प्रायश्चित काळातील तिसरा रविवार
दिनांक : ०७/०३/२०२१
पहिले वाचन : निर्गम २०:१-१७
दुसरे वाचन : करिंथकरांस पहिले पत्र १:२२-२५
शुभवर्तमान : योहान २:१३-२५
प्रस्तावना:
“तुम्ही हे
मंदिर मोडून टाका, आणि मी तीन दिवसांत ते उभारीन” (योहान २: १९).
आज आपण
प्रायश्चित काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत आणि आजची उपासना आपणास दोन
गोष्टींविषयी सांगत आहे; पहिली ही की, परमेश्वराच्या आज्ञा पाळून त्याला शरण जाणे
व दुसरी म्हणजे, आपली हृदये परमेश्वरासाठी साफ करणे. परमेश्वराच्या आज्ञा पाळणे
म्हणजे त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवणे. प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराचं मंदिर
आहे, ज्याच्यात तो वास करतो आणि जो कोणी ह्या मंदिराचा नाश करतो त्याचा परमेश्वर
नाश करील (१ करिंथ ३: १६-१७). म्हणून मंदिराचा नाश करणे म्हणजे देवाचा अपमान करणे.
देवाच्या मंदिरात देवाचा गौरव व्हावा हीच प्रभू येशूख्रिस्ताची इच्छा होती. म्हणून
तो म्हणतो की, “माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका” (योहान २: १६). आजच्या
शुभवर्तमानात प्रभू येशू फक्त भौतिक मंदिरा विषयी बोलत नाही तर मानवी शरीराविषयीही
बोलतो की, देवाने दिलेल्या शरीराचा नाश करू नका. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया:
मी परमेश्वराला माझ्या हृदयात प्रथम स्थान देतो कां? परमेश्वरासाठी मी कोणत्या
प्रकारची जागा तयार करतो?
पहिले वाचन : निर्गम २०:१-१७
आजच्या पहिल्या
वाचनात आपण वाचतो की, परमेश्वर इस्त्राएली लोकांना सियोन पर्वतावर मोशेद्वारे दहा
आज्ञा देतो. ह्या दहा आज्ञा किंवा दहा नियम, परमेश्वराने इस्त्राएली लोकांना
दिल्या जेणेकरून ते त्या आज्ञा पाळून परमेश्वराशी विश्वासू राहतील.
दुसरे वाचन : करिंथकरांस पहिले पत्र
१:२२-२५
आजच्या दुसऱ्या
वाचनात संत पौल सांगतो की, आपण ख्रिस्ताला उंचाविले पाहिजे कारण परमेश्वर महान व
शक्तिशाली आहे. देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची
दुर्बलता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.
शुभवर्तमान : योहान २:१३-२५
आजच्या
शुभवर्तमानात आपण मंदिराच्या शुद्धतेविषयी वाचतो की, ख्रिस्त मंदिरात व्यापार करणाऱ्यांना
दटावतो आणि त्यांना मंदिरातून बाहेर काढतो व म्हणतो की, परमेश्वाच्या मंदिराला
बाजारपेठ करू नका.
मनन चिंतन:
“हे मंदिर उध्वस्त करा आणि मी तीन दिवसांत ते पुन्हा उभारीन”.
आजच्या शुभवर्तमानातील प्रभू येशूचे हे
शब्द याहुद्यांना आवडले नाहीत. येशूच्या ह्या बोलण्याला पुष्कळ लोकांनी विरोध
केला. सर्वांचं लक्ष, बांधकामांनी सुशोभित केलेल्या भौतिक मंदिरावर होतं. सर्वांना
वाटत होतं की जे मंदिर बांधायला शेह्चाळीस वर्ष लागली, ते तीन दिवसांत बांधणे कसं
काय शक्य आहे. परंतु प्रभू येशू भौतिक मंदिराविषयी नाही तर आपल्या शरीराविषयी बोलत
होता. अशी म्हणं आहे, “दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं”. ते सर्व लोक येशूला त्यांच्या
सारखीच एक सामान्य व्यक्ती म्हणून ओळखत होते, म्हणून त्यांनी त्याच्या शब्दांवर
विश्वास ठेवला नाही. परंतु प्रभू येशूला सर्व माहित आहे. त्याला मनुष्याच्या
अंतःकरणातील विचार, हेतू व इच्छा हे सर्व माहित आहेत. त्याच्यापासून एखादी गोष्ट
लपविणे म्हणजे मूर्खपणा होय. फक्त जमलेल्या लोकांनाच प्रभू येशूचे शब्द निराळे
वाटले नाही तर त्याच्या शिष्यांनाही ते समजले नाही; कारण ख्रिस्त जेव्हा
पुनरुत्थित झाला तेव्हाच शिष्यांनी शास्त्रावर व त्याच्या वचनावर विश्वास ठेवला
(योहान २:२२).
आजच्या पहिल्या वाचनातील दहा आज्ञा, आपण
दोन भागांत विभागू शकतो: (१) पहिल्या तीन आज्ञा म्हणजे आपलं देवावरील प्रेम आणि आपले
देवाबरोबरचे संबंध ह्याविषयी आहेत. (२) तसेच शेवटल्या सात आज्ञा म्हणजे आपलं
इतरांवरील प्रेम आणि त्यांच्याबरोबर असलेले संबंध ह्याविषयी आहेत. परंतु नंतर
ह्याच दहा आज्ञांची प्रभू येशूने दोन संक्षिप्त आज्ञांमध्ये विभागणी केली: (१) तु
आपला परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने व
संपूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि (२) जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर
(मार्क १२:३०-३१). त्याची इच्छा आहे की आपण ह्या आज्ञांनुसार जगावे जेणेकरून आपल्याला
त्याच्याबरोबर पुन्हा एक होण्याचा आनंद मिळावा. मंदिरातील पैसे बदलणाऱ्यांची कृती
ही परमेश्वराची पहिली आज्ञा भंग करण्या जोगी होती. कारण कोणीही दोन धन्यांची
सेवा-चाकरी करू शकत नाही अथवा एकाचा तो विरोध करणार तर दुसऱ्यावर प्रेम (मत्तय
६:२४). कोणी व्यक्ती परमेश्वराच्या घराला बाजारपेठ करतो, ते प्रभू येशूला आवडत नाही. आपण प्रत्येक
जण देवाचे मंदिर आहोत (१ करिंथ ३: १६). आज आपण भौतिक मंदिराबरोबर आपल्या
स्वःताच्या शारीरिक मंदिरावर ही मनन चिंतन करूया. आपण आपल्या शरीराची योग्य ती
काळजी घेतो का? आपण आपलं शरीर स्वच्छ ठेवतो का? जर आपल्या शरीररूपी मंदिरामध्ये
देवपण हवं असेल तर त्यात प्रार्थनेची गरज आहे. आपलं शारीरिक मंदिर जर आपल्याला
सुशोभित ठेवायचं असेल तर ह्या मंदिरात प्रार्थनेचे वातावरण निर्माण करणे गरजेचे
आहे.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना
ऐक.
१. ख्रिस्तसभेचे
कार्य पाहणारे आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू,
धर्मभगिनी ह्या सर्वांना देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी देवाने मदत
करावी. तसेच सर्व मानवजातीला देवाची ओळख जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. देवाने
आपल्याला दहा आज्ञा दिल्या आहेत, ह्या आज्ञाचे आपण पालन करावे व आपले जीवन
जास्तीत जास्त सुखमय बनावे ह्यासाठी आपण प्रार्थना करूया.
३. जेव्हा-जेव्हा आपल्या जीवनात कष्ट, दु:ख येते आणि आपले सर्व प्रयत्न
व्यर्थ होतात, सर्व
आशा-निराशा होतात, तेव्हा प्रभूवरील विश्वास आणि श्रद्धा भक्कम करण्यासाठी
त्याच्या योजनेला प्राधान्य देण्यास लागणारी कृपा आपण परमेश्वराजवळ मागुया.
४. ह्या
प्रायश्चितकाळात आपण विशेष करून जे लोक देवापासून दूर गेले आहेत, त्यांना देवाचा स्पर्श होऊन त्यांच्या जीवनात देवाची गोडी लागावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. आता थोडा वेळ
शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजा प्रभूचरणी
मांडूया.
No comments:
Post a Comment