Thursday, 18 December 2025

Reflection for the fourth Sunday of Advent (21/12/2025) By Fr. Brian Motheghar

आगमन काळातील चौथा रविवार

दिनांक: २१/१२/२०२५

पहिले वाचन: यशया ७:१०-१४

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १:१-७

शुभवर्तमान: मत्तय १:१८-२४


प्रस्तावना:

जो कोणी येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन लाभेल, कारण प्रभू परमेश्वर आपला तारणारा आहे; हे आजची उपासना आपल्याला सांगत आहे.

पहिल्या वाचनात देव यशया संदेष्ट्याद्वारे इम्यॅनुएलचे चिन्ह भाकीत करून सांगतो की, ख्रिस्ताच्या जन्माने इस्रायलच्या सर्व दुःखाचा शेवट होईल व ख्रिस्त दाविदाच्या राज्यावर सर्वकाळ नीतीने राज्य करील. दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्त आपला तारणारा आहे व तोच खऱ्या देवाचा पुत्र आहे असा बोध करतो. तर शुभवर्तमानामध्ये देवाचा दूत योसेफला मरीयेचा स्वीकार करण्यास सांगतो कारण तिला जो पुत्र होईल तो जगाचा तारणारा होईल.

प्रभू येशु आपला तारणारा आहे व आपल्या सर्वांच्या जीवनाशी एकरूप होण्यास तो आपल्यामध्ये व आम्हामध्ये येत आहे. कारण तोच इमॅन्युएल म्हणजेच आम्हामध्ये देव आहे. त्याने आम्हां प्रत्येकाच्या अंतःकरणात वस्ती करावी व आपल्याबरोबर सदैव रहावे म्हणून आजच्या ह्या मिस्साबलिदानात आपण विशेष प्रार्थना करुया.

मनन चिंतन

विषय: इमॅन्युएल आम्हांसह देव

प्रिय बंधूभगिनींनो, आगमन काळातील अंतिम आठवड्यात प्रवेश करताना, आजची वाचने आपल्याला अतिशय सुंदर आणि आशावादी वचन दाखवतात:कुमारी गर्भवती होईल, पुत्रास जन्म देईल आणि त्याचे नाव इमॅन्युएल असेल.” (यशया ७:१४) हे शब्द केवळ भविष्यवाणी नाहीत; तर ते आपल्या विश्वासाचे केंद्रबिंदू आहेत: देव आपल्या जीवनात येतो - आपल्या संकटात, दु:खात, धक्कादायक परिस्थितीत व आपल्या संघर्षांत, आपल्या कुटुंबांत आपल्याला साथ देण्यासाठी.

पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला सांगतो की, राजा आहाझ भीतीत, घाबरलेला आणि अस्थिर होता. शत्रूंच्या धोक्याने घेरलेला तो देवावर विश्वास ठेवण्यास संकोच करत होता. देव त्याला म्हणतो:तू चिन्ह माग. आहाझ नकार देतो; तरीही देव स्वतः सर्वात महान चिन्ह देतोएक मूल, कुमारीच्या गर्भातून जन्मलेले, नाव “इम्मानुएलदेव आपल्या सोबत” आहे असे असणार आहे. देवाचा हा संदेश खूप सोपा आणि साधा आहे: तू घाबरू नकोस; मी तुला सोडणार नाही. मी तुझ्याकडे येईन. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ही जरी इतिहासीक घटना असली, तरी ती देवाची सर्वोच्च भविष्यवाणी प्रकट केली गेली आहे जी म्हणते की: मी तुझ्या तुटलेल्या जीवनात येईन आणि त्याला पवित्र करीन.

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल अभिमानाने आपल्याला सांगतो की प्रभू येशू हा परमेश्वराचा सर्व प्राचीन अभीवचनांची पूर्तता आहे. तो खरा मानवदावीदाच्या वंशाचा दिवा. आणि खरा दैवीदेवाचा पुत्र आहे. ह्याद्वारे संत पौल आपल्याला सांगू इच्छितो की, ख्रिस्त हा केवळ संकल्पना नाही तर तो खरा व्यक्ती आहेजो मानवी इतिहासात, मानवी दुःखात, मानवी कुटुंबात जन्मलेला आहे जो मानवी भावनांनी परिपूर्ण आणि दैवी आशीर्वादांनी संपन्न आहे आणि आजही पवित्र आत्म्याद्वारे आपल्या जीवनात वास करीत आहे.

आजच्या शुभवर्तमानात आपण संत योसेफ ह्याला आयुष्याचा निर्णय आणि त्याचे परिणाम जाणून सुद्धा ते आपली पती आणि पिता ही दुहेरी भूमिका कशी हाताळता ह्या विषयी आपण पाहतो. त्याच्या आयुष्यात गोंधळ, वेदना आणि असमंजसता निर्माण होते. कारण, धन्य कुमारी मरिया गर्भवती आहेपण त्याला समजत नाही कसे? तो तिला बदनाम न करता शांतपणे बाजूला सरकण्याचा विचार करतो. तेवढ्यात देव स्वप्नात त्याला दर्शन देतो. आणि योसेफ चमत्कारिक निर्णय घेतो: तो ऐकतो, तो विश्वास ठेवतो आणि तो आज्ञा पाळतो. तो धन्य कुमारी मरीयेला स्वीकारतो. तो येशूला आपल्या घरात घेतो. तो पवित्र कुटुंबाचा रक्षक बनतो. संत योसेफच्या जीवनातून आपल्याला खूप सुंदर अशी शिकवण मिळते ती अशी की देवाची योजना नेहमी स्पष्ट नसते, परंतु देवाचा साथ कायम असतो.

बोधकथा:

एक मुलगा आपल्या आईसोबत ख्रिसमस वृक्ष सजवत होता. सजावट झाल्यावर त्याने एक जागा रिकामी पाहिली. त्याने शाळेत बनवलेला एक छोटा कागदी तारा तिथे ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तारा वारंवार खाली पडत होता. तो त्रासून आईला म्हणाला, “आई, हा तारा राहत नाही; ही फांदी खूप कमजोर आहे! आई शांतपणे म्हणाली, “फांदी कमजोर नाही, बेटा. तू तिला नीट ठेव. मुलाने काळजीपूर्वक पुन्हा तारा ठेवलाआणि या वेळेस तो राहिला. आई म्हणाली, “कधी कधी आपले जीवनही तसेच वाटतेदेवाचे अस्तित्व व त्याची योजना जाणण्यासाठी कमजोर असते. पण जर आपण स्वतःला त्याच्या हाती पूर्णपणे समर्पित केले, तर तो आपल्याला दिशा दाखवून मजबूत बनवतो.

इम्मानुएल - आम्हा बरोबर देव आपल्याला हाच संदेश देतो की, तो आपल्या दुर्बलतेत आपल्या मध्ये येतो, तो आपल्या भीतीदायक परिस्थितीत आपल्याला सशक्त करतो. तो अशा घाबरलेल्या स्थितीत आपल्या बरोबर उभा राहतो जेव्हा आपण स्वतःकडून हिम्मत हारतो किंव्हा आपण स्वतः हताश होतो, आपण आतून तुटलेले असतो अशा वेळेस तो आपल्याला सक्षम करतो.

अ) परमेश्वर आपल्या भीतीदायक अवस्थेत आपल्या सोबत असतो: आहाझसारखे आपणही भविष्याबद्दल चिंतित असतो परंतु इम्मानुएल म्हणतो: तू एकटा नाहीस.

ब) परमेश्वर आपल्या दुर्बलतेत आपल्या मध्ये उपस्थित असतो: येशूचा जन्म साध्या गोठ्यात किंव्हा गव्हाणीत झाला परंतु त्याद्वारे तो आपल्याला म्हणतो:तुझ्या गरिबीत मी तुझ्या सोबत आहे.

क) परमेश्वर आपल्या कुटुंबाचा राजा बनतो: योसेफने धन्य कुमारी मरिया आणि येशूला घरात घेतले आसरा दिला. ख्रिस्ताला आपल्या घरातील निर्णयांत, संभाषणांत, कुटुंबीय नात्यांत त्याला आमंत्रण करूया.

ड) परमेश्वर आपल्या ध्येयात आपल्या सोबत असतो: संत पौल म्हणतो की आपण पवित्र होण्यासाठी बोलावलेले, पाचारलेले आहोत. ख्रिस्त केवळ आपल्या जवळ येत नाही; तर तो आपल्यात बदल घडवीत असतो.

नाताळ अगदी जवळ आला आहे. बाह्य सजावट, खरेदी, कार्यक्रम यांच्या पलीकडे आपण मनाची तयारी करूया संत योसेफसारखी विश्वासपूर्ण आणि आज्ञाधारकपणे. देवाचे हे वचन हृदयात कोरून ठेवूया: देव आपल्या सोबत आहे. भूतकाळात नाही, भविष्यात नाही तर आता इथेच, ह्या घटकेस तो आपल्या बरोबर आहे. पण मी त्याला माझ्या हृदयात आणि माझ्या कुटुंबात स्वीकारण्यासाठी तयार आहे का?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

धर्मगुरू: प्रिय बंधूंनोभगिनींनो, ‘इमॅन्युएल देव आपल्या समवेतया रहस्याच्या उत्सवासाठी आपण आध्यात्मिक तयारी करीत आहोत. देव आपल्या वचनांची पूर्तता करतो, या विश्वासाने आपण आपल्या प्रार्थना त्याच्यासमोर मांडूया.

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या तारणात आमचा समावेश कर.

१.   आपले पोप लियो, सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु आणि सर्व व्रतस्थ ह्यांना प्रभूचा विपुल आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून जगाला ख्रिस्ताचा शुभसंदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.   लवकरच आपण ख्रिस्त जयंती साजरा करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी योग्यरित्या मनाची व  अंतःकरणाची आध्यात्मिक तयारी करावी आणि ख्रिस्त आपला तारणारा ह्याला आपल्या जीवनात स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.   नव-विवाहित दांपत्यांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण फार वाढत आहे, अशा देवाविरोधक निर्णयाला परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा एकदा परमेश्वरामध्ये एक होऊन त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.   जे ख्रिस्ताची सुवार्ता पसरवीत आहेत, अशा सर्वांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा व ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे असे जगाला प्रगट करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.   आपला सर्वांचा देवावरील विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा व आपण सर्वांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून ख्रिस्त आपला तारणारा आहे ह्याची साक्ष आपण इतरांना दयावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.   थोडा वेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक गरजा प्रभूचरणी मांडूया.

धर्मगुरू: हे स्वर्गीय पित्या, तू तुझा पुत्र आम्हांमध्ये राहण्यासाठी पाठविला आहेस. आमच्या ह्या विनंत्या तुझ्या पवित्र इच्छेनुसार स्वीकार व त्या द्वारे आम्हांला प्रतिफळ प्राप्त करून दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता द्वारे करतो. आमेन.





No comments:

Post a Comment