Reflection for 31st Sunday in Ordinary Time (31/10/2021) By Fr. Baritan Nigrel
सामान्य काळातील एकतिसावा रविवार
दिनांक: ३१/१०/२०२१
पहिले वाचन - अनुवाद ६: २-६
दुसरे वाचन – इब्री ७:२३-२८
शुभवर्तमान- मार्क- १२: २८-३४
“आपला देवा परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण जीवाने प्रीती कर, व जशी
स्वतःवर तशी शेजाऱ्यावरही प्रीती कर”.
प्रस्तावना
आज आपण
सामान्य काळातील एकतिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास देवप्रीती व
शेजारप्रीतीचा धडा शिकवीत आहे. १ योहान ४: ८ मध्ये आपण वाचतो, “जो कोणी देवावर प्रीती
करीत नाही तो देवाला ओळखीत नाही कारण देव प्रीती आहे”. जशी ईश्वरप्रीती महत्वाची
आहे, तशी शेजारप्रीती सुद्धा महत्वाची आहे. कारण १ योहान ४: २० मध्ये आपण वाचतो,
“मी देवावर प्रीती करितों, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो
लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूंवर जो प्रीती करीत नाही त्याला न
पाहिलेल्या देवावर प्रीती करितां येणें शक्य नाही”. प्रीतीशिवाय कुठलाही धर्म मोठा
नाही.
असंख्य आज्ञांपैकी येशूने कुठलाही संकोच न
करता, प्रीती ह्या आज्ञेला प्रथम स्थान दिले. संत पौलाच्या मते प्रेम सहनशील आणि
दयाळू आहे; ते मत्सर किंवा अभिमान बाळगत नाही. प्रेम, स्वार्थासाठी किंवा
दुसऱ्यांचा अपमान करण्यासाठी नाही, तसेच प्रेम सहजासहजी रागावत नाही आणि चुकीची
नोंद ठेवत नाही; अशाच प्रकारची प्रीती करण्यास आज प्रभू येशुख्रिस्त आजच्या
शुभवर्तमानात आपणास सांगत आहे, “आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने,
संपूर्ण
जीवाने,
संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर व जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावरही
प्रीती कर”. म्हणूनच असं म्हणतात कि, “सर्व
आध्यात्मिक भेटींपैकी प्रेम हे सर्वात महत्वाचे आहे”. देवावर
व शेजाऱ्यावर प्रीती करण्यास परमेश्वराची कृपा व सामर्थ्य आपणास लाभावे आज आपणास म्हणून
प्रार्थना करू या.
मनन
चिंतन
प्रेमाचे नाते
ओढ
म्हणजे काय ते जीव लागल्याशिवाय समजत नाही, विरह म्हणजे काय ते प्रेमात
पडल्याशिवाय समजत नाही आणि प्रेम म्हणजे काय ते स्वतः केल्याशिवाय समजत नाही.
आपण
प्रेमाविषयी भरपूर वाचतो, भरपूर ऐकतो आणि भरपूर बोलतो; पण
प्रेम काय आहे हे समजण्यासाठी आपण स्वतः इतरांवर प्रेम केल पाहिजे. बायबल सांगतं, ‘देव
प्रीती आहे’ (१ योहान ४:८). खरोखर देव प्रीती आहे, कारण देवाने पहिलं प्रेम
संपूर्ण मानवजातीवर केलं. म्हणून प्रेम काय आहे हे आपण देवाकडून शिकतो. देवाने
आपल्याला त्याच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले आणि त्याचे प्रेम प्रकट केले.
जी
व्यक्ती आपल्याला सांगते, ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’ तीच
व्यक्ती काही काळानंतर आपल मन दुःखावत असते; परंतु परमेश्वर आपलं मन
दुःखावत नाही. आपण कितीही पापे करून त्याच्यापासून दूर गेलो, तरीही
तो आपल्यावर प्रेम करतो. आपल्यावर देवाचे भरपूर प्रेम आहे म्हणून आपल्या तारणासाठी
त्याने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला (योहान ३:१६).
शुभवर्तमानात
आपण वाचतो की, नियमशास्त्राचा
एक शिक्षक येशूकडे येऊन विचारतो, “सर्व आज्ञांत महत्वाची आणि पहिली
आज्ञा कोणती?” येशूने
उत्तर दिले, आपला
देव जो तुझा प्रभु आहे, त्याजवर संपूर्ण अत:करणाने, संपूर्ण
जिवाने, संपूर्ण
मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीति कर.’ दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी
आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर.’ यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी
नाही.”
ह्याचा
अर्थ असा की, जो
म्हणतो, ‘मी
देवावर प्रीती करतो’, त्याने
इतरांवरही प्रीती केली पाहिजे. जो देवावर प्रीती करतो, त्याच्या मनात कसलीही
भेदभावना असू शकत नाही. तो सर्वांकडे समदृष्टीने पाहतो. त्याच्या नजरेत कोणी उच्च
नाही किंवा नीच नाही. त्याचं सर्वांवर सारखच प्रेम असतं. जो देवावर प्रीती करतो, तो
इतरांवरही प्रीती करतो. ह्याच महत्त्वाच कारण असं की, परमेश्वराच्या प्रेमाची
जाणीव अश्या व्यक्तीला झाली असते.
एका
मुलाखतीत मदर तेरेसा यांना एकदा विचारण्यात आले होते, "प्रेम
म्हणजे नक्की काय आहे हे तुम्ही सांगू शकता का?" तिने लगेच
उत्तर दिले, “प्रेम
देण्यात आहे (Love is Giving). देवाने
जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला मुलगा दिला. येशूने जगावर खूप प्रेम केले, तुझ्यावर
प्रेम केले, माझ्यावर
इतके प्रेम केले की त्याने आपले जीवन दिले. आणि त्याने जसे प्रेम केले तसे आपण
प्रेम करावे अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून खरे प्रेम म्हणजे दुखणे होईपर्यंत
देणे आणि देणे होय.”
प्रभू
येशूने लोकांना सांगितले होते, “जे कैसराचं आहे ते कैसराला द्या आणि
जे देवाचं आहे ते देवाला द्या.” (मत्तय २२:१५-२२, लूक २०:२०-२६) कोणत्याही देशातील
नागरिकांना त्या देशाचे कायदे पाळावे लागतात. त्यांनी कायद्यानुसार अपेक्षित कर
भरले नाहीत तर त्यांच्यावर दंड लादला जातो किंवा त्यांना शिक्षा भोगावी लागते.
लोकांकडून मिळालेल्या कराचा सरकार त्यांना हिशोब देते, त्या पैशाचा वापर कसा केला
गेला ह्याची त्यांना माहिती देते. लोकांच्याच पैशातून देशाचा कारभार चालवला जातो.
पण
देव आपल्यावर कर लादत नाही, किंवा आपली थकबाकी तो वसूल करत
नाही. आपल्या पैशातून तो हे जग चालवत
नाही. देवाचे आणि आपले नाते हे प्रेमाचे नाते आहे आणि ते पैशावर आधारलेले नाही.
त्यात देवाणघेवाण नाही, हिशोब नाही.
प्रेमावर
आधारलेल्या कोणत्याही नात्यात हिशोब ठेवला जात नाही. पतिपत्नी एकमेकांना आनंद आणि
सुख देण्यासाठी जे काही करतात त्याच्यामागे काही स्वार्थ असतो का? मुलांच्या
शिक्षणासाठी पालकांना जो खर्च करावा लागतो त्यावर मुलांकडून ते व्याज आकारतात का? वृद्ध
आईबापांना आधार देणारी मुले त्यांना बिल सादर करतात का?
देवाचे
आणि आपले नातेही अशाच प्रकारचे आहे. खरे तर देव आपल्याकडून काहीच मागत नाही, आपल्याकडून
त्याला कसलीही अपेक्षा नाही. देवाने आपल्यावर नेहमीच प्रीती केली आहे आणि आपणही
त्याच्यावर तशीच प्रीती करावी एवढीच त्याची इच्छा आहे. आणि ती आपण पूर्ण मनाने, पूर्ण
जिवाने, पूर्ण
शक्तीने, आणि
पूर्ण बुद्धीने करायची आहे (लूक १०:२५-३७).
आयुष्य
जगण्याद्वारे समजते; केवळ
ऐकून, वाचून, बघून
समजत नाही. त्याचप्रमाणे प्रेम हे केल्यावर समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून
समजत नाही. म्हणून जसं देवावर प्रेम करीतो, तसचं इतरांवरही प्रेम करू
या.
विश्वासू लोकांच्या पार्थना
प्रतिसाद – दयावंत प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१) आपले
परमगुरु, महागुरू, धर्मगुरू
व सर्व व्रतस्थ बंधू-भगिनी व सर्व भाविकांनी सदैव ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत
असताना देवाचे कार्य अविरीतपणे करत रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)
प्रत्येक ख्रिस्ती भाविकांनी आपले जीवन जगत असताना देवावर व आपल्या शेजाऱ्यावर
संपूर्ण मनाने, जीवाने
व शक्तीने प्रेम करावे म्हणून प्रार्थना करूया.
३) आजच्या
ह्या जगाचे भवितव्य तरुण पिढीच्या हातात आहे. परंतु आजची पिढी अनैतिकता, आत्महत्या, भ्रष्टाचार
आणि इतर वाईट मार्गावर चालून आपले जीवन नष्ट करत आहेत. अश्या तरुणांना परमेश्वराचे
मार्गदर्शन लाभावे व त्यांनी योग्य मार्गाचा अवलंब करावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
४) आपल्या
समाजात व कुटुंबात जे कोणी आजारी आहेत अश्या सर्वांना प्रभूचा आशिर्वाद मिळावा व
आजार सहन करण्यास शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) थोडा
वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजासाठी
प्रार्थना करूया.