Reflection for the
Feast of the Holy Family (29/12/2024)
By Fr. Gilbert
Fernandes.
दिनांक: २९/१२/२०२४
पहिले वाचन: १शमुवेल १:२०-२२,२४-२८ / बेनसिरा
३:२-६, १२-१४
दुसरे वाचन: योहानाचे पहिले पत्र ३:१-२, २१-२४ / कलस्सेकरांस
पत्र ३:१२-२१
शुभवर्तमान: लूक २:४१-५२
पवित्र कुटुंबाचा सण
प्रस्तावना:
आज
आपण “पवित्र कुटुंबाचा सण” साजरा करीत आहोत. हा
सण विशेषकरून योसेफ, मरिया, आणि येशू यांच्या
जीवनावर आधारलेला आहे. कारण ह्या कुटुंबाने सदैव देवाच्या सानिध्यात राहून
देवाच्या योजनेप्रमाणे जीवन जगून आपलं कुटुंब पवित्र केले.
आजच्या
पहिल्या वाचनात, जो परमेश्वराचा मान व सन्मान करतो
तो आई-वडिलांचा आदर व सेवा करतो असे सांगितले आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल
आपल्या कुटुंबजीवनाची इमारत प्रेम, विश्वास, करुणा, दयाळूपणा, नम्रता,
सौम्यता, धीर, क्षमाशीलता,
शांती, प्रार्थना या मूल्यांच्या भक्कम पायावर
उभारण्यास आवाहन करत आहे.
आजच्या
या सणाच्या दिवशी पवित्र देऊळमाता नाझारेथच्या पवित्र कुटुंबाचा आदर्श आपल्याला
आपल्या कुटुंबजीवनात घेण्यास आमंत्रण आणि पाचारण देत आहे. जेव्हा आपण पवित्र
शुभवर्तमानच्या शिकवणीप्रमाणे आणि पवित्र कुटुंबाच्या आदर्शाप्रमाणे आपलं कुटुंब
घडवण्याचा आणि आपलं कुटुंबजीवन जगण्याचा प्रयत्न करतो,
तेव्हा आपल्या कुटुंबाचे पवित्रीकरण होते आणि आपलं कुटुंब हे
ख्रिस्ताची शिकवणूक आणि मूल्ये आपल्या जीवनात पाळणारी स्थानिक ख्रिस्तसभा बनते. आज
आपण आपल्या कुटुंबासाठी आणि सर्व ख्रिस्ती कुटुंबांसाठी खास प्रार्थना करूया आणि
सर्व कुटुंबे नाझरेथच्या पवित्र कुटुंबाप्रमाणे प्रेम, दया,
क्षमा, शांती आणि प्रार्थना या मूल्यांची घरे
बनावीत म्हणून परमेश्वराची कृपा मागूया.
मनन-चिंतन:
‘पवित्र कुटुंबाचा सण’ हा ‘कुटुंबांचा’
दिवस आहे. हा दिवस आहे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा. हा दिवस आहे
कुटुंबातील प्रत्येक माणसाचे, मोठया मनाने कौतुक व अभिनंदन
करण्याचा. कुटुंबात आजी-आजोबा, आई-वडील, मुले, नातेवाईक असतात. त्यांच्या कष्टांमुळे,
त्यागामुळे व प्रेमामुळे कुटुंबातील प्रत्येकाचे जीवन सुखरूप बनत
असते. म्हणूनच संत योहान म्हणतात, ‘आपण देवाची मुले आहोत आणि
हे देवाने आपणाला दिलेले प्रीतीदान आहे’. हेच प्रीतीदान
टिकवून ठेवण्यासाठी देव आपल्याला त्याच्या आज्ञा सांभाळण्यासाठी सांगतो.
आज
आपला समाज, आपलं जग आणि आपलं जीवन हे वेगाने
बदलत आहे. आणि कुटुंब-जीवनसुद्धा या प्रचंड अशा बदलाला अपवाद नाही. बदलती
जीवनपद्धती, व्यवसायामधील स्पर्धा आणि त्यामुळे वाढलेला
कामाचा व्याप, अभ्यासाचा भार आणि त्याबरोबरच मोबाईल, संगणक, फेसबुक, व्हॉट्सऍप,
इंस्टाग्राम, टिंडर, ट्विटर,
यूट्यूबसारखी सोशल मिडिया किंव्हा सामाजिक माध्यमे अशा सर्व
कारणीभूत घटकांमुळे कुटुंबाचे सदस्य हे वास्तवापेक्षा व्हर्च्युअल किंव्हा आभासी
जगाशी जास्त जोडलेले असतात. त्यामुळे त्यांना कुटुंबात एकत्र येऊन प्रीतिभोजन
करण्यास किंव्हा एकमेकांबरोबर मनमोकळेपणाने वार्तालाप करण्यास फारच कमी संधी आणि
वेळ मिळत असतो. अशामुळे कौटुंबिक जीवनात प्रेम, जिव्हाळा आणि
ऐक्य वाढीस लागण्याऐवजी तणाव, अनादर आणि दुरावा निर्माण
होतो.
आजच्या
सणाच्या दिवशी पवित्र देऊळमाता आपल्याला पारंपारिक कुटुंबाहून फारच वेगळ्या आणि
आधुनिक जीवनपद्धती अंगिकारणाऱ्या कुटुंबांचा निषेध किंव्हा अशा लोकांची निर्भत्सना
करावयास सांगत नाही आणि अशा कुटुंबांचे दोष काढण्यास सांगत नाही. कारण ते आपलं या
जगातील मिशनकार्य नाही आणि तसं करण्याचा आपल्याला अधिकारसुद्धा नाही. त्याऐवजी
इतरांप्रती प्रेम, मान-सन्मान आणि
निस्वार्थी सेवेची भावना बाळगून त्याप्रमाणे जीवन जगण्यास आपल्याला या जगात
पाठवण्यात आलेलं आहे.
सर्व
कुटुंबांनी पवित्र कुटुंबाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेऊन चांगले कौटुंबिक जीवन
जगावे. योसेफाने चांगले जीवन जगून एका चांगल्या वडिलाची भूमिका चोखपणे बजावली.
त्याने साधं सुताराचं काम करून, काबाडकष्ट
करून, आपल्या कुटुंबाला
म्हणजेच मरिया व येशूला साभाळून त्यांचे पालनपोषण केले. योसेफाने देवाच्या आज्ञाचे
तंतोतंत पालन करून, मरियेशी
तो प्रामाणिक राहिला. जर आम्ही देवाने दिलेले कार्य प्रामाणिकपणे किंवा विश्वासाने
पार पाडले तर खरोखरच देवाचा आशिर्वाद आम्हावर राहील.
संत
बहिणाबाई चौधरी म्हणतात, ‘अरे
संसार संसार, जसा
तवा चुलीवर, आधी
हाताला चटके मग मिळते भाकर.’ हे
बहिणाबाईंचे शब्द आईच्या जीवनाला साजेसे व योग्य आहेत. ‘आईचे काळीज’ ह्या चित्रपटामध्ये
मुलगा आपल्या खडूस, क्रूर
व लोभी पत्नीला हवं असलेल आईच काळीज तो तिचा खून करून, त्याच्या पत्नीला
देतो. आईचा खून करून मुलगा तिचे काळीज घेऊन बायकोला द्यायला जात असता, तो वाटेवर पडतो आणि
लगेच हळूच ‘हृद्यातून’ आईचा आवाज येतो, ‘बाळा तुला लागलं का?’ हे खरोखर सत्य आहे.
आई म्हणजे माया. आईचे घरातील प्रत्येक व्यक्तींवर अपार प्रेम व माया असते. मरियेने
देवाच्या पुत्राला जन्म देऊन त्याचे जीवन फलद्रूप केले. येशूच्या जन्मापासून ते
मरेपर्यंत ती त्याच्या सोबत राहिली. त्याच्या सुखात तसेच दुःखातही सहभागी झाली.
मरियेने सदैव नम्रतेचे, शांतीचे
व एकोप्याचे जीवन जगुन, योसेफाला
विश्वासू राहिली. याप्रकारे देवाने सोपविलेले कार्य मरीयेने सुद्धा निष्ठेने पार पाडले.
तिच्या सारखे पवित्र जीवन जगण्यासाठी देव आपणास आज बोलावीत आहे. आपले कौटुंबिक
जीवन सुखरूप आणि सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यासाठी आपल्याला येशूच्या आईचे मन
जोपासण्याची अत्यंत गरज आहे.
एक
सुखी,
आनंदी आणि आदर्श कुटुंब घडवणे किंव्हा निर्माण करणे हे कुंभाराच्या
कामाइतके सोपे नसते. कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवत असतो. परंतु
कुटुंबामध्ये आईवडील रक्तामांसाच्या जिवंत गोळ्यावर चांगले संस्कार घडवून त्या
जीवनाला आकार देत असतात. आणि हे सोपे नाही. ज्याप्रमाणे नाझरेथच्या पवित्र
कुटुंबात कठीण परिस्थितींचा, संकटांचा अभाव नव्हता, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातसुद्धा आपलं श्रद्धेचं जीवन जगताना अनेक अडचणी
आणि समस्या येऊ शकतात, किंबहुना येतात. अनेक वेळा असमंजसपणा,
अहंकार, अक्षमाशीलता, संवादाचा
अभाव अशा गोष्टींमुळे कुटुंबांमध्ये तणाव निर्माण होत असतो, कुटुंब
जीवनाची इमारत मोडकळीस येते. अशा वेळेला आपण परमेश्वररूपी शिल्पकाराला आपल्या
कुटूंबरूपी इमारतीच्या नूतनीकरणाचा ताबा दिला पाहिजे. तो आपल्या विस्कटलेल्या जीवनाची
त्याच्या पवित्र शब्दांद्वारे, त्याच्या कृपेद्वारे आणि
त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे योग्य ती डागडुजी करून आपली इमारत पुन्हा
राहण्यायोग्य आणि टिकावू करील. फक्त आपण त्याला मरीया आणि योसेफाप्रमाणे आपल्या
कुटुंबजीवनात प्रवेश दिला पाहिजे आणि त्याच्या पवित्र शब्दातूनच आपण सुखी आणि
यशस्वी कुटुंबजीवनाचे धडे घेतले पाहिजेत.
आज
आपण आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराच्या चरणी ठेऊया. आपल्या कौटुंबिक व आध्यात्मिक
जीवनाच्या उन्नतीसाठी व भरभरासाठी देवाजवळ त्याची कृपा व सामर्थ्य मागुया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रतिसाद: हे पवित्र कुटुंबा, आंम्हासाठी मध्यस्थी
कर.
१. आपले
परमगुरुस्वामी, कार्डीनल्स, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी-धर्मबंधू
ह्यांच्यावर व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा, तसेच त्यांच्या
कार्याद्वारे त्यांनी लोकांना एक पवित्र कुटुंब उभारण्यास मदत करावी म्हणून आपण
प्रार्थना करू या.
२. आपल्या
प्रत्येकांच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सतत नांदावे व
आपल्या त्यागमय जीवनातून एका सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा अनुभव सदोदित आपणास मिळावा
म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. जी
कुटुंबे अनैतिक वागणूक, गैरसमज
अशा कारणांमुळे उध्वस्त झाली आहेत, अशांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन
लाभून त्यांना समजूतदारपणाचे, शांतीचे
व प्रेमाचे वरदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आपल्या
वृद्ध आईवडिलांना, आजी-आजोबांना आपल्या प्रेमाचे, मायेचे व करुणेचे छत्र लाभून त्यांना
आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपल्या कुटुंबातील
सर्व आजारी व्यक्तींना परमेश्वराने त्याच्या कृपेच्या स्पर्शाने बरे करावे आणि त्यांना
निरोगी आणि निरामय आयुष्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
६. आपल्या कुटुंबातील ज्या व्यक्ती मरण पावलेल्या आहेत. त्यांना परमेश्वराच्या स्वर्गीय नंदनवनात चिरंतन शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
७. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment