Reflections for the Homily
of 13th Sunday in Ordinary Time (28-06-2026) By Br.
Oliver Munis
सामान्य काळातील तेरावा रविवार
दिनांक: २८/०६/२०२६
पहिले
वाचन: २
राजे ४:८-११, १४-१६अ
दुसरे वाचन: रोमकरांस
पत्र ६:३-४, ८-११
शुभवर्तमान: मत्तय - १०:३७-४२
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपण सामन्य काळातील तेरावा रविवार साजरा
करीत आहोत. बाप्तिस्म्याद्वारे आपण सर्वजण देवाची लेकरे आणि ख्रिस्ताच्या एका कुटुंबाचे
सदस्य झालो आहोत. म्हणून आजची उपासना आपणास आठवण करून देते की, आपल्या जीवनात प्रभूला पहिले स्थान दिले, तरच आपण
खऱ्या अर्थाने इतरांवर प्रेम करू शकतो.
आजच्या शुभवर्तमानात प्रभु येशू आपल्याला
त्याच्या मार्गावर चालायला आमंत्रण देतो. फक्त कौटुंबिक लोक नाहीत तर जे गरीब, गरजू, परके आणि दुर्लक्षित केलेले व्यक्ती ह्यांच्यासाठी
आपल्या हृदयात जागा करण्याचे देव आपल्याला आव्हान करतो. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये
ख्रिस्त स्वतः आपल्याला भेटत असतो.
म्हणून आज ह्या पवित्र मिस्साबळीदानात
सहभाग घेत असताना, आपण आपल्या स्वार्थी
वृत्तीबद्दल पश्चात्ताप करूया. प्रभूकडे कृपेची याचना करूया, जेणेकरून त्याच्या प्रेमाने भरून आपण आपल्या
कुटुंबात, समाजात आणि ख्रिस्तसभेत
त्याचे साक्षीदार बनू शकू.
मनन चिंतन:
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, समजा,
आज मिस्सा संपल्यानंतर,
चर्चच्या आवारात कुणीतरी तुम्हाला थांबवून विचारलं,
“जय ख्रिस्त!
तुम्ही कोण आहात?” तुम्ही कदाचित तुमचे नाव सांगाल. पण जर
तोच प्रश्न पुन्हा-पुन्हा विचारला,
तर तुम्ही तुमच्या
आई-वडिलांविषयी, पती-पत्नीविषयी, मुलांविषयी, गावाविषयी किंवा नोकरी-व्यवसायाविषयी सांगायला
सुरुवात कराल. कारण आपल्या आयुष्यात ज्या व्यक्तींवर आपण प्रेम करतो आणि जिथे आपण राहतो, त्यावरूनच आपली ओळख घडत असते.
जर आपण कुठेही प्रवास केला असेल, मग ती
मुंबईची लोकल ट्रेन असो किंवा पुण्याची खचाखच भरलेली एसटी बस (ST Bus) आपल्या सोबत प्रवास करणाऱ्या लोकांशी
आपण कसे वागतो, हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. गर्दीत
एखादी वृद्ध व्यक्ती, एखादी आई लहान बाळाला घेऊन उभी असते, एखादी
थकलेली व्यक्ती, वजनदार दप्तर (bag) घेऊन उभी असलेली दिसते आणि कधीतरी त्या
व्यक्ती आपल्याला विचारतात, थोडे बाजूला सरकून मला जागा देतात का? (थोडा अॅडजस्ट
करके, मुझे जगा दो ना?)
प्रिय भाविकांनो, आपण त्याला जागा देतो का? आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला
केवळ बसमध्ये जागा द्यायला सांगत नाही;
तर आपल्या हृदयात
देवाच्या नवीन कुटुंबासाठी जागा निर्माण करण्याचे आमंत्रण देतो. आजचे शुभवर्तमान ऐकताना अनेकांना धक्कादायक
वाटू शकते कारण येशू म्हणतो, “जो माझ्यापेक्षा
आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करितो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा आपल्या
मुलावर व मुलीवर प्रेम करितो तो मला योग्य नाही.”
याचा अर्थ येशू आपल्याला कुटुंब सोडायला सांगतो
का? नाही. उलट, तो आपल्या प्रेमाला योग्य दिशा देतो. जेव्हा
आपल्या कुटुंबावरील प्रेमामुळे आपण इतरांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा ते प्रेम स्वार्थी होऊ लागते. पण जेव्हा
ख्रिस्त आपल्या जीवनात प्रथम स्थानावर असतो,
तेव्हा आपल्या
कुटुंबावरील प्रेम अधिक निस्वार्थी,
उदार आणि देवाच्या
प्रेमासारखे बनते.
तर आता हे नवीन अंतःकरण आपल्याला कसे मिळते? आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो, “ख्रिस्ताच्या बाप्तीस्माद्वारे आपण
त्याच्या मरणात व पुनरुत्थानात सहभागी होतो.” बाप्तिस्मा म्हणजे केवळ ख्रिस्ती होण्याचा
दाखला नाही. बाप्तिस्म्यामुळे आपल्या आत्म्यावर देवाची कायमस्वरूपी किंवा अविनाशी आध्यात्मिक मुद्रा उमटते. (Indelible mark) आपण देवाची लेकरे बनतो आणि ख्रिस्ताच्या
शरीराचे सदस्य बनतो. म्हणूनच आता ख्रिस्ताचे कुटुंब हेच आपले कुटुंब बनते.
पोप फ्रान्सिस नेहमी म्हणायचे, “तोदोस, तोदोस, तोदोस!” (सगळे,
सगळे, सगळे). म्हणजे या कुटुंबात कुणीही कुणाचं ‘लाडकं’ (favourite) नाही. म्हणजे देवाच्या घरात सगळ्यांसाठी जागा
आहे. कुणीही देवाच्या प्रेमापासून दूर नाही. पण ही गोष्ट सोपी नाही. एस.टी. बसमध्ये
थोडं अॅडजस्ट करणे सोप्पे असते. पण येशू ज्याची मागणी करत आहे, त्यासाठी स्वतःचा क्रूस उचलावा लागतो. तो
म्हणतो, “जो आपला वधस्तंब उचलून घेवून
माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही.” गरीबासाठी,
समाजातून दुर्लक्षित
केलेल्या व्यक्तीसाठी, किंवा ज्याने आपल्याला दुखवले आहे अशा व्यक्तीसाठी
आपल्या हृदयात जागा करणे खूप कठीण आहे. कारण त्यासाठी आपला अहंकार बाजूला ठेवावा लागतो.
आणि हाच खरा वधस्तंब आहे.
येशू सर्वांचा तारणहार आहे; पण शुभवर्तमानात तो गरीब आणि दुर्बल लोकांना
विशेष स्थान देतो. त्यामुळे आपल्या ख्रिस्ती कुटुंबात त्यांच्यासाठीही जागा असलीच पाहिजे.
हे आपण पहिल्या वाचनात पाहतो. शुनेमची ती स्त्री एलीशा संदेष्ट्याला पाहते. ती फक्त
नमस्कार करून पुढे जात नाही. ती त्याच्यासाठी आपल्या घरावर एक लहानशी खोली बांधते.
एक खाट, एक मेज,
एक खुर्ची आणि
एक समई ठेवते. ती एका अनोळखी व्यक्तीसाठी आपल्या घरात जागा निर्माण करते आणि येशू म्हणतो, “जो ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून
जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजितो,
तो आपल्या प्रतिफळाला
मुकणार नाही.”
उन्हाळ्यात एका थंड पाण्याच्या प्याल्याची
किंमत काय असते, हे आपण सगळ्यांनी अनुभवले आहे. काही वर्षांपूर्वी
दुष्काळग्रस्त भागातील हजारो शेतकरी पायी चालत मुंबईत आले होते. त्यांच्या पायांना
फोड आले होते. त्या वेळी अनेक सामान्य नागरिक मध्यरात्री घराबाहेर आले. त्यांनी त्यांना
थंड पाणी दिले, बिस्किटे दिली, काहींनी तर स्वतःच्या चपलाही दिल्या. त्यांनी
फक्त मदत केली नाही; त्यांनी त्या शेतकऱ्यांमध्ये जणूकाही स्वतः
ख्रिस्तालाच ओळखले. हेच आजच्या शुभवर्तमानाचं जिवंत उदाहरण आहे.
तर माझ्या प्रिय भाविकांनो, आपले बाप्तिस्मामय जीवन जगणे म्हणजे काय? तर जेव्हा आपण गरीब, थकलेले, अनोळखी किंवा दुर्लक्षित केलेल्या व्यक्तीला पाहतो, तेव्हा तो आपल्याला परका वाटता कामा नये तर आपण त्याच्यामध्ये आपल्या ख्रिस्ती कुटुंबातील सदस्य ओळखले पाहिजे.
पण हे प्रेम आपल्या स्व:ताला शक्य नाही.
थोड्याच वेळात या वेदीवर ख्रिस्त पुन्हा एकदा
आपल्यासाठी स्वतःला अर्पण करणार आहे. तो केवळ पाण्याचा प्याला देत नाही; तर आपल्या तारणासाठी स्वतःचे शरीर आणि रक्त
देत आहे. आपण पापी, थकलेले आणि अनेकदा देवापासून दूर गेलेले असलो, तरी तो आपल्या प्रेमाच्या मेजवानीत आपल्यासाठी
जागा राखून ठेवतो. ह्याच पवित्र मिस्सामधून आपल्याला इतरांसाठी जागा निर्माण करण्याचे
सामर्थ्य मिळते.म्हणून आज जेव्हा आपण ख्रिस्ताला या पवित्र भाकारीद्वारे ग्रहण करू
आणि या चर्चच्या दरवाजातून बाहेर पडू,
तेव्हा प्रभू
आपल्यापैकी प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो:
तुझ्या हृदयात
माझ्यासाठी आणि माझ्या या लहान भावंडांसाठी जागा आहे का?
आज आपण स्वतःलाही
हा प्रश्न विचारूया:
आज मी माझ्या हृदयात कोणासाठी जागा निर्माण करणार आहे?
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
धर्मगुरू: प्रिय बंधू-भगिनींनो, प्रभू येशूने आपल्या सर्वांना त्याच्या प्रेमाच्या कुटुंबात
सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. विश्वासाने आपण आपल्या सर्व गरजा स्वर्गीय पित्याकडे
मांडूया.
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.
१. संपूर्ण ख्रिस्तसभेसाठी प्रार्थना करत असताना आपण पोप
लिओ चौदावे, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी
आणि सर्व विश्वासू ह्यांनी ख्रिस्ताला जीवनात प्रथम स्थान देत प्रेम, सेवा आणि ऐक्याचे साक्षीदार व्हावे.
२. जगातील सर्व राष्ट्रांचे नेते आणि प्रशासनासाठी प्रार्थना
करूया की, त्यांनी न्याय, शांतता आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करून गरीब आणि दुर्बल लोकांची
मनापासून सेवा करावी.
३. गरीब, आजारी, एकाकी,
निराधार, स्थलांतरित आणि जीवनात संघर्ष करणाऱ्या
सर्व बंधू-भगिनींसाठी प्रार्थना करूया की, प्रभू त्यांना धैर्य देवो आणि आपल्या सेवेतून
त्यांना त्याचे प्रेम अनुभवता यावे.
४. आपल्या परिवारांसाठी आणि या ख्रिस्ती समाजासाठी प्रार्थना
करूया की, आपल्या घरांमध्ये प्रार्थना, क्षमा, प्रेम आणि
परस्पर सेवा वाढावी; तसेच प्रत्येकाने आपल्या हृदयात इतरांसाठी
जागा निर्माण करावी.
५. ह्या पवित्र मिस्सामध्ये सहभागी झालेल्या आपण सर्वांसाठी
प्रार्थना करूया की, प्रभूच्या वचनाने आणि पवित्र मिस्साचे बळ मिळून, आपण आपल्या बाप्तिस्म्याच्या
वचनांना विश्वासूपणे जगावे आणि प्रत्येक व्यक्तीत ख्रिस्ताला ओळखण्याची कृपा लाभावी.
६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक
गरजांसाठी विशेष प्रार्थना करूया.
धर्मगुरू: हे स्वर्गीय पिता, तुझ्या पुत्राने आम्हाला
एकाच कुटुंबात एकत्र केले आहे. विश्वासाने अर्पण केलेल्या या प्रार्थनेंचा कृपापूर्वक
स्वीकार कर आणि आम्हाला तुझ्या इच्छेनुसार जगण्याची कृपा दे. हे आम्ही आमच्या प्रभू
ख्रिस्ताद्वारे मागतो. आमेन
No comments:
Post a Comment