Thursday, 18 March 2021

          Reflection for the Homily of 5th Sunday of Lent (21/03/2021) By Br. Jeoff Patil




प्रायश्चित काळातील पाचवा रविवार

दिनांक: २१-०३-२०२१

पहिले वाचन: यिर्मया ३१: ३१-३४

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ५: ७-९

 शुभवर्तमान: योहान १२: २०-३३




प्रस्तावना:

          “गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर अमाप पिक देतो.” आज आपण उपवास काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला त्यागमय जीवन जगण्यास बोलावीत आहे. यिर्मया संदेष्टा पहिल्या वाचनात इस्त्राएल लोकांना सांगतो की देव तुमच्याबरोबर नवीन करार करून तो करार तुमच्या हृदयावर लिहिणार आहे. ह्याद्वारे तो तुमचा देव होईल व तुम्ही त्याची प्रजा होणार. इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात आपण वचतो की, ख्रिस्त आपल्या पित्याशी आज्ञाधारक राहिल्यामुळे देवाने त्याला परिपूर्ण करून सर्व विश्वाचा तारणकर्ता केला आहे. योहानलिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त स्वतःला गव्हाच्या दाण्याची उपमा देतो. ज्याप्रमाणे गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरतो व पुष्कळ पिक देतो त्याप्रमाणे ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरून आपलं तारण करणार आहे. ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनाचा त्याग करून आपल्याला पापापासून मुक्त केले त्याप्रमाणे आपण सुध्दा सदैव इतरांसाठी जगावे म्हणून या पवित्र मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया. 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यिर्मया ३१: ३१-३४

          यिर्मया भविष्यवादी बाबीलोनाच्या लोकांचे सांत्वन करतो. देव त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या तारणासाठी “मसिहाचे” युग येत आहे अशी भविष्यवाणी करतो. देव आपल्या निवडलेल्या लोकांशी नवा करार करणार आहे. हा नवा करार जुन्या करारासारखा नसणार तर ख्रिस्ताच्या बलिदानाने हा नवा करार प्रस्थापित होईल. पूर्वी झालेल्या सर्व करारांपेक्षा हा नवा करार एकदमच वेगळा असणार. हा करार मानवाच्या हृदयातच कोरला जाणार. देवाने हा करार मानवाच्या मनावर कोरला असता परंतु मन हे चंचल असल्यामुळे आणि त्याची स्मरणशक्ती कमी असल्यामुळे देव हा करार त्याच्या मनावर नव्हे तर, हृदयावर कोरणार आहे. हा नवीन करार प्रीतीचा व क्षमेचा करार आहे. 

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ५: ७-९

          प्रत्येक ख्रिस्ती माणूस ख्रिस्ताचा प्रेषित व शिष्य आहे. आपण आपले ख्रिस्ती जीवन कसे जगावे हे आपल्याला इब्री लोकांस पत्र ह्यामध्ये सांगण्यात आले आहे. ख्रिस्त आज्ञाधारक झाला व त्याने मानवी रूप घेऊन धरतीवर येऊन दुःख सहन केले व मरण पावला आणि आपल्या सर्वांचा तारणारा बनला. 

शुभवर्तमान: योहान १२: २०-३३

          योहान सुवार्तिक येशूच्या येरुशलेमेत येण्याच्या शेवटच्या वेळेचं वर्णन करतो. येरुशलेमेत येशू ख्रिस्ताचा हा विजयी/गौरवी प्रवेश होता.

गव्हाचा दाणा: गव्हाचा दाणा हे रूपक आपणास स्पष्ट करते की येशूच्या सभोवताली जमलेला जमाव हा शेती व्यवसाय करणारा असावा. शेतकऱ्यांना गव्हाच्या दाण्याचे महत्त्व काय हे माहित आहे आणि त्याचे पिक किती प्रमाणात मिळते हे त्यांना ठाऊक आहे. ख्रिस्त त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडींची उदाहरणे देऊन आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे.

ख्रिस्त स्वतःची तुलना एका गव्हाच्या दाण्याशी करतो. जशी गव्हाच्या दाण्याची जमिनीत पेरणी केली जाते तसा येशू ख्रिस्ताचा मृत देह जमिनीत (थडग्यात) ठेवला जाईल. जमिनीत पेरलेल्या गव्हाचा दाणा जसा मृत्यू पावतो तसाच ख्रिस्त देखील मृत्यू पावेल आणि जसे मृत्यू पावलेल्या एका गव्हाच्या दाण्याला अंकुर फुटून त्याचे भरपूर प्रमाणात पिक येते तसेच ख्रिस्त मृत्यूतून उठून ख्रिस्तसभा प्रस्थापित करेल. 

बोधकथा:

          एका खेडेगावात एक गरीब कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात आई आणि तिच्या दोन लहान मुली राहत होत्या. ऐके दिवशी एका अपरिचित व्यक्तीने त्यांना भेट दिली आणि त्या कुटुंबाला ४ किलो तांदूळ भेट म्हणून दिले. त्या घरातील आईने पटकन त्या तांदळाचे दोन वाटे केले, त्यातला एक स्वतःसाठी ठेवला व दुसरा आपल्या शेजारी असलेल्या कुटुंबात नेऊन दिला. आई घरी आल्यावर तिला तिच्या मुलींने विचारले, ‘आई आपल्याला दिलेले तांदूळ तू त्यांना का दिले?’ तेव्हा ती म्हणाली, ‘दोन दिवसापासून आपण जसे उपाशीपोटी आहोत तसेच ते देखील उपाशी आहेत’. आई पुढे म्हणाली, ‘ज्याप्रमाणे आपल्यावर कोणी दया दाखवली व आपल्या अडचणीच्यावेळी आपल्याला मदत केली, त्याप्रमाणे आपणदेखील आपल्याजवळ जे आहे त्यातून इतरांना मदत केली पाहिजे.’ 

मनन-चिंतन:

          सोन्याला शुध्द होण्यासाठी अग्नीतून जावे लागते. जमिनीला भुसभुशीत होण्यासाठी नांगर सहन करावा लागतो. दगडाला मूर्ती होण्यासाठी फटके सहन करावे लागतात. अशाच प्रकारचे उदाहरण आज आपण आजच्या उपासनेत पाहत आहोत. सर्व माणसांची नाती ही त्यागावर अवलंबून असतात. येशू येशू ख्रिस्ताने आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्यामध्ये व देवामध्ये जवळीकता आणली आहे. येशूने कालवरीवर आपला प्राण देऊन आपल्यामध्ये व देवामध्ये जे नाते तुटले होते ते पुन्हा जोडले. येशूने आपल्या जीवनाचा त्याग करून आपल्यासाठी आपल्या पापांची क्षमा मिळवली आहे.

          आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपणांस सांगतो की, जो आपल्या जीवावर प्रिती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. अर्थात ख्रिस्त आपल्याला त्यागमय जीवन जगण्यासाठी सांगत आहे. त्याग करावा! पण कशाचा? ख्रिस्ताने त्याग केला तो त्याच्या इच्छेचा “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे (योहान:३:३६). ख्रिस्ताने पित्याच्या इच्छेस प्राधान्य दिले म्हणूनच देवाने ख्रिस्तास उंच केले, त्यास गौरविले.

          तेराव्या शतकातील असिसिकर संत फ्रान्सिस मौजमजा करत होता. आपल्या बापाच्या पैशांची उधळपट्टी करत होता. त्याला आपल्या जीवनात सरदार व्हायची खूप इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी फ्रान्सिस आपल्या इच्छेप्रमाणे जगत होता. त्याला जे काही योग्य वाटत होते ते तो करत होता. परंतु ख्रिस्ताने संत फ्रान्सिसला जगाचा सरदार न बनवता स्वर्गाचा सरदार बनवला.

          येशू आजच्या शुभवर्तमानात स्वतःला गव्हाचा दाणा म्हणत आहे. जेव्हा गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरतो तेव्हा पुष्कळ पिक देतो. तशाच हेतूने येशू मरणार व सर्वांना तारण देणार. देवाने आपल्या प्रेमाखातर हे सर्व केले. तर आपण सुध्दा हे सर्व केले पाहिजे.

          आज ख्रिस्त आपणास आपल्या मी पणाला, गर्वाला आणि खोटेपणाला तिलांजली देण्यास सांगत आहे. जे कोणी आपल्या स्वःइच्छेला प्राधान्य देतात ते जणू जमिनीत पडून न मेलेल्या गव्हाच्या दाण्यासारखे आहेत आणि जे ख्रिस्ताच्या इच्छेला प्राधान्य देतात ते जमिनीत पडून मेलेल्या गव्हाच्या दाण्यासारखे आहेत, जे मेल्यानंतरच अधिकाधिक फळ देऊ शकतात. आपण दुसऱ्यांवर प्रिती केली पाहिजे. आज संपत्तीमुळे भांडणं होऊन जीव घेतात. शेजाऱ्यांबरोबर भांडण झाल्यामुळे लहान मुला-मुलींना शेजाऱ्यांबरोबर बोलायला बंद करतात. गर्व, स्वार्थ व हेवा ह्या कारणाने आपण नम्र बनत नाहीत. तिरस्कार, द्वेष, मत्सर आपल्या अंतःकरणात असल्याने आपल्याला दुसऱ्यांना क्षमा करावयाला आवडत नाही. जर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थाची साक्ष सर्व जगाला द्यायची असेल तर आपण सुध्दा प्रभू येशु ख्रिस्ताप्रमाणे जीवन जगायला हवे. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. ज्याप्रमाणे गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरून जातो व पुष्कळ पीक देतो; त्याप्रमाणे आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु-धर्मभगिनी व प्रापंचिक ह्यांनी सुद्धा गव्हाच्या दाण्याप्रमाणे झिजून जाऊन येशू ख्रिस्ताचे प्रेषितीय कार्य पुढे नेण्यास त्यांना कृपा, शक्ती व आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. जे लोक व तरुणपिढी व्यसनाच्या आहारी जाऊन आपली नैतिक जबाबदारी पार पाडत नाहीत. अशा सर्व लोकांना परमेश्वराचा करुणामय स्पर्श व्हावा व त्यांची व्यसनातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. जे लोक पापांच्या अंधारात चालून वाईटाचे व क्रूरतेचे जीवन जगत आहेत, तसेच ज्यांचे वाईट संगतीमुळे जीवन अंधारमय झाले आहे. अशा सर्व लोकांना येशू ख्रिस्ताचा प्रकाश दिसावा व अंधारातून बाहेर पडून चांगले जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. ज्या कुटुंबात भांडण, संशय, अशांतीचे वातारवण निर्माण झाले आहे व ज्यामुळे कुटुंबात प्रेम कमी होऊन एकमेकांमध्ये भेदभाव, तिरस्कार निर्माण झालेला आहे अशा कुटुंबावर येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद सदैव राहावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. जे लोक नोकरीच्या शोधात, नोकरी नसल्यामुळे उदास, दु:खी होऊन नैराश्याचे जीवन जगतात व जे कोणी आत्महत्येचा विचार करतात अशा लोकांना लवकरात लवकर नोकरी मिळून जीवनात आनंदी राहून जीवन जगण्यासाठी प्रभूने शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

६. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करू या.


No comments:

Post a Comment