Wednesday 13 November 2013



Chris Jude Bandya hails from Our Lady of Sea Church, Uttan, Bhayander. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province of Maharashtra.Presently, he is pursuing his Theological studies in Jnana Deepa Vidyapeeth, Pune. Man of creativity and spontaneity, this homily comes to us with creative and biblical reflections.


सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार
१७/११/२०१३
वर्ष-क
मलाखी;३:१९-२०.
२ थेस्सलनीकाकरांस;३:७-१२.
लूक;२१:५ -१९.
"सेनाधीश परमेश्वराचा दिवस

प्रस्तावना:
आजच्या उपासनेची मध्यवर्ती कल्पना आहे:'सेनाधीश परमेश्वराचा दिवस.' आजच्या तिन्ही वाचनात आपणास प्रभूच्या दिवसाबद्दल सूचित करण्यात येते. संदेष्टा मलाखी, संत पौल व स्वत: येशू ख्रिस्त आपणास प्रभूच्या दिवसाची भविष्यवाणी सांगतात आणि त्याच बरोबर आपल्याला सज्ज होण्यास आवाहन करतात. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशु ख्रिस्त यरुशलेमेचा विध्वंस व युगाची समाप्ति ह्याविषयीचे भविष्य सांगतो. प्रभूचा दिवस जेव्हा येईल तेव्हा राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; मोठेमोठे भूकंप होतील व दुष्काळ पडतील तसेच आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील एकमेकांना धरून देतील; कित्येकांना जिवे मारतील आणि येशूच्या नावामुळे सर्व आपला द्वेष करतील असे असले तरी आपल्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. ह्याच प्रभूच्या अभिवचनावर विश्वास ठेवून आजच्या पवित्र मिसाबलीदानात सह्भागी होत असताना प्रभूच्या राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी आपण विशेष कृपा-शक्ती मागु या.  
पहिले वाचन:
पहिल्या वाचनात संदेष्टा मलाखी आपणास सुचित करतो की, " पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी बनतील; तो येणारा दिवस त्यांस जाळून टाकील." संदेष्टा मलाखी आपणास सज्ज होण्यास पाचारण करतो व सेनाधीश परमेश्वराच्या त्या दिवसाचे स्वागत करण्यास व तयारीत राहण्यास आवाहन करतो.
दुसरे वाचन:
आजच्या दुस-या वाचनात संत पौल थेस्सलनीकाकरांस बोध करितो की, "ज्या कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्यांने खाऊही नये." पुढे तो सांगतो की, "आम्ही स्वत: कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, परंतू तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले" संत पौल आम्हास त्याचे अनुकरण करण्यास आवाहन करतो.
सम्यक विवरण:
लूकलिखीत शुभवर्तमानात अध्याय २१:५-१९ हा येशूचा शिष्याबरोबर शेवटचा संवाद; म्हणजे येशूच्या दुःखसहना अगोदरचे शब्द. ह्या संवादाचे रूप ह्यापुढे लूकच्या शुभवर्तमानात आपणास कुठेही आढळत नाही. ह्यावेळेस येशू फक्त त्याच्या सभोवती जमा झालेल्या त्याच्या शिष्यांबरोबर संवाद साधत होता. येशूचे शब्द त्याच्या शिष्यांना जीवनात येणा-या समस्या व अडचणीबद्दल सुचीत करत आहे; हे शब्द फक्त शिष्यांनाच नव्हे तर इस्रायल राष्ट्राला तसेच तेथे उभे असलेल्या मंदिराबद्दल होते. आपल्या अति-सुंदर मंदिराचा नाश होणार हे जाणून त्यांना खूप दुःख झाले असलेच तरीपण जुन्या मंदिराचा नाश म्हणजे नवीन मंदिराचे आगमन होणार हे ऐकून ते आनंदित झाले. हे नवीन मंदिर म्हणजे 'मसीहा' होय व तो मसीहा आपला गुरुजी येशुख्रिस्त आहे हे जाणून त्यांच्या आनंदाला पारा उरला नाही आणि आपण येशूचे अनुयायी आहोत व आपण परमपित्याचे लोक म्हणून ओळखले जाऊ व आपणास स्वर्गाचे दरवाजे उघडले जातील ह्या भाग्यामुळे ते आनंदात रमून गेले होते. परंतु ह्या सर्व गोष्टी कधी कश्या घडतील अश्या घडतील अश्या अनेक प्रश्नांनी व विचारांनी त्यांना चिंतित केले होते. पुढे येशू आपल्या शिष्यांना सावध रहावयास सांगून म्हणतो की अनेक व्यक्ती येऊन सांगतील, 'मी देवाने पाठवलेला मसीहा आहे परंतु तुम्ही फसवले जावू नका आणि ह्या क्षणी सर्वत्र दुष्काळ, भूकंप, पूर, युद्ध व धरणीकंप होतील आणि जुन्या करारात सांगितल्याप्रमाणे आपणा सर्वांस देवाच्या न्यायास सामोरे जावे लागेल.' 
येशू जेव्हा येणा-या  काळा (वेळ) विषयी चर्चा करतो तेव्हा तो दोन काळाबद्दल बोलतो:
१) वर्तमान काळ  (Present Age) म्हणजे आता चालू असलेला काळ. 
२) प्रभूचा काळ (Age to come) म्हणजे भविष्यात येणारा काळ.
येशू जेव्हा आपल्या सभोवतीच्या लोकांबद्दल विचार करतो तेव्हा ह्या वर्तमान काळाविषयी म्हणतो की हा काळ खुप वाईट गोष्टींनी भरून गेलेला आहे. म्हणून सैतानी गोष्टी सुद्धा घडून येत आहेत आणि त्यांच्या ह्या वाईट संगती व वाईट गोष्टी त्यांच्यापासून दूर करणे अती कठीण जाईल. वर्तमानकाळाविरुद्ध म्हणजे प्रभूच्या काळात सैतानाला जागा नसणार ह्या काळाला सोन्याचा काळ म्हणून संभोधिले जाईल व ह्या काळात जगात सर्वत्र शांतीचा प्रसार होईल. परंतु ह्या दोन्ही काळा-दरम्यान जो दिवस येईल तो म्हणजे 'सेनाधीश परमेश्वराचा दिवस'. हा दिवस ह्या जगात दहशतवाद घडवून आणील. "पाहा, रोष व तीव्र क्रोध यांनी दुःखकर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे; तो देश उजाड करून सोडील, त्यातील पातक्यांचा संहार करील" (यशया १३:९ ; योएल २:२ ; आमोस ५:१८-२०; सफ़न्या १:१४-१८ ). हा दिवस अचानक येईल, "कारण तुम्हाला स्वत:ला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो"(१ थेस्सलनिका ५:२; २ पेत्र ३:१०), आणि ह्याच त्या प्रभूच्या दिवशी संपूर्ण जग अंधारात बुडून जाईल. तसेच आकाशातील तारे प्रकाशीत होणार नाहीत आणि सूर्य त्याच्या सूर्योदय आणि सूर्यास्तापर्यंत अंधारात माखून जाईल, आणि चंद्राकडून सुद्धा आपल्याला प्रकाश मिळणार नाही (यशया १३:१०-१३; योएल २:३०-३१; २ पेत्र ३:१०).
अनेक अश्या भयानक गोष्टी लोकांच्या मनात सुरवातीपासून होत्या; विशेष म्हणजे:
१) येशूच्या वेळेस जगणा-या सर्व यहुदी लोकांच्या मनात प्रभूच्या दिवसाबद्दल चिंता.
२) जुन्या करारातील संदेष्टयांनी सांगितल्याप्रमाणे रोमन सैनिकांच्या हातून इसवी सन ७० मध्ये यरुशलेमेच्या मंदिराचा  विध्वंस.
. प्रभू येशूच्या परत येण्याची सुवार्ता.
४. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भविष्यात होणा-या छळाची सुध्दा त्यांना जाणीव होती.
येशूख्रिस्ताने ह्याबद्दल त्याच्या शिष्यांना प्रथमच जागृत केले होते, येशू त्यांच्या शिष्यांना सांगतो, "परंतू हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील; तुम्हाला सभास्थाने व तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील, आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नांवासाठी नेतिल… (लुक; २१: १२-१९). जसे येशूने आपल्या शिष्यांना अधिकाराने बोध केला त्याच ख्रिस्ताच्या अनुभवाद्वारे पौलाने थेस्सलनीकाकरांस अधिकाराने आज्ञा दिली की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊ हि नये(२ थेस्सलनीका; ३:१०). संत पौलाला हा अधिकार येशूख्रिस्ताच्या नावात व ते नाव उच्चारण्यात मिळतो. एकूण वीस वेळेस पौल थेस्सलनीकाच्या पत्रामध्ये येशूसाठी 'तारणारा' (savior) शीर्षक वापरतो, आणि ह्याच मानवी नावाने येशू ओळखला जात असे(मत्तय;१:२१). ख्रिस्त हे येशूचे दैविक नाव आहे ह्याचा अर्थ: मसिहा, म्हणजे देवाने अभिषेक केलेला होय; आणि ह्याच नावाच्या अधिकाराने पौल थेस्सलनीकाकरांस बोध व आज्ञा देतो. पौल आजच्या वाचनात जीवनातील दैनंदिन कामाबद्द्ल मार्गदर्शन करतो. देवाने आदामाला बागेची राखण व देखरेख करावयास सांगितले होते(उत्पती; २:१५). स्वत:च्या परिपूर्णतेकरिता मानवाला दररोज काम करावे लागते. आपण जर पवित्र शास्त्राच्या इतिहासाचा अभ्यास बारकाईने केला तर आपणास कळते की, देवाने जेव्हा शास्त्रामधल्या महान व्यक्तींना बोलावले होते तेव्हा त्या सर्व व्यक्ती त्यांच्या कामात गुंग होत्या.
- मोशे शेळ्या व मेंढ-याचा कळप चारत होता(निर्गम; ३).
- यहोशवा मोशेचा उत्तराधिकारी होण्याअगोदर, तो मोशेचा सेवक होता(निर्गम; ३३:११). 
- गिदोन गव्हाची झोडणी करीत होता(शास्त्रे; ६:११).
- दावीद राणात शेळी-मेंढरी राखीत होता(१ शमुवेल; १६: ११).
- येशूने अनेक कोळी(fisherman) लोकांना त्याचे अनुयायी होण्यास पाचारण केले.
- येशूख्रिस्त स्वत: सुताराचे काम करीत होता.
- संत पौल राहूट्या(tent) करण्याचा व्यवसाय करत होता(प्रेषितांची कृत्ये; १८:३).
आणि ह्या व्यवसायाच्या माध्यामाद्वारे येशू ख्रिस्ताची सुर्वाता पसरविण्यास त्यास खूप मदत झाली. आजच्या वाचनाद्वारे संत पौल आपणा सर्वांस कठीण मार्गाबद्दल व त्याच्यावर येशूच्या नावाने चालण्यास मार्गदर्शन करतो.
बोध कथा:
एकदा एक मुलगा विहिरीमध्ये डोकावून पाहत असताना त्याचा तोल जातो व तो विहिरीत पडून बुडायला लागतो. तो बुडत असल्यामुळे आपला प्राण वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडायला लागतो, "मला वाचवा! मला वाचवा!" इतक्यात बाजूने जाणा-या एक व्यक्तीने त्याचा आवाज ऐकला व आपल्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारून त्या मुलाला वाचवले. अनेक वर्ष होतात, दोघे त्यांच्या जीवनात पुढे जातात परंतु तो मुलगा एक गुंड बनतो, चोरी करणे, लोकांचा छळ करणे, लुबाडणे हे त्याचे जीवन बनते.
एक दिवस अशीच चोरी करताना तो पकडला जातो आणि त्याला तुरूंगवास होतो. त्याला न्यायधीश्यासमोर उभे केले जाते व जेव्हा तो न्यायाधीशाकडे बघतो तेव्हा तो खूप आनंदीत होतो कारण न्यायाधीश दुसरा कोणी नसून ज्याने त्याला लहानपणी बुडताना वाचवले होते तोच व्यक्ती असतो. न्यायाधीश त्याचा न्याय करतो व सांगतो, "तुला मरण दंडाची शिक्षा सुनावली जाते, कारण तू खूप गुन्हे केले आहेत."
तो मुलगा हे सर्व ऐकून जोरजोरात ओरडत न्यायाधीशाला सांगतो, "मी तोच मुलगा आहे ज्याला आपण वाचवले होते आणि आज तुम्ही मला मरण दंडाची शिक्षा देता?" तेव्हा न्यायाधीश त्या मुलाला सांगतो "जेव्हा मी तुला वाचवले होते तेव्हा मी तुझ्याकडे मसिहा बनून आलो होतो व आज तुझा न्याय करावयास एक न्यायाधीश म्हणून तुझ्यापुढे बसलेलो आहे; आजचा दिवस हा तुझ्या न्यायाचा दिवस आहे(Judgment Day). तू केलेल्या कृत्यांचा अशाप्रकारे न्याय होणे हे माझ्या दुष्टीनेच नव्हे तर परमेश्वराच्या व समाज्याच्या दुष्टीने योग्य आहे."
मनन चिंतन:
जगात जन्माला आलेल्या सर्व गोष्टींचा कधी तरी अंत होतोच. जरी आपल्याला  जगाचा अंत किंवा शेवट माहित नसला तरी एका दिवशी आपल्याला  ह्या जीवनाचा अंत जरूर होणार आहे आणि धरतीवरील आपल्या  ह्या जीवनाचा शेवट होणार आहे ह्याची मला खात्री आहे. मनुष्याला जेव्हा स्वत:च्या जीवनाच्या अंताची जाणीव होते तेव्हा मरणाव्यतिरिक्त आपल्या मनात दुसरे कोणतेही विचार येत नसतात. आपण मरणास घाबरतो; कारण आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे जगत नसतो. आजची उपासना आपल्यास ह्या दिवसाची आठवण देते कारण आजच्या उपासनेत आपण सेनाधीश प्रभूच्या दिवसाबद्दल ऐकतो. येशुख्रिस्त आपल्या समोर दोन काळाचे वर्णन करतो. ह्या दोन्ही काळामुळे आपल्या जीवनात एक नवीन वळण (U-Turn) येते.
येशूख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे आपणा सर्वांच्या जीवनात हे दोन्ही काळ अनुभवण्यास मिळतात. दैनंदिन जीवनात आपण वर्तमान काळात जगत असतो प्रत्येक दिवशी सुर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यत आपण अनेक अडी-अडचणीना, समस्यांना किवा वाईट विचारांना बळी पडत असतो. अशावेळी आपण स्वत: आपले जीवन निवडत असतो. मानवी जीवन हे पापांमुळे विध्वंस होत असते; म्हणूनच अनेक ठिकाणी किंवा आपल्या जीवनात आपणास सर्वत्र अंधकार सापडतो, जीवन नकोसे होते, ह्या सर्व गोष्टींचा नाश प्रभुने सांगितल्याप्रमाणे प्रभूच्या दिवशी होईल. आपल्या कृत्याप्रमाणे आपण तोळले जाऊ आणि जर आपल्या पापांचे पारडे जड झाले तर आपल्याला ह्या दिवसात आगीच्या भट्टीला सामोरे जावे लागणार. ह्या न्यायाच्या दिवसानंतर प्रभूचा काळ ह्या सृष्टीवर राज्य करील. ह्या काळात सर्वत्र शांती, प्रेम व समेट ह्या गुणांच्या बागा फुलतील. सर्व लोक शांतीच्या मार्गावर चालतील; परंतु ह्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी आपणास आतापासूनच कष्ट करायला लागतील. आपल्याला आजच आपल्या कामास सुरवात करायला लागेल. असिसीकर संत फ्रान्सिस म्हणतात, "अजूनपर्यत आपण काहीच केलेले नाही, आता लागलीच सुरवात करुया." संत पौल व असिसीकर संत फ्रान्सिस ह्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या वाटयाचे काम करून प्रभूच्या दिवसाचे स्वागत करण्यास सज्ज व्हायला पाहिजे म्हणजे जेव्हा हा दिवस येणार तेव्हा प्रभूच्या काळाचा अनुभव घेण्यास व प्रभूचा काळ आत्मसात करण्यास आपण सर्वदा पात्र ठरू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, तुझ्या शांतीचा काळ पाहण्यास आम्हाला पात्र कर.
1. आपले परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी ह्यांच्यावर प्रभूचा आशिर्वाद सतत राहावा व प्रभूचे कार्य करण्यास त्यांची  श्रध्देत वाढ व्हावी; तसेच प्रभूच्या काळासाठी त्यांनी सर्व प्रापंचिकांना सज्ज होण्यास सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
2. दु:ख, कष्ट, आजारपण, कठीण कसोटीच्या प्रसंगांनी त्रस्त झालेल्या लोकांना त्यांचे दु:ख सहन करण्यासाठी धैर्य आणि सहनशक्ती दे. जेणेकरून ते सदैव तुझ्या काळाचे आगमन करण्यास जागृत राहतील म्हणून आपण प्रार्थना करू या.
. आमच्या धर्मग्रामातील सर्व लोकांनी पदोपदी, क्षणोक्षणी त्यांच्या जीवनातील तुझे अस्तित्व ओळखावे व तुझ्या मार्गावर तसेच तुझ्या शब्दाप्रमाणे जीवन जगण्यास प्रयत्त्न करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
. जगातील सर्व मिशनरी बंधु भगिनींना कृपा, आशिर्वाद आणि मार्गदर्शन मिळावे व देवाने त्यांचे सर्व वाईटापासून आणि अडीअडचणी पासून रक्षण करावे तसेच प्रभूच्या प्रेमाचे बीज त्यांनी सर्वत्र पेरावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया

9 comments:

  1. Congrates Chris! well done and inspiring Homily. God bless you

    ReplyDelete
  2. great work brother, keep doing

    ReplyDelete
  3. chris good inspiring thoughts

    ReplyDelete
  4. hi Chris nice homily inspiring thoughts... keep it up........

    ReplyDelete
  5. Chris very good thoughts. It will help me to prepare my homily well. Well done. Keep the spirit going. I know you will do well.

    ReplyDelete
  6. good work............. keep it up bro.

    ReplyDelete
  7. Bravo, well done, keep it up.

    ReplyDelete