आज्ञा गुरुवार
दिनांक: ०१/०४/२०२१
पहिले वाचन: निर्गम
१२:१-८, १२-१५
दुसरे वाचन:
करिंथकरास पहिले पत्र ११:२८-३६
शुभवर्तमान: योहान
१३:१-१५
प्रस्तावना:
प्रिय बंधू-भगिनिंनो आज आपण “आज्ञा गुरुवार” साजरा करीत आहोत. आजच्या दिवशी शिष्यांबरोबर शेवटचे भोजन करत असताना प्रभू येशूने पवित्र ख्रिस्तशरीर संस्काराची स्थापना केली आणि आपल्या शिष्यांना आणि त्याचबरोबर संपूर्ण ख्रिस्तसभेला नम्र आणि निस्वार्थी सेवेचा महामंत्र दिला. आजच्या मिस्साबलिदानाने आपण पवित्र त्रिदुमची किंव्हा तीन पवित्र दिवसांची सुरुवात करतो. या तीन दिवशी आपण प्रभू येशूचे पवित्र दुःखसहन, क्रुसावरील मरण आणि त्याचे पुनरुत्थान यांवर मनन-चिंतन करतो. हे तीन दिवस आणि ह्या तीन घटना एका महत्वाच्या घटनेबद्दल सांगतात: “येशू आपल्या पित्याकडे परत जातो”. येशूचे त्याच्या शिष्यांबरोबरचे शेवटचे जेवण, त्याचा वधस्तंभावरील मृत्यू आणि त्याचे पुनरुत्थान एक अविश्वसनीय सत्य प्रकट करतात: परमेश्वर आपल्या पुत्राद्वारे संपूर्ण मानवजातीचे म्हणजेच त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि विश्वास न ठेवणाऱ्या अशा सर्वांचं तारण करतो.
पवित्र मिस्साबली हा आपल्या तारणाचा आणि चिरंतन जीवनाचा मार्ग आहे. परंतु जर आपल्याकडे जीवनाकडे पाहण्याचा चांगला दृष्टिकोन असला, चांगली वृत्ती आपल्या अंगी असली आणि पवित्र मिस्साबलिदानावर आपली खरी श्रद्धा असली तरच आपण साजरा करणारा प्रत्येक मिस्साबली आपल्यासाठी तारणदायक आणि फलद्रुप ठरू शकतो. आणि आपल्या शिष्यांचे पाय धुण्याद्वारे प्रभू येशू आपल्याला तेच सांगत आहे: जेव्हा तुम्ही नम्र होऊन इतरांची सेवा करू शकता तेव्हाच तुम्ही स्वर्गीय जीवनाचे वतनदार होऊ शकता. प्रभू आपल्याला स्पष्ट आज्ञा देत आहे: “जसे मी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला उदाहरण घालून दिले”. आपलं प्रत्येक कृत्य, आपली प्रत्येक कृती जी प्रेमावर आधारित असते, प्रेमाद्वारे होते, त्या कृतीद्वारे आपण प्रभू ख्रिस्ताच्या आणि एकमेकांच्या जवळ येऊन ख्रिस्ताच्या रहस्यमय शरीराचे-पवित्र ख्रिस्तसभेचे सदस्य म्हणून एकमेकांशी जोडले जातो.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम १२: १-८, १२-१५
आजच्या दिवशी आपण परमेश्वराच्या मध्यस्थी आणि दयेद्वारे मिसर देशाच्या गुलामगिरीतून मुक्त होणाऱ्या इस्रायली लोकांबरोबर एका पातळीवर, शेवट व आरंभांसह नवीन कराराच्या उद्घाटनासह जुन्या कराराच्या पूर्ततेचा आनंद साजरा करतो. देवाने अब्राहामाबरोबर त्याच्या संततीचं एक मोठे राष्ट्र करण्याचा करार केला होता आणि इस्रायली लोकांची मिसर देशातून सुटका या कराराची पूर्तता आहे. निर्गम या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकतो की, देव इजिप्तच्या गुलामगिरीतून इस्राएली लोकांना वाचवतो. हा पहिला वल्हांडण सण, खरं तर पहिली गोष्ट आहे जी, इस्रायली लोकं, आता त्यांच्या सुटकेनंतर आणि परमेश्वराची प्रजा झाल्यानंतर करतात. वल्हांडण सण, किंव्हा पास्काचा सण हा मुक्तीचा, स्वातंत्र्याचा आणि परिपूर्तीचा उत्सव आहे.
दुसरे वाचन: करिंथकरास पहिले
पत्र ११:२८-३६
दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो कि प्रभुभोजनाचं खरं उद्दिष्ट प्रभू पुन्हा येईपर्यंत त्याच्या मरणाची आणि विजयी पुनरुत्थानाची सुवार्ता संपूर्ण जगाला देणे हे आहे. दैनंदिन प्रभुभोजनविधीद्वारे ख्रिस्तीजण परमेश्वराने जगाच्या तारणासाठी आपल्या पुत्राचे जे बलिदान दिले त्याचं स्मरण करतात. मिस्साबलिदान हे नम्रता आणि प्रेमाचे प्रतीक आहे म्हणूनच हि दोन मूल्ये ख्रिस्तीजनांनी आपल्या जीवनात अंगीकारणे गरजेचं आहे.
मनन –चिंतन:
पवित्र मिस्साबलिदानाचं रहस्य थोड जवळून समजण्यासाठी मी एक उदाहरण देतो: एक महिला आपला पन्नासावा जन्मदिवस साजरा करत होती आणि तिने अनेक स्नेह्यांना आपल्या जन्माचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. त्यासाठी तिने जय्यत तयारी केली. तिने आपलं घर सुशोभित केलं, घरात संगीतवादनाचा कार्यक्रम ठेवला, उत्तम प्रकारची खाद्ये, मिष्ठान्न आणि पेय्ये बनवली. पाहुण्यांनी तिच्या घरी सेवन केलेल्या अन्नाद्वारे त्या स्त्रीने तिच्या जीवनाचा, तिच्या प्रेमाचा एक भाग त्यांच्याबरोबर वाटला. पाहुण्यांनासुद्धा त्यामुळे खूप आनंद झाला, त्यांनी त्या स्त्रीची तोंड भरून स्तुती आणि वाहवा केली. तिचे प्रेम, तिचे आदरातिथ्य आणि पाहुण्यांच्या प्रति तिची निष्ठा पाहून त्यांना आनंद झाला, ते समृद्ध झाले. तिच्या आदरातिथ्याद्वारे पाहुण्यांनी एक कुटुंब होण्याचा खरा अर्थ जाणून घेतला आणि जीवन जगण्यासाठी नवीन स्फूर्ती आणि चैतन्य त्यांच्या अंगात संचारले. त्या महिलेचा तो पन्नासावा जन्मदिवस खूप वर्षे तिच्या पाहुण्यांच्या स्मरणात रेंगाळत राहिला. त्या महिलेने आपला पन्नासावा जन्मदिवस ज्या प्रकारे साजरा केला तो प्रकार आपल्याला पवित्र भोजनविधीची, पवित्र मिस्साबलीची आठवण करून देते.
आपण सर्वजण आज या पवित्र मंदिरात एक सण, एक सोहळा साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. आणि प्रभू ख्रिस्त स्वतः या सोहळ्याचा यजमान, या घराचा धनी, आपल्या सर्वांचं आदरातिथ्य करणारा आहे. आपण सर्वजण त्याचे अतिथी किंव्हा पाहुणे आहोत. पवित्र प्रभुभोजनात तो स्वतःला फक्त अर्धवट किंव्हा थोडासा नाही तर संपूर्णपणे आपणा सर्वांसाठी अर्पण करतो. आपण त्याच्या नावाने जमलेलो आहोत, त्याने आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आणि तो आपल्यामध्ये हजर आहे. या पवित्र बलिदानाचा उगम येशूने आपल्या शिष्यांबरोबर घेतलेल्या आणि आजच्या दिवशी आपण साजरा करत असलेल्या शेवटच्या भोजनात आहे. पवित्र गुरुवारी प्रभू येशूने प्रत्येक वर्षाप्रमाणे आपल्या बारा शिष्यांबरोबर पास्काचा सण साजरा केला. परंतु हि संध्याकाळ मात्र एक आगळी-वेगळी संध्याकाळ ठरली. दुसऱ्या वाचनात आपण ऐकल्याप्रमाणे येशूने आजच्या दिवशी एका नवीन सणाची, एका नवीन सोहळ्याची स्थापना केली. त्या सोहळ्याला आपण पवित्र मिस्साबलिदान या नावाने संबोधितो.
पवित्र ख्रिस्तसभेच्या शिकवणुकीनुसार “हे माझ्या आठवणीसाठी करा” ह्या शब्दांद्वारे प्रभू येशूने आपल्या शिष्यांची याजकपदी नेमणूक केली. हा नवीन सोहळा पुढेसुद्धा सर्व ठिकाणी आणि सर्व वेळा साजरा केला जावा अशी त्याची प्रबळ इच्छा होती. या उत्सवाद्वारे संपूर्ण ख्रिस्तीजनांशी जोडले जावे अशी त्याची इच्छा होती म्हणूनच हे पवित्र मिस्साबलिदान भविष्यातही साजरे व्हावे अशी आज्ञा ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिली. संत मत्तयलिखित शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, कि “जेथे दोघे किंव्हा तिघे माझ्या नावाने एकत्र जमले आहेत तेथे मी त्यांच्यामध्ये हजर आहे” (१८, २०). तो असे म्हणत नाही की, “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले असतील तेथे मी त्यांचा प्रमुख, म्होरक्या म्हणून हजर आहे”. प्रभू येशू हा पदस्तर, श्रेणीबंध, अधिकार श्रेणी ह्यांवर भर देत नाही तर बंधुभाव, संगत, सहभागिता, सोबत ह्या गोष्टींवर भर देत आहे. मिस्साबलिदानाच पौरोहित्य जरी धर्मगुरू करत असले तरी धर्मगुरू हे मिस्साबलिदानाचे केंद्रबिंदू नसतात. ख्रिस्त आणि त्याच्याबरोबर एक शरीर-एकदेह झालेले ख्रिस्तीजन हेच मिस्साबलिदानाच्या केंद्रस्थानी असतात.
जेव्हा त्याने भाकर घेतली आणि “हे माझे शरीर आहे”, असे म्हटले, तेव्हा त्याने सर्व काळासाठी घोषित केले, की प्रत्येक पवित्र प्रभुभोजनात भाकरीचं रूपांतर त्याच्या पवित्र शरीरात होईल. परंतु पवित्र मिस्साबली हा येशूला भौतिक स्वरूप देण्याविषयी नाही. पवित्र मिस्साबलिदान म्हणजे जादू-टोणा नाही ज्यामध्ये काही मंत्र वदल्याने ख्रिस्त सदेह प्रकट होतो.
प्रभू येशूचे आपल्यावर प्रेम आहे आणि त्याला या प्रेमापोटी आपल्यामध्ये, आपल्याबरोबर आणि आपल्यात खरा देव आणि खरा मनुष्य म्हणून वास करायचा आहे. म्हणूनच प्रभू येशूने आजच्या दिवशी पवित्र ख्रिस्तशरीर संस्काराची स्थापना केली. या मिस्साबलीमध्ये भाकर आणि द्राक्षारस त्याच्या आपल्यावर असलेल्या अतुलनीय प्रेमाची चिन्हे बनतात. प्रत्येक वेळी जेव्हा आपण हा पवित्र संस्कार साजरा करतो, तेव्हा प्रभू ख्रिस्त आपल्यामध्ये हजर असतो आणि आपल्याबरोबर हा त्याच्या प्रेमाचा सोहळा साजरा करतो.
प्रभू
येशूचे या जगातील शेवटचे भोजन हे त्याच्या आपल्यावरील अथांग प्रेमाचे चिन्ह आहे. याच प्रेमाखातर आणि प्रेमाद्वारे तो आपल्या तारणासाठी स्वताःचे बलिदान देतो. म्हणूनच पवित्र मिस्साबलीमध्ये आपण त्याच्या प्रेमाचा आणि त्याच्या जीवनाचा अनुभव घेतो.
पवित्र
मिस्साबली हा देवाला शोधण्याचा आणि त्याच्याशी एका विशिष्ठ रीतीने एक होण्याचा मार्ग आहे. परंतु पवित्र मिस्साबली हा देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग नाही. मनुष्याच्या
जवळ येण्याचे विविध मार्ग परमेश्वराला ठाऊक आहेत. विशेषत: या कोरोना महामारीच्या काळात पूर्वीच्या वर्षांप्रमाणे आपण सर्व एकत्र मोठ्या संख्येने पवित्र मिस्साबली साजरा करू शकत नाहीत, तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देवाचं प्रेम आणि त्याचा आत्मा पवित्र मिस्साबली उत्सवाच्या बाहेरसुद्धा प्रभावीपणे कार्यरत असू शकतात.
धन्यवादित हेनरिक
स्यूसे यांनी अशी प्रार्थना केली: “मी तुला स्वत: च्या स्वाधीन करतो आणि तुला घेऊन मी माझ्याबरोबर जोडतो. तू स्वत:च अस्तित्व गमावतोस आणि
माझ्यात रूपांतरित होतोस. "
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रभू
येशूने
आपल्या
दुःखसहनाच्या
आदल्या
संध्याकाळी
पवित्र
मिस्साबलिदानाची
स्थापना
केली.
त्या
तारणाऱ्या
प्रभूकडे
आपण
नम्रपणे
प्रार्थना
करू
या.
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१. हे प्रभू ख्रिस्ता, आमच्यावरील प्रेमाखातर तू आमच्यामध्ये आलास. तुझ्या ख्रिस्तसभेत प्रेम, ऐक्य आणि निष्ठेची भावना वाढीस लागू दे.
२. हे प्रभू, तू नम्र बनून आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आमच्या समाजात समेटाची उमेद वाढीस लागू दे आणि जी लोक एकमेकांपासून दुरावली आहेत त्यांच्यातील मतभेद आणि वैमनस्य नाहीसे होऊदे आणि त्यांच्या जीवनात सदैव शांती आणि प्रेम नांदू दे.
३. तुझे आपल्या शिष्यांबरोबरचे शेवटचे भोजन हे प्रेमाचे चिन्ह होते, प्रीतिभोजन होते. आमच्या कुटुंबांमध्ये आणि शेजाऱ्यांमध्ये प्रेमाची भावना अधिकाधिक वाढू दे. म्हणून आम्ही प्रार्थना करतो.
४. हे प्रभो, प्रीतीच्या कृत्याने तू आपल्या दुःखसहनाला सुरुवात केली. जी लोकं आजारी आणि पीडित आहेत त्यांना तुझे सांत्वन दे. तुझ्या पवित्र क्रुसाद्वारे त्यांना त्यांचा क्रूस वाहण्यास बळ आणि धैर्य दे.
हे
परमेश्वरा,
तुझ्या
प्रिय
पुत्राने
त्याच्या
या
जगातील
शेवटच्या
भोजनाद्वारे
दैवी
प्रीतीचं
स्मरणचिन्ह
आमच्यासाठी
या
पवित्र
मिस्साबलीद्वारे
दिलेलं
आहे.
आमच्या
तुझ्यावरील
निष्ठेत,
श्रद्धेमध्ये
आणि
ऐक्यात
दृढ
होण्यास
तुझी
कृपा
आम्हाला
दे.
हि
प्रार्थना
आम्ही
आमच्या
प्रभू
ख्रिस्ताद्वारे
करतो.
No comments:
Post a Comment