Friday, 12 June 2020


Reflections for the Homily of 
THE MOST HOLY BODY AND BLOOD OF CHRIST (14-06-2020) by Br. Julius Rodrigues.






येशूच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा

दिनांक: १४-०६-२०२०
पहिले वाचन: अनुवाद ८:२-३, १४-१६
दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र १०:१६-१७
शुभवर्तमान: योहान ६:५१-५८





माझे शरीर खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे.
प्रस्तावना:
          सामान्य काळातील 11 व्या आठवड्यात आज आपण पदार्पण करत आहोत, आज संपूर्ण ख्रिस्तसभा ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे.  मनुष्य स्वतःवर अवलंबून राहिला तर तो संपुष्टात येईल, त्याचा नाश होईल परंतु जर त्याची ओढ परमेश्वरावर असेल तर जगेल से  आपणास परमेश्वर खुद्द सांगत आहे.  तो पुढे म्हणतोय, ‘जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.
           प्रत्येक दिवशी ख्रिस्तशरीर संस्कारद्वारे आपण ख्रिस्ता बरोबर एकरूप होतो ख्रिस्त आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो म्हणून या मिस्सा बलिदानात भाग घेत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र शरीराने रक्ताने आपले अंतःकरण व जीवन निर्मळ नावे आणि आपण देखील त्या ख्रिस्तसारखे व्हावे म्हणून देवाकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण :
पहिले वाचन: अनुवाद ८: २-३, १४-१६
          इस्रायली लोकांसाठी रानात घालवलेला हा समय म्हणजे विश्वासात वाढण्याची संधी होती. यिर्मया संदेष्ठाने पुढे रानातील हा काळ देवाला श्रद्धेने अनुसरण्याचा काळ होता असे म्हटले आहे. तसेच हा काळ शिस्त लावण्याचा होता यावर भर दिला आहे. इस्रायलवरील देवाच्या प्रीतीची ही आणखी एक बाजू आहे. लोकांना देशाची देणगी मिळण्या अगोदर, लीन व नम्र करण्यासाठी रानातला अनुभव खडतर असला, तरी तोही एक देणगी असाच होता. अखेरीस आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण करावे हा त्यात उद्देश होता. लोकांना ह्या अनुभवाचे स्मरण कायम राहावे अशी योजना केली होती. वचनदत्त देशात पोहचल्यावर त्यांना मागील गोष्टींचा विसर पडू नये व सर्व गोष्टी देवापासून मिळतात हे त्यांनी लक्षात ठेवणे अगत्याचे होते.

दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र १०:१६-१७
          संत पौल आजच्या वाचनात सांगतो की, येशूने आपल्या मरणापुर्वीच्या रात्री प्यालाचे  महत्व पुन्हा नव्याने स्पष्ट केले. हा प्याला वधस्तंभावर सांडल्या जाणाऱ्या त्याच्या रक्ताचे द्योतक आहे. तसेच त्याच्या मरणामुळे होणाऱ्या लाभामध्ये सहभागी होण्याचे साधन आहे. त्याने भाकर घेऊन मोडली आणि ती अशाच सहभागाचे द्योतक असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे प्रभूभोजनाच्या समयी ख्रिस्ती लोक एकाच भाकरीतून घेतात यावरून ते सर्व ख्रिस्ताचे आहेत व ख्रिस्तामध्ये एक शरीर, एक देह आहेत हे स्पष्ट होते.


शुभवर्तमान: योहान ६:५१-५८
          येशूने एक महत्वाचे विधान केले आहे. त्यात त्याने आपणच जिवंत भाकर असल्याचा दावा केला आहे. येशू म्हणाला की, “जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.तेव्हा यहुदी म्हणाले, “हा आपला देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो?” यहुदी लोकानी येशूचे बोलणे शब्दशः घेतले म्हणून त्यांना येशूच्या वाचनातील अलंकारीक अर्थ समजलाच नाही. येशूच्या शब्दामधील आध्यात्मिक अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोहचण्यासाठी यहुद्यांची मजल गेली नाही. कारण हे समाजाने केवळ विश्वासाच्या द्वारेच शक्य होते आणि त्यांचा विश्वास नव्हता हे अगोदरच स्पष्ट झाले आहे. येशूचे मांस व रक्त खाणे व पिणे म्हणजेच त्याने जे काही केले त्यावर अवलंबून राहणे व असे केल्यानेच आपण परस्परांमध्ये राहत असतो.  

मनन चिंतन:
‘येशू का लहू सारे पापों से मुक्त करता हमें’
          आजच्या मनन चिंतनाचा विषय आहे रक्त. अनेक वेळा आपण येशूच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत असतना, येशूच्या शरीरा व रक्ताविषयी आपण मनन चिंतन केलेले आहे. आज पुन्हा एकदा हा सोहळा साजरा करीत असतना येशूच्या रक्ताविषयी किंवा येशूच्या रक्तावर आपण मनन चिंतन करणार आहोत. मानवी जीवनात रक्त किती महत्वाचे आहे ह्याची आपणा सर्वांना जाणीव आहे. जर आपल्या शरीरात रक्त नसेल, तर आपण जिवंत राहू शकत नाही, म्हणून रक्त हा एक रहस्यमय असा आपल्या जीवनातील घटक आहे, त्यावर आपण आकलन करू शकत नाही. त्यात जीवन असते असे आपणास लेवीय १७:११ मध्ये वाचावयास मिळते की, शरीराचे जीवन रक्तात असते असे येथे नमूद केले आहे. अपघात झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून जर रक्त वाहत असेल, तर ती व्यक्ती काही क्षणांत मरण पावते कारण जीवन हे रक्तात सामावलेले असते. रक्ताचे A+, AB+, O+ अशा प्रकारे अनेक अशे गट आहेत, परंतु कुठल्याही माणसाचे रक्त दुसऱ्या कुठल्याही माणसाला उपयोगी येऊ शकते. मग रक्त देणारा व्यक्ती कुठलाही असू दया समजा, युरोपातील व्यक्तीचे रक्त आफ्रिकेतील व्यक्तीच्या शरीरात घातले किंवा या उलट केले तरी काही फरक पडत नाही. कारण रक्त कोणत्याही व्यक्तीच्या कातडीचा रंग, जात धर्म किंवा इतर कुठल्याही गोष्टी पाहत नाही, परंतु ते त्याचे कार्य म्हणजे जीवन देण्याचे कार्य. आपल्या शरीरात डोक्यापासून तर तळ पायापर्यंत अनेक रक्तवाहिन्या आहेत त्यामुळेच शरीराचे कार्य सुरळीत चालते, रक्तामुळेच जीवनाला गती आहे.
          रक्तसाक्षी ही संकल्पना आपल्या धर्मात फार महत्वाची मानली जाते. आज अनेक लोक ख्रिस्तासाठी आपले रक्त वाहिले व ख्रिस्ती श्रद्धेचा पाया बळकट केला. ह्या त्यांच्या धाडसी कृत्यामुळे ख्रिस्तसभेने त्यांस संत पद बहाल केले आहे. कारण त्यांनी त्यांच्या रक्ताद्वारे ख्रिस्ती श्रद्धेला चालना दिली आहे. जर मानवी रक्तला इतके महत्व असेल तर, मग ख्रिस्ताच्या रक्ताला किती महत्व आहे. देवाचा पुत्र ह्या भूतलावर आला तो फक्त मानव जातीला प्रेम, दया, शांती शिकवण्यासाठी. सर्व काही सुख सोडून तो मानव जातीचा सांभाळ करण्यासाठी, मानवाला पापमुक्त करून स्वर्गीय सुख देण्यासाठी आला. मानव त्याच्या स्वार्थीपणामुळे देवापासून दुरावला, तो लांब गेला आणि सैतानाच्या राज्यात त्याने प्रवेश केला, परंतु परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या रक्ताद्वारे आपले तारण केले, सैतानापासून मानवाचा बचाव केला आणि सर्व पाप बंधनातून आपली सुटका केली. असे म्हणतात की, जेव्हा क्रुसावर असताना येशूच्या कुशीत भाला बोचकण्यात आला, तेव्हा त्याच्या कुशीतून रक्त वाहू लागले आणी जो व्यक्ती एका डोळ्याने अंध होता ज्याला, त्याच्या डोळ्यात येशूच्या रक्ताचा थेंब पडताच त्या आंधळ्या व्यक्तीस त्याची दृष्टी पुन्हा प्राप्त झाली. त्याच ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आज आपणां सर्वांना नवजीवन मिळाले आहे. आणि म्हणूनच आपण देखील त्या ख्रिस्ताला प्रकट करीत असताना, इतरांच्या जीवनात नवजीवन देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
          आजच्या उपासानेद्वारे ख्रिस्त, दुसऱ्यांना मदत, चांगुलपणा आणि सत्कार्य करण्यासाठी बोलावत आहे. आणि म्हणून कधीही कोणास रक्ताची गरज पडली, तर मागे न वळता निसंकोचपणे पुढे येवून रक्तदान करून, इतरांस ख्रिस्ताप्रमाणे जीवन देण्यास मिळालेली ही संधी गमावू नका. हाच धडा ख्रिस्त आपणास ह्या सणाद्वारे शिकवित आहे.           

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या शरीर रक्ताद्वारे आमचा विश्वास दृढ कर.
. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आशीर्वाद यावा त्यांना त्यांच्या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर अधिकाऱ्यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी, तसेच सर्व वाईट वृत्तींपासून त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आज आपण प्रभू येशु ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर रक्ताचा सोहळा साजरा करीत असताना आपण आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला प्रथम स्थान द्यावे आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आपल्या धर्मग्रामात जे दुखित, पिडीत आहेत, तसेच जे असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा नवजीवनाची वात त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आज विशेष प्रार्थना करूया ती म्हणजे संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेला आहे. ज्या लोकांना या विषाणूची लागण झालेली आहे त्यांना प्रभू येशूच्या रक्ताने नवीन जीवन मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थ ना


Thursday, 4 June 2020


Reflections for the Homily of Most Holy Trinity Sunday (07-06-2020) By Dn. Robby Fernandes.





पवित्र त्रैक्याचा सण



दिनांक: ०७/०६/२०२०
पहिले वाचन: निर्गम ३४:४-६, ८-९
दुसरे वाचन: २ करिंथकरांस पत्र १३:११-१३
शुभवर्तमान: योहान ३:१६-१८




प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहे. ख्रिस्ती श्रध्देचा गाभा असलेले पवित्र त्रैक्य आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आजच्या पहिल्या वाचनात म्हटले आहे, “परमेश्वर दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर आहे” असा महान परमेश्वर जगावर एवढी प्रिती करतो की, त्याने आपल्या सर्वांच्या तारणासाठी त्याच्या पुत्राला भूतलावर पाठविले.
संत पौलाने दुसऱ्या वाचनात म्हटले आहे, “प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवपित्याची प्रिती आणि पवित्र आत्म्याची सह्भागिता तुम्हा सर्वांसह असो.” तसेच आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीदानात सह्भागी होत असताना, पवित्र त्रैक्याने आपली श्रद्धा बळकट करावी व त्याच श्रद्धेद्वारे आपल्या ख्रिस्ती जीवनात एकता, शांती, प्रेम प्रस्तापित व्हावे म्हणून आपण पवित्र त्रैक्याकडे विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम ३४:४-६, ८-९
देवाने मोशेला दुसऱ्यांदा सिनाय पर्वतावर बोलावले जेणेकरून पुन्हा एकदा पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडांवर सर्व आज्ञा लिहाव्या कारण मोशे जेव्हा सिनाय पर्वतावरून खाली आला होता तेव्हा लोकांच्या पापी कृत्यामुळे त्यांनी पहिल्या आज्ञा मोडल्या होत्या. देव स्वतः मोशेला प्रकट झाला व देवाच्या स्वरूपाचे हे अनन्य प्रकटीकरण पाहून मोशेने देवाला विनवून सांगितले की, प्रभूने लोकांच्या बरोबर रहावे, त्यांच्या पातकांची क्षमा करावी आणि आपले वतन म्हणून त्यांचा स्विकार करावा. मोशेची विनंती देवाने मान्य केली व त्यांच्याबरोबर कराराचे नाते पुन्हा स्थापन केले.

दुसरे वाचन: २ करिंथकरांस पत्र १३:११-१३
पौलाने आपल्या वाचकांना उद्देशून अखेर उत्तेजनपर शब्द लिहिले आहेत. त्यांचे कल्याण असो, त्यांना पुर्णता लाभो, समाधान मिळो, ते एकचित्त होवोत अशी त्याने इच्छा व्यक्त केली आहे. येथील संदर्भाला अनुसरून याचा अर्थ असा होतो: पौलाच्या विरोधकांनी आणलेली वेगळी सुवार्ता त्यांनी नाकारावी (११:४) त्याचा प्रेषित असण्याचा पौलाचा यथार्थ व रास्त हक्क मान्य करावा (१०:१३-१८, ११:२१-२३), त्यांच्यामध्ये कोणीही कसलेच अनैतिक आचरण, स्वैराचार करीत नाही याची खात्री करून घ्यावी (१२:१९-२१) आणि परस्परांशी एक दिलाने, एकमेळाने राहावे.

शुभवर्तमान: योहान ३: १६-१८
वचन (३:१६), “देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अश्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे." मधील विधानातून सत्याचे तीन मुद्दे थोडक्यात, मार्मिकपणे सांगितले आहेत:
१. देवाच्या प्रीतिचे सार्वत्रिक स्वरूप,
२. त्या प्रीतिचा समर्पणात्मक स्वभाव आणि
३. तिचा सार्वकालिक नित्य उद्देश
एकाच वचनात शुभवर्तमानअसे यांचे वर्णन केले आहे. जुन्याकरारात देव हा फक्त इस्रायलवरच प्रीति करत होता असे त्यांना वाटायचे, पण नव्याकरारात इतरत्र आढळणारी विश्वव्यापी प्रीति या संकल्पनेशी जुळणारीच आहे. येशू जगाचा न्याय निवाडा करून दोषी ठरवण्यास नव्हे तर सुटका करण्यास का आला तेही येथे स्पष्ट होते. खर तर जग हे अगोदरच दोषपात्र ठरलेल्या अवस्थेत आहे आणि देवाच्या पुत्रावर विश्वास न ठेवल्याने ही स्थिती अधिकच ठळक झाली. देवाचा पुत्र ह्या नात्याने येशू हीच अंतिम कसोटी आहे. ही कसोटी लावल्याने जगाचे विश्वासणारे आणि विश्वास न ठेवणारे असे सरळ दोन भाग पडतात.
          देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.” परुश्यांपैकी निकदेम नावाच्या एका मनुष्याला येशूने स्वतः जगामध्ये का आला ह्याचे कारण स्पष्ट करून दिले आहे. मनुष्यरूप धारण करून येशू ख्रिस्त देवाचे मानवांवर असलेले सार्वकालिक प्रेम दर्शविण्यास ह्या धरतीवर आला होता. “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”
          येशूख्रिस्तावर परिपूर्ण विश्वास हाच सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग आहे. ह्याचा अर्थ असा नाही की आपण कधीच मरणार नाही, तर जरी आपण देहाने मरण पावलो तरीपण आत्म्याने सर्वकाळ जगणार. येशू दुस-यांचा नाश करण्यास आला नाही तर जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यांचा नाश स्वतःमुळेच होईल.

मनन चिंतन:
          जेव्हा आपण Trinity किंवा पवित्र त्र्यैक्याविषयी बोलतो, तेव्हा आपण रहस्याविषयी बोलतो; त्याच्या गुढाविषयी बोलतो, किंबहुना हे न उलगडणारे कोडं आहे. ते समजण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या नात्याची किंवा संबंधांची गरज असते, व फक्त परमेश्वरचं ते कोड समजू शकतो. असे म्हणतात की, जे आपल्याला समजत नाही किंवा कळत नाही, ते आपल्या बुद्धी स्मृतीपटलाच्या पलीकडे आहे. अशा गोष्टी आपण विश्वासाने समजून घ्यायला पाहिजेत.
          पवित्र शास्त्रामध्ये Trinity किंवा पवित्र त्र्यैक्याविषयी कित्येक असे संदर्भ (References) दिलेले आहेत. योहान लिखित शुभवर्तमानामध्ये शुभवर्तमानकार आपल्या सर्वांना येशूचा पिता व पवित्र आत्माविषयी सांगत आहे. पवित्र त्र्यैक्याविषयीचे चांगले संदर्भ आपल्याला मत्तय लिखित शुभवर्तमानामध्ये आढळून येतात. मत्तय ह्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना सांगतो, “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या” (मत्तय २८:१९). तर मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये पवित्र त्र्यैक्याची सुचित्रीत प्रतिमा येशूच्या बाप्तिस्मा वेळी रेखाटलेली आपल्याला आढळते. “आणि लागलेच पाण्यातून वर येताना, आकाश उघडले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे, असे त्याला दिसले; तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे” (मार्क १:१०-११). “वाणी, कबूतर आणि येशू” ह्या तीन प्रतिमा आपल्याला पवित्र त्र्यैक्याची आठवण करून देतात.
          तसेच संत पौल सुद्धा पवित्र त्र्यैक्याविषयी आजच्या दुसऱ्या वाचनात म्हणतो, “प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती व पवित्र आत्म्याची सहभागीता तुम्हा सर्वांवर असो” (२ करिंथ १३:१४). संत लूक ह्याच्या प्रेषितांची कृत्ये व शुभवर्तमानामध्ये तारणाचा इतिहास हा त्रिमूर्त दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो.
          जुना करार काळ हा पित्याचा काळ आहे, शुभवर्तमानाचा कालावधी हे पुत्राचे युग आहे व शुभवर्तमानानंतरचा काळ हा पवित्र आत्म्याचा काळ आहे. तर Creed किंवा प्रेषितांचा विश्वासांगीकार जे आपण विश्वासाने दर रविवारी म्हणतो; त्यामध्ये सुद्धा आपण हाच नमुना (Pattern) किंवा संरचना जोपासतो व त्याची सुरुवात देव पिता - निर्मानकर्ता व नंतर देवपुत्र - संरक्षण करतात व ह्याची सांगता किंवा समाप्ती देव पवित्र आत्म्याद्वारे होते, जो जीवन देणार आहे. पण आपण हे विसरून चालणार नाही की, जेथे-जेथे पिता परमेश्वर आहे त्या-त्या ठिकाणी पुत्र व पवित्र आत्मा हजर असतो. पवित्र त्र्यैक्य हे अगम्य असे एकता व विविधतेचे रहस्य व गुढ आहे.
          जेव्हा-जेव्हा फ्राँन्क शिड लोकांना पवित्र त्र्यैक्यावर प्रबोधन करायचा तेव्हा पवित्र त्र्यैक्य समजवण्यासाठी पावसाच्या पाण्याच्या उपमेद्वारे लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत असे. तो म्हणायचा की, जे पावसाचे पाणी पडते ते तीन वेगवेगळ्या स्वरुपात अस्तित्वात असू शकते: वायू (Gas), घन (Solid) व द्रव्य (Liquid) म्हणजेच वाफ (Steam), बर्फ (Ice) आणि पाणी (Water) ह्या वरून असे दिसून येते की, हे काही तीन प्रकारचे पाणी नाही. पाणी फक्त एकच आहे, परंतु ते तीन भिन्न स्वरूपात अस्तित्वात असते.
          ह्याच प्रकारे लोयोलाचे संत इग्नाती असे म्हणतात की, “पवित्र त्र्यैक्य हे संगीताच्या तीन स्वराच्या स्वरूपात आहे, ते जरी तीन असले, तरी त्यांचा आवाज मात्र एक येतो.” त्याचप्रमाणे संत पॅट्रिक असे म्हणतात की, “हे तीनपाती गवताप्रमाणे आहे.” त्याचप्रमाणे संत जोसेफ कुपरतीनो असे म्हणतात की, “पवित्र त्र्यैक्य हे सुर्याच्या तेजाप्रमाणे आहे: प्रकाश (Light), उष्णता (Heat) व किरणे (Rays).” अशा प्रकारे कित्येक संतांनी पवित्र त्र्यैक्य समजवण्यासाठी त्यांच्या परीने प्रयत्न केले आहेत. ह्या उदाहरणाद्वारे आपण कदाचित पवित्र त्र्यैक्याचा विचार करून समजण्याचा प्रयत्न करूया आणि त्या पवित्र त्रैक्याचरणी आपल्याला त्याचे रहस्य समजून घेण्याची शक्ती प्राप्त व्हावी, जेणेकरून आपला त्याच्यावरील विश्वास अधिक बळकट व्हावा.

विश्वासू लोकांच्या प्रार्थंना:
प्रतिसाद: “हे पवित्र त्रैक्या आम्हांला आमच्या कुटुंबातील व समाजातील एकरूपता वाढविण्यास मदत कर.”
१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्त बंधू भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, त्यांची त्रैक्यावरील श्रद्धा बळकट असावी व इतरांनाही त्याच श्रद्धेत दृढ असण्यास त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत असताना त्यांच्यातील समन्वयातून आपण प्रेरणा घेऊन आपल्या कुटुंबात, धर्मग्रामात व समाजात समन्वय राखून सुखा-समाधानाने आपल्याला जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
. ख्रिस्ती ह्या नात्याने जी श्रद्धा आम्हाला मिळाली आहे ती श्रद्धा अधिक दृढ करण्यास आम्हाला कृपा मिळावी व हीच श्रद्धा आम्हाला दुसऱ्यांना देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. लवकरच मुले नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात करणार आहेत. ह्या नवीन वर्षात अधिक जोमाने अभ्यास करून त्यांना त्यांचा सर्वांगीन विकास करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.

आपणा सर्वास पवित्र त्र्यैक्याच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा!