Reflections for the Homily of 25th Sunday in Ordinary Time (20-09-2026) By Fr. Glen Fernandis
सामान्य काळातील पंचविसावा रविवार
प्रस्तावना:
आजची पवित्र उपासना आपल्याला देवाच्या उदार दयेची आठवण करून देत आहे. जेव्हा दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त मिळते, व आपल्याला कमी मिळते तेव्हा आपल्याला अन्याय झाल्यासारखा वाटतो. पण आजची पवित्र वाचने आपल्याला सांगतात की देवाचा न्याय आपल्या मानवी न्यायापेक्षा वेगळा आहे. तो सर्वांना समान प्रेम करतो आणि उशिरा आलेल्यांनाही पूर्ण आशीर्वाद देतो. ह्या पवित्र मिस्सात आज आपण प्रार्थना करूया की आपल्याला हेवा सोडून देवाच्या उदारतेवर विश्वास ठेवण्याची आणि त्याच्यासारखी दया दाखविण्याची कृपा मिळावी.
मनन चिंतन:
“हा अन्याय आहे!” आपण किती वेळा हे शब्द ऐकतो किंवा
स्वतः म्हणतो? खेळाच्या मैदानावर मुले, घरातील कामाबाबत भाऊ-बहीण, पगाराची तुलना करणारे कर्मचारी, किंवा दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त आशीर्वाद
मिळालेला पाहून आपणही म्हणतो, “हा अन्याय आहे!” आजच्या पवित्र शुभवर्तमानात प्रभू येशू एक
गोष्ट सांगतो जी आपल्या या “न्याय” आणि “योग्य” या कल्पनेला थेट आव्हान देते. एक
द्राक्षमळ्याचा मालक दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी कामगारांना कामावर घेतो आणि
सर्वांना एकसारखा पूर्ण दिवसाचा पगार देतो. जे जास्त वेळ काम केले त्यांना राग
येतो. आणि मालक फक्त इतकेच म्हणतो, “मी उदार असल्यामुळे तुम्हाला हेवा वाटतो का?” आजची तीनही वाचने आपल्याला सांगतात की देवाचा न्याय
आणि त्याची दया आपल्या मानवी कल्पनेपेक्षा खूप वेगळी आहे. देवाची दया त्याच्या
न्यायापेक्षाही मोठी आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा बाबिलोनमध्ये
असलेल्या लोकांना अनेक वचने सांगतो. ते लोक आपल्या पापांमुळे निर्वासित झाले होते.
तरीही देव त्यांना शिक्षा देण्याऐवजी म्हणतो, “परमेश्वराला शोधा, तो त्याना सापडेल त्या वेळी वाईट माणसाने आपला
मार्ग सोडावा परमेश्वराकडे परत या, कारण तो विपुल प्रमाणात क्षमा करील.”मग तो महत्त्वाचे वचन
सांगतो, “माझे विचार तुमच्या विचारांसारखे नाहीत आणि माझे
मार्ग तुमच्या मार्गांसारखे नाहीत.” देव आपल्या गणितानुसार क्षमा करत नाही. तो
मुक्तपणे क्षमा करतो. ज्यांनी
त्याला दुःख दिले त्यांनाही तो पुन्हा घरात बोलावतो. हाच आजच्या संदेशाची पाया आहे. देवाचा न्याय खरा आहे, पण त्याची दया त्याहूनही मोठी आहे. आजच्या दुसऱ्या
वाचनात संत पौल जो तुरुंगात आहे व त्याला कदाचित फाशीची शिक्षा होऊ शकते, तो म्हणतो ‘जगणे म्हणजे सुवार्तेसाठी अधिक काम, आणि मरणे म्हणजे ख्रिस्तासोबत राहणे’. संत पौलाने देवाच्या इच्छेनुसार पाहणे
शिकले. हीच वृत्ती आजची सुवार्ता आपल्याला
शिकवते, हेवा न करता, तुलना न करता, फक्त देवाची इच्छा पूर्ण करण्याची वृत्ती.
आजच्या पवित्र शुभवर्तमानात प्रभू येशू एका
द्राक्षमळ्याच्या मालकाची गोष्ट सांगतो. तो सकाळी सहा वाजता, नऊ वाजता, बारा वाजता, तीन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजताही कामगारांना कामावर घेतो.
दिवस संपला की तो सर्वांना एकसारखा पूर्ण दिवसाचा पगार देतो. सकाळपासून काम केलेल्यांना
राग येतो. ते म्हणतात,
“आम्ही पूर्ण दिवस कष्ट केले, उन्हात राबलो. हे शेवटचे फक्त एक तास काम केले, तरी त्यांना आम्हांसारखाच पगार का?” मालक उत्तर देतो, “मी तुमच्याशी अन्याय केला नाही. तुम्ही ज्या
पगारावर सहमत झाला होता तोच मी दिला. मी उदार असल्यामुळे तुम्हाला हेवा वाटतो का?”
ही गोष्ट पगार किंवा कामगारांच्या हक्कांबद्दल
नाही. ही देवाच्या राज्याबद्दल आहे. सकाळपासून काम करणारे म्हणजे जे फार काळ
देवाचे अनुसरण करतात, धार्मिक
लोक, जे स्वतःला “जास्त पात्र” समजतात. उशिरा आलेले
म्हणजे ज्यांनी उशिरा पश्चात्ताप केला, जे पापी होते, जे शेवटच्या क्षणी देवाकडे आले. देव कोणाला किती वेळ काम केले यावरून बक्षीस
देत नाही. तो सर्वांना जीवन देऊ इच्छितो. त्याचा प्रश्न “या लोकांना किती मिळायला
हवे?” असा नसून “मी त्यांना कसे वाचवू?” असा आहे. म्हणूनच पहिल्या तासाला आलेल्यांना आणि
शेवटच्या तासाला आलेल्यांनाही एकसारखे शाश्वत जीवन दिले जाते.
दुसऱ्याला
आपल्यापेक्षा जास्त आशीर्वाद मिळालेला पाहून रागावू नका. आपण लक्षात ठेवले पाहिजे
की देवाने आपल्यालाही आपल्या पात्रतेपेक्षा खूप जास्त दिले आहे. दुसऱ्याच्या
आनंदात आनंद मानला पाहिजे. देवाच्या प्रेमाची तुलना मानवी तराजूने करता कामा नये.
आपल्याला देवाच्या द्राक्षमळ्यात स्थान मिळाले हे आपण कमावलेले नाही. बाप्तिस्मा, विश्वास, क्षमता, संधी हि सर्व काही देवाची मोफत देणगी आहे. म्हणून कृतज्ञता
व्यक्त करा, प्रार्थनेत, पाप टाळण्यात, दुसऱ्यांची सेवा करण्यात आणि जे मिळाले आहे ते
गरजूंना वाटण्यात.
ह्या गोष्टीच्या शेवटी येशू म्हणतो, “शेवटचे पहिले होतील आणि पहिले शेवटचे होतील.”
देवाच्या राज्यात ज्येष्ठतेची यादी नाही. फक्त एक उदार पित्याचा हात आहे, जो सर्वांना पूर्ण दिवसाचा पगार म्हणजे शाश्वत जीवन
देऊ इच्छितो. जो देव आपल्याला दिवसाच्या कोणत्याही वेळी बोलावतो, तोच देव दिवस संपला की आपल्याकडे पाहून म्हणेल, “ये, जे माझे आहे ते घे. कारण मी उदार आहे.” आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: प्रभु, आमची
प्रार्थना ऐक.
१. आपले परम-गुरुस्वामी, महा-गुरूस्वामी, कार्डिनल्स, सर्व धर्मगुरू आणि व्रतस्थ; तसेच येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे सर्व प्रापंचिक या सर्वांवर प्रभूचा आशीर्वाद राहावा. त्यांना त्यांचे पवित्र काम व्यवस्थितरित्या आणि धैर्याने पार पाडण्याकरिता देवाची कृपा नेहमीच लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. इथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या कुटुंबात शांती, प्रेम आणि एकोपा सतत नांदावा. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवर देवाचा आशीर्वाद नेहमी राहावा आणि प्रत्येक घर देवाच्या उपस्थितीने भरून जावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या घरात असलेल्या वृद्ध आई-वडिलांना चांगले आरोग्य आणि शांती लाभावी. त्यांच्या आजारपणात त्यांना परमेश्वराच्या कृपेने चांगले स्वास्थ्य मिळावी आणि त्यांना प्रेमळ काळजी व सांत्वन मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे तरुण-तरुणी योग्य साथीदाराच्या शोधामध्ये आहेत, त्यांना देवाच्या इच्छेनुसार योग्य आणि विश्वासू साथीदाराची जोड मिळावी. त्यांच्या भावी वैवाहिक जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि आशीर्वाद राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपल्या हृदयातील सर्व गरजा आणि इच्छा परमेश्वरासमोर सादर करूया.
समाप्ती प्रार्थना: हे दयाळू आणि उदार पित्या, तू आम्हांला तुझ्या द्राक्षमळ्यात बोलावले आहेस. आमच्या या सर्व प्रार्थना कृपापूर्वक ऐक आणि आम्हांला तुझ्या इच्छेनुसार जगण्याची कृपा दे. आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही ही प्रार्थना करतो.आमेन.
No comments:
Post a Comment