Reflections for the Homily of 24th Sunday in Ordinary Time (13-09-2026) By Fr. Suhas Pereira
सामान्य काळातील चोविसावा रविवार
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील चोवीसावा रविवार साजरा करत आहोत आणि आजची उपासना आपल्याला क्षमाशीलतेच्या, दयेच्या आणि समेटाच्या मार्गाची आठवण करून देऊन त्या मार्गावर आपल्या जीवनात चालण्याचे आव्हान देत आहे. क्षमाशीलतेसाठी आपण आपल्या जीवनात दोन प्रकारच्या मापाचा वापर करत असतो: एक माप दयेचे जे आपण स्वत:साठी वापरतो आणि दुसरे माप न्याय-निवडायचे जे आपण इतरांसाठी वापरत असतो. परंतु परमेश्वर हा सर्वांना समान मापाने दया आणि क्षमा देतो. परमेश्वराची दया आणि क्षमा ही अमर्याद असल्यामुळे आपणसुद्धा इतरांना दया दाखवण्यात आणि क्षमा देण्यात दैवी उदारता दाखवावी असं आजची उपासना आपल्याला सांगत आहे. आजच्या शुभवर्तमानात, पेत्र येशूला विचारतो की, माझ्या बंधूने माझ्या विरुद्ध अपराध केला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? सात वेळा? येशू उत्तर देतो, "सात वेळा नव्हे, तर सातच्या सत्तर वेळा." क्षमा न करणाऱ्या सेवकाच्या दृष्टान्ताद्वारे येशू आपल्याला आठवण करून देतो की, आपल्याला देवाची विपुल दया लाभली आहे आणि म्हणूनच आपणसुद्धा इतरांबरोबर दयाळू वृत्तीने वागलो पाहिजेत.
या पवित्र मिस्साबलीच्या सुरुवातीला आपण आपल्या हृदयाची झडती घेऊ या. आणि स्वतःला विचारूया: माझ्या जीवनात अशी व्यक्ती आहे का जिला जिला क्षमा करणे आपल्याला कठीण जात आहे? माझ्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी कटुता, राग किंवा दुखावणारी भावना अजूनही घर करून राहिली आहे का? आपण हे सर्व प्रभूच्या चरणी अर्पण करूया आणि ज्याप्रमाणे आपल्याला क्षमा मिळाली आहे, त्याचप्रमाणे इतरांना क्षमा करण्याची कृपा त्याच्याकडे मागूया. हा पवित्र मिस्साबली संस्कार आपली हृदये कोमल करो, आपले नाते-संबंध सुधारो आणि आपल्याला देवाच्या दयेची व शांतीची साधने बनवो.
मनन चिंतन:
आजच्या उपासनेची तिन्ही वाचने
आपल्यापुढे एक आव्हानात्मक आणि आपल्याला रोजच्या जीवनात अनुभवायास मिळणारे वास्तव
सादर करतात. हे वास्तव आहे दोष, शांती आणि समेटाचं वास्तव. आपण अनेक वेळा शांतीबद्दल
वाचतो, ऐकतो परंतु एक महान सत्य
विसरतो: शांतीची सुरुवात आपल्या
जीवनापासून, आपल्या झाली पाहिजे. संत मदर तेरेसा म्हणतात, कि "शांती आणि युद्धाची सुरुवात
घरातूनच होते; त्यामुळे जर आपल्याला जगात
खरोखरच शांतता हवी असेल, तर आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबात
एकमेकांवर प्रेम करण्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे." ज्या गोष्टीद्वारे आपला समाज
तेजोमय झाला पाहिजे असं आपल्याला वाटते, त्या गोष्टीचा उगम आपल्या घरात झाला
पाहिजे.
माझ्या वैयक्तिक, खाजगी जीवनात शांती आहे हा? मी समेटासाठी सदैव तयार असतो
का? त्या ऐवजी आपण आपला स्वतःचा
राग आणि असंतोष नगण्य-योग्य मानतो, आणि सदैव दुसऱ्यांमध्ये दोष शोधात नाहीत
का? स्वतःच्या चुका झाकून ठेवणे
किंव्हा त्यांकडे डोळेझाक करणे आपण सहसा पसंत करतो. परंतु, राग आणि क्रोधाबाबत तर, आजची उपासना एक वेगळेच मत
मांडत आहे. पहिलं वाचन आपल्याला सांगते: “राग आणि क्रोध हे घृणास्पद
आहेत; केवळ पापीच त्यांना धरून
राहतो. जो माफ करत नाही, त्याचा बदला प्रभूच घेतो; त्याची पापे प्रभूच्या
स्मरणात राहतात.” पहिलं वाचन आपल्या पापांच्या
वास्तविक स्वरूपाचे जणूकाही वर्णन करत आहे. आपले वाद, राग आणि द्वेष यांच्याकडे
क्षुल्लक गोष्टी पहिलं वाचन क्षुल्लक नाही, तर पाप मानते. आणि हे पाप आपल्या आध्यात्मिक
मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच, आपण आपल्या अंताचा विचार केला पाहिजे, मृत्यूचा विचार केला पाहिजे
आणि द्वेष सोडून दिला पाहिजे!” असे पहिलं वाचन आपल्याला सांगते.
आजच्या शुभवर्तमानत आपण वाचतो, “मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूंही आपल्या सोबतीचा दासावर करावयाची नव्हतीस काय? देवाने आपल्याला अगणित वेळा क्षमा केली आहे. देवाकडून मिळणाऱ्या उदार क्षमादानामुळेच आपण जिवंत आहोत. आपल्या प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे: जर देवाने आपल्या सर्व चुकांचा हिशोब ठेवला असता आणि आपल्याला क्षमादान दिले नसते तर आपण आज कुठे असतो? आपली परिस्थिती काय असती? परंतु देव असा नाही! तो क्षमाशील आहे आणि सदैव दया आणि क्षमा देतो. वारंवार तो आपल्याला जीवनाची नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. हे सत्य आपण कदापि विसरता कामा नये.
देवाने आपल्याला आपल्या सर्व पापांची प्रत्येक वेळेला क्षमा करतो. म्हणून आपणसुद्धा त्याचप्रमाणे वागलो पाहिजेत. आपणसुद्धा इतरांना क्षमा करण्यास तयार असलो पाहिजेत. आजच्या पहिल्या वाचनातील शब्द आपण लक्षात ठेवूया: “तुझ्या अंतिम घटकेची आठवण ठेव, आणि द्वेष करण्याचे सोडून दे. मृत्यूचा विचार कर आणि वैरभाव सोडून दे."
आपलं जीवन हे परमेश्वर पित्याच्या संयमी आणि दयाळू वृत्तीवर आणि प्रेमावर विसंबून आहे, हे आपण सदैव स्मरणात ठेवावे. आणि जेव्हा आपल्याला इतरांना क्षमादान देणे कठीण जाते, तेव्हा परमेश्वराने आपल्याला आपल्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे, या सत्याची आठवण ठेवू या. स्तोत्रसंहितेमधील आजचं स्तोत्र आपलं स्तुतिगीत करूया: हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको."
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
परमेश्वर आपल्या दयाळू पित्याकडे आता आपण आपल्या सर्व गरजांसाठी प्रार्थना करू या.
प्रतिसाद: हे परमेश्वरा आम्हाला तुझ्या दयेने भर.
१) आपले परमगुरुस्वामी. सर्व महागुरुस्वामी, धर्मगुरू, धर्मभगिनी, व्रतस्थ आणि सर्व ख्रिस्ती भाविकांनी दया आणि क्षमाशीलतेचं जीवन जगून आपल्या जीवनाद्वारे परमेश्वराच्या दयेचे साक्षीदार व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) अनियमित पावसामुळे पिकांचं सतत नुकसान होत असल्यामुळे जीवनात खचून जात असलेल्या आपल्या शेतकरी बांधवाना सरकारकडून आणि त्याचप्रमाणे सेवाभावी संस्था आणि लोकांकडून मदत मिळावी आणि त्यांच्या जीवनातील आशेची ज्योत प्रफुल्लित व्हावी म्हणून आपण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया.
३) शिक्षणातील भ्रष्टाचार आणि गोंधळामुळे उज्वल आणि सुखी भविष्याची आशा सोडून देत आहेत अशा तरुण-तरुणींसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या जीवनात धैर्याने आणि चिकाटीने पुन्हा एकदा अभ्यास करून उज्ज्वल यश त्यांनी मिळवावं आणि त्याचप्रमाणे शिक्षणातील अनियमितता आणि भ्रष्टाचार समुळ नष्ट करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यासाठी सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आपल्या कुटुंबातील आणि समाजातील सर्व आजारी व्यक्तींना परमेश्वराने कृपेच्या स्पर्शाने बरे करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५) आपल्या सर्व वयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.
हे परमेश्वरा तुझ्या चरणी आणलेल्या आमच्या विनंत्या आणि गरजांचा दयेने स्वीकार कर आणि तुझी दया आणि तुझा आशीर्वाद आम्हावर सदैव राहू दे. हि प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन
No comments:
Post a Comment