Tuesday, 23 December 2025

Reflections for the homily for the Christmas Vigil Mass (25-12-2025) by Fr. Pravin Bandya


ख्रिस्त जयंती – नाताळ  (मध्यरात्रीची मिस्सा)

दिनांक: २५/१२/२०२५

पहिले वाचन: यशया ६२: १-५

दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये: १३: १६-१७, २२-२५

शुभवर्तमान: मत्तय: १: १-५

प्रस्तावना:

आज आपण नाताळ साजरा करीत आहोत. आजची ही पवित्र रात्र केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नाही, तर देवाच्या प्रेमाची जिवंत अनुभूती देणारा क्षण आहे. आज आपण फक्त एका बालकाच्या जन्माची आठवण साजरी करत नाही, तर देवाने आपल्याबरोबर जो करार केला होता तो पूर्ण झाला आहे. अंधारात प्रकाश निर्माण करणारी ही रात्र आपल्या विश्वासाला, आपल्या आशेला आणि आपल्या प्रेमाला नवीन जीवन देते.

आजची सर्व वाचने आपल्याला आठवण करून देतात की देवाने आपल्या लोकांना सोडले नाही, तो त्यांना विसरला नाही. माणसाच्या इतिहासात, त्याच्या संघर्षात, त्याच्या दुःखात देव शांत बसला नाही; तर त्याने मी तुझ्याबरोबर आहे असे सांगत स्वतःच खाली येण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच ही रात्र आहे देवाच्या जवळिकीची, देवाच्या निष्ठेची, आणि तारणाच्या वचनपूर्तीची रात्र.

हा नाताळ आपणास आठवण करून देतो कि, देव आपणासाठी इतका नम्र झाला, तर आपण किती नम्र होतो? देव इतका जवळ आला, तर आपण त्याच्याजवळ जाण्याची तयारी करतो का? देवाने आपल्यावर इतके प्रेम केले, तर आपणही आपल्या नात्यांमध्ये प्रेम, क्षमा आणि शांती आणतो का? हा नाताळ आपल्याला फक्त आनंद देण्यासाठी नाही, तर आपले हृदय बदलण्यासाठी सांगत आहे.

म्हणून, आज आपण केवळ बाह्य साजरीकरणापुरते मर्यादित न राहता आपल्या हृदयाच्या दारांवर नजर टाकूया. आपण स्वतःस प्रश्न विचारूया; देवाच्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवण्यासाठी आपले मन तयार आहे का? आजची ही पवित्र रात्र आपल्याला विश्वास दृढ करण्यासाठी, आशा पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी आणि प्रेमाने जगण्यासाठी आमंत्रित करते. म्हणून, आनंदाने आज आपण ख्रिस्ताचे स्वागत करूया कारण खरोखरच, तारण आज आपल्या घरात आले आहे!

मनन चिंतन

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, आज रात्री आपण अत्यंत पवित्र व धन्य अशा वातावरणात ख्रिस्तजन्माचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. ही जागरणाची मिस्सा आपल्याला इतिहासातील त्या क्षणाकडे घेऊन जाते, जेव्हा देवाने मानवजातीला दिलेले वचन पूर्ण झाले. नाताळ म्हणजे देवाची मानवाशी झालेली भेट ही भेट शांत, नम्र आणि प्रेमाने परिपूर्ण आहे.

पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला आशेचा आणि आनंदाचा संदेश देतो. तू परित्यक्ता राहणार नाहीस, असे देव आपल्या लोकांना सांगतो. याचा अर्थ स्पष्ट आहे देव आपल्या लोकांना कधीही सोडत नाही. जसे वर आपल्या वधूवर आनंद करतो, तसे देव आपल्या लोकांवर आनंद करतो. नाताळ हा त्या देवाच्या निष्ठेचा आणि प्रेमाचा उत्सव आहे, जो आपल्या दुर्बलतेकडे दुर्लक्ष न करता आपल्याला स्वीकारतो.

दुसरे वाचन आपल्याला तारणाच्या इतिहासाची आठवण करून देते. देवाने इस्राएल लोकांची निवड केली, त्यांना मार्गदर्शन केले आणि दावीदाच्या वंशातून तारणहार देण्याचे वचन पूर्ण केले. येशू ख्रिस्त हा अचानक घडलेला प्रसंग नाही, तर देवाच्या योजनेचा शिखरबिंदू आहे. देव इतिहासामध्ये काम करतो, आणि योग्य वेळी तो आपले वचन पूर्ण करतो हेच नाताळ आपल्याला शिकवतो.

आजच्या शुभवर्तमानात आपण संत मत्तयकडून येशूच्या वंशावळीचा आणि संत योसेफच्या विश्वासाचा अनुभव घेतो. योसेफ हा शब्दांचा नव्हे तर कृतीचा माणूस होता. तो देवाच्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवणारा होता. देव त्याला सांगतो, घाबरू नकोस,” आणि हाच संदेश आज आपल्यासाठीही आहे. नाताळ म्हणजे भीतीवर विश्वासाचा विजय. देवदूत त्याला पावित्र मरीये विषयी म्हणाला, “तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.” येशू हे नाव म्हणजेच देव वाचवतो. नाताळ म्हणजे देव आपल्याला वाचवण्यासाठी स्वतः खाली येतो. तो राजवाड्यात नाही, तर साधेपणात; शक्तीने नाही, तर प्रेमाने; अधिकाराने नाही, तर सेवेद्वारे येतो.

ही जागरणाची रात्र आपल्याला शांत होण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते. आज आपण स्वतःस प्रश्न विचारूया; आपल्या हृदयात ख्रिस्तासाठी जागा आहे का? आपण देवाच्या योजनेवर संत योसेफसारखा विश्वास ठेवतो का?

नाताळ आपल्याला एक नवीन सुरुवात देतो. तुटलेली नाती जुळवण्याची, क्षमा देण्याची, गरिबांमध्ये ख्रिस्ताला पाहण्याची आणि अंधारात प्रकाश बनण्याची ही वेळ आहे. आज या पवित्र रात्री, आपण ठरवूया की ख्रिस्त आपल्या जीवनात फक्त जन्माला येणार नाही, तर तो आपल्या जीवनाचा मार्गदर्शक बनेल. म्हणून चला, आनंदाने आणि कृतज्ञतेने म्हणूया ख्रिस्त जन्मला आहे! चला, आपण त्याचे आपल्या हृदयात, आपल्या कुटुंबात आणि आपल्या जीवनात स्वागत करूया

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू तुझ्या प्रेमाने आम्हाला भरून टाक.

१. आज आपण पवित्र ख्रिस्त महासभेचे सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनी साठी प्रार्थना करूया की जसे बाळ येशू आज शांती व प्रेमाचा  संदेश घेऊन जन्माला आला आहे,  तसेच आपणही त्याच्या  प्रेमाचा व शांतीचा संदेश जगात पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज आपण विशेष करून सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना करूया ज्या राष्ट्रांमध्ये युद्ध व अशांती आहे तेथील सर्व अधिकारी व पुढारी लोकांनी येशूच्या शांतीचा अनुभव घेऊन सतत शांती साठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आज आपण सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना करू या विशेष करून,  जे कुटुंब काही कारणास्तव विभक्त झाले आहेत अशा कुटुंबानी पवित्र कुटुंबाचा आदर्श घेऊन घरात शांतीचे वातावरण निर्माण करावे म्हणून आपण  प्रार्थना करूया.

४. जे कोणी जीवनात निराश आहेतअशांती व अंधकारात आहेत त्यांनाही  बाळ येशूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व  त्यांचे जीवन आनंदाने भरावे तसेच त्यांच्या जीवनात बद्दल घडून यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आज आपल्या सर्वाना इथे जमले असताना बाळ येशूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व आपले जीवन संपन्न व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment