Friday, 21 November 2025

 Reflections for the homily of Christ the King (23-11-2025) by Fr. Benjamin Alphonso


ख्रिस्त राजाचा सण

सामान्य काळातील ३४ वा रविवार

दिनांक: २३/ ११/२०२५

पहिले वाचन:  शमुवेल : -

दुसरे वाचन: संत पौलचे कलस्सैकरांस पत्र  : १२-२०

शुभवर्तमान: लुक  २३: ३५-४३


प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी प्रिय बंधू-भगिनींनो, आज पवित्र देऊळमाता ख्रिस्त राजाचा सण साजरा करत आहे. आपण अनेक राज्याविषयी ऐकतो, परंतु ख्रिस्त हा एक आगळावेगळा राजा होता. तसेच ख्रिस्ताचे राज्य हे प्रेमाचे, दयेचे व शांतेतेचे तसेच क्षमेचे राज्य आहे. देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रभु येशू ह्या जगात आले होते. ख्रिस्त हा अखिल विश्वाचा व आपल्या प्रत्येकाचा राजा आहे.

आजचे पहिले वाचन आपल्याला दाविद राज्याविषयी सांगत आहे. तसेच दुसरे वाचन, जे संत पौलाने कैलस्येकरांस लिहिलेल्या पत्रातून घेतले आहे, ते आपल्याला प्रभु ख्रिस्ताला दिलेल्या सर्व देणग्याविषयी सांगत आहे. कारण प्रभु येशू सर्व उत्पत्तीत श्रेष्ठ आहे. तर आजचे लुकलिखित शुभवर्तमान आपल्याला प्रभु ख्रिस्ताने आपल्या प्रजेसाठी सहन केलेल्या दुःखाविषयी सांगत आहे. अशा ह्या ख्रिस्तराज्याकडे आजच्या पवित्र मिस्साबलिदानात आपण आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करूया, की प्रभूने आपल्या सगळ्यांना शांती व समाधान द्यावे.

मनन चिंतन:

आजचा लोकप्रिय राजा कसा असावा’ ह्याविषयी आयर्लंड या देशात घडलेली एक सुंदर कथा आपल्याला पटवून देत आहे. आयर्लंडमध्ये एक राजा होता. तो फार दयाळू व प्रेमळ होता. पण दुर्दैवाने त्याला मूलबाळ नव्हते. पण त्याची इच्छा होती की भविष्यात होणारा राजा त्याच्यासारखा दयाळू व गरिबांविषयी प्रेम असलेला असावा. म्हणून त्याने आपल्या राज्यातील सर्व होतकरू तरुणांना आपल्या राजवाड्यात बोलावले.

राजाने त्यांच्या सर्वांची परीक्षा घेतली. अनेक तरूण त्याच्या परीक्षेत पास झाले नाहीत. त्याच्या राज्यात एका गावात गरीब युवक होता. तो कष्टाळू व दयाळू होता. त्याच्याकडे राजवाड्यात यायला पैसे व कपडे नव्हते. म्हणून त्याच्याकडे असलेली काही जमीन त्याने विकली, थोडे नवीन कपडे घेतले व दुसऱ्या जेवणाच्या व इतर वस्तू घेतल्या व तो राजवाड्याकडे निघाला. काही दिवसांचा प्रवास केल्यानंतर तो राजधानीत सकाळी-सकाळी पोहोचला. राजवाड्याच्या बाहेर त्याला एक गरीब माणूस थंडीने व भुकेने तडफडत असलेला दिसला. त्या तरुणाला त्या गरीबाची दया आली. त्याने त्याच्याकडे असलेला चांगला कोट, कपडे व खाऊ त्या गरिबाला पुढचा विचार न करता दिला. काही वेळाने राजवाड्याचे दार उघडले. तेव्हा तो तरुण थंडीने थरथरत सिंहासनासमोर पोहोचला. सिंहासनापाशी जेव्हा पोहोचला, तेव्हा त्याने गरिबाला दिलेले कपडे व खाऊ एका मोठ्या ताटात ठेवलेले दिसले. तेव्हा त्या राजाने तरुणाचे स्वागत केले आणि सांगितले, “आजपासून तू या देशाचा नवीन राजा, कारण तुझ्यात गरिबांविषयी प्रेम व दया आहे.”

आजची तिन्ही वाचने आपल्याला उत्तम राज्याविषयी कल्पना देतात. जेव्हा आपण ‘राजा’ हे शीर्षक ऐकतो, तेव्हा आपल्यासमोर कोणती प्रतिमा झळकते? आपल्यासमोर विशेषतः रत्नजडित वस्त्रे, मुकुट, सामर्थ्य, अधिकार, श्रीमंती, सैनिक व सेवक अशी शाही व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर येते. परंतु आज आपण एका अशा राजाचा सण साजरा करतो, ज्याच्याकडे असं काही नव्हते. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले होते. त्याच्या दोन्ही बाजूला चोरांना खिळले होते. सैनिक त्याची थट्टा व मस्करी करत होते, निंदा करत होते. क्रुसावर पाटी लिहिलेली होती की ‘हा यहूद्यांचा राजा आहे.’
जेव्हा पिलाताने येशूला विचारले, “तू राजा आहेस का?”, तेव्हा येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे, पण माझे राज्य या जगाचे नाही.”

होय, येशूचे राज्य इतर राज्यापेक्षा वेगळे होते. म्हणून येशूने वधस्तंभावरून क्षमेचा व प्रेमाचा संदेश दिला, आपल्या मारेकऱ्यांना, थट्टा करणाऱ्यांना क्षमा केली. ज्या चोराने येशूवर विश्वास ठेवला, त्याला स्वर्गराज्यात नेण्याची घोषणा केली. येशूने अनेक आजारी लोकांना बरे केले, अनेक चमत्कार केले, तसेच पित्याच्या इच्छेला प्राधान्य देण्यास आपल्याला शिकवले.

तो शांतीप्रिय, दयाळू राजा आहे. आपल्या  हृदयाचा राजा आहे. तो ‘हृदयसम्राट’ आहे. येशूने आपल्या प्रवचनांत देवराज्याची अमूल्य शिकवण दाखल्याद्वारे दिली.

येशू हा उत्तम मेंढपाळ होता, जो आपल्या मेंढराची काळजी घेतो. पृथ्वीवरही काही राजे जुलमी असतात, लोकांना त्रास देतात. परंतु येशू आपल्या प्रजेची काळजी घेणारा प्रेमळ राजा आहे. मराठीत म्हणतात, “यथा राजा, तॆथा प्रजा.” येशू आपल्या सर्वांच्या हृदयाचा राजा आहे. आपण येशूची शिकवण पाळूया, तसेच देवाचे राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया, जिथे प्रेम, दया आणि शांती नेहमी नांदते.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू तुझे राज्य आम्हांवर येवो.

१.आपल्या ख्रिस्त सभेचा कारभार पाहणारे पोप लियोसर्व बिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ ज्यांनी आपले सर्व आयुष्य प्रभू सेवेसाठी अर्पण केले आहे त्यांना देवाची कृपा-आशीर्वाद मिळावा व त्यांनी येशूची सुवार्ता सर्वत्र पसरवली म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.आपले सर्व राजकीय पुढारी व नेते ह्यांनी येशू प्रमाणे जनहितासाठी झटावे व जनतेची अधिकाधिक सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.जे कोणी आजारी,  दुःखी व संकटांनी ग्रासलेले आहेतआयुष्याला कंटाळलेले आहेत अशांना प्रभुचा दैवी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.आज ख्रिस्त राज्याचा सण साजरा करत असताना प्रभू येशूला आपल्या जीवनाचा राजा बनवून त्याचे राज्य आपल्या हृदयात यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. देशात परदेशात अनेक लोक अन्यायाला, हिंसेला, युद्धेला, अत्याचाराला, राजनीती व कुटनीती ह्यास बळी पडत आहेत, अश्या सर्व लोकांवर ख्रिस्ताचे न्यायचे व करुणेचे राज्य यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिकसामाजिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Thursday, 13 November 2025

Reflections for the homily of 33rd Sunday in Ordinary Time (16-11-2025) by Br. Vinon Souz

सामान्य काळातील ३३ वा रविवार

दिनांक: १६/११/२०२६

पहिले वाचन: मलाखी ३: १९-२०

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र ३: ७-१२

शुभवर्तमान: लुक २१: ५-१९



प्रस्तावना:

आज देऊळमाता सामान्य काळातील तेहतिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास प्रभू पुनरागमनाची आणि शेवटच्या न्यायाविषयीचा संदेश देते.

आजच्या वाचनांमधून आपल्याला श्रद्धा, कर्तव्य आणि सहनशीलतेविषयी सुंदर संदेश मिळतो.

आजच्या पहिल्या वाचनात मलाखी संदेष्टा सांगतो की, प्रभूचा दिवस येणार आहे, अन्याय करणाऱ्यांसाठी तो दंडाचा दिवस असेल, पण प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तो तारण आणि प्रकाशाचा दिवस असेल. संत पौल थेस्सलनीकाकरां दुसरे पत्र ह्यात उद्देशून सांगतात की, ख्रिस्ती जीवन म्हणजे कष्ट आणि प्रामाणिक परिश्रमाचे जीवन आहे; निष्क्रिय राहू नका, तर स्वतः काम करून जगण्याचा आदर्श द्या. लुकलिखीत शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना सांगतो की, संकटे, छळ आणि अडचणी येतील, पण या सर्वांतही धीर धरा, कारण तुमची निष्ठा तुम्हाला जीवन देईल.

आजच्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना आपली अंतःकरणे आपण शुद्ध करूया व ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा देवावर अधिक प्रेम करावे ह्याकरीता परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

मनन चिंतन

येशू ख्रिस्त यरुशलेमच्या मंदिरात उभा असताना, शिष्यांनी आणि इतरांनी मंदिराच्या अफाट भव्यतेबद्ल, सौंदर्याबद्ल, सुंदर दगडांबद्ल आणि देवाला अर्पण केलेल्या किंमती वस्तूंबद्ल बोलण्यास सुरुवात केली. हे मंदिर ज्यु लोकांसाठी केवळ एक प्रार्थनास्थळ नव्हते, तर राष्ट्राभिमान, धार्मिक सुरक्षितता आणि देवाच्या कायमस्वरूपी उपस्थितीचे प्रतीक होते. त्यांच्या दृष्टीने, या मंदिरात जोपर्यंत देव आहे, तोपर्यंत त्यांना कोणत्याही संकटाची भीती नव्हती. ही त्यांची भौतिक सुरक्षिततेची कल्पना होती.

परंतु, येशूने त्यांच्या या कल्पनेला धक्का दिला. येशूने म्हटले, “तुम्ही पाहत असलेल्या या गोष्टी अशा येतील की, एक दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही; त्या सर्व पाडून टाकण्यात येतील.” येशू ख्रिस्ताचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. तो आपल्याला शिकवतो की, मनुष्याने निर्माण केलेली कोणतीही गोष्ट शाश्वत नसते. आपले बँक बॅलन्स असो, आपले घर असो, आपले भौतिक सामर्थ्य असो, एक दिवस या सर्वांचा नाश होणार आहे. आपली खरी सुरक्षितता आणि खरी आशा कधीही भौतिक वस्तूंवर किंवा मानवी संस्थांवर अवलंबून नसावी, तर अविनाशी देवावर केंद्रित असावी. या भविष्यवाणीमुळे गोंधळलेल्या शिष्यांनी 'हे केव्हा होईल आणि याचे चिन्ह काय?' असा प्रश्न केला.

शिष्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, येशू ख्रिस्ताने त्यांना भविष्यात येणाऱ्या अनेक संकटांविषयी आणि चिन्हांविषयी सांगितले. परंतु येशूने त्यांना सर्वात आधी एक अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला: “तुम्ही फसू नये म्हणून जपा, कारण 'मीच तो आहे' किंवा 'काळ जवळ आला आहे' असे सांगत पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील; त्यांच्यामागे जाऊ नका.”

आजच्या जगातही आपल्याला अनेक खोटे संदेश ऐकायला मिळतात. काहीजण देवाच्या नावाने आपल्याला खोट्या तारखा आणि खोट्या आशा दाखवतात, तर काहीजण केवळ भीती पसरवतात. येशूने आपल्याला शिकवले की, जर कोणी 'मीच ख्रिस्त आहे' किंवा 'काळ जवळ आला आहे' असे सांगत असेल, तर त्यांच्या मागे धावू नका. आपण देवाच्या वचनावर आणि स्थिर विश्वासावर उभे राहिले पाहिजे.

येशूने आपल्या शिष्यांना सांगितले की जगाच्या अंताआधी त्यांना छळ आणि जुलूम सहन करावा लागेल. कुटुंब, मित्र आणि अधिकार्‍यांकडूनही विश्वासघात होईल. पण येशूने आश्वासन दिले की, छळाच्या वेळी पवित्र आत्मा त्यांना योग्य शब्द देईल, ज्यामुळे ते येशूची साक्ष देऊ शकतील. हा छळ म्हणजे परीक्षा नसून ख्रिस्ताची साक्ष देण्याची संधी आहे. शेवटी येशू म्हणतो, “तुमच्या डोक्याचा एक केसही नाश पावणार नाही; आपल्या स्थिरतेने तुम्ही आपले जीव वाचवाल.” म्हणजेच, जरी शारीरिक हानी झाली तरी त्यांचे आत्मिक जीवन देवाकडे सुरक्षित राहील.

आज आपल्यालाही आपल्या जीवनातील अनेक 'मंदिरांच्या' (म्हणजे भौतिक आधार आणि सुरक्षिततेच्या स्रोतांच्या) नश्वरतेचा अनुभव येत आहे. अशा वेळी, आपण घाबरून न जाता, खोट्या भविष्यवाण्यांपासून दूर राहून आणि छळाला साक्ष देण्याची संधी मानून, स्थिर विश्वासाने जगूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक”

१. ख्रिस्त सभेची अखंडितपणे सुवार्ता जगाला पोहोचविणारे पोप लियो चौदावेकार्डिनल्स, बिशप्सधर्मगुरू व सर्व व्रतस्थ यांना सर्वांना ख्रिस्ताचे प्रेमकृपा व दया मिळून ख्रिस्ताची सुवार्ता जगभर जोमाने पसरविता यावी  म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. देशात अत्याचारकाळाबाजारअन्याय व वैराचार ह्यासारख्या गोष्टी घडत आहेतत्यामुळे देशाची उन्नती होत नाही. अशा वेळी आपल्या राजकीय नेत्यांनी होत असलेल्या वाईट गोष्टीवर आवाज उठवूनदेशाला योग्य दिशा द्यावी व देशाची चांगल्यारितीने वाटचाल व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. ज्या देशात युद्ध चालू आहेत व त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना बळी पडाव लागत आहे, अनेकांना बेघर राहाव लागत आहे अश्या लोकांना परमेश्वराने दिलासा द्यावा त्यांचे सांत्वन करून, त्यांना सहनशक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आज युवक-युवती जीवनात योग्य साथीदार व नोकरीच्या शोधात आहेतत्यांना योग्य साथीदार व नोकरी मिळून त्यांचे जीवन आनंदित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जे लोक अतिशय आजारी आहेतज्यांची सेवा करायला कोणीही नाही. अशा सर्व लोकांना ख्रिस्ताचा करुणामय स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिककौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Friday, 7 November 2025

 Reflections for the homily for the Feast of the Dedication of the Lateran Basilica (09-11-2025) by Br. Saurav Patil


लॅटरन महामंदिराचे समर्पण

दिनांक: ०९/११/२०२५

पहिले वाचन: यहेज्केल: ४७: १-२, ८-९,१२

दुसरे वाचन: १करिंथ ३: ९-११, १६-१७

शुभवर्तमान: योहान: २:१३-२२


प्रस्तावना:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या पवित्र वाचनांमधून देव आपल्याला त्याच्या मंदिराचे आणि आपल्या आत्म्याचे महत्त्व समजावतो. यहेज्केल संदेष्टा आपल्याला देवाच्या मंदिरातून वाहणाऱ्या जीवनदायी पाण्याचे दर्शन घडवतात. जेथे हे पाणी पोहोचते, तेथे जीवन आणि फळे फुलतात. संत पौल आपल्याला सांगतात की, आपण देवाचे जिवंत मंदिर आहोत आणि देवाचा आत्मा आपल्यात वास करतो. म्हणून आपले जीवन पवित्र, स्वच्छ आणि देवमय राहिले पाहिजे.

आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की येशू मंदिर शुद्ध करतो, कारण लोकांनी देवाच्या घराचे रूपांतर बाजारात केले होते. ही घटना आपल्यालाही आपल्या अंतःकरणाकडे पाहण्याचे आमंत्रण देते. आपल्या हृदयाचे मंदिर किती शुद्ध आहे? आपल्या अध्यात्मिक मंदिरात देवाला योग्य स्थान मिळते का, की तिथे लोभ, स्वार्थ आणि पापाचे व्यापारी बसले आहेत?

आजचा दिवस आपल्याला स्मरण करून देतो की देवाचे मंदिर म्हणजे आपल्या आत्म्याचे आणि शरीराचे पवित्र स्थान आहे. आपण देवाच्या कृपेच्या प्रवाहात वाहू देऊ, जेणेकरून आपल्या जीवनातून इतरांना जीवन, आशा आणि प्रेमाचा झरा मिळेल.

मनन चिंतन

देवाचे मंदिर: जीवनदायी उपस्थिती

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या वाचनांद्वारे देऊळमाता आपणास देवाच्या उपस्थितीबद्दल, त्याच्या जीवनदायी कृपेबद्दल आणि आपल्या आत असलेल्या मंदिराच्या पवित्रतेबद्दल विचार करायला बोलावत आहे.

पहिल्या वाचनात यहेज्केल संदेष्टा मंदिरातून वाहणाऱ्या पाण्याच्या दर्शनाविषयी सांगतो. ते पाणी सुरुवातीला लहान प्रवाहासारखे दिसते, पण पुढे जाताना मोठ्या नदीत रुपांतरीत होते. हे पाणी ज्या ठिकाणी जाते, तिथे जीवन आणि फळ येते. मृत समुद्रासारख्या निर्जीव ठिकाणीही ते पाणी पोहोचते आणि जीवन फुलवते.

प्रिय भाविकांनो,  हे पाणी देवाच्या कृपेचे आणि आत्म्याचे प्रतीक आहे. जेव्हा देवाचा आत्मा आपल्या जीवनात वाहू लागतो, तेव्हा आपले कोरडेपण, उदासीनता आणि पापांनी भरलेले हृदय नव्या जीवनाने भरून जाते. म्हणूनच आपण देवाच्या कृपेच्या प्रवाहाशी जोडलेले राहिले पाहिजे, म्हणजे आपल्या जीवनातही जीवनाचे आणि आशेचे झरे वाहतील.

दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आठवण करून देतात की आपण सर्व देवाचे सहकारी आहोत, आणि आपण देवाचे मंदिर आहोत. ख्रिस्त हा या मंदिराचा पाया आहे. दुसरा कुणीही त्याच्या ऐवजी त्याचा पाया घालू शकत नाही. आणि ते पुढे सांगतात  “तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यात वास करतो.”
प्रिय मित्रांनो, याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्य, प्रत्येक ख्रिस्ती हा देवाचे जिवंत मंदिर आहे. त्यामुळे आपल्या जीवनात पवित्रता, नम्रता आणि प्रेमाचे वातावरण असले पाहिजे. पाप, स्वार्थ, द्वेष किंवा असत्य हे या मंदिराचे अपमान करतात. देव आपल्या आत राहतो हे सतत लक्षात ठेवलं, तर आपल्या प्रत्येक कृतीत देवाची उपस्थिती दिसून येईल.

शुभवर्तमानामध्ये  आपण ऐकतो की येशू येरुसलेमच्या मंदिरात जातो तिचे त्याच्या दृष्टीस येते की, व्यापार सुरू आहे. देवाच्या घराचे बाजारात रूपांतर झाले आहे. तेव्हा तो रागाने त्या व्यापाऱ्यांना बाहेर काढतो आणि म्हणतो, “हे माझ्या पित्याचे घर आहे; तुम्ही त्याला चोरांची गुहा बनवली आहे.” प्रिय भाविकांनो, हे दृश्य केवळ बाह्य मंदिराबद्दल नाही, तर आपल्या आध्यात्मिक मंदिराबद्दलही आहे. आपल्या हृदयात, आपल्या मनात, देव राहतो, पण आपण कधी कधी या मंदिरात लोभ, स्वार्थ, अहंकार आणि पापाचा व्यापार करू लागतो. येशू आज आपल्याला सांगतो, “तुमच्या अंतःकरणातील मंदिर शुद्ध करा.” देवाला आपले जीवन पवित्र, प्रेममय आणि सत्यनिष्ठ हवे आहे. येशू पुढे म्हणतो, “हे मंदिर उद्ध्वस्त करा, आणि मी ते तीन दिवसांत पुन्हा उभे करीन.” तेव्हा लोक समजते की तो स्वतःच्या देहाबद्दल बोलत आहे. मृत्यूवर विजय मिळवून तो पुन्हा उठतो, आणि त्याचे पुनरुत्थान हेच नवे मंदिर बनते , जिथे देव आणि मानव एकत्र येतात.

येशूने येरुसलेममधील मंदिर शुद्ध केल्यावर, तो आपल्याला सांगतो की, "तुमच्या अंतःकरणातील मंदिर शुद्ध करा." हे असे दर्शवते की आपले जीवन देवासाठी पवित्र असले पाहिजे. येशूचे पुनरुत्थान हेच नवे मंदिर आहे, जिथे देव आणि मानव एकत्र येतात. त्याच्यावर आपल्या जीवनाचा आधार असणे आवश्यक आहे. ख्रिस्ती जीवन म्हणजे पवित्रतेचे आणि प्रेमाचे मंदिर असले पाहिजे, ज्यातून देवाचा प्रकाश आणि शांती इतरांपर्यंत पोहोचेल. आपण जिवंत मंदिर म्हणून जगल्यास, देवाची उपस्थिती आपल्या जीवनात प्रकट होईल.

म्हणून, प्रिय बंधुभगीनिनो, आपले जीवन हे देवाचे मंदिर आहे; ते स्वच्छ, प्रकाशमय आणि प्रेमाने भरलेले असले पाहिजे. देवाच्या कृपेचे पाणी आपल्या आत वाहू द्या, जेणेकरून आपण जिथे जाऊ तिथे जीवन आणि आनंद पसरू द्या. ख्रिस्त हा आपला पाया आहे, त्याच्यावर आपले जीवन उभे राहिले पाहिजे. आणि आपण जिवंत मंदिर म्हणून जगलो, तर आपल्यातूनही जगात देवाचा प्रकाश आणि शांती प्रकट होईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभूतुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.’

१. पोप महाशयसर्व कार्डीनल्सबिशपधर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनिंना पवित्र जीवन जगण्याची शक्ती आणि समर्पण मिळावी, जेणेकरून ते आपल्या कार्यातून इतरांची श्रद्धा आणि विश्वास बळकट करू शकतील म्हणून आपण प्रार्थना करूया.

. आपण आज अंधारलेल्या जगात राहत आहोतनिराशेने बरेच लोक वैफल्यग्रस्त झाले आहेत. अशांना ख्रिस्ताच्या आशेचा शुभसंदेश प्राप्त व्हावा व त्यांना नवचैतन्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

. काही लोक हे पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवत नाहीत व दुसऱ्यांना विश्वासू लोकांचा विश्वास उध्वस्त करून त्यांस येशुपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना प्रभूचा स्पर्श होऊन त्यांची श्रद्धा वाढीस लागावी व त्यांनी येशूजवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या सर्व देणग्यांचा आपण योग्य प्रकारे वापर करावा व इतरांची सेवा करून नवजीवनाचा आनंद घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.