पुनरुत्थान रविवार
(जागरण विधी)
दिनांक: ०४/०४/२०२१
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२:२
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१अ
चौथे वाचन: यशया ५४:५-१४
पाचवे वाचन: यशया ५५:१-११
सहावे वाचन: बारुख ३:९-१५,३२-४:४
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११
शुभवर्तमान: मार्क १६:१-७
आजच्या
ह्या विधीचे चार भाग आहेत:
पहिला भाग: प्रकाश विधी:-
पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे हे आपण घोषीत करतो.
दुसरा भाग: प्रभुशब्दविधी:-
येथे जुन्या व नवीन करारातील निवडक वाचने, जगाच्या
सुरूवातीपासून देवाने मानवावर प्रेमाचा वर्षाव केला, त्याची
आपणाला आठवण करून देतात.
तिसरा भाग: पाण्याला आशीर्वाद:- येथे
बाप्तिस्म्यासाठी लागणाऱ्या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. पुनरुत्थानाचे पहिले गोड
फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा अनन्य साधारण
आशीर्वाद आहे.
चौथा भाग: ख्रिस्तशरीर स्विकारविधी:- येथे
आपण ख्रिस्तशरीर स्विकारविधी साजरा करतो. स्वर्गीय भोजनाची चव ह्या ठिकाणी आपण
घेतो.
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधुभगिनींनो,
या पवित्र रात्री आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला. या
शुभप्रसंगी ख्रिस्तसभा साऱ्या विश्वातील तिच्या मुलांना जागरण व प्रार्थना
करण्यासाठी एकत्र बोलावीत आहे. हा आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा सर्वात मोठा (महान)
सण आहे. प्रभूचे पुनरुत्थान हा आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा केंद्रबिंदू आहे. हा प्रभूच्या
वल्हांडणाचा दिवस आहे. प्रभूचे शब्द ऐकून व त्याची दिव्ये रहस्ये साजरी करून
त्याच्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे आपण पुण्यस्मरण केले, तर त्याच्या मरणातील
विजयात आपणाला खात्रीपूर्वक सहभाग मिळेल व त्याच्याबरोबर शाश्वत जीवन जगता येईल.
आजच्या ह्या पवित्र विधीत आपण खास प्रार्थना करू या की आपला विश्वास मजबूत व्हावा.
मनन-चिंतन:
ख्रिस्ताठायी
माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आज संपूर्ण जग कोरोना
नावाच्या महामारीने हादरून गेले आहे. जेव्हा आपण मृत्यूविषयी ऐकतो तेव्हा आपण सर्व
जण घाबरून जातो. मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू हा कोणाला कधी आणि कोठे येणार आहे हे
माहित नाही. परंतु आपण मृत्यूविषयी ऐकून घाबरून जावं का? मृत्यू आपल्या जीवनाचा
खरोखर अंत आहे का? ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला ख्रिस्ताच्या दुःखसहन, मरण व
पुनरुत्थान ह्या रहस्यांद्वारे मिळत आहेत.
प्रभू
येशू ख्रिस्ताने मृत्यूवर मात केली आहे. संत पौल म्हणतो की माणसाचा सर्वात मोठा
शत्रू मृत्यू आहे आणि प्रभू येशूने ह्या मृत्यूवर विजय मिळवला. जेव्हा अमेरिकन
अंतराळ विरांनी चंद्रावर पहिले पाऊल टाकले त्या वेळेला त्यावेळचे अमेरिकेचे
राष्ट्राध्यक्ष निक्सन म्हणाले की ही घटना माणसाच्या इतिहासातील सर्वात श्रेष्ठ
घटना आहे. तेव्हा त्यावेळचे प्रसिद्ध प्रवचनकार बील ग्रॅहम म्हणाले की मला वाटते
की अध्यक्ष निक्सन ह्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. ते उदगारले की ख्रिस्ताचे
दुःखसहन, मरण व पुनरुत्थान ही घटना जगाच्या इतिहासातील सर्व श्रेष्ठ घटना आहे.
प्रसिद्ध लेखक W. H. Whale म्हणतात शुभवर्तमान ख्रिस्ताचं
पुनरुत्थान समजावून देत नाही तर पुनरुत्थान आपल्याला शुभवर्तमान समजावून देतं.
आजचा विधी हा ‘पास्काचा जागरण विधी’
म्हणून ओळखला जातो. ख्रिस्तीजनांनी हे नाव यहुदयांच्या पास्काच्या सणावरून घेतले
आहे. इजिप्त देशात देवाचा दूत यहुद्यांची घरे ओलांडून गेला व इजिप्त वासीयांच्या
प्रथम जन्मलेल्या बालकांचा त्याने वध केला व हे सर्व यहुद्यांची फारोच्या
गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून करण्यात आले. ख्रिस्ती जणांनी हा सण प्रभूच्या
‘पुनरुत्थानाचा सण’ म्हणून घोषित केला. प्रभूने आपल्या मरण व पुनरुत्थानाने पापावर
विजय मिळविला. मरणातून सार्वकालिक जीवनाकडे प्रभूने केलेले हे ओलांडण. यहुद्यांनी
ज्याप्रमाणे गुलामगिरीतून सुटका झाल्यानंतर परमेश्वराठायी एका नव्या जीवनाला
सुरुवात केली, त्याचप्रमाणे प्रभूच्या पुनरुत्थित जीवनाद्वारे आपणास एका नव्या
जीवनाला प्रारंभ करण्यास मुभा मिळते. आजच्या दिवशी स्नानसंस्कार दिला जातो. म्हणून
प्रभूच्या जीवन, मरण व पुनरुत्थानाला ‘पास्काचे रहस्य’ म्हणून संबोधिले जाते व
ख्रिस्ती श्रद्धेत महत्त्वाचे स्थान दिले जाते.
संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात
ख्रिस्ती बांधवांना प्रभूमध्ये जीवन जगण्यास प्रवृत्त करत आहे. पौल म्हणतो,
“स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्तामध्ये मरतो व ख्रिस्तामध्ये
पुनरुत्थित होतो”. त्याचे सर्व जीवन हे ख्रिस्ताद्वारे सुरु होते व ख्रिस्तामध्येच
संपते. स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक व्यक्ती देवाचे लेकरू होते. जोपर्यंत ख्रिस्त
माझ्यात नाही व मी ख्रिस्तात नाही, तोपर्यंत मी प्रभूच्या सानिध्यात जगू शकत नाही.
मार्कलिखित शुभवर्तमानात आपण प्रभू
येशूच्या पुनरुत्थानाविषयी ऐकतो. यहुदी लोक मृत व्यक्तीस काळजीपूर्वक दफन करीत
असत. विविध गंधरस लावून ते प्रेतास जपत असत. शब्बाथ दिवस आड आल्यामुळे येशूचा
मृतदेह घाईत दफन केला गेला होता. स्त्रियांनी येशूला यहुदी रीतीप्रमाणे गंधरस
लावला नव्हता. ह्यासाठीच स्त्रिया भल्या पहाटे ही उत्तरक्रिया पूर्ण करण्यासाठी
थडग्यापाशी गेल्या होत्या. रिक्त कबर बघून व धोंडा सरकलेला बघून स्त्रिया भयभीत
होतात. देवाचा दूत ह्या स्त्रियांना दर्शन देतो व म्हणतो भिऊ नका प्रभू मरणातून
उठला आहे. फक्त मार्कच्या शुभवर्तमानात आपल्याला दूताचा आदेश आढळतो. “जा व
त्याच्या शिष्यांना व पेत्रास सांगा”, दूत स्त्रियांना ही शुभवार्ता घोषित
करण्याचे आदेश देतो.
ख्रिस्त मेलेल्यातून उठला आहे आणि आजही
तो आपल्यामध्ये जिवंत असून कार्यरत आहे. ज्यांना ह्या जिवंत (देवाचा) ख्रिस्ताचा
अनुभव झालेला आहे, त्यांनी देव अनुभवलेला आहे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान आपल्या
सर्वामध्ये एक नवीन आशा उत्पन्न करते. जीवनामध्ये आपण कधीच निराश होऊ नये तर
आशावादी व्हावे.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेची खरी घटना.
जेव्हा अमेरिकेच्या विमानाने हिरोशिमा व नागासकी ह्या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले
तेव्हा त्या दोन शहरांची पूर्ण राख झाली होती. तेव्हा जपानचे काही इंजिनिअर त्या
शहराची पाहणी करत होते तेव्हा त्यांना तिथे एक हिरवी पालवी दिसली. तेव्हा इंजिनिअर
म्हणाले जर का ही पालवी पुन्हा येऊ शकते तर नवीन जीवन का नाही? आज त्या एका आशेवर
जपानच्या ह्या दोन शहरांचा कायापालट झाला आहे, प्रगती झाली.
ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्याला आज संदेश
देत आहे. दुःखाने, मरणाने घाबरत जगू नका तर विश्वासू बना, आशीर्वादित व्हा. एक
दिवस नक्कीच यशस्वी व विजयी व्हाल आणि आपण खरच म्हणू शकू हो ख्रिस्त, खरोखरच
मेलेल्यातून उठला आहे. त्याने विजय मिळवला आहे आणि आम्हीही विजय मिळवू.
He
is Risen, He is Truly Risen, Alleluia!
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पुनरुत्थित ख्रिस्ता आमची
प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीस, आध्यात्मिक मेंढपाळ बिशप, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनिंना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अनुभव त्यांच्या
कार्यात यावा. ख्रिस्ती श्रद्धावंतांना त्यांच्या श्रद्धेत व विश्वासात वाढण्यास त्यांनी
आपल्या कार्याद्वारे प्रेरित करावे व स्वर्गीय नवजीवनाचा आनंद उपभोगण्यास मनोबळ
द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
२. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या विजयाचा, आनंदाचा व प्रकाशाचा संदेश जे धर्मगुरू व धर्मभगिनी आज इतरांपर्यंत
पोहचविण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या कार्यात प्रभूची कृपा व शक्ती
मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते
नेमले गेले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला
जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात
व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
४. जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श होउन ह्या रोगापासून मुक्तता मिळावी
म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. सतत आजारामुळे ज्या कुटुंबांवर आज उपासमारीची वेळ आलेली
आहे,
त्यांना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वैभवशाली शक्तीने
दिलासा दयावा व सर्व आजारातून त्यांची सुटका करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना
करू या.
६. सर्व धर्म सहभाव, सर्व धर्म स्नेहभाव,
सर्व धर्म समीपभाव व सर्व धर्मसन्मानभाव या चौकटीवर विविध
धर्मांच्या लोकांनी एकत्रित येऊन ऐकमेकांचा उध्दार व सन्मान करावा, गुण्यागोविंदाने नांदत राहावे व जगात शांतीचे व प्रेमाचे वातावरण निर्माण
करावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment