Friday, 22 May 2026

Reflections for the Homily of Pentecost Sunday (24-05-2026) By Fr. Gilbert Fernandes

 पास्काचा सण

दिनांक: २४/०५/२०२६
पहिले वाचन:  प्रेषितांची कृत्ये २:१-११
दुसरे वाचन: करिंथ १२:३ब-७, १२-१३
शुभवर्तमान:  योहान २०:१९-२३



प्रस्तावना

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण मोठ्या आनंदाने पवित्र आत्म्याच्या आगमनाचा सोहळा साजरा करीत आहोत. पुनरुत्थनानंतर पन्नासाव्या दिवशी प्रेषितांवर पवित्र आत्मा अग्नीच्या जिभांच्या रूपाने उतरला आणि भयभीत शिष्य धैर्यवान साक्षीदार बनले. आजची वाचने आपल्याला सांगतात की पवित्र आत्मा विविध देणग्या देतो, पण सर्वांचा उद्देश एकच आहे, परमेश्वराची महिमा आणि ख्रिस्तसभेची उभारणी होय. शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना शांती देतो आणि म्हणतो, “पवित्र आत्मा स्वीकारा.”

आज आपण आपल्या जीवनातही त्या पवित्र आत्म्याचे स्वागत करूया. जिथे भीती आहे तिथे धैर्य, जिथे द्वेष आहे तिथे प्रेम, जिथे निराशा आहे तिथे आशा निर्माण करण्यासाठी प्रभूचा आत्मा आपल्यात कार्य करो. ह्या मिस्सामध्ये सहभागी होत असताना पवित्र आत्म्याची दाने आणि फळे आपणास प्राप्त होवो म्हणून विशेष प्रार्थना करू या.

मनन चिंतन

एकदा एका गावात एक जुने चर्च होते. त्या चर्चमध्ये अनेक वर्षे प्रार्थना होत होती, पण हळूहळू लोक चर्चमध्ये येणे कमी झाले. लोकांमध्ये भांडणे, मतभेद आणि निराशा वाढली. एके दिवशी त्या धर्मग्रामाच्या वृद्ध धर्मगुरूने सर्व लोकांना एकत्र बोलावले आणि म्हणाले: “आपल्या चर्चमध्ये दिवे आहेत, घंटा आहेत, वेदी आहे; पण जर पवित्र आत्मा नसेल तर हे सर्व केवळ रिकामे आहे.” त्यांनी सर्वांना नऊ दिवस प्रार्थना करायला सांगितले. लोकांनी मनापासून प्रार्थना केली. हळूहळू लोकांमध्ये प्रेम वाढू लागले, भांडणे मिटली, युवक चर्चमध्ये येऊ लागले आणि त्या धर्मग्रामामध्ये नवीन उत्साह निर्माण झाला.

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जिथे पवित्र आत्मा असतो तिथे जीवन बदलते, जिवनाच परिवर्तन होते.

१. पवित्र आत्मा भयाचे रूपांतर धैर्यात करतो:

आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की शिष्य बंद दरवाज्यांमागे बसले होते. त्यांना यहुद्यांची भीती वाटत होती. त्यांचा गुरु मरण पावला होता. त्यांचे भविष्य अंधकारमय वाटत होते. पण त्या अंधारात येशू आला आणि म्हणाला: तुम्हांला शांती असो. यानंतर त्याने त्यांच्यावर श्वास फुंकला आणि म्हणाला: पवित्र आत्मा स्वीकारा. त्या क्षणापासून त्यांचे जीवन बदलले.

पेंटेकॉस्ट पूर्वीचे शिष्य: घाबरलेले, संभ्रमित, कमकुवत आणि लपून बसलेले होते.

पेंटेकॉस्ट नंतरचे शिष्य: निर्भय, सामर्थ्यवान, विश्वासू आणि सुवार्तेचे साक्षीदार झाले.

आज आपल्या जीवनातही भीती आहे. उद्याची चिंता, आजाराची भीती, आर्थिक संकट, मुलांच्या भविष्याची चिंता व नातेसंबंध तुटण्याची भीती. पण पवित्र आत्मा आपल्याला धैर्य देतो.

संत पौल म्हणतात: देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा दिला आहे.

२. पवित्र आत्मा एकता निर्माण करतो:

पहिल्या वाचनात आपण ऐकले की अनेक देशांतून आलेले लोक वेगवेगळ्या भाषा बोलत होते. पण प्रत्येकाला देवाचा संदेश आपल्या भाषेत ऐकू आला. ही केवळ भाषेची गोष्ट नव्हती; हा एकतेचा चमत्कार होता.

बाबेलचा बुरुज: गर्वामुळे लोक विभाजित झाले. ते बुरुज बांधू शकले नाही. (उत्पत्ति ११:१-९)

पेंटेकॉस्ट: पवित्र आत्म्यामुळे लोक एकत्र आले.

आज आपल्या समाजात, देशात व जगात जातीयवाद, धर्मवाद, द्वेष, कुटुंबातील भांडणे व समाजातील फूट, हे सर्व वाढत आहे.

पण पवित्र आत्मा प्रेम शिकवतो. ज्या घरात एकत्र प्रार्थना होते, क्षमा केली जाते, प्रेमाने संवाद होतो, तिथे पवित्र आत्मा वास करतो.

३. पवित्र आत्मा देणग्या देतो:

दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतात: देणग्या निरनिराळ्या आहेत, पण आत्मा एकच आहे. परमेश्वर प्रत्येकाला काही ना काही विशेष देणगी देतो: कोणाला गाण्याची, कोणाला शिकवण्याची, कोणाला सेवा करण्याची, कोणाला प्रार्थनेची व कोणाला लोकांना एकत्र आणण्याची.

ख्रिस्तसभा म्हणजे एक शरीर आहे. शरीराचे सर्व अवयव वेगवेगळे असले तरी ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. आज प्रश्न असा आहे, मी माझी देणगी देवासाठी वापरतो का? कधी कधी आपण दुसऱ्यांच्या देणग्यांचा हेवा करतो. पण देवाने आपल्याला जसे बनवले आहे तसे आपण खास आहोत.

४. पवित्र आत्मा आपल्याला मिशन देतो:

येशू म्हणतो: जसे पित्याने मला पाठवले तसे मी तुम्हांला पाठवतो.

आपण फक्त चर्चमध्ये येण्यासाठी ख्रिस्ती नाही. आपण जगात जाऊन प्रेम पसरवण्यासाठी, शांती निर्माण करण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी आणि ख्रिस्ताचे साक्षीदार होण्यासाठी बोलावलेले आहोत. आज चर्चला काय हवे? फक्त नावाचे ख्रिस्ती नाही, तर जिवंत विश्वासू ख्रिस्ती.

५. पवित्र आत्मा क्षमा शिकवतो:

येशू म्हणतो: ज्याच्या पापाची तुम्ही क्षमा कराल त्यांची क्षमा होईल.

पवित्र आत्मा आपल्याला राग सोडायला, क्षमा करायला आणि प्रेम करायला शिकवतो. कधी कधी अनेक वर्षे आपण मनात राग धरून ठेवतो. पण जिथे क्षमा नाही तिथे शांती नाही.

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण प्रार्थना करूया: हे पवित्र आत्म्या, आमच्या भीती दूर कर. आमच्या जीवनात प्रेमाची आग पेटव, आमच्या कुटुंबात शांती आण आणि आम्हांला धैर्यवान साक्षीदार बनव. जसे पवित्र आत्म्याने प्रेषितांचे जीवन बदलले, तसाच तो आज आपलेही जीवन बदलू शकतो.

चला आज मनापासून प्रार्थना करूया:

हे पवित्र आत्म्या,

माझ्या हृदयात ये.

माझी भीती दूर कर.

माझे जीवन नवीन कर.

मला प्रेम, शांती आणि धैर्याने भरून टाक. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

धर्मगुरू: प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण आपल्या सर्व गरजा प्रेमळ पित्यापुढे मांडूया.

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या पवित्र आत्म्याच्या दानांनी आणि फळांनी आम्हाला भरून टाक.

१. आपले परमगुरुस्वामी, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी आणि सर्व विश्वासू लोकांना पवित्र आत्मा ज्ञान, धैर्य आणि पवित्रतेने भरून टाको, जेणेकरून ते सुवार्तेचे प्रभावी साक्षीदार बनतील. म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. युद्ध, दहशतवाद, द्वेष आणि अन्यायाने त्रस्त जगात पवित्र आत्मा शांतता आणि बंधुभाव निर्माण करो. सर्व राष्ट्रांचे नेते न्यायाने आणि प्रामाणिकपणाने कार्य करो. म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. आपल्या घरांमध्ये प्रेम, एकता, क्षमा आणि प्रार्थनेचे वातावरण निर्माण होवो. तुटलेली नाती पुन्हा जोडली जावोत. म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आजच्या मोह, व्यसन आणि चुकीच्या मार्गापासून युवकांचे संरक्षण होवो आणि पवित्र आत्मा त्यांना योग्य निर्णय घेण्याचे ज्ञान देवो. म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. जे आजार, एकटेपणा, नैराश्य आणि संकटांचा सामना करीत आहेत त्यांना प्रभू धैर्य, आशा आणि आरोग्य देवो. म्हणून आपण प्रार्थना करू या.

६. आपल्याला मिळालेल्या देणग्या देवाच्या गौरवासाठी आणि इतरांच्या सेवेसाठी वापरण्याची कृपा मिळो. म्हणून आपण प्रार्थना करू या.

७. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वैयक्तिक गरजा प्रभूकडे मांडू या.

धर्मगुरू: हे स्वर्गीय पित्या, तुझ्या पवित्र आत्म्याने आमची अंतःकरणे नवीन कर. आम्हांला तुझ्या प्रेमाचे, शांतीचे आणि सत्याचे साधन बनव. हि प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन.


No comments:

Post a Comment