Reflection for the Solemnity of the Nativity of the Lord (25/12/2024) By Fr. Rakesh Ghavtya.
ख्रिस्त जयंती – नाताळ
(सकाळची मिस्सा)
दिनांक: २५/१२/२०२४.
पहिले
वाचन: यशया ५२:७-१०.
दुसरे
वाचन: इब्री. १:१-६.
शुभवर्तमान: योहान १:१-१८.
प्रस्तावना
आजचा हा दिवस आम्हा प्रत्येकांसाठी आनंदाचा व हर्षाचा
आहे.
कारण आज आपण "नाताळ" म्हणजे प्रभू येशूच्या जन्माचा
दिवस साजरा करत आहोत. आजच्या उपासनेद्वारे देवाच्या शब्दाला प्राधान्य देण्यास, आम्हा प्रत्येकाला पाचारण करण्यात येत आहे. कारण "शब्द देही झाला व आम्हामध्ये राहिला. हाच शब्द धरतीवर अवतरला. शब्द मानव झाला आणि आम्हामध्ये राहिला व आम्हाबरोबर आहे."
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगत आहे की, परमेश्वर आपल्या शब्दाने सगळ्या लोकांचे सात्वन करतो व या परमेश्वराची हीच इच्छा आहे की, सर्वांचे तारण व्हावे.
दुसऱ्या वाचनात इब्री लोकास पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, देव प्राचीनकाळी संदेष्टाच्याद्वारे बोलला. पण या काळात तो आपल्या पुत्राच्याद्वारे बोलत आहे. त्यासाठी देवाने आपल्या पुत्राला या भूतलावर सर्वांचे तारण करावयास पाठवले व त्याला देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नेमिले आहे.
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता
आणि शब्द देव होता. आजच्या पवित्र मिस्साबलिदानात सहभाग घेताना, प्रभू येशूच्या जन्माचा आनंद सर्वत्र पसरूया व देवाच्या शब्दाचा गौरव व महिमा सर्वत्र वर्णूया.
मनन चिंतन
"ईश्वराचा शब्द झाला माणूस
जणामध्ये वास त्याने केला"
देव मानव होणे, देवाने मानवी रूप धारण करणे व आम्हाबरोबर राहणे हाच नाताळचा खरा अर्थ आहे. जगाचा तारणारा प्रभू येशू संपूर्ण मानव जातीचे तारण करण्यासाठी गाईच्या गोठ्यात एका अजाण, असहाय्य व गरीब बाळकांच्या रुपात जन्माला आला. यावरून आपल्याला देवाने मानवावर केलेले अस्सीम प्रेम प्रगट होते.
उत्पत्तीच्या
पुस्तकात अध्याय १ मध्ये आपण ऐकतो की, देव बोलला आणि संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. म्हणजेच देवाच्या सजीव व कार्यशील शब्दाने सर्व काही उत्पन्न झाले. इब्री लोकास पत्रात याविषयी सांगण्यात आले आहे की, "देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. (इब्री ४:१२)
हाच देवाचा शब्द प्रारंभ पासून देवासह होता व शब्द देव होता. त्यामुळे हा शब्द देह धारण करून आम्हांमध्ये वस्ती करत आहे. या दैवी शब्दाला जर आम्ही आमच्या अंतकरणात योग्य जागा तयार केली तर, आपले संपूर्ण जीवन प्रकाशमय होईल. आज गरज आहे या शब्दाला जाणण्याची व पाळण्याची की त्याद्वारे आमच्या स्वभावात, वर्तुणूकीत आणि वागणुकीत बदल दिसून येऊन आपले शब्द इतरांना प्रेरणाद्वारे ठरतील.
आज जन्माला आलेला देवाचा शब्द प्रभू येशू आपल्याला चांगले आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, खरे आणि खोटे यामधून निवडण्यास मदत करतो. हाच देवाचा शब्द आम्हाला सुद्धा जीवनात अचूक शब्द वापरण्यास सुसंवाद साधण्यास व आपले चांगले नातेसंबंध जोडण्यास आमंत्रण करत आहे.
एकदा एका शिल्पकाराने सुंदर अशी मूर्ती तयार केली व आपल्या मजुराला ती बाजूच्या खोलीत ठेवण्यास सांगितली. जेव्हा मजुराने ही मूर्ती हातात उचलली तेव्हा शिल्पकार म्हणाला की, ही मूर्ती थोडी ओळी आहे व जडसुद्धा आहे. त्यामुळे ती नेताना दक्षता घ्यावी, परंतु जेव्हा ही मूर्ती मजुराने आपल्या हातात उचलून बाजूच्या खोलीमध्ये नेण्यास प्रयत्न करू लागला, त्यावेळी ती त्याच्या हातातून पडून, फुटून तिचे अनेक तुकडे जमिनीवर पसरले. हे पाहून मजुराला भीती वाटली, त्याला वाटले आता या चुकीमुळे त्याच्यावर त्याचे मालक: शिल्पकार रागावतील व ओरडतील पण ध्येय साधून तो मजूर त्याच्या मालकाकडे गेला व त्याला सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून शिल्पकाराने मजुराला काहीही न म्हणता, त्या फुटलेल्या मूर्तीचे सर्व तुकडे उचलून ते जमा केले व पुन्हा मूर्ती जोडून तयार केली.
हे पाहून त्या मजुराला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, "मालक जरी ही मूर्ती माझ्याकडून पडली आणि फुटली तरी तुम्ही माझ्यावर रागावले नाहीत, ओरडले नाहीत हे कसे!" तेव्हा शिल्पकाराने त्याच्याकडे पाहून, त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, मला तू महत्त्वाचा आहेस, तुटलेली व फुटलेली मूर्ती जोडता येता, नवीन तयार करता येते, पण शब्दांनी दुख:वलेली व्यक्ती व नाते तोडलेल्या व्यक्तीशी पुन्हा नाते जोडणे, तितके सोपे नसते, तोंडातून निघालेला शब्द पुन्हा परत घेता येत नाही व तुटलेली नाती जोडताना संपूर्ण आयुष्य निघून जाते, म्हणून शब्द जपून वापरावे, आपल्या शब्दाने इतरांना आधार द्यायला हवा.
म्हणूनच असे म्हटले आहे की,
“शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे.
कारण धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात”.
तसेच आपले नातेसंबंध कायमचे टिकवायचे असेल तर एकमेकांना समजून घेणे व एकमेकांना सहन करणे गरजेचे आहे.
आज आपल्यामध्ये जन्माला आलेला जगाचा मालक, आम्हा प्रत्येकाला हा संदेश देऊ इच्छित असेल की, आम्ही आपुलकीची भावना बाळगावी, एकमेकांशी सुसंवाद साधून देवाचे प्रेम या भूतलावर चांगले ख्रिस्ती जीवन जगताना अनुभववावे व प्रेमाचे शब्द वापरून, आपले सर्वांचे नातेसंबंध जोडले ठेवावेत. आजच्या या पवित्र मिस्साबलिदानात सहभाग घेताना तारणाऱ्याकडे हीच कृपा आशीर्वाद मागूया की, आम्हा प्रत्येकांना हा नाताळचा सण साजरा करताना, तुझ्याच अस्तित्वाची जाणीव होवो.
आज आपण आपली अंतकरणे बाळेयेशूच्या निवासासाठी उघडी करून ठेवूया. म्हणजे आपला बाळयेशू आमचे तारण करण्यास येऊन आपली ख्रिस्ती श्रद्धेत व विश्वासात वाढ करील व हा नाताळ साजरा करण्यास आम्हाला खरा आनंद लाभेल.
“नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा”.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : “हे प्रभू तुझ्या प्रेमाने आम्हाला भरून टाक.”
१. आपले पोप महाशय फ्रान्सिस
सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व प्रापंचिक
यांना सर्वांना चांगले आरोग्य लाभावे व ईश्वर शब्द प्रकट करताना प्रभुची प्रेरणा लाभावी
म्हणून प्रार्थना करूया.
२. सर्व राजकीय व सामाजिक
पुढाऱ्यांना प्रभू येशूचा स्पर्श व्हावा की जेणेकरून त्यांना निस्वार्थी सेवा करण्याचे
भाग्य लाभावे. म्हणून प्रार्थना करूया.
३. सर्वांच्या कुटुंबामध्ये
चांगले नातेसंबंध जोडले जावे व एकमेकांना समजून घेऊन, येशु बाळाच्या जन्माचा आनंद सर्वत्र पसरावा. म्हणून प्रार्थना
करूया.
४. ज्या विवाहित जोडप्यांना
अजून बाळाची देणगी लाभली नाही, अशांना येशु बाळाने कृपेने भरून, त्यांची इच्छा पूर्ण
करावी. म्हणून प्रार्थना करूया.
५. येथे उपस्थित असलेल्या
सर्व भाविकांवर देवाच्या प्रेमाचा वर्षाव व्हावा, की त्याद्वारे ख्रिस्ती
जीवन जगताना येशु बाळाच्या आदर्श समोर ठेवून, गरजवंतांचे जीवन
उज्वल करावे, म्हणून प्रार्थना करूया.
थोडा वेळ शांत राहून, आपल्या सामुदायिक
व वैयक्तिक गरजांसाठी प्रयत्न करूया.
No comments:
Post a Comment