Friday, 11 September 2026

Reflections for the Homily of 24th Sunday in Ordinary Time (13-09-2026) By Fr. Suhas Pereira

सामान्य काळातील चोविसावा रविवार

दिनांक: १३/०९/२०२६
पहिले वाचन: बेनसिरा ची बोधवचने २७:३३-२८:९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १४:७-९

शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५

प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील चोवीसावा रविवार साजरा करत आहोत आणि आजची उपासना आपल्याला क्षमाशीलतेच्या, दयेच्या आणि समेटाच्या मार्गाची आठवण करून देऊन त्या मार्गावर आपल्या जीवनात चालण्याचे आव्हान देत आहे. क्षमाशीलतेसाठी आपण आपल्या जीवनात दोन प्रकारच्या मापाचा वापर करत असतो: एक माप दयेचे जे आपण स्वत:साठी वापरतो आणि दुसरे माप न्याय-निवडायचे जे आपण इतरांसाठी वापरत असतो. परंतु परमेश्वर हा सर्वांना समान मापाने दया आणि क्षमा देतो. परमेश्वराची दया आणि क्षमा ही अमर्याद असल्यामुळे आपणसुद्धा इतरांना दया दाखवण्यात आणि क्षमा देण्यात दैवी उदारता दाखवावी असं आजची उपासना आपल्याला सांगत आहे. आजच्या शुभवर्तमानात, पेत्र येशूला विचारतो की, माझ्या बंधूने माझ्या विरुद्ध अपराध केला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी? सात वेळा? येशू उत्तर देतो, "सात वेळा नव्हे, तर सातच्या सत्तर वेळा." क्षमा न करणाऱ्या सेवकाच्या दृष्टान्ताद्वारे येशू आपल्याला आठवण करून देतो की, आपल्याला देवाची विपुल दया लाभली आहे आणि म्हणूनच आपणसुद्धा इतरांबरोबर  दयाळू वृत्तीने वागलो पाहिजेत.

या पवित्र मिस्साबलीच्या सुरुवातीला आपण आपल्या हृदयाची झडती घेऊ या. आणि स्वतःला विचारूया: माझ्या जीवनात अशी व्यक्ती आहे का जिला जिला क्षमा करणे आपल्याला कठीण जात आहे? माझ्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी कटुता, राग किंवा दुखावणारी भावना अजूनही घर करून राहिली आहे का? आपण हे सर्व प्रभूच्या चरणी अर्पण करूया आणि ज्याप्रमाणे आपल्याला क्षमा मिळाली आहे, त्याचप्रमाणे इतरांना क्षमा करण्याची कृपा त्याच्याकडे मागूया. हा पवित्र मिस्साबली संस्कार आपली हृदये कोमल करो, आपले नाते-संबंध सुधारो आणि आपल्याला देवाच्या दयेची व शांतीची साधने बनवो.

मनन चिंतन:

आजच्या उपासनेची तिन्ही वाचने आपल्यापुढे एक आव्हानात्मक आणि आपल्याला रोजच्या जीवनात अनुभवायास मिळणारे वास्तव सादर करतात. हे वास्तव आहे दोष, शांती आणि समेटाचं वास्तव. आपण अनेक वेळा शांतीबद्दल वाचतो, ऐकतो परंतु एक महान सत्य विसरतो: शांतीची सुरुवात आपल्या जीवनापासून, आपल्या झाली पाहिजे. संत मदर तेरेसा म्हणतात, कि "शांती आणि युद्धाची सुरुवात घरातूनच होते; त्यामुळे जर आपल्याला जगात खरोखरच शांतता हवी असेल, तर आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबात एकमेकांवर प्रेम करण्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे." ज्या गोष्टीद्वारे आपला समाज तेजोमय झाला पाहिजे असं आपल्याला वाटते, त्या गोष्टीचा उगम आपल्या घरात झाला पाहिजे.

          माझ्या वैयक्तिक, खाजगी जीवनात शांती आहे हा? मी समेटासाठी सदैव तयार असतो का? त्या ऐवजी आपण आपला स्वतःचा राग आणि असंतोष नगण्य-योग्य मानतो, आणि सदैव दुसऱ्यांमध्ये दोष शोधात नाहीत का? स्वतःच्या चुका झाकून ठेवणे किंव्हा त्यांकडे डोळेझाक करणे आपण सहसा पसंत करतो. परंतु, राग आणि क्रोधाबाबत तर, आजची उपासना एक वेगळेच मत मांडत आहे. पहिलं वाचन आपल्याला सांगते: “राग आणि क्रोध हे घृणास्पद आहेत; केवळ पापीच त्यांना धरून राहतो. जो माफ करत नाही, त्याचा बदला प्रभूच घेतो; त्याची पापे प्रभूच्या स्मरणात राहतात.” पहिलं वाचन आपल्या पापांच्या वास्तविक स्वरूपाचे जणूकाही वर्णन करत आहे. आपले वाद, राग आणि द्वेष यांच्याकडे क्षुल्लक गोष्टी पहिलं वाचन क्षुल्लक नाही, तर पाप मानते. आणि हे पाप आपल्या आध्यात्मिक मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच, आपण आपल्या  अंताचा विचार केला पाहिजे, मृत्यूचा विचार केला पाहिजे आणि द्वेष सोडून दिला पाहिजे!” असे पहिलं वाचन आपल्याला सांगते.

          आजच्या शुभवर्तमानत आपण वाचतो, “मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूंही आपल्या सोबतीचा दासावर करावयाची नव्हतीस काय? देवाने आपल्याला अगणित वेळा क्षमा केली आहे. देवाकडून मिळणाऱ्या उदार क्षमादानामुळेच आपण जिवंत आहोत.  आपल्या प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजे:  जर देवाने आपल्या सर्व चुकांचा हिशोब ठेवला असता आणि आपल्याला क्षमादान दिले नसते  तर आपण आज कुठे असतो? आपली परिस्थिती काय असती? परंतु देव असा नाही! तो क्षमाशील आहे आणि सदैव दया आणि क्षमा देतो. वारंवार तो आपल्याला जीवनाची नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. हे सत्य आपण कदापि विसरता कामा नये.

 देवाने आपल्याला आपल्या सर्व पापांची प्रत्येक वेळेला क्षमा करतो. म्हणून  आपणसुद्धा त्याचप्रमाणे वागलो पाहिजेत. आपणसुद्धा इतरांना क्षमा करण्यास तयार असलो पाहिजेत. आजच्या पहिल्या वाचनातील शब्द आपण लक्षात ठेवूया: “तुझ्या अंतिम घटकेची आठवण ठेव, आणि द्वेष करण्याचे सोडून दे. मृत्यूचा विचार कर आणि वैरभाव सोडून दे."

आपलं जीवन हे परमेश्वर पित्याच्या संयमी आणि दयाळू वृत्तीवर आणि प्रेमावर विसंबून आहे, हे आपण सदैव स्मरणात ठेवावे. आणि जेव्हा आपल्याला इतरांना क्षमादान देणे कठीण जाते, तेव्हा परमेश्वराने आपल्याला आपल्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे, या सत्याची आठवण ठेवू या. स्तोत्रसंहितेमधील आजचं स्तोत्र आपलं स्तुतिगीत करूया: हे माझ्या जिवा परमेश्वराचा धन्यवाद कर; हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको."

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

परमेश्वर आपल्या दयाळू पित्याकडे आता आपण आपल्या सर्व गरजांसाठी प्रार्थना करू या.

प्रतिसाद: हे परमेश्वरा आम्हाला तुझ्या दयेने भर.

१) आपले परमगुरुस्वामी. सर्व महागुरुस्वामी, धर्मगुरू, धर्मभगिनी, व्रतस्थ आणि सर्व ख्रिस्ती भाविकांनी दया आणि क्षमाशीलतेचं जीवन जगून आपल्या जीवनाद्वारे परमेश्वराच्या दयेचे साक्षीदार व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) अनियमित पावसामुळे पिकांचं सतत नुकसान होत असल्यामुळे जीवनात खचून जात असलेल्या आपल्या शेतकरी बांधवाना सरकारकडून आणि त्याचप्रमाणे सेवाभावी संस्था आणि लोकांकडून मदत मिळावी आणि त्यांच्या जीवनातील आशेची ज्योत प्रफुल्लित व्हावी म्हणून आपण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करूया.

३) शिक्षणातील भ्रष्टाचार आणि गोंधळामुळे उज्वल आणि सुखी भविष्याची आशा सोडून देत आहेत अशा तरुण-तरुणींसाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या जीवनात धैर्याने आणि चिकाटीने पुन्हा एकदा अभ्यास करून उज्ज्वल यश त्यांनी मिळवावं आणि त्याचप्रमाणे शिक्षणातील अनियमितता आणि भ्रष्टाचार समुळ नष्ट करण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यासाठी सरकारला सुबुद्धी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपल्या कुटुंबातील आणि समाजातील सर्व आजारी व्यक्तींना परमेश्वराने कृपेच्या स्पर्शाने बरे करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

५) आपल्या सर्व वयक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.

हे परमेश्वरा तुझ्या चरणी आणलेल्या आमच्या विनंत्या आणि गरजांचा दयेने स्वीकार कर आणि तुझी दया आणि तुझा आशीर्वाद आम्हावर सदैव राहू दे. हि प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन




Friday, 4 September 2026

Reflections for the Homily of 23th Sunday in Ordinary Time (06-09-2026) By Br. Saurav Patil

सामान्य काळातील तेविसावा रविवार

दिनांक: ०६/०९/२०२६
पहिले वाचन: यहेज्केल ३३:७-९
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:८-१०
शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०

प्रस्तावना:

प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या वचनातून आपल्याला प्रेम, जबाबदारी, क्षमा आणि बंधुभाव यांचा सुंदर संदेश मिळतो. यहेज्केलच्या वाचनात देव आपल्याला आपल्या भावंडांसाठी पहारेकरी होण्याचे आवाहन करतो. संत पौल सांगतो की प्रेम हे सर्व नियमशास्त्राची पूर्णता आहे, तर शुभवर्तमानात येशू आपल्याला भाऊ-बहिणींच्या चुका प्रेमाने समजावून सांगण्याचा आणि समेट साधण्याचा मार्ग दाखवतो. म्हणून आजच्या या वाचनांवर  मनन चिंतन करत असताना आपण आपल्या नात्यांकडे पाहूया आणि जिथे मतभेद, किंवा दुरावा आहे, तिथे प्रेम, क्षमा आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याची कृपा प्रभूकडे मागूया.

मनन चिंतन:

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजची तिन्ही वाचने आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा संदेश देतात आणि तो असा कि, आपल्या भाऊ-बहिणींची जबाबदारी आपली आहे. पहिल्या वाचनात परमेश्वर संदेष्टा यहेज्केलला म्हणतो, “मी तुला इस्राएलच्या घराण्यावर पहारेकरी नेमले आहे.” पहारेकरी स्वतःसाठी जागत नाही, तर इतरांच्या सुरक्षेसाठी जागत असतो. त्याचप्रमाणे देवाने आपल्यालाही आपल्या कुटुंबातील, समुदायातील आणि समाजातील लोकांसाठी जबाबदार म्हणून बनवले आहे. एखादा माणूस चुकीच्या मार्गावर जाताना दिसला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही; प्रेमाने आणि नम्रतेने त्याला योग्य मार्ग दाखवणे ही आपली जबाबदारी आहे. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला हे काम कसे करायचे हे शिकवतो. तो म्हणतो, “तुझ्या भावाने तुझ्याविरुद्ध अपराध केला तर जा आणि एकांतात त्याला त्याची चूक समजावून सांग.” येशूची पद्धत अतिशय सुंदर आहे. आज आपण एखाद्यामुळे दुखावलो गेलो की त्याच्याशी बोलण्याऐवजी इतरांशी बोलतो, ज्या व्यक्तीमुले दुखावलो गेलो आहोत त्या व्यक्ती विरुद्ध चर्चा करतो, त्याच्यावर टीका करतो; परंतु येशू म्हणतो, आधी त्या व्यक्तीकडे जा आणि प्रेमाने संवाद साध. कारण ख्रिस्ती शिकवण हि दुसऱ्याला लाजवणे किंवा खाली पाडणे हा असा नाही, तर त्याला पुन्हा मिळवणे अशी आहे. एखाद्याची चूक दाखवताना आपण स्वतःला विचारले पाहिजे “मी त्याचा न्याय करीत आहे की त्याला प्रेमाने सुधारण्यास मदत करीत आहे?” दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगतो, “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा,” कारण प्रेम हे नियमशास्त्राची पूर्णता आहे. आपण प्रार्थना करतो, चर्चमध्ये येतो, धार्मिक कार्य करतो; परंतु आपल्या जीवनात प्रेम नसेल तर आपल्या श्रद्धेचा खरा अर्थ काय? देवाला केवळ आपल्या ओठांवरील प्रार्थना नको आहे, तर आपल्या कृतीतून दिसणारे प्रेम हवे आहे. म्हणून आज आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया. कदाचित आपल्या घरातच अशी व्यक्ती असेल जिच्याशी आपले बोलणे बंद आहे; कदाचित एखादा मित्र आपल्यामुळे दुखावला असेल; कदाचित आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची आणि समजुतीची गरज असेल. अशा वेळी आपण पुढाकार घेऊन संवाद साधूया. शेवटी येशू म्हणतो, “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्यांच्या मध्ये मी आहे.” जेव्हा दोन भाऊ भांडण सोडून समेट करतात, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला क्षमा करते, जेव्हा आपण दुःखी आणि गरजू व्यक्तीच्या जवळ उभे राहतो, तेव्हा ख्रिस्ताची उपस्थिती आपल्या जीवनात प्रकट होते. म्हणून आज आपण एक प्रश्न स्वतःला विचारूया “मी माझ्या भावासाठी आणि बहिणीसाठी पहारेकरी आहे का?” दुसऱ्याची चूक पाहताना त्याचा न्याय करण्याऐवजी प्रेमाने त्याला समजून घेऊया; सत्य बोलताना नम्रता ठेवूया आणि आपले ध्येय दुसऱ्याला हरवणे नसून त्याला पुन्हा प्रेमात जिंकणे हे असू द्य. कारण येशू आपल्याला न्याय करण्यासाठी नव्हे, तर प्रेम करण्यासाठी पाठवतो. आपल्या प्रत्येक नात्यात प्रेम, क्षमा, संवाद आणि समेट वाढू दे आणि आपल्या जीवनातून इतरांना ख्रिस्ताची उपस्थिती अनुभवता येऊ दे. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: : हे प्रभू आमचा विश्वास वाढव.

१. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांचा विश्वास बळकट व्हावा व त्यांनी इतरांचा विश्वास बळकट करावा म्हणून प्रार्थना करूया.

२. कुटुंब हे विश्वासाचे जडण घडण करणारे ठीकाण आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने विश्वास वाढवण्याची जबाबदारी पार पाडावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्माग्रामातील जी कुटुंबे विश्वासात डळमळले आहेत व चर्चला येत नाही अशा कुटुंबावर परमेश्वराचा पवित्र आत्मा यावा व त्यांच्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. आपल्या ध्रामाग्रामातील जे लोक आजारी, दुःखी व कष्टी आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श मिळावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

५.आपण शांतपणे आपल्या सामाजिक व व्यैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.