Tuesday, 30 December 2025

 



मरिया देवाची मातानवीन वर्ष



पहिले वाचन: गणना :२२-२७.

दुसरे वाचनगलतीकरांस पत्र :-.

शुभवर्तमानलुक :१६-२१.


प्रस्तावना

प्रिय बंधु-भगिनींनो, आज आपण नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात करीत आहोत आणि त्याचबरोबर पवित्र मरिया, देवाची माता  हा पवित्र सोहळा सुद्धा साजरा करीत आहोत. आज ख्रिस्तसभा नवीन वर्षात देवाचा आशीर्वाद ह्या विषयावर मनन चिंतन करावयास बोलावत आहे. आजची तिन्ही वाचने आपल्याला एकच महत्त्वाचा संदेश देतात,  नवीन वर्षाची सुरुवात भीतीने नव्हे, तर देवाच्या आशीर्वादाने करा.

आजचे पहिले वाचन आपल्याला सांगते की देव आपल्या लोकांना याजकाच्या माध्यमातून आशीर्वाद देतो. स्तोत्र आपल्याला देवाच्या कृपेची आणि शांतीची याचना करायला शिकवते.

दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आठवण करून देतो की, मरीयेद्वारे देवपुत्र आपल्यामध्ये आला आणि आपण सर्व देवपित्याची लेकरे झालो. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की मेंढपाळ देवाच्या वचनावर विश्वास ठेवून येशूकडे धाव घेतात आणि मिळालेला आनंद इतरांपर्यंत पोहोचवतात.

आजच्या ह्या मिस्सा बलिदानामध्ये भाग घेत असताना, आपण प्रार्थना करूया की, हे नवीन वर्ष २०२६ आपल्या सर्वांसाठी देवाच्या आशीर्वादाचे, शांतीचे आणि त्याच्या देवाच्या उपस्तितीचे  वर्ष ठरो.



मनन चिंतन

प्रिय बंधु-भगिनींनो आज आपण दोन अतिशय महत्त्वाचे सोहळे साजरे करत आहोत. पहिल्या प्रथम,  पवित्र मरिया  देवाची माता हा सोहळा, आणि दुसरे म्हणजे, नवीन वर्ष २०२६. आजची उपासना आपल्याला “नवीन वर्षासाठी देवाचा आशीर्वाद” अशा ह्या सुंदर विषयावर मनन चिंतन करावयाला बोलावत आहे.

प्रिय भाविकानो, आज रात्री या मिस्सासाठी येण्यापूर्वी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मोबाईल पाहिला असेल. तो मोबाईल तुम्ही, तारीख पाहण्यासाठी नाही, तर वेळ पाहण्यासाठी, की, नवीन वर्ष येण्यासाठी अजून किती वेळ आहे?

काही जणांनी आपल्या मोबाईलमधले २०२५ मधील जुने फोटो पाहून आपले आनंदाचे तर काही दुःखद क्षणही आठवले असतील. काही जणांनी तर मिस्साला येण्याआधी कॅलेंडरही बदलले असेल, कारण नवीन वर्ष सुरू झाले आहे.

परंतु  आज चर्च आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते की, आपण वेळ पाहिली, फोटो पाहिले, कॅलेंडर बदलले, पण आपले हृदय बदलले का?

आज आपण जुने वर्ष संपवत आहोत आणि नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आजची उपासना आपल्याला सागते, नवीन वर्षाची सुरुवात गोंगाटाने किंवा भीतीने नाही, तर देवाच्या आशीर्वादाने चालू  करा.

प्रिय मित्रांनो, ज्या प्रकारे एखाद्या गाडीला प्रवास सुरू करण्यासाठी पेट्रोल लागते, तसंच आपल्याला नवीन वर्षाच्या प्रवासासाठी देवाचा आशीर्वाद लागतो. घराला मजबूत पाया नसेल, तर घर टिकत नाही; तसंच देवाच्या आशीर्वादाशिवाय नवीन वर्ष टिकत नाही. आपण कितीही योजना केल्या, परंतु त्यात देवाचा आशीर्वाद नसेल, तर त्या योजना यशस्वीच होऊ शकत नाही.

म्हणून प्रिय मित्रांनो, आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे. देवाच्या आशीर्वादाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. हाच संदेश आजची उपासना आपल्याला शिकवते.

माझ्या प्रिय भाविकानो, आपण जेव्हा  नवीन गाडी घेतो, नवीन घर बांधतो, किवा काहीही नवीन करतो तेव्हा आपण ताबडतोब पहिला, फादराना बोलावून आशीर्वाद घेत असतो. याचा अर्थ म्हणजे, आपण  आपल्या आयुष्यातील प्रत्येक नवीन सुरुवात हि देवाचा आशीर्वादाने करत असतो. त्याचप्रमाणे, आज आपण नवीन वर्ष २०२६ हे भरपूर सुखा समाधानच जावो, म्हणून आपण  आपल्या कुटुंबांवर आणि आपल्या व्यवसायावर  देवाचा आशीर्वाद मागण्यासाठी इथे मिस्सासाठी आलेले  आहोत.

आजच्या पहिल्या वाचनात, आपण पाहतो की देव आपल्या लोकांना याजकाच्या माध्यमातून   आशीर्वाद देत आहे. देव मोशेला सांगतो, तुझा भाऊ आरोन, जो याजक आहे, त्याच्यामार्फत माझ्या लोकांना आशीर्वाद दे.”

इथे आपल्याला एक गोष्ट कळून चुकते की, मोशे आशीर्वाद देत नाही,  आरोन – याजक आशीर्वाद देतो. यातून आपल्याला एक खोल सत्य कळते की, जेव्हा याजक आपल्याला आशीर्वाद देतो, तेव्हा तो याजक म्हणून बोलत नाही तर तो खुद देव परमेश्वर आपल्याशी बोलत असतो, व आशीर्वाद देत असतो. याजक फक्त एक साधन आहे, देव आणि त्याच्या लोकांमधला मध्यस्थ करत असतो.

आजच्या वाचनात आपण ऐकतो, देव आरोनमार्फत इस्राएल लोकांना म्हणतो: प्रभू तुला आशीर्वाद देवो आणि तुझे रक्षण करो. प्रभू आपले मुख तुझ्यावर उजळवो आणि तुला कृपा करो. प्रभू तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहो आणि तुला शांती देवो.”

प्रिय मित्रांनो, हा आशीर्वाद जरी याजकाच्या मुखातून बाहेर पडला तरी, ते याजकाचे शब्द नसून देवाचे शब्द व  देवाचा आशीर्वाद आहे. जेव्हा याजक म्हणतो, प्रभू तुला आशीर्वाद देवो आणि तुझे रक्षण करो,” तेव्हा देव स्वत: याजकाद्वारे म्हणतो: मी तुझे रक्षण करीन.” मी तुझ्यासोबत असेन.” प्रभू तुला शांती देवो,” याचा अर्थ, देव आपल्याला आशीर्वादा बरोबर आश्वासन सुद्धा देतो की,तू एकटा नाहीस. मी तुझ्यासोबत आहे. मी तुला, आशीर्वादित केले आहे.”

आजच्या दुसऱ्या वाचनात, संत पौल आपल्याला सांगतो की योग्य वेळी देवाने आपला पुत्राला मारीयेद्वारे पाठवले.

जुन्या करारात आपण पाहतो, आधी देव दूरून आशीर्वाद देत होता, म्हणजेच संदेष्ट्यानद्वारे,
आता देव  स्वतः येशूच्या रूपाने आपल्या जवळ आला आहे. आणि तू माझा मुलगा, आहे असे म्हणून जगातील सर्वात भव्य असा मोठा आशीर्वाद देत आहे, ह्या आशीर्वादापेक्षा जगात दुसरा महान कुठला आशीर्वाद नाही.

तसेच आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो, मेंढपाळ देवदूताचा संदेश ऐकतात, आणि ते भीती न बाळगता संदेशाद्वारे येशूकडे धाव घेतात, आणि येशूला भेटल्यानंतर येशूची  स्तुती करत सर्वांना शुभवर्तमान सांगतात.

हे शुभवर्तमान आपल्याला सागते की, देवाच्या  आशीर्वादाचं काम हे  भीतीपासून नाही, तर धैर्यापासून सुरु होत असते. मेंढपाळ साधे लोक होते. त्यांना सगळं कळत नव्हतं, पण त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला, म्हणून ते तिथे थांबत नाहीत, चर्चा करत बसत नाहीत, शंका काढत बसत नाहीत. शुभवर्तमान सांगतं: ते “तत्काळ”, घाईघाईने येशूकडे निघाले. आणि जेव्हा ते येशूला भेटतात, तेव्हा त्यांचं आयुष्य बदलतं.

येशूला भेटल्यानंतर ते शांत बसत नाहीत, तर देवाची स्तुती करत आणि सर्वांना शुभवर्तमान सांगत परत जातात. या मेंढपाळाकडून आपल्याला शिकवण मिळते की,  देवाचा आशीर्वाद जो मनापासून स्वीकारतो, तो आशीर्वाद मनातच ठेवत नाही, तो आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचवतो. प्रिय मित्रांनो, मेंढपाळ घाबरले नाहीत, कारण त्यांना एक खात्री मिळाली होती, देव आपल्यासोबत आहे. आणि हीच खात्री प्रत्येक माणसाला पुढे जाण्याची ताकद देते.

एकदा एक  लहान मुलगा आपल्या वडिलांसोबत लांब प्रवासाला निघाला. त्याने विचारलं, बाबा, तुम्ही माझ्यासोबत येणार ना?” वडील म्हणाले, हो बाळा, मी तुझ्यासोबत आहे.” प्रिय मित्रांनो त्या बाळाने रस्ता विचारला नाही, अडचणी विचारल्या नाहीत, कारण त्याला माहीत होतं की  माझे बाबा माझ्यासोबत आहेत.

प्रिय मित्रांनो, आज देव आपल्यालाही तेच सांगतो. २०२६  मध्ये कदाचित समस्या येतील, पण देव म्हणतो, घाबरू नकोस, मी तुला आशीर्वादित केले आहे, मी तुझ्यासोबत आहे.” हाच देवाच्या आशीर्वादाचा अर्थ आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, या नवीन वर्षात देवाचं नाव सोबत घेऊया, देवाचा आशीर्वाद सोबत घेऊया, आणि आत्मविश्वासाने म्हणूया:प्रभू आमच्यासोबत आहे - आणि आम्ही आशीर्वादित आहोत.” आमेन.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे देहधारी ख्रिस्ताआमची प्रार्थना ऐक.

1. पोप लेओ चौदावेसर्व कार्डीनल्सबिशप्सधर्मगुरुधर्मभगिनी ह्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभूसेवेसाठी अर्पण केले आहे. त्यांना देवाची  कृपा व आशिर्वाद मिळावा व देवाची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरविण्यासाठी त्यांना सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

2. जे युवक व युवती देवापासून दूर गेलेले आहेत व त्यांच्या जीवनामध्ये काही धैर्य नाहीअशा सर्व युवक व युवतींना देवाच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व ते देवाच्या जवळ यावेत म्हणून आपण प्रार्थना करुया.

3. आज येशू ख्रिस्त आपल्यामध्ये जन्मलेला आहे. ख्रिस्ताने शांतीचा व प्रेमाचा संदेश आपल्याला दिलेला आहे. हाच संदेश आपण इतरांना द्यावा व इतरांचे जीवन आनंदमय व शांतीमय बनावे म्हणून आपण प्रार्थना करु या.

4. हे प्रेमळ ख्रिस्तासर्व बालकांना विशेष करून जी मुले अनाथ-आश्रमांमध्ये आहेत व ज्या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांना सोडून दिलेले आहे. हे प्रभो तू त्यांचा सांभाळ करत्यांची काळजी घे व त्यांना चांगला मार्ग दाखव. इतरांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा म्हणून आपण प्रार्थना करुया.

5. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिककौटुंबिक व सामाजिक हेतूं प्रभूचरणी ठेऊया.