Wednesday, 21 July 2021

                                    

 Reflection for the 17th Sunday in Ordinary Time (25/07/2021) By       Dn. Julius Rodrigues


सामान्य काळातील सतरावा रविवार 


दिनांक २५-७-२०२१

पहिले वाचन २ राजे ४:४२-४४

दुसरे वाचन इफिसकरांस पत्र ४:१-६

शुभवर्तमान योहान ६:१-१५


"पाच भाकरी आणि दोन लहान मासे"



प्रस्तावना

आज देऊळ माता सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात देवाने संदेष्टा अलीशाद्वारे केलेल्या चमत्काराविषयी या वृत्तांत ऐकणार आहोत. परमेश्वराच्या अगम्य आशीर्वादामुळे गव्हाच्या वीस भाकरी व काही हिरवी कणसे माणसांना पुरवून उरल्या. त्याचप्रमाणे आजचे शुभवर्तमान पाच हजारांना जेवण ह्या येशूच्या चमत्काराविषयी सांगत आहे. ह्यातून आपणास एकच उपदेश मिळतो की, आपण नेहमीच आपल्याकडे असलेल्या गोष्टी इतरांना देण्यासाठी तयार असले पाहिजे. परमेश्वर आपल्याला त्याचे प्रतिफळ देत असतो. आपणामध्ये घेण्याची वृत्ती कमी होऊन, देण्याची वृत्ती वाढावी म्हणून प्रार्थना करूया.

 

सम्यक विवरण

पहिले वाचन : २ राजे ४: ४२-४४

       शंभर जणांना जेवण घालणे हे त्यांना शक्य नव्हते. परंतु हे शंभर लोक बहुदा संदेष्ट्याच्या समुदायातील होते. वीस भाकरी फार लहान होत्या व त्या इतक्या जणांना पुरे पडल्या नसत्या म्हणून सेवकाने चकित होऊन प्रश्न केला, तेव्हा देवाने दिलेला संदेश एलिशा सांगतो कि, अन्न भरपूर होईल व त्यातून काही अन्न उरेल. असे देवाने सांगितलेल्या भविष्यवाणी द्वारे घडले.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र : ४:१-६

       यहुदी व परराष्ट्रीय यांना ख्रिस्तामध्ये कसे एक करण्यात आले. याविषयी सांगितल्यावर पौलाने त्यांच्या करिता अशी प्रार्थना केली की, त्यांनी ख्रिस्ताच्या प्रीतीने एक व्हावे.

       विश्वासणाऱ्याचे वैयक्तिक आचारण ख्रिस्ताला शोभेल असेच असावे. एकमेकांच्या उणीवा दिसत असल्या तरीही, एकमेकांशी अति नम्रतेने व सौम्येतेने वागा. सहनशिलतेने एकमेकांचे दुःख सहन करा. ख्रिस्ताच्या प्रीतीने एकमेकांस वागवून घ्या. हेच पाचारणास शोभेल असे आचारण आहे.

शुभवर्तमान योहान ६:१-१५

कोणतीही परिस्थिती येशू ख्रिस्ताला अवघड वाटत नव्हती. दैवी सामर्थ्याने तो रोग्यांना बरे करी. पाच हजार लोकांना भाकर व मासलीने तृप्त केले. हे देवाचे सामर्थ्य होते. यावरून तेथे जमलेल्या लोकांनी येशू हा देव आहे हे ओळखायचे होते. या उद्देशाने येशू ख्रिस्ताने हा चमत्कार केला. म्हणून त्यास चिन्ह म्हटले आहे. तरी त्या लोकांनी त्याचे दैवत्व मानले नाही ते त्याला फक्त संदेष्टा म्हणत.

तो देव आहे व हजारों लोकांस अन्न देण्यास समर्थ आहे यावर शिष्यही विश्वास ठेवत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने त्या पाच भाकरी हातात घेतल्या व देवापित्याचे आभार मानले. तो त्या मोडत राहिला. त्याने आपले सामर्थ्य प्रकट केले. सर्वजण जेवून तृप्त झाले. हाच प्रभू आपल्या गरजा पुरवून शांती व समाधान देतो.

 

मनन चिंतन

God loves the cheerful giver (2 Cor 9:7). संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो, आणि आपण हे अनेक वेळेस घेतलेले आहे. देणे आणि घेणे ह्या दोन्ही गोष्टी आपण आपल्या जीवनात अनुभवत असतो. आपण देवू ही शकतो आणि घेऊ ही शकतो. जो हात देत असतो तो सदासर्वदा प्रगती होत असते आणि जो हात घेतो त्याची नेहमीच अधोगती होत असते; आणि हे सर्व आम्हाला आमच्या रोजच्या जीवनातील अनुभवावरून माहित आहे. संत तुकाराम महाराज आपल्या २८४५ ह्या अभंगामध्ये म्हणतात, “पाहिजे तो कळवळा| मग बळा काय उणे||

                              तुका म्हणे उदारपणे| का उणे मानावि||

ह्याचा अर्थ असा आहे की, कोणत्याही कार्यात त्याबद्दलचा कळवळा असणे गरजेचे आहे. मग त्या कार्यासाठी लागणारे सामर्थ्य देखील अंगी सहज येते. तुकोबाराय शेवटी म्हणतात की, त्याप्रमाणेच जो खऱ्या अर्थाने उदारपणे लोकांना मदत करून केव्हाही मागेपुढे पहात नाही; मग भले त्याच्या स्वतःकडे काहीही नसले, तरीदेखील त्याचा उदारपणा किंवा दानशूरपणा कमी होत नाही, उलट ते म्हणतात, अशा माणसाकडे काही उणे आहे असे मानू देखील नये.

आजच्या वाचनाद्वारे आपणास देण्याचे महत्त्व किती आहे, हे समजून देत आहे. असाच एक शुभवर्तमानातील दाखला तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. येशु भंडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत, हे पाहत होता. त्यावेळेस अनेक असे धनवान श्रीमंत लोक मोठ्या मोठ्या रकमा भांडारात टाकत होते. अशा वेळेस त्या ठिकाणी एक गरीब बाई आली आपल्याकडे असलेले एकूते एक नाणे त्या भांडारात टाकते आणि हे पाहताच प्रभू येशू आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांस म्हणतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक दान टाकलेले आहे”.

वरील उताऱ्यावरून ती विधवा बाई आपणास उदारपणाचा कित्ता घालून देत आहे. त्या बाईने किती रक्कम टाकली याकडे लक्ष न देता, आपल्याकडे जे आहे त्यातून आपण  इतरांना किती देतो हे महत्वाचे आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की कोणी एका मनुष्याने आपल्याला झालेल्या उत्पादनातून थोडेसे अन्न म्हणजेच वीस भाकऱ्या व काही धान्याची हिरवी कणसे ही देवाच्या माणसाकडे घेऊन आला. आणखी  पुढे आपण ऐकतो की, शाप्रकारे परमेश्वराने त्या ठिकाणी चमत्कार घडवून आणला.

तशाचप्रमाणे शुवर्तमानातही एका लहानशा बालकाने दाखविलेल्या पाच भाकरी व दोन माशांच्या उदारतेमुळेच येशू पाच हजारांना भोजन देऊ शकला. त्या लहान बालकाकडे अगदी त्याच्यापुरता होईल इतकेच होते. परंतु त्यांनी स्वार्थी भावना मनात आणली नाही. असे म्हणतात, लहान मुले, ही देवाघरची फुले,’ ह्याचा साक्षात्कार त्या छोट्याशा बालकाने सिद्ध करून दिला. जे आपल्याकडे होते ते सर्व काही सरळ हाताने इतरांना दिले. दुसऱ्याची भूक तृप्त व्हावी यासाठी स्वतः खुशीने अर्पण केले.

आपण नेहमी बोलत असतो, अतिथी देवो भव!” म्हणजे घरी असलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार झालाच पाहिजे कारण ते देवाच्या रूपात येत असतात. आज हाच अनुभव खुद्द येशू आपणास देत आहे. आपल्याकडे आलेल्या सर्व लोकांचा पाहुणचार करतात, त्यांची आध्यात्मिक व शारीरिक भूक आपण भागवत असतो.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेळेस स्वार्थी वागत असतो. ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे, अशांना आपण मदतीचा हात देत नाही, इतरांना आधार हस्ते मदत करत करत नाही. ह्या महामारीच्याकाळात अनेक अशा लोकांनी सरळ हस्ते इतर लोकांना मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे काही जण फक्त स्वतःचात विचार करून स्वार्थीपणाची भूमिका बजावत आहेत.

आज पाच हजारांना भोजन हा चमत्कार खरा आहे, की खोटा, यावर आपण आपले लक्ष केंद्रित न करता, ह्या चमत्काराद्वारे येशू आपणा सर्वांना उदारपणाचा, दानशूरपणाचा महामंत्र शिकवत आहे. पुढे तो आपणास सांगत आहे की, घेणारे होऊ नका, तर देणारे व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे God loves the cheerful giver.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा, आमची ओंजळ तू प्रेमाने भर

१. ख्रिस्तसभेचे पुढारी पोप फ्रान्सिस तसेच बिशप्स व इतर सर्व सहकारी वर्ग, ह्यांनी देव प्रीतीचा संदेश संपूर्ण जगाला आपल्या कार्याद्वारे द्यावा, व असे करण्यासाठी त्यांना परमेश्वराचे योगदान लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. हे परमेश्वरा, सृष्टीतील वस्तूवर व्यक्तींवर अवलंबून न राहता, तुझ्यावर विसंबून राहण्या शिकव व आमचा विश्वास वाढव, म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. समाजात जास्तीत जास्त देण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन जे गोर- गरीब आहेत, जे गरजवंत आहेत; अशा सर्वांना त्याचा लाभ व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आजही आपल्या देशात अनेक लोकांना एक वेळचे पुरेसे अन्न मिळत नाही, अशा लोकांची तू भूक भागवण्यासाठी उदार नागरिकांना पुढे पाठव, म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आपण आपल्या वैक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थाना करू या.

Friday, 16 July 2021

                                      


Reflection for the 16th Sunday in Ordinary Time (18/07/2021) By Bro. Isaac D’Souza


सामान्य काळातील सोळावा रविवार


दिनांक : १८/७/२०२१

पहिले वाचन : यिर्मया २३: १-६

दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र  २: १३-१८

शुभवर्तमान : मार्क ६: ३०-३४



ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते!

 

प्रस्तावना:

आजच्या वाचनात देवाची प्रजा आणि नेते त्यांची तुलना मेंढरे आणि मेंढपाळ ह्यांच्याशी करण्यात आली आहे. यिर्मया प्रवक्ता मेंढपालाबद्दल नैराश्य व्यक्त करीत आहे. तू माझा कळप विघुरला आहेस आणि त्याचा पाठलाग तू केला नाहीस. मी स्वतः त्यांना एकत्र करीनत्यांना परत घेऊन येईन. यिर्मया संदेष्टा असे म्हणत आहे किपरमेश्वर उत्तम मेंढपाळाविषयी नीतिमानन्यायीचांगला मेंढपाळ मी उभारीनम्हणजेच प्रभू येशू विषयी भविष्यवाणी करीत आहे.

           प्रभू येशू उत्तम मेंढपाळ आहे. तो आपल्या मेंढारांची निगा राखत आहे. आपल्या लोकांचा तो सांभाळ करत आहे. त्याने आपल्या समर्पनाद्वारे सर्व लोकांना एकत्र केले आहे.

 

सम्यक विवरण

पहिले वाचन : यिर्मया २३:१-६

 

          संदेष्टा यिर्मया वारंवार आपले संदेश राजांना उद्देशून सांगत असे. लोकांचे धार्मिक जीवन सुव्यवस्थित ठेवण्याची विशेष जबाबदारी राजाचीच असे. या संदर्भात यिर्मयाचे कार्य विशेष लक्षणीय आहे. राजे हे एका मेंढपाळा प्रमाणे असावेतअसे त्याचे म्हणणे होते. देवांच्या लोकांसाठी अधिक चांगला भविष्यकाळ असेल. तो स्वतःच आपला मेंढपाळ असणार. तो आपले मेंढपाळाचे काम विश्वासू नेत्यावर सोपवून देईल. याशिवायदाविदाचे ऐतिहासिक राजघराणे संपुष्टात आले असले तरीहीदविदाच्या घरण्यात असा एक नवा राजा उदयास येईलजो अगदी दाविदा सारखा असेल. देव आमची धार्मिकताहे त्याचे नाव मूळ हिब्रूमध्ये सिद्कीय नावाशी जुळणारे आहे. पण या राजाला हे नाव खरोखर सर्वार्थांनी साजेसे असेल. आणि हा राजा हे नाव खरोखर सत्याने धारण करील. यिर्मया येथे दाविदाचा मसीहाकडे (येशू ख्रिस्त) पाहतो आहे. त्याचा जन्म इस्त्राईलच्या तारणासाठी असेल.

 

 

दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र २:१३-१८

 

          जे यहुदी नव्हते त्यांनी सत्याचे वचन म्हणजे सुवार्ता ऐकली. सुवार्तेवर त्यांनी विश्वास ठेवला तेव्हाच ते ख्रिस्ताचे झाले. त्यांना ख्रिस्ताने जीवन दिले व ते देवाचे झाले. हा देवाचा मालकी हक्क दाखविण्यासाठी पवित्र आत्म्याचा शिक्का त्यासमयी त्यांच्यावर मारण्यात आला. हा पवित्र आत्मा आता व पुढे मिळणाऱ्या सर्व आशिर्वादाची हमी असा आहे.

इफिस मधील सर्व बंधूजनांना देवाच्या कृपेने ख्रिस्तात मिळालेले अशिर्वाद किती महान होते. देवाने आपल्याला कशाला पाचारण केले या प्रश्नाचे उत्तर देवाच्या ओळखीनेच मिळणार होते. देवाविषयी अधिक कळण्यासाठी आणि त्याचे विचार व मार्ग ओळखण्यासाठी आत्मिक दृष्टीची गरज आहे. ख्रिस्तामध्ये देव किती अगणित आशिर्वाद देत आहे हे पाहण्यासाठी सुदृष्टी हवी आहे.

 

शुभवर्तमान : मार्क ६:३०-३४

 

          शुभवर्तमानकार मार्क शिष्यांच्या परत येण्याविषयी सांगत आहे. येशूचे शिष्य त्यांचा अनुभव येशुकडे कथित करीत होते. येशूने त्यांच्या कथा ऐकून घेतल्यावर त्यांना सांगितले किएका निवांत आणि शांत स्थळी जाऊन विसावा घ्या. येशू आणि शिष्य मचव्यात बसून एकांतात राहण्यासाठी निघून गेले. पण त्या ठिकाणी सुद्धा लोकांचा समुदाय जमला होता. त्यांना एक मेंढपाळाची गरज होती. म्हणूनच येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवण दिली. शिष्यांनी केलेले चमत्कार आणि सुवार्तेचा केलेला प्रचार आणि कोणकोणत्या खेडे-शहरामध्ये त्यांचे शिष्य गेले होते त्याचा सविस्तर तपशील ते येशूला देत होते. केलेल्या ह्या कामामुळे त्यांना एक मानव म्हणून थकवा आलेला असेलचह्याची जाणीव आपल्याला होते. परंतु येशू आपल्या सुखाची व स्वतःच्या आरामावर लक्ष केंद्रित न करता लोकांना शिकवण देण्यास सुरवात करतो. येशू ख्रिस्त निःस्वार्थी आणि निःपक्षपाती मेंढपाळ आहे असे आपल्या निदर्शनास शुभवर्तमानकार आणून देतो.

 

मनन चिंतन:

          येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: आपण एका निर्जन/ मोकळ्या जागी जाऊ आणि थोडा विसावा घेऊ (मार्क ६:३१). येशूचे कृत्य आणि शब्द आपली वृत्ती बदलण्यास आपल्याला प्रेरणा देते असतात.

Ø प्रभू येशूची वृत्ती:

प्रभू येशू आपल्या प्रेषितांना केवळ त्याच्या दैवी कार्यात सामील करून देत नाही तर त्याच वेळी येशू त्याच्या शिष्यांची शारीरिक आणि मानसिक सुव्यवस्था काळजीपूर्वक पाहत आहे. त्यामुळे प्रभू येशू आपल्या शिष्यांना म्हणतोएका मोकळ्या जागी जाऊन विसावा घेऊया.

आपल्याला मदत करणारेआपल्यासाठी कार्य करणारे लोक किंवा आपले आई-वडीलपती किंवा पत्नी घरकाम करणारे इत्यादी. जेव्हा थकलेले घरी परत येतात तेव्हा आपण त्यांच्या विषयी विचारशील असतो कात्यांची सुव्यवस्था पाहणे म्हणजेच त्यांना एक ग्लास पाणी देणेचहा देणे अशाप्रकारचे कृतद्न्य कार्य आपल्याला विचारशील बनवत असतात. त्यांना देखील विसाव्याची गरज आहे. त्याची आपल्याला जाणीव असणे गरजेचे आहे.

Ø प्रभू येशूचे शब्द:

येशू आपल्या शिष्यांना शारीरिक विश्रांती विषयी बोलला होता ह्यात काही शंका नाही. परंतु येशू प्रामुख्याने दोन विषयआपल्या शिष्यांसमोर मांडत आहे. ते म्हणजेआपल्या आयुष्यातील स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे गरजेचे आहे. थोडासा विसावा आपल्या अंतर्मनामध्ये पाहण्यासाठी आपण घेतला पाहिजे.

१)   आपल्या जीवनामधील भूतकाळातील घडलेल्या गोष्टीचा आढावा घेणे आणि त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये सुधारणा घडवून आणणेआणि

२)   भविष्यामध्ये आपलं जीवन कसे असावे. भूतकाळामध्ये घडलेल्या सर्व घडामोडींचा आढावा घेत आपण आयुष्याचा अनुभव घेतला आहे. हा अनुभव आपला भविष्य शांतीचचांगुलपणाच बनवण्यासाठी मदत म्हणून ठरू शकते. आपल्या जीवनाचे नूतनीकरण करण्यासाठी हा विसावा घेणे गरजेचे आहे.  जर आपण प्रभू येशूच्या सोबत आहे. तर येशू आपल्याला काय म्हणत असेल. थोडासा विसावा घ्या.

आपण सोशल नेटवर्कचा वापर करून online वर खूप व्यस्त असतोह्या व्यस्ततेतून विसावा घ्या आणि स्वर्गाच्या नेटवर्कमध्ये या. थोडेसे मोबाईलवर offline जा आणि देवासोबत प्रार्थनेद्वारे online राहा. थोडावेळ मोबाईल बंद करा आणि आपले बायबल उघडा. थोडावेळ प्रार्थनेमध्ये घालवून परमेश्वराच्या सानिध्यात विसावा घेऊया.

जगाच्या मोहमय मनोरंजनापेक्षा परमेश्वराच्या सानिध्यात घालवलेला वेळा फार फलदायक बनू शकतो. प्रार्थना आणि शांतता आपल्याला अधिक फळद्रूप बनवू शकते.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभूआमची प्रार्थना ऐकून घे.

 

१. आपल्या ख्रिस्त सभेचे पोप फ्रान्सिसबिशप्सधर्मगुरू आणि धर्मभागिनी ह्यांना ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी घेण्यास चांगले आरोग्य आणि पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.

२. आपले पालक वर्ग जे आपल्या मुलाचे पालनपोषण करून त्यांना चांगले शिक्षण देऊन घडवण्याचे कार्य करतातत्यांनी आपल्या मुलांना चांगली मुल्ये आणि शिक्षण देऊन त्यांना भविष्यात सुसंस्कृत नागरिक होण्यास प्रोस्ताहान करावे म्हणून प्रार्थना करूया.

३. आपल्या देशाचे कार्य सांभाळणारे कार्यकर्ते ह्यांनी लोकांची सेवा करून आपले काम जबाबदारीने पार पाडावे आणि समाजात शांतीचे वातावरण निर्माण करण्यास त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थन करूया.

४. आपल्या धर्मग्रामातील गरीबआजारी आणि गरजवंत लोकांना मदत करण्यास त्यांना चांगले जीवन जगण्यास आणि मानवप्रिती दर्शविण्यास जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे आणि त्यासाठी लागणारे धैर्य त्यांना मिळावे म्हणून प्रार्थना करूया.

५. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या काम-धंद्यात कोणतेही व्यत्यय येऊ नयेत आणि पुढच्या काळासाठी पाण्याची साठवण करून पाणी योग्य प्रकारे वापरला जावा म्हणून आपण प्रार्थना करूया.