झावळ्यांचा रविवार
दिनांक: २८-०३-२०२१
पहिले वाचन: यशया ५०:४-७
दुसरे वाचन: फिलीपकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान: मार्क १४:१-१५:४७
प्रस्तावना:
आज अखिल ख्रिस्तसभा ‘झावळ्यांचा रविवार’ साजरा
करीत आहे. ह्या आठवड्याला ‘येशूच्या दुःखसहनाचा’ किंवा ‘पवित्र आठवडा’ असे ही
संबोधिले जाते. प्रभू येशूचा येरुशलेमेत जयोत्स्वाने प्रवेश झाला, ह्या घटनेचे आपण विशेष स्मरण करीत आहोत. प्रभू येशूच्या येरुशलेमेतील
प्रवेशाच्या वेळी लोकांनी आनंद साजरा केला व येशूच्या स्वागतासाठी खजुराच्या
झाडाच्या झावळ्या किंवा डहाळया रस्त्यावर पसरवल्या. ज्या लोकांनी यहूद्यांचा राजा
तुझा जयजयकार असो अशी घोषणा केली; दुदैवाने, कालांतराने त्याच लोकांनी ह्याला क्रुसी खिळा, ह्याला
क्रुसी खिळा अशी घोषणा केली.
आजची तिन्ही वाचने आपणास येशूच्या दुःखसहनाबाबत सांगत आहेत. पहिल्या वाचनात
यशया प्रवक्ता आपल्या दुःखाद्वारे ख्रिस्ताच्या दुःखसहनाची शेकडो वर्षाआधी पूर्वतयारी
करीतो आणि स्वतः येशू ख्रिस्ताचा यातनामय आवाज होतो. तर दुसऱ्या वाचनात संत पौल
आपणास सांगतो की, ख्रिस्ताने त्याच्या नम्रतेने व
आज्ञाधारकपणाने एक उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवले आहे. तसेच शुभवर्तमानामध्ये
देवाने मानवाच्या तारणाकरीता रचलेला मार्ग म्हणजे येशू ख्रिस्ताचे दुःखसहन व
क्रूसावरील मरण ह्यांचा सविस्तर वृतांत आपणास आज ऐकावयास मिळत आहे.
ह्या पवित्र आठवड्यात देऊळ माता आपणा सर्वांना येशू ख्रिस्ताच्या दुःख
सहनात भक्तिभावाने सहभागी होण्यास, तसेच ख्रिस्ताच्या दुःख,
मरण व पुनरुत्थानावर मनन चिंतन करण्यास पाचारण करत आहे. ह्यास्तव
ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना विशेष कृपा मागुया.
मनन
चिंतन:
माझ्या प्रिय
बंधू आणि भगिनिंनो, आज आपण झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहोत. जखऱ्या संदेष्ट्याच्या
पुस्तकात अधाय ९ ओवी ९ मध्ये आपण वाचतो, “सियोनकन्ये, जोरानें आनंदचा गजर कर; यरुशलेमकन्ये,
गजर कर; पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे; नितीमत्वाने तो तुझकडे येत आहे”. तसाच आपला राजा
येशू, आज येरुशलेममध्ये मोठ्या जयजयकाराने व मोठ्या जल्लोषाने प्रवेश करत आहे. आणि
म्हणून त्याच्या स्वागतासाठी काही लोक आपली वस्त्रे, काही लोक झाडाच्या फांद्या,
तर काही जण खजुरीच्या फांद्या कापून त्याचा जयजयकार, त्याचा जल्लोष करतात: ‘होसान्ना,
होसान्ना, होसान्ना; प्रभूच्या नावाने येणारा, पवित्र नगरीचा राजा धन्यवादीत असो ...
धन्यवादीत असो’. परंतु, ह्याच झावळ्यांच्या रविवारला दुःखसहनाचा रविवार देखील ओळखले जाते; कारण जी लोकं आज
त्याचा जयजयकार करतात, त्याचा जल्लोष करतात, त्याचं स्वागत करतात तीच लोकं काही
दिवसानंतर त्याच्या विरुद्ध जाणार आहेत, त्याच्या विरुद्ध बोलणार आहेत; “ह्याला
क्रुसावर खिळा, ह्याला ठार मारा.” असे शब्द, हेच लोक येशू विरुद्ध बोलणार आहेत,
त्याच्या विरुद्ध जाणार आहेत.
ही वेळ, सुखाची
आणि दुःखाची वेळ आहे. ही वेळ आहे, उजेडाची आणि अंधाराची. ही वेळ दुःखाची आणि
अंधाराची का? कारण ज्या देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला, आपल्यासाठी पाठवलं
त्याला अपराधी म्हणून पकडलं जाणार आहे; त्याला अंधाऱ्यारात्री गुन्हेगार म्हणून
घोषित केलं जाणार आहे; आणि त्याला क्रुसावर ठार मारलं जाणार आहे. ही वेळ सुखाची
किंवा प्रकाशाची अशासाठी की आपल्या मानवीपणामुळे आपण जे पाप केलं त्या पापापासून
आपलं तारण व्हावं; आपल्याला नवीन जीवन मिळावं, आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त
व्हावं, म्हणून देव त्याच्या पुत्राद्वारे आपल्याला तारण देणार आहे. आणि म्हणूनच
हे जे जल्लोषाच, आणि त्याला ठार मारायचं जे मानवीपणाच जे रूप आहे, ते ह्या
झावळ्यांच्या रविवारी आपणाला दिसून येतं. आपण पाहतो की, जे काही घडलं, ते विनाकारण
घडलं नाही, तर त्याला अर्थ आहे, कारण ते आपल्या चांगल्यापणासाठी घडतं होतं;
त्याद्वारे काही तरी चांगलं घडणार होतं; आपल्याला तारण मिळणार होतं. तसचं आपण
शुभवर्तमानात ऐकत आहोत की, जे काही यहूदा (जुदास) करत होता, ते त्याला माहित नव्हतं.
परंतु जे भाकीत केलं होतं, ते पूर्ण व्हावं म्हणून ते सर्व घडलं. परंतु यहुदी,
शास्त्री, परुशी काय करत होते? त्यांना तरी ठाऊक होतं का की, ते काय करत आहेत? देवाच्या
पुत्राला, राज्यांच्या राज्याला गुन्हेगार ठरवून त्याला ठार मारतात हे त्यांना
ठाऊक होतं का?
प्रभू येशूने
पेत्र तसेच जुदासला देखील आपले मित्र म्हणूण हाक मारली होती. जुदासने जे पाप केलं,
ते त्याला नंतर समजलं; परंतु त्याला देवाच्या क्षमेपेक्षा त्याच पाप मोठं वाटलं;
म्हणून त्याने जाऊन, आत्महत्या करून स्वःताचा जीव घेतला. पेत्राने सुद्धा पाप केलं
होतं, त्याने प्रभू येशूला नाकारलं होत; परंतु त्याला आपल्या पापांपेक्षा
परमेश्वराची दया मोठी वाटली; तेव्हा त्याने पश्चाताप केला आणि चांगल्या मार्गावर
चालून, देवाच्या राज्याची घोषणा केली आणि देवाचं राज्य उभारण्याचा त्याने प्रयत्न
केला.
आज पासून आपण
पवित्र आठवड्याला सुरुवात करीत आहोत. पवित्र आठवडा म्हणजे काय? पवित्र जीवन कसं
आहे, किंवा कसं जगायचं? प्रत्येकाने हे स्वतःला विचारलं पाहिजे की, माझ्यासाठी
पवित्रपणाची व्याख्या काय आहे? जे दररोज प्रार्थना करतात, जे मंदिरात जातात, तेच
पवित्र आहेत का? ह्या गोष्टी पवित्र जीवन जगण्यासाठीच आहेत, परंतु त्यांच्याही पलीकडे
जाऊन, माझी पवित्रपणाची व्याख्या काय आहे? माझे आचार आणि माझे विचार, माझा
सर्वांगीण विकास आणि माझे जीवन, माझं बाह्य जीवन आणि माझं आंतरिक जीवन (अंतःकरण), ह्यांचं
मिलन असणे, म्हणजेच पवित्रपण.
आजच्या ह्या
झावळ्यांच्या रविवारी आपण काय शिकत आहोत? आजच्या दिवशी आपण तीन गोष्ठी शिकलो
पाहिजे, आणि स्वतःला सांगितलं पाहिजे व विचारलं पाहिजे की, माझं जीवन कसं आहे?
माझं जीवन, जे लोक येशूचा जयजयकार करतात परंतु काही दिवसांनी ‘त्याला क्रुसावर
खिळा’ असं म्हणणार आहेत, त्यांच्यासारख आहे? की, समोरून चांगलं आणि मागून चाकू भोसकणारे,
असं माझं जीवन आहे? किंवा समोरून एखाद्याची मी स्तुती करतो परंतु त्याच्या
पाठीमागे त्याच्या विरुद्ध वाईट बोलतो? त्याच बरोबर, दुसरा प्रश्न मी स्वतःला
विचारायला पाहिजे, की माझा पवित्र आठवडा मी कसा घालवणार आहे, माझं जीवन मी कसं
पवित्र करणार आहे? फक्त ह्याच दिवसात, मंदिरात जाऊन किंवा प्रार्थना करून का? ते
सर्व करणं गरजेचे आहे, परंतु त्याच बरोबर दररोज घरी प्रार्थना करणे, देवाचा शब्द
वाचणे, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे, दुसऱ्यांना मदत करायची, त्यांच्याविषयी चांगले
शब्द बोलावे असं पवित्र जीवन जगून, सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न केला
पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे, जे काही प्रभू येशू करत होता, जे काही त्याच्याविषयी
घडणार होतं, ते तो त्याच्या शिष्यांना सांगतो: “मला धरून ठार मारणार आहेत; परंतु
मी पुन्हा उठून त्या मरणावर विजय मिळविन”. असं सांगतात की, ह्या वेळेशिवाय दुसरी
जी येणारी वेळ आहे, ती आपणा कोणालाच माहित नसते आणि ती माहित असणे ही गरजेचे नाही;
परंतु त्या वेळेसाठी मी तयार आहे का? मग ते सुख असो किंवा दुःख असो, तो काळोख असो
किंवा उजेड असो. जेव्हा ती वेळ समोर येते, तेव्हा तिला मी कसा सामोरे जातो? ती मी
कशी सहन करतो? आणि त्या वेळेमधून बाहेर पडण्याचा मी कसा प्रयत्न करतो? त्याचे फळ
चांगले किंवा वाईटही असू शकते; तरीही, त्या वेळेचं स्वागत करण्यासाठी, त्याला
सामोरे जाण्यासाठी, त्यावर विजय मिळविण्यासाठी मी तयार असलो पाहिजे.
आजच्या ह्या
झावळ्यांच्या रविवारी, जसा येशू त्या यरुशलेमात आपल्या तारणासाठी, आपल्या बरेपणासाठी
प्रवेश करतो, त्याच्याबरोबर आपण ही प्रवेश करू या. त्याच्याबरोबर जाऊया; आपल्या
तारणाचा अनुभव घेऊया आणि त्याला सांगूया की जसं तू सर्व काही स्वीकारलं तसं
आम्हालाही स्वीकारण्यास मदत कर, धीर दे, प्रोत्साहन दे. त्याच बरोबर आमचं जीवन
पवित्र करण्यासाठी आमच कौटुंबिक जीवन पवित्र करण्यासाठी आमच सामाजीक जीवन पवित्र
करण्यासाठी, आमचा आत्मा शुद्ध करण्यासाठी आम्हाला शक्ती व सामर्थ्य दे. आणि त्याच
बरोबर जसं तू आम्हाला तारण मिळवून देणार आहेस, तशीच आमच्याने दुसऱ्यांसाठी मदत होत
असेल तर ती करण्यासाठी तुझी शक्ती व सामर्थ्य आम्हाला दे; आणि तुझ्या ह्या ताराणामध्ये
भाग घेऊन आमच जीवन पवित्र करून, सार्वकालिक जीवनात आम्ही प्रवेश करावा, म्हणून
आम्हाला कृपा दे.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना :
प्रतिसाद:
हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे पोप
महाशय, बिशप्स, कार्डीनल्स, सर्व
धर्मगुरु व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, ह्या
सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित चालू ठेऊन एक
उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करु या.
२. जी लोकं देऊळ मातेपासून दुरावलेले
आहेत, त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व ख्रिस्ताच्या
प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. हा पवित्र आठवडा चांगल्या रीतीने
व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येशूच्या जवळ बोलावून
घ्यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जी लोकं दुःखी, कष्टी व आजारी आहेत विशेषकरून कोरोनाने ग्रासलेले आहेत, त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व त्यांचे जीवन सुखी व
समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment