पास्काचा सण
(सकाळची मिस्सा)
दिनांक: ०४/०४/२०२१
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये
१०:३४अ, ३७-४३
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४
शुभवर्तमान: योहान २०:१-९
विषय: पुनरुत्थान प्रभू येशूचे: प्रारंभ ख्रिस्ती श्रद्धेचा
प्रस्तावना:
आज जगाच्या कानाकोपऱ्यात सर्व ख्रिस्ती लोक प्रभू येशूच्या पुनरुत्थानाचा सोहळा साजरा करीत आहेत.
येशूचं पुनरुत्थान ही मानवी इतिहासातील एक आगळीवेगळी, असामान्य, अदिवतीय अशी घटना आहे. जगात अनेक धर्माचे विविध संस्थापक होऊन गेले. त्यांनी
आपापल्यापरीने मानवजातीच्या कल्याणासाठी विधायक कार्य केलं आणि ते शारीरिकदृष्ट्या
मृत्यू पावले. फक्त येशू नाझरेथकर जो देवपुत्र मानवजातीच्या तारणासाठी
मानवी अवतार धारण करून या भूतलावर अवतरला होता तो त्याच्या शारीरिक मृत्यूनंतर तीन
दिवसांनी पुन्हा उठला. हे आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचे रहस्य आहे.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये
१०:३४अ, ३७-४३
आजच्या पहिल्या वाचनात संत पेत्र म्हणतो कि देवाने येशूला तिसऱ्या दिवशी उठविले
व त्याने प्रगट व्हावे असे केले या घटनेचे आम्ही साक्षी आहोत.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल सांगतो कि तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला
आहात. स्वर्गातील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील
गोष्टींकडे मन लावू नका.
शुभवर्तमान: योहान २०:१-९
संत योहान म्हणतो कि येशूने मेलेल्यांतून उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख
येशूच्या शिष्यांना तोपर्यंत समजला नव्हता.
मनन-चिंतन:
खरंच प्रभु येशूची रिकामी कबर हि सर्वांनाच एक फार कुतुहलाची बाब वाटते.
मानवी दृष्टीकोनातून पाहिलं तर आपल्याला असं वाटतं कि रिकाम्या जागेत
काय एवढं महत्त्वाचं असतं. मुळात तिथं काहीच नसतं. आपल्या डोळयांना तिथं काहीच दिसत नाही. आपल्या मानवी
बुद्धीला हे असं काही पटत नाही. विज्ञान ह्या असल्या गोष्टी काही
मानत नाही. असं म्हणतात कि जेथे आपल्या मानवी बुद्धीचं क्षेत्र
संपतं तेथे आपल्या श्रद्धेचं क्षेत्र सुरु होतं. येशूचं पुनरुत्थान
हि आपल्या ख्रिस्ती श्रद्धेची बाब आहे. आपल्या श्रद्धेचा तो मुख्य
गाभा आहे. आपल्या ख्रिस्ती धर्माची भव्य नि दिव्य इमारत हि येशूच्या
पुनरुत्थानावर उभी आहे. तो आपल्या धर्माचा एक मजबूत पाया आहे.
श्रद्धा हि मानवी बुद्धीने मोजली जात नाही, ती प्रयोगशाळेत पहिली जात नाही. विज्ञानाने श्रद्धेची लांबी रुंदी मोजली जात नाही. कारण श्रद्धा हि ठेवायची असते आपल्या विचाराने ठरवायची नसते. मानव जातीच्या तारणासाठी येशूचा जन्म, दु:खसहन, क्रूसावरील मरण आणि शेवटी त्याचे मरणातून पुन्हा विजयी होऊन उठणे हि सारी दैवी योजना होती. दैवी योजना म्हणजेच आपल्या स्वर्गीय पित्याची आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी असलेली योजना होय.
येशूचं पुनरुत्थान म्हणजेच नवजीवनाची सुरुवात, नवीन प्रारंभ,
आपल्यासाठी एक नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी निर्माण करण्याचा दिवस आहे. आपल्या मराठीत गाणं आहे:
"भले बुरे जे घडून गेले, विसरुनी जाऊ जरा
क्षणभर. जरा विसावू या वळणावर, या वळणावर.
होय माझ्या प्रिय भाविकांनो, आज येशूच्या पुनरुत्थानाचा
सोहळा साजरा करीत असताना आपण आपल्या जीवनात आतापर्यंत जे काही बरं वाईट झालं,
ज्या काही कडू गोष्टी घडल्या, हेवेदावे,
रागरोष, भांडणतंटे त्या विसरून जाऊ या. आज नुसतं
घोटभर प्यायची नि पोटभर जेवायचा विषय नाही. ते तर आपण केव्हाही
करू शकतो. पण आज एका नवीन जीवनाला सुरुवात करण्यासाठी देवाने
दिलेली एक नामी संधी आहे. गेलं वर्षभर आपण कोरोना महामारीमुळे
किती त्रास सहन केला आणि अजूनही करत आहोत. आपल्या जीवनात किती
समस्या आल्या. आपल्या प्रिय व्यक्ती मरण पावल्या, नोकरी गेली, सर्वकाही एकदम ठप्प झालं. ह्या एका कोरोना विषाणुने आपल्याला जणु गुडघ्यावर आणलं. पण आपण हिंमत हरवायची नाही, या करोना विषाणुसमोर कधी
झुकायचं नाही, निराश आणि हताश बिलकुल व्हायचं नाही तर आपल्या
पुनरुत्थित ख्रिस्ताला मनापासून आपल्या अंत:करणात स्वीकारून,
एकमेकांना मदत करून या करोनावर व तसेच जीवनात येणाऱ्या दु:खावर मात करून सतत पुढे जाऊ या हाच खरा आजच्या सणाचा अर्थ आहे.
आपण ख्रिस्ती लोक म्हणजे येशूचे सैनिक आहोत. सदैव सैनिका
पुढेच जायचे न मागे तुला कधी न फिरायचे. येशू म्हणतो:
"पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे परमेश्वरा आमची विनंती
ऐक.
१. आमचे परमगुरु फ्रान्सिस, सर्व महागुरू,
धर्मगुरु, व्रतस्थ आणि ख्रिस्ती प्रापंचिक यांनी
येशूच्या पुनरुत्थानावर मनापासून विश्वास ठेवावा आणि आपल्या रोजच्या जीवनात त्याची
इतरांना साक्ष द्दावी म्हणून प्रार्थना करू या.
२. जे कोणी वेगवेगळ्या पापाच्या कबरेत अजूनही पडून आहेत त्यांनी
येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारावं आणि पापाचा त्याग करावा म्हणून प्रार्थना
करू या.
३. आपल्या आजूबाजूला जे कोणी कोरोना विषाणुमुळे निराश आणि हताश
झालेले आहेत त्यांना परमेश्वराने आशेचा मार्ग दाखवावा व त्यांनी नवजीवनाचा अनुभव घ्यावा
म्हणून प्रार्थना करू या.
४. प्रभू येशू जसा दुखःसहनाला सामोरा गेला आणि त्याने आपल्या तारणासाठी
देवाची योजना स्वीकारली तसे आपण आपल्या जीवनात देवाची योजना स्वीकारावी व येणाऱ्या
लहान-सहान संकटाला सामोरं जावं म्हणून प्रार्थना करू या.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करू या.
तुम्हा सर्वांना पास्काच्या सणाच्या हार्दीक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment