Reflection for the Homily of Easter Sunday (31-03-2024) By, Br. Trimbak Pardhi
दिनांक: ३१/०३/२०२४
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४ अ. ३७-४३
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४
शुभवर्तमान: योहान २०:१-९
प्रस्तावना
"ख्रिस्त आज विजयी झाला
मरणा जिंकूनी या उठला"
आज आपण पास्काचा सण म्हणजेच
ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा दिवस साजरा करीत आहोत. पास्काचा सन हा अनुभवाचा व
विश्वासाचा सण आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये पास्काचा सण हा सर्वात मोठा सण आहे. कारण
येशू ख्रिस्ताने आपल्याला पापांतून मुक्त करून मरणावर विजय मिळविला आहे.
पहिल्या वाचनात पेत्र लोकांना प्रभू
येशू ख्रिस्त हा सर्वांचा प्रभू आहे, व तो आपल्या सर्वांचा तारणारा आहे, याविषयी साक्ष देतो. दुसऱ्या वाचनात संत
पौल आपल्याला आपले लक्ष स्वर्गीय येशू ख्रिस्तावर केंद्रित करण्यास सांगत आहे.
येशूचे पुनरुत्थान, हा ख्रिस्ती श्रद्धेचा मूळ पाया आहे.
आणि तो पाया दोन भक्कम पुराव्यावर घालण्यात आलेला आहे.१) रिकामी कबर आणि २)
पुनरुत्थीत ख्रिस्ताचे दर्शन. ती कबर आणि येशूचे दर्शन आपल्याला पाहण्याचे भाग्य
लाभले नाही. परंतु आपण त्याकडे आध्यात्मिक नजरेने पाहत असतो.
पास्काचा आनंद व ख्रिस्ताचा पुनरुत्थीत
संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रभू येशू
ख्रिस्तामध्ये आपले पुनरुत्थान होणार आहे. अशी श्रद्धा प्रत्येक ख्रिस्ती माणसांची
असावी. आणि हीच पुनरुत्थीत येशूवरील श्रद्धा अधिकाधिक दृढ व्हावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
बोधकथा:
अमेरिकेतील एक तरुण एकदा स्मशानभूमीत
फिरत असताना त्याला एका खाचेवरील चिरयावर शब्द वाचायला मिळाले की “येथे सर्व आशा
आकांक्षा गाडल्या गेल्या आहेत”. त्यांनी त्या खाचेवर डोळ्यात अश्रू आणून प्रार्थना
करणाऱ्या माणसाला विचारलं, काका तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? आणि येथे लिहिलेल्या ह्या शब्दाचा अर्थ
काय आहे?
तर तो म्हणाला दोन वर्षांपूर्वी डॉक्टर
झालेला माझा २५ वर्षाचा एकुलता मुलगा येथे दफन केला आहे. तो खूप हुशार डॉक्टर होता, त्याला स्वतःचं एक मोठं हॉस्पिटल
बांधायचं होतं आणि गरिबांची सेवा करायची होती. मोठ मोठी उद्दिष्टे त्यांनी मनात
बाळगली होती. एक महिन्यापूर्वी त्याचं रस्त्यात अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्या
माझ्या मुलाला इथे पुरलं आहे व ते शब्द त्या चिरयावर मी लिहायला सांगितले आहेत.
माझा मुलगा मला परत कधीच बघायला मिळणार नाही, माझ्या जीवनाच्या सर्व आशा आकांक्षा
त्याच्यात होत्या त्या मातीत गाडल्या आहेत.
मनन चिंतन:
जेव्हा सर्वकाही संपूर्ण गेले आहे असे
वाटते,
तेव्हा तीच वेळ असते काहीतरी नवीन
घडण्याची किंवा नवीन घडवून आणण्याची. ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरण-जनु सर्वकाही
संपुष्टात आले होते. सर्व काही जणू नाहीसे झाले होते. शिष्य घाबरून पळून गेले
होते. परंतु तीच सुरुवात होती आपल्या सर्वांच्या ख्रिस्ती विश्वासाची, ख्रिस्ती श्रद्धेची. आज ख्रिस्त
मरणांतून जिवंत होऊन पुन्हा आपल्या जीवनात प्रवेश करतो व आपणास तारणाची संधी
उपलब्ध करतो.
आजच्या पहिल्या वाचनात, पेत्र लोकांना प्रभू येशू ख्रिस्त हा
सर्वांचा प्रभू आहे, व तो आपल्या सर्वांचा तारणारा आहे, याविषयी साक्ष देतो. पेत्र लोकांना
सांगतो जरी त्यांनी ख्रिस्ताला खांबावर टांगून मारले तरी देवाने त्याला तिसऱ्या
दिवशी उठवले. कारण देवाची कृपा त्याच्याबरोबर सदैव होती आणि देवाने त्याला पवित्र
आत्म्याने व सामर्थ्याने अभिषिक केले होते. प्रभू येशू हा देवाने नेमलेला जीविताचा
व मेलेल्यांचा न्यायाधीश आहे. जो कोणी ख्रिस्ताचा स्वीकार करतो त्याला पापांची
क्षमा मिळते.
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल
कलस्यैकराना ख्रिस्ताबरोबर केव्हाच उठवलेले आहे हा मुद्दा मांडत आहे. आपण प्रभू
येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या जीवनात सहभागी झालो आहोत म्हणून आपली मने व
आपली आस्था ख्रिस्तावर केंद्रित केली पाहिजे. आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्ताच्या
पुनरुत्थानाचा वृत्तांत सांगितला आहे. रविवारी पहाटेस अंधारात मारिया माग्दलीया व
काही स्त्रिया कबरेजवळ आल्या, कबरे जवळ येताच त्यांना धक्का बसला. पहारेकरी तेथे
नव्हते. कबरे वरची धोंड बाजूला लोटलेली पाहून त्यांना धक्काच बसला. प्रभुचे शरीर
कबरेतून कोणीतरी काढून नेले व ते कोठे आहे व त्यांना ठाऊक नव्हते. हे सांगण्यासाठी
त्या धावत पेत्र व योहानाकडे गेल्या. प्रभू येशूचे पुनरुत्थान होणार ही आशा
नसल्यामुळे त्यांनी किती शोक केला होता. त्याच्या मृत शरीराला सुगंधी द्रव्य
लावण्याची संधी त्या पाहत होत्या.
जेव्हा पेत्र व योहानाने आणि कबरेत जाऊन
पाहिले तेव्हा फक्त तागवस्त्रे पडलेली दिसली व डोक्याचा रुमाल बाजूला होता. यावरून
त्याचे शरीर कोणी चोरून नेले नव्हते हे स्पष्ट दिसत होते, येशूचे पुनरुत्थान झाले ते स्पष्ट दिसत
होते.
त्याच शरीर पुनरुत्थीत झाले होते ते
गौरवी शरीर होते. तो आपल्या स्वाभाविक देहानेच बाहेर आला. जेव्हा येशू उठला तेव्हा
त्याच्या स्वभाविक देहाची आध्यात्मिक देहामध्ये रूपांतर झाले होते. फुलपाखरू
कोशातून बाहेर येते परंतु कोश तसाच राहतो त्याप्रमाणे येशूचा रूपांतरित देह त्या
तागाच्या प्रेतवस्त्रतून बाहेर आले, प्रेतवस्त्र देखील होती तशीच राहिली
होती.
ख्रिस्ताचे पुनरुत्थीन हे आपल्या
ख्रिस्तावरील विश्वासाचे व सत्याचे मुकुट आहे. पहिल्या ख्रिस्ती मंडलीने त्याचा
विश्वास प्रकट केला व ते मुख्य सत्य जगले. ही परंपरा जोपासून त्या नव्या करारात
मांडल्या व येशूचे दुःख मरण व
पुनरुत्थीनाच्या रहस्याची सुवार्ता त्यांनी सर्व जगात पसरविली. ख्रिस्त
मेलेल्यातून उठला मरण स्वीकारून त्यांनी
मरणावर विजय मिळविला. मेलेल्यांना त्यांनी नवीन जीवन दिले. जेणेकरून नाईन
गावाच्या विधवा बाईच्या मुलाला त्यांनी जीवन दिले (लुक १४-१५). याइराच्या कन्येला
येशूने जीवन दिले (लुक ८:५४-५५). येशूने लाजराला जीवन दिले (योहान ११:४३-४४).
ख्रिस्ताचे पुनरुत्थान आम्हाला नवीन आशा
देते की जे ख्रिस्तावर व त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात ते त्याच्याबरोबर
उठले जातील. बोधकथेत सांगितल्याप्रमाणे जसा अमेरिकेतील तरुण डॉक्टरांचे
वडीलाप्रमाणे प्रभू येशूला मेल्यानंतर जेव्हा पुरण्यात आलं, तेव्हा सर्व शिष्य, मारिया माग्दलेना व काही भाविकांच्या
आशा आकांक्षा गाडल्या गेल्या आणि त्यांच्या पदरी निराशा आली. जणू काही ख्रिस्तानेच
त्यांच्या अपेक्षा व आशा धुलीमध्ये गाडून घेतल्या. परंतु येशू आपल्या शरीराच्या
मंदिराला तीन दिवसात पुनरुत्थानाने पुन्हा उभारले.
तसं पाहिलं तर प्रत्येक मनुष्य आशेवर
जगतो,
आशेवर आपली कार्य करत राहतो, आशेवर सर्व काही करतो. जीवनात निराशा
आल्यावर त्याला आशेच महत्त्व अधिक पडू लागते. अमेरिकेतला तो तरुण डॉक्टर ध्यानीमनी
नसताना अचानक मरण पावतो, आपल्यातील अजूनही काही लोक जीवनाच्या सुरक्षतेवर
एवढा विश्वास ठेवतात की ते आपल्या लग्नाचं रिलेशन विमानात साजरा करतात. उद्या परवा
हेच रिलेशन पाणबुडी मध्ये समुद्राच्या तलाशी सुद्धा होऊ शकेल. परंतु तेच विमान
किंवा तीच पाणबुडी अपघातात सापडली तर मात्र त्यांना जमीन असली तरी पुरता येणार
नाही.
तर माझ्या प्रिय भाविकांनो ख्रिस्ताचे
पुनरुत्थान आपल्याला असे सांगत आहे की आपली शरीरे ही नवीन जीवनात परिवर्तित होतील.
हा आपला विश्वास आहे. म्हणूनच येशू म्हणतो. पुनरुत्थान व जीवन मीच आहे जो माझ्यावर
विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, (योहान ११-२५) तो शांती आनंद व सुख
समाधान सदैव अनुभवेल.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे परमेश्वरा द्या कर आणि
तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१. आपले पोप महाशय फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी आपल्या कार्याद्वारे
आपल्या लोकांना आणि स्वतःच्या जीवनात नवजीवनाचा अनुभव यावा म्हणून कष्ट घेतात.
त्यांच्या कार्यात पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या कृपेने यश लाभावे म्हणून प्रार्थना
करूया.
२. ख्रिस्ताच्या मळ्यात काम करण्यास
तरूण तरुणींनी पुनरुत्थित ख्रिस्ताच्या आदर्शातून पाचारण घडावे म्हणून आपण
प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामातील गरजवंत, आजारी व एकाकी लोकांना पुनरुत्थित
ख्रिस्ताचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. राष्ट्रा-राष्ट्रांमधील, देशांतर्गत चाललेले वाद व हिंसाचार
निवळावे,
आपण सर्व एकाच देवाची लेकेरे आहोत ही
ऐक्य भावना वाढीस लागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करूया.