या वल्हांडणाचा दिवस आहे. प्रभूचे शब्द ऐकून व त्याची दिव्ये रहस्ये साजरी करून त्याच्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे आपण पुण्यस्मरण केले, तर त्याच्या मरणातील विजयात आपणाला खात्रीपूर्वक सहभाग मिळेल व त्याच्याबरोबर शाश्वत जीवन जगता येईल. आजच्या ह्या पवित्र विधीत आपण खास प्रार्थना करू या की आपला विश्वास मजबूत व्हावा.

मनन-चिंतन:

          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज संपूर्ण जग कोरोना नावाच्या महामारीने हादरून गेले आहे. जेव्हा आपण मृत्यूविषयी ऐकतो तेव्हा आपण सर्व जण घाबरून जातो. मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू हा कोणाला कधी आणि कोठे येणार आहे हे माहित नाही. परंतु आपण मृत्यूविषयी ऐकून घाबरून जावं का? मृत्यू आपल्या जीवनाचा खरोखर अंत आहे का? ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला ख्रिस्ताच्या दुःखसहन, मरण व पुनरुत्थान ह्या रहस्यांद्वारे मिळत आहेत.

          प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर मात केली आहे. संत पौल म्हणतो की माणसाचा सर्वात मोठा शत्रू मृत्यू आहे आणि प्रभू येशूने ह्या मृत्यूवर विजय मिळवला. जेव्हा अमेरिकन अंतराळ विरांनी चंद्रावर पहिले पाऊल टाकले त्या वेळेला त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन म्हणाले की ही घटना माणसाच्या इतिहासातील सर्वात श्रेष्ठ घटना आहे. तेव्हा त्यावेळचे प्रसिद्ध प्रवचनकार बील ग्रॅहम म्हणाले की मला वाटते की अध्यक्ष निक्सन ह्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. ते उदगारले की ख्रिस्ताचे दुःखसहन, मरण व पुनरुत्थान ही घटना जगाच्या इतिहासातील सर्व श्रेष्ठ घटना आहे. प्रसिद्ध लेखक W. H. Whale म्हणतात शुभवर्तमान ख्रिस्ताचं पुनरुत्थान समजावून देत नाही तर पुनरुत्थान आपल्याला शुभवर्तमान समजावून देतं.

आजचा विधी हा ‘पास्काचा जागरण विधी’ म्हणून ओळखला जातो. ख्रिस्तीजनांनी हे नाव यहुदयांच्या पास्काच्या सणावरून घेतले आहे. इजिप्त देशात देवाचा दूत यहुद्यांची घरे ओलांडून गेला व इजिप्त वासीयांच्या प्रथम जन्मलेल्या बालकांचा त्याने वध केला व हे सर्व यहुद्यांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून करण्यात आले. ख्रिस्ती जणांनी हा सण प्रभूच्या ‘पुनरुत्थानाचा सण’ म्हणून घोषित केला. प्रभूने आपल्या मरण व पुनरुत्थानाने पापावर विजय मिळविला. मरणातून सार्वकालिक जीवनाकडे प्रभूने केलेले हे ओलांडण. यहुद्यांनी ज्याप्रमाणे गुलामगिरीतून सुटका झाल्यानंतर परमेश्वराठायी एका नव्या जीवनाला सुरुवात केली, त्याचप्रमाणे प्रभूच्या पुनरुत्थित जीवनाद्वारे आपणास एका नव्या जीवनाला प्रारंभ करण्यास मुभा मिळते. आजच्या दिवशी स्नानसंस्कार दिला जातो. म्हणून प्रभूच्या जीवन, मरण व पुनरुत्थानाला ‘पास्काचे रहस्य’ म्हणून संबोधिले जाते व ख्रिस्ती श्रद्धेत महत्त्वाचे स्थान दिले जाते.

संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात ख्रिस्ती बांधवांना प्रभूमध्ये जीवन जगण्यास प्रवृत्त करत आहे. पौल म्हणतो, “स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्तामध्ये मरतो व ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होतो”. त्याचे सर्व जीवन हे ख्रिस्ताद्वारे सुरु होते व ख्रिस्तामध्येच संपते. स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक व्यक्ती देवाचे लेकरू होते. जोपर्यंत ख्रिस्त माझ्यात नाही व मी ख्रिस्तात नाही, तोपर्यंत मी प्रभूच्या सानिध्यात जगू शकत नाही.

मार्कलिखित शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी ऐकतो. यहुदी लोक मृत व्यक्तीस काळजीपूर्वक दफन करीत असत. विविध गंधरस लावून ते प्रेतास जपत असत. शब्बाथ दिवस आड आल्यामुळे येशूचा मृतदेह घाईत दफन केला गेला होता. स्त्रियांनी येशूला यहुदी रीतीप्रमाणे गंधरस लावला नव्हता. ह्यासाठीच स्त्रिया भल्या पहाटे ही उत्तरक्रिया पूर्ण करण्यासाठी थडग्यापाशी गेल्या होत्या. रिक्त कबर बघून व धोंडा सरकलेला बघून स्त्रिया भयभीत होतात. देवाचा दूत ह्या स्त्रियांना दर्शन देतो व म्हणतो भिऊ नका प्रभू मरणातून उठला आहे. फक्त मार्कच्या शुभवर्तमानात आपल्याला दूताचा आदेश आढळतो. “जा व त्याच्या शिष्यांना व पेत्रास सांगा”, दूत स्त्रियांना ही शुभवार्ता घोषित करण्याचे आदेश देतो.

ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे आणि आजही तो आपल्यामध्ये जिवंत असून कार्यरत आहे. ज्यांना ह्या जिवंत (देवाचा) ख्रिस्ताचा अनुभव झालेला आहे, त्यांनी देव अनुभवलेला आहे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान आपल्या सर्वामध्ये एक नवीन आशा उत्पन्न करते. जीवनामध्ये आपण कधीच निराश होऊ नये तर आशावादी व्हावे.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेची खरी घटना. जेव्हा अमेरिकेच्या विमानाने हिरोशिमा व नागासकी ह्या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले तेव्हा त्या दोन शहरांची पूर्ण राख झाली होती. तेव्हा जपानचे काही इंजिनिअर त्या शहराची पाहणी करत होते तेव्हा त्यांना तिथे एक हिरवी पालवी दिसली. तेव्हा इंजिनिअर म्हणाले जर का ही पालवी पुन्हा येऊ शकते तर नवीन जीवन का नाही? आज त्या एका आशेवर जपानच्या ह्या दोन शहरांचा कायापालट झाला आहे, प्रगती झाली.

ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्याला आज संदेश देत आहे. दुःखाने, मरणाने घाबरत जगू नका तर विश्वासू बना, आशीर्वादित व्हा. एक दिवस नक्कीच यशस्वी व विजयी व्हाल आणि आपण खरच म्हणू शकू हो ख्रिस्त, खरोखरच मेलेल्यातून उठला आहे. त्याने विजय मिळवला आहे आणि आम्हीही विजय मिळवू.

He is Risen, He is Truly Risen, Alleluia!

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे पुनरुत्थित ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीस, आध्यात्मिक मेंढपाळ बिशप, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनिंना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अनुभव त्यांच्या कार्यात यावा. ख्रिस्ती श्रद्धावंतांना त्यांच्या श्रद्धेत व विश्वासात वाढण्यास त्यांनी आपल्या कार्याद्वारे प्रेरित करावे व स्वर्गीय नवजीवनाचा आनंद उपभोगण्यास मनोबळ द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

२. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या विजयाचा, आनंदाचा व प्रकाशाचा संदेश जे धर्मगुरू व धर्मभगिनी आज इतरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या कार्यात प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

४. जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श होउन ह्या रोगापासून मुक्तता मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. सतत आजारामुळे ज्या कुटुंबांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वैभवशाली शक्तीने दिलासा दयावा व सर्व आजारातून त्यांची सुटका करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

६. सर्व धर्म सहभाव, सर्व धर्म स्नेहभाव, सर्व धर्म समीपभाव व सर्व धर्मसन्मानभाव या चौकटीवर विविध धर्मांच्या लोकांनी एकत्रित येऊन ऐकमेकांचा उध्दार व सन्मान करावा, गुण्यागोविंदाने नांदत राहावे व जगात शांतीचे व प्रेमाचे वातावरण निर्माण करावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.

७. आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी प्रार्थना करू या.



                     Reflection for the Homily of Good Friday (02/04/2021) By Fr. Issac D’Souza







उत्तम शुक्रवार


दिनांक: ०२/०४/२०२१

पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ४:१४-१६; ५:७-९

शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२



प्रस्तावना:

          आज आपण शुभ शुक्रवार साजरा करीत आहोत. शुभ शुक्रवार दैवी प्रेमाचे प्रतिक आहे आणि हे प्रेमाचे प्रतिक प्रभू येशूच्या रक्ताने सजवण्यात आलेले आहे. प्रभू येशूचे दुःखसहन, त्याच्या यातना, त्याचे मरण ह्याद्वारे आपल्या सर्वांना आनंद आणि नवजीवन लाभले आहे.

          आपल्या जीवनात आनंद आणि दुःख, समस्या, अडचणी, आजार  व मरण, अशा नानाविविध रहस्याची उत्तरे प्रभू येशूच्या दुःखसहनाद्वारे आपल्याला मिळत असतात.

          ह्या पवित्र विधीमध्ये सहभागी होत असताना आपल्या जीवनातील दुःख आपण प्रभू येशूच्या दुःखाशी समरस करू या आणि ज्याप्रमाणे परमेश्वराची कृपा त्याच्या सोबत होती त्याप्रमाणे आपणा सर्वांना त्याची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

मनन-चिंतन:

          एक लहान मुलगा एका धर्मगुरूला म्हणाला आपण गुड फ्रायडे/ शुभ किंवा उत्तम शुक्रवारला उत्तम का म्हणतो? येशू ख्रिस्त ह्या दिवशी मरण पावला, परमेश्वराचा पुत्र ह्या दिवशी मरण पावला. हा दिवस उत्तम किंवा शुभ शुक्रवार कसा गणला जाऊ शकतो? आपण नाताळचा सण साजरा करीतो हे उत्तम आहे, हे शुभ आहे. आपण ईस्टरचा सण साजरा करितो, पुनरुत्थित येशूचा सण साजरा करितो हे गुड  आहे, उत्तम आहे, शुभ आहे. तेव्हा धर्मगुरू त्या मुलाला उत्तर देतात की, शुभ शुक्रवार शुभ आहे कारण प्रभू येशूच्या मरणाने आपणा सर्वांना तारण प्राप्त झालेले आहे. प्रभू येशूच्या रक्ताद्वारे आपण मुक्त झालो आहोत. त्याच्या छिन्न-विछिन्न झालेल्या देहाद्वारे आपला परमेश्वरासोबत समेट झाला आहे आणि पवित्र क्रुसाद्वारे सर्व जगाचे तारण झाले आहे. आज गुड फ्रायडेच्या दिवशी आपण पाच विषयांवरती मनन चिंतन करीत आहोत.

१. देवाचं प्रेम:

          जर आपण एका आईला विचारलं की तू आपल्या लहान मुलाला दिवसाला किती वेळा माफ केले आहे. तर ती आई आपल्याला सांगेल की मी कधी मोजले नाही. परंतु आपल्या वैऱ्याला/ शत्रूला विचारल की त्याला आपल्याजवळून किती वेळा त्रास झाला आहे तर तो नक्कीच लहानातील लहान, नगण्य अशा गोष्टीविषयी आपल्याला तपशील देईल. प्रेम आणि राग, मित्र आणि शत्रू ह्यामधील हा फरक आहे. येशू ख्रिस्ताच प्रेम त्याच्या शब्दात व्यक्त करण्यात आले आहे ते म्हणजे “There is no greater love than to lay down one’s life for one’s friend.” आज गुड फ्रायडेच्या दिवशी जगातील सर्वात महान प्रेमाची घटना आपण स्मरत आहोत. देव प्रेम आहे आणि त्याचं प्रेम क्रुसावरील मरणाद्वारे व्यक्तव्य केलेले आहे.

२. क्रूस:

          प्रभू येशूने जेव्हा हा क्रूस आपल्या खांद्यावर वाहिला तेव्हा त्याने आपल्या प्रत्येकाला त्याच्या हृदयामध्ये सामावून घेतले आहे. पवित्र क्रूस हा आपल्या तारणाचे प्रतिक आहे. क्रुसा आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करितो कारण तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस.

३. दुःख/यातना:

          जो कारागीर लाकडाच्या सोबत काम करीत होता तोच त्या लाकडावर खिळला गेला. जो मेंढपाळ आपल्या मेंढरांची निगा राखीत होता तोच मेंढपाळ छिन्न-विच्छिन्न झालेला आहे. जो जिवंत पाण्याचा झरा आहे तोच पाण्यासाठी व्याकूळ झालेला आहे. ज्या हाताने तो इतरांना बरे करीत होता तेच हात खिळलेले आहेत, रक्तबंबाळ झालेले आहेत. जे हृदय प्रेम करीत होते व इतरांना प्रेमाचा संदेश देत होते त्याच हृदयात भाला भोसकण्यात आला आहे. प्रभू येशूने ह्या सर्व व्यथा सहन केल्या कारण त्याने आपल्यावर प्रेम केले आहे.

४. क्षमा:

          क्षमेचं सर्वश्रेष्ठ वरदान आपल्याला क्रुसावरून मिळालेलं आहे. “बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करीत आहेत ते त्यांना माहीत नाही.” आपल्या वैऱ्याला क्षमा करणे हा महामंत्र प्रभू येशू आपल्याला देत आहे. क्षमा आपण इतरांना देतो परंतु त्याचं फळ आपल्या प्रत्येकांना चांगुलपणामध्ये किंवा शांतीच्या रुपामध्ये मिळत असते.

५. त्याग/समर्पण:

          प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याग हा परिपूर्ण जीवनाचा महान संदेश आहे. क्रुसावरून त्याने आपला आत्मा देव पित्याच्या स्वाधीन केला. रक्त आणि पाण्याद्वारे त्याने आपल्या सर्वांचे पाप धुवून काढले, त्याची आई आपल्या शिष्याच्या स्वाधीन केली. म्हणजेच प्रभू येशूने स्वतःसाठी काहीच राखून ठेवले नाही. त्याने आपलं सर्वस्व आपणा सर्वांसाठी समर्पण केले.

          प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आपल्या प्रत्येकांच्या उद्धारासाठी समर्पित करण्यात आलेले आहे. त्याच्या मरणाद्वारे नवजीवनाचा मार्ग मिळालेला आहे. त्याच्या घायाद्वारे आपणा सर्वांना बरेपण मिळालेलं आहे. गुड फ्रायडे; गुड, उत्तम, शुभ आहे कारण आपणा सर्वांचा परमेश्वर पित्याबरोबर समेट झाला आहे. 

Tuesday, 30 March 2021

            Reflection for the Homily of Holy Thursday (01/04/2021) By Fr. Suhas Pereira





आज्ञा गुरुवार



दिनांक: ०१/०४/२०२१

पहिले वाचन: निर्गम १२:१-८, १२-१५

दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र ११:२८-३६

शुभवर्तमान: योहान १३:१-१५


प्रस्तावना:

          प्रिय बंधू-भगिनिंनो आज आपणआज्ञा गुरुवारसाजरा करीत आहोत. आजच्या दिवशी शिष्यांबरोबर शेवटचे भोजन करत असताना प्रभू येशूने पवित्र ख्रिस्तशरीर संस्काराची स्थापना केली आणि आपल्या शिष्यांना आणि त्याचबरोबर संपूर्ण ख्रिस्तसभेला नम्र आणि निस्वार्थी सेवेचा महामंत्र दिला. आजच्या मिस्साबलिदानाने आपण पवित्र त्रिदुमची किंव्हा तीन पवित्र दिवसांची सुरुवात करतो. या तीन दिवशी आपण प्रभू येशूचे पवित्र दुःखसहन, क्रुसावरील मरण आणि त्याचे पुनरुत्थान यांवर मनन-चिंतन करतो. हे तीन दिवस आणि ह्या तीन घटना एका महत्वाच्या घटनेबद्दल सांगतात: येशू आपल्या पित्याकडे परत जातो. येशूचे त्याच्या शिष्यांबरोबरचे शेवटचे जेवण, त्याचा वधस्तंभावरील मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान एक अविश्वसनीय सत्य प्रकट करतात: परमेश्वर आपल्या पुत्राद्वारे संपूर्ण मानवजातीचे म्हणजेच त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या अशा सर्वांचं तारण करतो.

      पवित्र मिस्साबली हा आपल्या तारणाचा आणि चिरंतन जीवनाचा मार्ग आहे. परंतु जर आपल्याकडे जीवनाकडे पाहण्याचा चांगला दृष्टिकोन असला, चांगली वृत्ती आपल्या अंगी असली आणि पवित्र मिस्साबलिदानावर आपली खरी श्रद्धा असली तरच आपण साजरा करणारा प्रत्येक मिस्साबली आपल्यासाठी तारणदायक आणि फलद्रुप ठरू शकतो. आणि आपल्या शिष्यांचे पाय धुण्याद्वारे प्रभू येशू आपल्याला तेच सांगत आहे: जेव्हा तुम्ही नम्र होऊन इतरांची सेवा करू शकता तेव्हाच तुम्ही स्वर्गीय जीवनाचे वतनदार होऊ शकता. प्रभू आपल्याला स्पष्ट आज्ञा देत आहे: जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले”. आपलं प्रत्येक कृत्य, आपली प्रत्येक कृती जी प्रेमावर आधारित असते, प्रेमाद्वारे होते, त्या कृतीद्वारे आपण प्रभू ख्रिस्ताच्या आणि एकमेकांच्या जवळ येऊन ख्रिस्ताच्या रहस्यमय शरीराचे-पवित्र ख्रिस्तसभेचे सदस्य म्हणून एकमेकांशी जोडले जातो.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: निर्गम १२: १-८, १२-१५

                   आजच्या दिवशी आपण परमेश्वराच्या मध्यस्थी आणि दयेद्वारे मिसर देशाच्या गुलामगिरीतून मुक्त होणाऱ्या इस्रायली लोकांबरोबर एका पातळीवर, शेवट आरंभांसह नवीन कराराच्या उद्घाटनासह जुन्या कराराच्या पूर्ततेचा आनंद साजरा करतो. देवाने अब्राहामाबरोबर त्याच्या संततीचं एक मोठे राष्ट्र करण्याचा करार केला होता आणि इस्रायली लोकांची मिसर देशातून सुटका या कराराची पूर्तता आहे. निर्गम या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकतो की, देव इजिप्तच्या गुलामगिरीतून इस्राएली लोकांना वाचवतो. हा पहिला वल्हांडण सण, खरं तर पहिली गोष्ट आहे जी, इस्रायली लोकं, आता त्यांच्या सुटकेनंतर आणि परमेश्वराची प्रजा झाल्यानंतर करतातवल्हांडण सण, किंव्हा पास्काचा सण हा मुक्तीचा, स्वातंत्र्याचा आणि परिपूर्तीचा उत्सव आहे.

दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र ११:२८-३६

          दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो कि प्रभुभोजनाचं खरं उद्दिष्ट प्रभू पुन्हा येईपर्यंत त्याच्या मरणाची आणि विजयी पुनरुत्थानाची सुवार्ता संपूर्ण जगाला देणे हे आहे. दैनंदिन प्रभुभोजनविधीद्वारे ख्रिस्तीजण परमेश्वराने जगाच्या तारणासाठी आपल्या पुत्राचे जे बलिदान दिले त्याचं स्मरण करतात. मिस्साबलिदान हे नम्रता आणि प्रेमाचे प्रतीक आहे म्हणूनच हि दोन मूल्ये ख्रिस्तीजनांनी आपल्या जीवनात अंगीकारणे गरजेचं आहे.

मनन चिंतन:

          पवित्र मिस्साबलिदानाचं रहस्य थोड जवळून समजण्यासाठी मी एक उदाहरण देतो: एक महिला आपला पन्नासावा जन्मदिवस साजरा करत होती आणि तिने अनेक स्नेह्यांना आपल्या जन्माचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. त्यासाठी तिने जय्यत तयारी केली. तिने आपलं घर सुशोभित केलं, घरात संगीतवादनाचा कार्यक्रम ठेवला, उत्तम प्रकारची खाद्ये, मिष्ठान्न आणि पेय्ये बनवली. पाहुण्यांनी तिच्या घरी सेवन केलेल्या अन्नाद्वारे त्या स्त्रीने तिच्या जीवनाचा, तिच्या प्रेमाचा एक भाग त्यांच्याबरोबर वाटला. पाहुण्यांनासुद्धा त्यामुळे खूप आनंद झाला, त्यांनी त्या स्त्रीची तोंड भरून स्तुती आणि वाहवा केली. तिचे प्रेम, तिचे आदरातिथ्य आणि पाहुण्यांच्या प्रति तिची निष्ठा पाहून त्यांना आनंद झाला, ते समृद्ध झाले. तिच्या आदरातिथ्याद्वारे पाहुण्यांनी एक कुटुंब होण्याचा खरा अर्थ जाणून घेतला आणि जीवन जगण्यासाठी नवीन स्फूर्ती आणि चैतन्य त्यांच्या अंगात संचारले. त्या महिलेचा तो पन्नासावा जन्मदिवस खूप वर्षे तिच्या पाहुण्यांच्या स्मरणात रेंगाळत राहिला. त्या महिलेने आपला पन्नासावा जन्मदिवस ज्या प्रकारे साजरा केला तो प्रकार आपल्याला पवित्र भोजनविधीची, पवित्र मिस्साबलीची आठवण करून देते.

          आपण सर्वजण आज या पवित्र मंदिरात एक सण, एक सोहळा साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. आणि प्रभू ख्रिस्त स्वतः या सोहळ्याचा यजमान, या घराचा धनी, आपल्या  सर्वांचं आदरातिथ्य करणारा आहे. आपण सर्वजण त्याचे अतिथी किंव्हा पाहुणे होत. पवित्र प्रभुभोजनात तो स्वतःला फक्त अर्धवट किंव्हा थोडासा नाही तर संपूर्णपणे आपणा सर्वांसाठी अर्पण करतो. आपण त्याच्या नावाने जमलेलो आहोत, त्याने आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आणि तो आपल्यामध्ये हजर आहे. या पवित्र बलिदानाचा उगम येशूने आपल्या शिष्यांबरोबर घेतलेल्या आणि आजच्या दिवशी आपण साजरा करत असलेल्या शेवटच्या भोजनात आहे. पवित्र गुरुवारी प्रभू येशूने प्रत्येक वर्षाप्रमाणे आपल्या बारा शिष्यांबरोबर पास्काचा सण साजरा केला. परंतु हि संध्याकाळ मात्र एक आगळी-वेगळी संध्याकाळ ठरली. दुसऱ्या वाचनात आपण ऐकल्याप्रमाणे येशूने आजच्या दिवशी एका नवीन सणाची, एका नवीन सोहळ्याची स्थापना केली. त्या सोहळ्याला आपण पवित्र मिस्साबलिदान या नावाने संबोधितो.

          पवित्र ख्रिस्तसभेच्या शिकवणुकीनुसार हे माझ्या आठवणीसाठी करा ह्या शब्दांद्वारे प्रभू येशूने आपल्या शिष्यांची याजकपदी नेमणूक केली. हा नवीन सोहळा पुढेसुद्धा सर्व ठिकाणी आणि सर्व वेळा साजरा केला जावा अशी त्याची प्रबळ इच्छा होती. या उत्सवाद्वारे संपूर्ण ख्रिस्तीजनांशी जोडले जावे अशी त्याची इच्छा होती म्हणूनच हे पवित्र मिस्साबलिदान भविष्यातही साजरे व्हावे अशी आज्ञा ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिली. संत मत्तयलिखित शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, कि जेथे दोघे किंव्हा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले आहेत तेथे मी त्यांच्यामध्ये हजर आहे (१८, २०). तो असे म्हणत नाही की, “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले असतील तेथे मी त्यांचा प्रमुख, म्होरक्या म्हणून हजर आहे”. प्रभू येशू हा पदस्तर, श्रेणीबंध, अधिकार श्रेणी ह्यांवर भर देत नाही तर बंधुभाव, संगत, सहभागिता, सोबत  ह्या गोष्टींवर भर देत आहे. मिस्साबलिदानाच पौरोहित्य जरी धर्मगुरू करत असले तरी धर्मगुरू हे मिस्साबलिदानाचे केंद्रबिंदू नसतात. ख्रिस्त आणि त्याच्याबरोबर एक शरीर-एकदेह झालेले ख्रिस्तीजन हेच मिस्साबलिदानाच्या केंद्रस्थानी असतात.

          जेव्हा त्याने भाकर घेतली आणिहे माझे शरीर आहे”, असे म्हटले, तेव्हा त्याने सर्व काळासाठी घोषित केले, की प्रत्येक पवित्र प्रभुभोजनात भाकरीचं रूपांतर त्याच्या पवित्र शरीरात होईल. परंतु पवित्र मिस्साबली हा येशूला भौतिक स्वरूप देण्याविषयी नाही. पवित्र  मिस्साबलिदान म्हणजे जादू-टोणा नाही ज्यामध्ये काही मंत्र वदल्याने ख्रिस्त सदेह प्रकट होतो.

          प्रभू येशूचे आपल्यावर प्रेम आहे आणि त्याला या प्रेमापोटी आपल्यामध्ये, आपल्याबरोबर आणि आपल्यात खरा देव आणि खरा मनुष्य म्हणून वास करायचा आहे. म्हणूनच प्रभू येशूने आजच्या दिवशी पवित्र ख्रिस्तशरीर संस्काराची स्थापना केली. या मिस्साबलीमध्ये भाकर आणि द्राक्षारस त्याच्या आपल्यावर असलेल्या अतुलनीय प्रेमाची चिन्हे बनतात. प्रत्येक वेळी जेव्हा आपण हा पवित्र संस्कार साजरा करतो, तेव्हा प्रभू ख्रिस्त आपल्यामध्ये हजर असतो आणि आपल्याबरोबर हा त्याच्या प्रेमाचा सोहळा साजरा करतो.

          प्रभू येशूचे या जगातील शेवटचे भोजन हे त्याच्या आपल्यावरील अथांग प्रेमाचे चिन्ह आहे. याच प्रेमाखातर आणि प्रेमाद्वारे तो आपल्या तारणासाठी स्वताःचे बलिदान देतो. म्हणूनच पवित्र मिस्साबलीमध्ये आपण त्याच्या प्रेमाचा आणि त्याच्या जीवनाचा अनुभव घेतो.

          पवित्र मिस्साबली हा देवाला शोधण्याचा आणि त्याच्याशी एका विशिष्ठ रीतीने एक होण्याचा मार्ग आहे. परंतु पवित्र मिस्साबली हा देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग नाहीमनुष्याच्या जवळ येण्याचे विविध मार्ग परमेश्वराला ठाऊक आहेत. विशेषत: या कोरोना महामारीच्या काळात पूर्वीच्या वर्षांप्रमाणे आपण सर्व एकत्र मोठ्या संख्येने पवित्र मिस्साबली साजरा करू शकत नाहीत, तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देवाचं प्रेम आणि त्याचा आत्मा पवित्र मिस्साबली उत्सवाच्या बाहेरसुद्धा प्रभावीपणे कार्यरत असू शकतात.

          धन्यवादित  हेनरिक स्यूसे यांनी अशी प्रार्थना केली: “मी तुला स्वत: च्या स्वाधीन करतो आणि तुला घेऊन मी माझ्याबरोबर जोडतो. तू स्वत: अस्तित्व गमावतोस आणि माझ्यात रूपांतरित होतोस. "

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रभू येशूने आपल्या दुःखसहनाच्या आदल्या संध्याकाळी पवित्र मिस्साबलिदानाची स्थापना केली. त्या तारणाऱ्या प्रभूकडे आपण नम्रपणे प्रार्थना करू या.

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. हे प्रभू ख्रिस्ता, आमच्यावरील प्रेमाखातर तू आमच्यामध्ये आलास. तुझ्या ख्रिस्तसभेत प्रेम, ऐक्य आणि निष्ठेची भावना वाढीस लागू दे.

२. हे प्रभू, तू नम्र बनून आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आमच्या समाजात समेटाची उमेद वाढीस लागू दे आणि जी लोक एकमेकांपासून दुरावली आहेत त्यांच्यातील मतभेद आणि वैमनस्य नाहीसे होऊदे आणि त्यांच्या जीवनात सदैव शांती आणि प्रेम नांदू दे.

३. तुझे आपल्या शिष्यांबरोबरचे शेवटचे भोजन हे प्रेमाचे चिन्ह होते, प्रीतिभोजन होते. आमच्या कुटुंबांमध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये प्रेमाची भावना अधिकाधिक वाढू दे. म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

४. हे प्रभो, प्रीतीच्या कृत्याने तू आपल्या दुःखसहनाला सुरुवात केली. जी लोकं आजारी आणि पीडित आहेत त्यांना तुझे सांत्वन दे. तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे त्यांना त्यांचा क्रूस वाहण्यास बळ आणि धैर्य दे.

हे परमेश्वरा, तुझ्या प्रिय पुत्राने त्याच्या या जगातील शेवटच्या भोजनाद्वारे दैवी प्रीतीचं स्मरणचिन्ह आमच्यासाठी या पवित्र मिस्साबलीद्वारे दिलेलं आहे. आमच्या तुझ्यावरील निष्ठेत, श्रद्धेमध्ये आणि ऐक्यात दृढ होण्यास तुझी कृपा आम्हाला दे. हि प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.