Wednesday, 10 January 2024

 



Reflection for the 2nd Sunday in Ordinary Time (14/01/2024) by Br. Rockson Dinis.




दिनांक: १४-०१-२०२४

पहिले वाचन: १ शमुवेल ३:३-१०१९

दुसरे वाचन: १ करिंथ ६:१३-१५१७-२०

शुभवर्तमान: योहान १:३५-४२


सामान्य काळातील दुसरा रविवार



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील दुसरा राविवार साजरा करीत आहोत. आजच्या वाचनात आपण देवाच्या पाचारणाविषयी ऐकत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात, परमेश्वराचे शमुवेलाला पाचारण करत आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथ येथील देवाच्या मंडळी सांगतो की, तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हास ठाऊक नाही काय? अशा प्रकारचा संदेश संत पौल आपल्याला आज देत आहे. आजच्या शुभवर्तमानात, योहानाच्या शिष्यांना, येशू कोण आहे व तो कोठे राहत आहे, याची ओळख आपणास करून देत आहे.

प्रत्येक व्यक्ति खऱ्या देवाच्या शोधात आहे, जसे योहानाचे शिष्य जणूकाही खऱ्यादेवासाठी तहानलेले होते. अशाच प्रकारची श्रद्धा आपल्याला कॅथोलिक ख्रिस्तासभा शिकवत (CCC) आहे ती म्हणजे, ईश्वरी उत्कंठा मानवी हृदयावर लिहून ठेवलेली आहे. कारण परमेश्वराने स्वतःसाठी मनुष्यनिर्मिती केली. परमेश्वर मनुष्याला स्वतःकडे ओढून घेत असतो. सत्याचा आणि सुखाचा शोध घेणाऱ्या मनुष्याला सत्य आणि सुख केवळ परमेश्वरामध्ये सापडते. (CCC 27).


मनन चिंतन:

आजच्या उपासनेत परमेश्वर आपणा सर्वांना एकजीव होण्याचे आमंत्रण देत आहे. एकजीव होणे म्हणजे परमेश्वराशी सुसंवाद करणे. आपण पाहतो, प्राचीन इतिहासापासून ते आजपर्यंत मानवाने आपली परमेश्वरासंबंधीची उत्कंठा आपल्या धार्मिक जीवनातून अथवा वर्तणुकीतून आणि श्रद्धेतून व्यक्त केली आहे.

आजच्या पहिल्या वाचना आपण पाहतो की, शमुवेलाच्या पाचारणात परमेश्वराचा सिंहाचा वाटा होता. प्रभूने त्याला बालपणात बोलावले, “शमुवेल शमुवेल त्याने ही हाक ऐकली तेव्हा तो झोपेत होता. एलिया त्याला बोलावीत आहे असे त्याला वाटले. परमेश्वर मात्र शमुवेलाच्या उत्तराला थांबला होता. शमुवेलचे उत्तर त्याला ठाऊक होते. तरीही शमुवेलला तो तीन वेळा हाक मारतो. तीन वेळा हाक येणे हे मुवेलाच्या  पाचारणाची ठाम हमी होती.

ज्या प्रकारे शमुवेलाच्या पाचारणात आव्हान होते, तशाच प्रकारे योहानाच्या शिष्यांना सुद्धा खऱ्या देवाच्या शोधाची तहान लागली होती. जेव्हा योहान त्याच्या शिष्यांना म्हणतो, पहा देवाचा कोकरा, तेव्हा त्या शिष्यांना कळून चुकते की, खरोखर ख्रिस्ता मध्ये जीवन आहे. म्हणूनच ते ख्रिस्ताला सांगतात, गुरुजी आपण कोठे राहता? जेव्हा शिष्य ख्रिस्ताबरोबर राहिले, तेव्हा त्यांना कळून चुकले की, खरोखरच जीवनाचे उगमस्थान हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा कोणी नसून मसीहा आहे. त्याच्याठायी जीवन आहे, जीवनाची भाकर आहे. त्याच्याठायी विसावा आहे. म्हणूनच संत आगस्तीन म्हणतात, जोपर्यंत आपण ख्रिस्तामध्ये विश्रांती घेत नाही तोपर्यंत आपली अंतःकरणें आश्वस्त राहतील.

ज्या प्रकारे मुंगी दिवसभर साखरेच्या शोधात असते, तसे आपण दिवसभर ख्रिस्ताच्या शोधात असावेत. कारण ख्रिस्ताच्या आध्यात्माचा झरा जिथे वाहतो तिथे जीवन आहे, विपुल सुख आहे. या विपुल सुखाचे उत्कृष्ट उदाहरण योहानाच्या शुभवर्तमानात सांगितली आहे ते म्हणजे, शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया हा शिमोनाला म्हणाला, मसीहा आम्हाला सापडला आहे. अश्या ह्या आनंदाची उंची कोणीही मोजू शकत नाही, कारण परमेश्वराला ओळखणे हे मनुष्याला आपल्या बुद्धीने कमावता येणार नाही. म्हणूनच परमेश्वर ते स्वेच्छेने स्वतः प्रकट करतो. आणि अशाप्रकारे आपल्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या पाचारणाची हाक येत असते.

आज जगामध्ये, देवाच्या राज्यात कार्य करण्यासाठी प्रभू येशू अनेक लोकांना पाचारण करत आहे. ज्या प्रकारे शमुवेलला प्रभूची हाक आली, तशा प्रकारे अनेक लोकांना परमेश्वर त्याच्या मळ्यामध्ये कार्य करण्यासाठी बोलावत आहे. पाचारण ही खरी ईश्वरी हाक आहे. या ईश्वरी हाके परमेश्वर नेहमी बोलत असतो व जीवनात येणाऱ्या समस्यांना व अडी अडचणीला सामोरे जाण्यास दिलासा देत असतो. देवाच्या हाकेस भरपूर शक्ती आहे म्हणून आपण एकदा नांगराला हाथ घातला की मागे वळून पाहायचे नाही, फक्त परमेश्वर आपल्या बरोबर आहे इतकी कल्पना करून आपले जीवन प्रभुला समर्पित करावे.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

१.    आपले परमगुरु, इतर सर्वं महागुरु, धर्मगुरू, व्रतस्थ, आणि प्रापंचिक ह्यांनी देवाच्या हाकेला योग्य तो प्रतिसाद देऊन येशूच सतत अनुकरण करावं म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    आपल्या देशातील सर्वं राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर जनतेने दिलेली जबाबदारी योग्य मार्गाने पार पाडावी, कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता लोकांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    जे कुणी देवाच्या मार्गातून दूर गेलेले आहेत, जे मार्गभ्रष्ट झालेले आहेत अशांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी पुन्हा योग्य मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    जगभरातील युवक-युवतींना प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी प्रेरणा व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जे कोण आजारी आहेत व गंभीर आजाराने त्रस्त आहेत त्यांना प्रभूचे आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

    ६.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. 


Thursday, 4 January 2024

 



Reflection for the Homily for the FEAST OF THE EPIPHANY OF THE LORD (07/01/2024) By Br. Justin Dhavade.




दिनांक: /०१/२०२४

पहिले वाचन: यशया ६०:१-६

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-३५-६ 

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२


प्रकटीकरणाचा सण


प्रस्तावना:

आज देउळमाता येशूच्या प्रकटीकरणाचा सोहळा साजरा करत आहे. आजच्या सोहळ्याद्वारे आपणासमोर तीन राज्यांना येशुबाळ कश्याप्रकारे प्रकट झाला ह्यवर मनन चिंतन करण्यास आमंत्रित करत आहे. प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे व तो प्रकाश भूतलावर मानवाच्या तारणासाठी प्रकट झालेला आहे. आजची उपासना आपणास सांगत आहे कि, प्रभू येशू ठराविक लोकांकरिता नव्हे तर समस्त मानवजातीसाठी जन्मास आला आहे अथवा प्रकट झाला आहे. तो लोकांना एकत्र करण्यासाठी व सर्वांना समान दर्जा देण्यासाठी प्रकट झाला आहे. आपणही ख्रिस्ताच्या प्रकाशाला शरण जाऊन त्याचा प्रकाश इतरांपर्यंत पोह्चवूया.


मनन चिंतन:

क्ल्नीचे संत ऑडीलो म्हणतात, सोने अर्पण करणे म्हणजे येशूचे राजेपण घोषित करणे, ऊद अर्पण करणे म्हणजे येशूचे  देवत्व भजने आणि गंधरस अर्पण करणे म्हणजे प्रभुच्या मृत्युची कबुली देणे.

प्रकटीकरण हा शब्द ‘एफीफानिया’ (Epiphaneia) ह्या ग्रीक शब्दातून आलेला आहे, ह्याचा अर्थ म्हणजे प्रकट होणे- Manifestation. हा शब्द जेव्हा येशूच्या प्रकटीकरणाबाबत वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ सखोल आहे असे समजते, जे कोणी कधी पाहिले नाही ते प्रकट करणे.

खरा परमेश्वर स्वतःला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रकट करतो म्हणून आज आपण प्रकटीकरणाचा सण साजरा करीत आहोत. ख्रिस्ताच्या जन्माने एक अनमोल सत्य संपूर्ण जगासमोर मांडण्यात आले आहे कि, प्रभू येशू हाच जगाचा एकमेव तारणारा आहे (प्रेषितांची कृत्ये ४:१२) आणि एकाच खऱ्या परमेश्वराचे प्रकटीकरण आहे. (योहान १:१८).

प्रकटीकरणाचा सोहळा हा प्रकाशाचा सोहळा म्हणून मानला जातो, जेथे मागी लोकांना प्रभू येशू हा जगाचा प्रकाश आहे असे प्रकट करण्यात येते. प्रभू येशू हा प्रकाश देणारा पहाटेचा तेजस्वी तारा आहे (प्रकटीकरण २२:१६) आणि त्याच्यावर जे विश्वास ठेवतात त्यांना तो स्वतः प्रभात तारा देईल (प्रकटीकरण २:२८). हे ज्ञानी लोकांच्या बाबतीत घडले म्हणजे ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये त्यांना प्रकाशित करण्यात आले, जे ज्ञानी लोक ताऱ्याच्या दिशेने गेले व त्यांना जीवनाचा मार्ग प्रभू येशू सापडला. परंपरेनुसार असे सांगण्यात येते कि, या ज्ञानी-मागी तीन राज्यांची नावे गॅस्पर, मेल्खीओर व बल्थाझार अशी आहे. या तीनही राज्यांनी येशूबाळाला भेट दिली, त्याचे दर्शन घेताना नमन केले व आपल्या-कडील भेटवस्तू सोने, ऊद व गंधरस ही दाने येशूबाळाला अर्पण केली (मतय २:११).

सोने - प्रभू येशू राजा आहे म्हणून, सोने अर्पण केले. सर्वात मौल्यवान असा घटक प्रभू येशू राज्यांच्या राजाला अर्पण करण्यात आला.

ऊद - ऊद हे परमेश्वराच्या भजनासाठी, भक्तिसाठी मंदिरामध्ये वापरण्यात येत असे (निर्गम ३०:३७). प्रभू येशूला ते अर्पण करून तो परमेश्वर आहे हे दर्शविण्यात आले.

गंधरस - गंधरस महायाजक याजकांच्या अभिषेकासाठी वापरत असे (निर्गम ३०:२३). तो प्रभू येशू ख्रिस्ताला अर्पण करून तो जगाची पापे दूर करणारा खरा अभिषिक्त महायाजक आहे हे दर्शविण्यात आले. अशा प्रकारे प्रभू येशू फक्त यहुदी लोकांना नव्हे तर परराष्ट्रीयांना देखील प्रकट होतो. तो संपूर्ण जगाचा तारणारा म्हणून जन्माला आला.

आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगतो की, सर्व राष्ट्र एक होऊन प्रभूच्या प्रकाशाकडे येतील. दुसऱ्या वाचना संत पौल आपणास देवाच्या प्रकटीकरण्याविषयी सांगतो की, प्रकटीकरण हे सर्व लोकांसाठी आहे.

शुभवर्तमानात आपल्याला तीन राज्यांची प्रभू येशूला झालेली भेट ह्याविषयी सांगते. हे तीन राजे ज्ञानी लोक, विद्वान होते. ते खगोलशास्त्रज्ञ/ ज्योतिषी सुद्धा म्हणू शकतो. ते भाकीत किंवा स्वप्नांचे अर्थ सांगत असत. हे मागी लोक परराष्ट्रीय होते त्यांना प्रभू येशूचे प्रकटीकरण करण्यात आले. कारण प्रभू येशू हा सर्वांसाठी या भूतलावर आला होता. तो जगाचा प्रकाश, तारणारा म्हणून आला होता.

आजचा सोहळा आपल्याला असा बोध देत आहे कि, प्रभू येशू त्याच्या सर्व लोकांना एकत्र करण्यासाठी आला व सर्व लोकांना समान दर्जा व योग्य स्थान देण्यास आला. तसेच तीन मागी लोक- राजे आपल्याला हिच शिकवण देतात कि, प्रभू येशू सर्व लोकांसाठी यहूदी आणि परराष्ट्रीयसाठी जगाचा प्रकाश म्हणून व तारणारा म्हणून जन्माला आला आहे. त्याचे दर्शन घेऊन त्याच्या प्रकाशाने प्रकाशमय बनण्यास आपणा सांगत आहे. ज्याप्रमाणे तीन राज्यांनी ताऱ्याच्या सहाय्याने त्याच्या दिशेने मार्गक्रमण करून येशू बाळाचा शोध केला व त्याचे दर्शन घेताना नमन केले व आपल्या थैल्या सोडून आपली दाने येशूबाळाला समर्पित केली. त्याचप्रमाणे आपण ही आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या तेजस्वी प्रकाशाला शरण जाऊया व आपले सर्वस्व त्याच्या चरणी समर्पित करुया. ह्याच येशू बाळाचा प्रकाश घेताना त्याच्यापुढे नतमस्तक होऊन तोच जगाचा तारणारा आहे हे स्वीकारूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभूआम्हांला तुझे दर्शन घडव.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशयबिशस्पधर्मगुरू व तसेच धर्म-भगिनी ह्यांना देवाचे प्रेमद्या व शांती इतरांपर्यंत पोहचविण्यासाठी कृपा व शांती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने देवाची मुले म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आज जगात अशांतता असल्यामुळे वैरीपणाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून जगात शांती पसरावी व एकात्मतेचे वर्चस्व स्थापन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. हे नवीन वर्ष चांगलेसुखा-समाधानाचेशांतीचे व भरभराटीचे जावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आपल्या सामाजिककौटुंबिक आणि वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.