Reflection for the Second Sunday
of Advent (07/12/2025) By Br. Oliver Munis
आगमन काळातील दुसरा रविवार
दिनांक: ०७/१२/२०२५
पहिले वाचन: यशया ११:१-१०
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: १५:४-९
शुभवर्तमान: मत्तय: ३:१-१२
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय
बंधू-भगिनींनो, आजची उपासना ‘आगमन काळाचा दुसरा रविवार’ साजरा करीत आहे. आज आपण ‘शांतीची
मेणबत्ती’ पेटवली आहे. तसेच, आजची उपासना
आपल्याला पुढील आव्हानात्मक प्रश्न विचारून,
आपले जीवन
जोपासायला बोलावत आहे: “आज आपल्या मनात शांती आहे का?”
नाताळाची तयारी घराची साफसफाई करताना
दिसते, आपण नवीन कपडे घेताना दिसते, फराळ बनवताना पण दिसते. हे सगळे छान आहे.
पण आजच्या उपासनेत योहान बाप्तिस्ता आपल्याला जाणीव करून देतो की, पश्चात्ताप करून मनाची तयारी करणे हे खूप
महत्त्वाचे आहे. बाह्य तयारी झाली असली तरी,
राजाला
आपल्या जीवनात येण्यासाठी आपल्याला मनाची तयारी करायला हवी.
आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया: ‘आपले मन
प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी तयार आहे का?’ जर आपले मन प्रभू येशूला स्वीकारण्यासाठी
योग्य नसेल, तर आपल्या मनाच्या शुद्धतेसाठी आणि
शांतीसाठी पवित्र मिस्साबलीदानात कृपा आणि शक्ती मागूया; जेणेकरून आपले जीवन सुंदर होईल आणि शेवटी
स्वर्गाची शांती आम्हाला मिळवता येईल.
मनन चिंतन
आपल्या
मनाचा मार्ग साफ करा, ख्रिस्तराजा
येत आहे!
पहिले वाचन
नैराश्याच्या छायेत, आशेचा सूर्य उगवतो,
त्यासाठी मन शुद्ध ठेवावे, अंधार नष्ट होतो.
आपले जीवन आपल्यासाठी व दुसऱ्यांसाठी
शांती होऊनी, जीवन नवा रंग घेतो.
होय,
माझ्या
प्रिय बंधू आणि भगिनींनो! आजच्या पहिल्या वाचनात (यशया ११:१-१०), यशया संदेष्टा एका बुंध्याचे (Stump of Jesse) वर्णन करतो. जेव्हा झाड तोडले जाते, तेव्हा फक्त बुंधा उरतो; तो मेलेला वाटतो. पण देव म्हणतो, “त्या बुंध्यातून एक नवीन कोंब फुटेल.” हा कोंब म्हणजे येशू ख्रिस्त.
जिथे सर्व काही संपल्यासारखे वाटते,
तिथे देव
नवीन सुरुवात करतो. यशया पुढे सांगतो की,
जेव्हा हा
राजा येईल, तेव्हा लांडगा आणि कोकरू एकत्र राहतील.
म्हणजेच, जिथे वैर आहे तिथे मैत्री होईल; जिथे भीती आहे तिथे शांती येईल.
‘नैराश्य’ किंवा ‘सर्व संपल्यासारखे
वाटणे’ हे नेहमीच वाईट अनुभव नसतात, तर ते आपल्याला एक आशेचा किरण दाखवतात.
जेव्हा आपल्या जीवनात नैराश्य येते,
हताश वाटते
किंवा सर्व संपल्यासारखे प्रसंग येतात,
तेव्हा आपले
मन कुठे असते? दुसऱ्यामुळे आपले जीवन खराब झाले असताना, आपण त्यांच्याविषयी शत्रुत्व ठेवतो का? किंवा आपण त्यांच्यासोबत प्रेमाचे नाते
जपतो का? ‘आपले वाईट झाले आहे म्हणून त्यांचेही
वाईट झाले पाहिजे,’ असा विचार आपण करतो का?
तर माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रसंगात आपण देवाच्या आशेवर थांबून, त्या सर्व वाईट अनुभवातून आपल्या जीवनाला
चांगले वळण देऊ शकतो. जसे एका बुंध्यातून नवीन कोंब उगवतो, तसेच आपल्यालाही त्या कठीण प्रसंगातून
नवा मार्ग आणि नवी आशा मिळू शकते. जिथे वैर आहे,
तिथे मैत्री
होईल आणि जिथे भीती आहे, तिथे शांती येईल.
दुसरे वाचन
दुसऱ्या वाचनात (रोम. १५:४-९), संत पौल आपल्याला सांगतो की, देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने
तुमचा-आमचा स्वीकार केला. जेव्हा आपण पापी होतो,
तरीही
ख्रिस्ताने आपल्याला ‘क्षमा करून’ व ‘प्राण क्रुसावर देऊन’ आपला स्वीकार केला आणि
आपल्याला पापमुक्त करून अनंत काळाची शांती बहाल केली.
जेव्हा गैरसमजामुळे व एका-दुसऱ्याच्या
चुकांमुळे आपल्यामध्ये वाद-विवाद होतात,
अशा ह्या
प्रसंगात आपण ख्रिस्ताप्रमाणे देवाच्या गौरवासाठी आपल्या मनात एक-दुसऱ्यांचा
स्वीकार करतो का? एक-दुसऱ्यांना आपली चूक नसताना देखील, ख्रिस्ताप्रमाणे क्षमा करतो का? ख्रिस्ताने प्राण दिला, आपण दुसऱ्यांसाठी प्राण नको पण निदान
काही गोष्टींचा व बाबींचा त्याग करतो का?
तर आपल्या
मनात शांती बाळगून, आपणही इतरांना क्षमा करून व इतरांचा
स्वीकार करून, शांतीचा मार्ग तयार करण्यास झटले पाहिजे.
शुभवर्तमान
बाप्तिस्मा करणारा योहान यहुदियांच्या
रानात येऊन अशी घोषणा करू लागला की,
“पश्चात्ताप
करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” यशया संदेष्ट्याद्वारे सांगितले होते की, “परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा नीट करा.”
आपल्या गावाकडे जेव्हा एखादा मोठा मंत्री
किंवा साहेब येणार असतो, तेव्हा आपण काय करतो? आपण रस्त्यावरचे खड्डे दुरुस्त करतो, कचरा उचलतो, रस्ता सरळ करतो. बरोबर ना? प्रभू येशू तर राजांचा राजा आहे! तो
आपल्या मनात येणार आहे. पण आपल्या मनाच्या रस्त्यावर काय आहे?
- गर्वाचे डोंगर
आहेत.
- रागाचे आणि
द्वेषाचे खड्डे आहेत.
- वाईट सवयींचे काटे
आहेत.
तर प्रिय भाविकांनो, हे डोंगर पाडा, दुरुस्त करा व मनातील कचरा साफ करा.
नुसते तोंडाने “प्रभू, प्रभू” म्हणून चालणार नाही, तर आपल्या वागण्यात फरक दिसला पाहिजे.
यालाच ‘पश्चात्तापाचे फळ’ म्हणतात.
बोधकथा
एकदा आगमन काळात, एका कुटुंबात दोन भावांमध्ये शेताच्या
बांधावरून भांडण झाले. त्यांना इतका राग आला की,
त्यांनी
बोलणे बंद केले, अगदी एकमेकांकडे बघणेसुद्धा बंद केले.
घरात नाताळच्या अगोदर ते एकत्र घराची साफ-सफाई करत होते, गोडधोड बनवत होते, पण नात्यात मात्र कडवटपणा तसाच होता.
एकदा असे झाले की, धाकटा भाऊ आजारी पडला. त्याला दवाखान्यात
दाखल केले. मोठ्या भावाचे मन गोंधळून गेले होते: ‘जाऊ की नको? त्याने माझा अपमान केला होता.’ पण त्या दिवशी मिस्सामध्ये त्याने हेच
वाचन ऐकले होते, “एकमेकांचा स्वीकार करा.”
मोठा भाऊ रागाचा अहंकार बाजूला ठेवून
दवाखान्यात गेला. धाकट्या भावाला पाहताच त्याचे डोळे पाणावले. त्याने भावाचा हात
हातात घेतला आणि त्यांच्यातील एकमेकांबद्दलचा सगळा राग नाहीसा झाला. त्या दिवशी
खऱ्या अर्थाने त्यांच्या घरात
‘येशूचा
जन्म’ झाला आणि त्या घरातल्या लोकांच्या मनात
शांती निर्माण झाली. जमिनीचा तुकडा महत्त्वाचा की रक्ताचे नाते? त्यांनी त्या दिवशी आपल्या मनाचा रस्ता
साफ केला व येशू ख्रिस्ताचा जन्म त्यांच्या मनात व हृदयात झाला.
प्रिय भाविकांनो, आज आपल्या प्रत्येकाच्या घरात आणि मनात आपण शांती हरवलेली आहे आणि मी तुम्हाला एका कविताद्वारे व्यक्त करत आहे:
हरवलेली मन-शांती
नवरा-बायकोत अबोला भारी, सासू-सुनेचं पटत नाही,
पैशापायी सख्खा भाऊ, भावाकडे आता बघत नाही.
दारू,
जुगार अन्
मोबाईलमध्ये, पिढी आपली अडकली,
व्यसनाच्या या जाळ्यात बघा, घराची शांती भडकली.
नोकरी,
लग्न अन्
महागाईची, चिंता जाळते मनाला,
काळजीच्या या अंधारात, विसरून गेलो देवाला.
वरवर म्हणतो “हॅपी ख्रिसमस”, पण आतून जीव हा रडतोय,
खऱ्या शांतीसाठी माणूस, आजही रस्ता शोधतोय.
होय माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपल्या घरात कुठेतरी मन-शांती हरवली
आहे. मग यावर उपाय काय? तर निराश होऊ नका, कारण देव आपल्याला मदत करायला नेहमी तयार
आहे.
1. कुमसार (Confession) करा: हे सर्वात मोठं औषध आहे. आपल्या मनातील
घाण, जुनी पापं,
कोणाबद्दलचा
राग... हे सर्व धर्मगुरूसमोर सांगून टाका. जेव्हा आपण पाप कबूल करतो, तेव्हा मन हलके होतं आणि देवासोबत व
शेजाऱ्यासोबत आपला समेट होतो.
2. क्षमा: जर कोणाशी बोलणे बंद असेल, तर या आगमन काळात तुम्ही पहिलं पाऊल
टाकून त्यांना फोन करा, किंवा प्रत्यक्ष भेटा आणि ‘माझेच बरोबर
आहे’, हा हट्ट सोडा.
3. कुटुंबात
प्रार्थना करा: ज्या घरात
संध्याकाळी एकत्र रोझरी (जपमाळ) होते,
त्या घरात
सैतान जास्त वेळ टिकू शकत नाही.
4. गरजूंना
मदत: नाताळला स्वतःसाठी खर्च करण्याआधी, एखाद्या गरिबाच्या पोटात अन्न जाईल हे
बघा.
शेवटी इतकंच सांगेन. शेतकरी पेरणी
करण्याआधी जमीन नांगरतो, तण काढून टाकतो, तेव्हाच पीक चांगले व उत्तम येते. आपणही
या आठवड्यात आपल्या मनाची मशागत करूया. राग काढून टाकूया, प्रेमाचे बी पेरूया. जेव्हा आपण
पश्चात्ताप करतो, तेव्हाच आपण नाताळचा खरा आनंद घेऊ शकतो.
देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनाची शांती देवो.
सर्वांना
आगमन काळाच्या शुभेच्छा!
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
धर्मगुरू: माझ्या प्रिय भाविकांनो, देव आपला प्रेमळ पिता
आहे. तो नेहमी आपली वाट पाहत असतो. आपल्या आनंदात, दु:खात,
यशात आणि अपयशात. तर आता मोठ्या विश्वासाने आणि नम्रतेने आपल्या
गरजा, इच्छा व आकांक्षा त्याच्यासमोर मांडूया.
प्रतिसाद: हे प्रेमळ पित्या, आमची प्रार्थना ऐक.
१. आपले पोप लियो, सर्व बिशप्स, फादर्स
आणि धार्मिक सेवकांसाठी प्रार्थना करूया की, त्यांनी लोकांना सत्याचा प्रकाश
दाखवावा, न्यायाने आणि प्रेमाने मार्गदर्शन करावे आणि
ख्रिस्ताच्या नि:स्वार्थ प्रेमाची खरी साक्ष जगासमोर ठेवावी; म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज जगाच्या अनेक भागांत युद्ध, संघर्ष आणि हिंसा
पेटलेली आहे. त्या सर्व ठिकाणी तुझी शांती, समजूत आणि ऐक्य
नांदो. आपल्या संपूर्ण देशात सर्व जाती-धर्माचे लोक एकमेकांचा सन्मान करतील,
प्रेमाने आणि बंधुत्वाने राहतील, अशी कृपा कर;
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ज्या घरांमध्ये मतभेद, भांडणं किंवा तणाव आहे,
तिथे तुझ्या प्रेमाचा समेट घडो. घराघरांत शांतता, ऐक्य आणि आशीर्वाद नांदो. तसेच, जे तरुण व्यसनाच्या
किंवा वाईट संगतीच्या विळख्यात अडकले आहेत, त्यांच्या जीवनात
तुझा प्रकाश पडो आणि त्यांना योग्य, सुरक्षित आणि अर्थपूर्ण
मार्ग सापडो; म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आजारी, एकटे, बेरोजगार
आणि कोणत्याही प्रकारच्या संकटात असलेल्या आपल्या बांधवांसाठी आम्ही प्रार्थना
करतो. त्यांना तुझ्या मदतीचा हात मिळू दे आणि आम्हालाही करुणा व मदत करण्यासाठी
प्रेरणा दे, जेणेकरून आम्ही गरिबांमध्ये तुझे रूप ओळखून
त्यांची सेवा करू शकू; म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. हे प्रभू, आमच्या मनातील प्रत्येक इच्छा,
चिंता आणि आशा तुला ठाऊक आहेत. त्या तुझ्या पवित्र इच्छेनुसार पूर्ण
होऊ दे आणि आमच्या जीवनात तुझे मार्गदर्शन स्पष्ट जाणवू दे; म्हणून
आपण प्रार्थना करूया.
धर्मगुरू: हे प्रेमळ पित्या, तू आमचा आधार, आमचा आश्रय आणि आमची शक्ती आहेस. आम्ही या सर्व प्रार्थना तुझ्या चरणी
नम्रतेने अर्पण करतो. आमचे मन स्वच्छ, प्रेमळ आणि शांत कर,
जेणेकरून आम्ही तुझ्या पुत्र, प्रभू येशू
ख्रिस्ताचे स्वागत आनंदाने, विश्वासाने आणि उत्साहाने करू
शकू. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.
No comments:
Post a Comment