Wednesday 22 July 2015

Reflections for the homily: By Dominic Brahmane












सामान्य काळातील सतरावा रविवार




दिनांक: २६/०७/२०१५
पहिले वाचन: राजे ४:४२-४४.
दुसरे वाचन: इफिसीकरांस पत्र ४:१-६.
शुभवर्तमान: योहान ६: १-१५.


प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील सतरावा रविवार तसेच संत जोकीम आणि आन्ना ह्यांच्या सणानिमित्ताने मातृ-पितृ दिन आणि आजी-आजोबांचा सन्मान दिन साजरा करीत आहोत.
     पहिल्या वाचनात एका सद्गृहस्थाने आणलेल्या जवाच्या वीस भाकरी आणि काही कणसे शंभर माणसांस पुरून उरल्या ह्या देवाने एलिशाद्वारे केलेल्या चमत्काराविषयी आपण ऐकतो. इफिसीकरांस पाठविलेले पत्र ह्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास ख्रिस्ती ऐक्याची मुलतत्वे म्हणजेच नम्रता, सौम्यता व सहनशीलता यांद्वारे एकमेकांना प्रीतीने वागवून ऐक्य टिकून ठेवण्यास आवाहन करत आहे. तर शुभवर्तमानात योहान, येशूने पाच भाकरी व दोन मासे यांद्वारे पाच हजारांना दिलेल्या भोजनाचे वर्णन करीत आहे.
आपल्या हातात असलेले थोडके हे देवाच्या हातात अधिक असते फक्त आम्ही ते त्याला देण्याची तयारी दर्शिविली पाहिजे. ह्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना इतरांच्या गरजा जाणून घेऊन त्यांना मदत करण्याचे वरदान परमेश्वराने आम्हाला द्यावे म्हणून प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: राजे ४:४२-४४.

ह्या उताऱ्यात एलिशा संदेष्ट्याने केलेल्या बऱ्याच चमत्कारांपैकी एका चमत्काराची नोंद केलेली आहे; एलीशाने केलेले चमत्कार व त्याची किर्ती ऐकून बरेच लोक त्याला गुरु मानत असे. त्यामुळे त्याच्या शिष्यांची संख्या शंभराहून अधिक वाढत होती. जेंव्हा एका उदार व्यक्तीने त्यांच्या शेतातून नुकतीच काढलेली धान्याची कणसे आणि वीस जवाच्या भाकरी देऊ केल्या तेंव्हा त्या सगळ्या शिष्यांना पुरणार नाही ही त्याची स्वाभाविक समजून होती. तरीही एलिशा संदेष्ट्याच्या चमत्काराने ती त्यांना पुरवून उरली.
     ख्रिस्तसभा हा एलीशाने केलेला चमत्कार येशूने पाच हजारांना दिलेल्या भोजनाच्या बरोबरीत मांडत आहे. ह्याचा अर्थ एवढाच की, जुन्या करारात जे काही घडले किंवा आपणास वाचावयास मिळते हे नवीन करारातील तारणाऱ्या मसिहाची संकेत सुची होत. देवाने त्याच्या पुत्राच्या पृथ्वीवरील आगमनाची पूर्वतयारी त्याच्या संदेष्ट्यांद्वारे केली होती.

दुसरे वाचन: इफिसीकरांस पत्र ४:१-६.

     ह्या उता-यातून संत पौल ख्रिस्ती धर्मात सामावलेले ऐक्याचे मुलभूत पैलू मांडत आहे.
१) आपण एकशरीर/एकदेह असे आहोत.
ख्रिस्तसभा हे शरीर व ख्रिस्त त्याचे मस्तक आहे. ख्रिस्ताचे कार्य ख्रिस्तसभेत(चर्च) दिसून यावे असे वाटत असेल तर ख्रिस्तसभेने ऐक्याची कास धरली पाहिजे आणि ह्या ऐक्याचा पाया भक्कम करण्यासाठी आपण ख्रिस्ताने शिकविलेल्या प्रीतिवर अवलंबून असायला हवे; तरच आपण एक शरीर असे होऊ शकतो.
२) आपण एक आत्मा असे आहोत
ग्रीक भाषेतील ‘pneuma’ (न्युमा) ह्या शब्दाचा अर्थ ‘आत्मा’ किवा ‘श्वास’ असा होतो. श्वासोच्छवासाविना शरीरात प्राण असूच शकत नाही. जसे श्वासोच्छवासाशिवाय शरीरात प्राण नसतो. तसेच जर ख्रिस्तसभेत पवित्र आत्मा वास करत नसेल तर ती ख्रिस्तसभा अस्तिवात असूच शकत नाही. पवित्र आत्मा आपणाला प्रार्थनेतून प्राप्त होत असतो.
३) आपल्या पाचारणात एक आशा(उमेद) आहे.
आपणा सर्वांचे ध्येय एक असणे हे आपल्या ख्रिस्तीधर्मातील ऐक्याचे गुढ आहे. आपले विचार पद्धती संकल्पना कार्यशैली विचारसरणी जरी वेगवेगळी असली तरीही आपण एकाच ध्येयाकडे वाटचाल करत असतो आणि ते म्हणजे तारणकर्त्या ख्रिस्तात जगाला एकरूप करून घेणे.
४) आपला एकच स्वामी आहे.
पहिल्या ख्रिस्तीसमूहाने प्रेषितांच्या विश्वासांगीकारात सलग्न असे वाक्य नमूद केले आहे, ‘ख्रिस्त आमचा स्वामी आहे’ (फिलीप २:११). संत पौलाला प्रगटीत झाले की, अखिल मानवजातीने एक दिवशी ख्रिस्त हा सर्वांचा स्वामी आहे हे स्विकारावे. ग्रीक भाषेत स्वामी ह्या शब्दाला जोडून ‘kurios’ हा शब्द वापरला जातो. ह्यास दोन अर्थ प्राप्त झालेले आहेत.
अ) चाकराचा धनी (मालक)
ब) रोमन अधिपतीच्या सत्ते पासून वेगळी असलेली प्रतिमा.
सर्व ख्रिस्ती बांधव एकरूप आहेत कारण आपणा स्वत:ला ख्रिस्ताच्या सेवेत समर्पित करून घेतले आहे.
५) आपला विश्वास एक आहे.
पौलाचा म्हणण्याचा अर्थ असा नव्हता की, ख्रिस्ती समाजामध्ये फक्त एकच creed(विश्वासांगीकार) आहे. नव्या करारात विश्वासू श्रद्धा म्हणजे ख्रिस्तासाठी समर्पित जगणारे ख्रिस्ती. समर्पित जीवन जगण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात परंतु येथे सांगितल्याप्रमाणे स्व-समर्पण हे आपणामधील साम्य आहे आणि तेच आपले ध्येय असावे.
६) आपला बाप्तिस्मा एक आहे.
पहिल्या ख्रिस्त मंडळीमध्ये प्रौढ बाप्तिस्मा  दिला जाई कारण, बर्स्कॅसे विधर्मी लिल ख्रिस्ताला व ‘ख्रिस्ती विश्वास ‘ त्यांच्या प्रौढावस्थेत असतना स्वीकारत असे असल्या कारणाने बाप्तिस्मा हा लोकांसमोर समवेत ख्रिस्ताला स्वीकारल्याची साक्ष देण्याची एक प्रथा होती. रोमन सैनिकाला सैन्य भारती होण्यासाठी ‘तो त्यांच्या राजाशी अधिपात्यची एकनिष्ठ असेल’ अशी शपथ घेई. अगदी त्यच प्रकारे ख्रिस्ती धर्मात समाविष्ट होण्यासाठी लोकांसमोर ख्रिस्ताला स्वीकारण्याची साक्ष देण्याची प्रथा त्याकाळी रूढ होती.
७) देव एकच आहे.
 देव एक असल्याचे विशेष गुण संत पौल खालील प्रमाणे मांडतो.
अ)  देव सर्वांचा पिता आहे :
     ह्यात देवाने आपल्यावर केलेल्या प्रेमाचे गूढ रहस्य आहे. ख्रिस्ती धर्मात देवाचे महात्म्य, त्याचे राजेपण, न्यायाधिशत्व यामध्ये नाही, तर ‘पिता’ या शब्दात सामावलेले आहे. म्हणूनच ख्रिस्ती धर्मात हि कल्पना त्याच्या प्रेमात सामावलेली आहे.
आ) तो सर्वाधिपती आहे.
देव सर्व नियंत्रित करतो पूर व महापूर येतात परंतु ‘देवाचे त्या प्रलयावर नियंत्रण असते; त्याचे त्यावर वर्चस्व असते’ कारण तो सर्वोच्च आहे. (स्तोत्र.२९.१०)
इ) तो सर्वामध्ये वसतो.
देवाने ही सर्व सृष्टी फक्त एका घड्याळाला चावी दिल्याप्रमाणे आपोआप चालण्यासाठी निर्माण केलेली नाही, तर तो प्रत्येक घटकांमध्ये वास्तव्य करतो. त्याचा अंश सृष्टीच्या कणाकणांत आहे.
‘stoic’ नावाच्या विचारवंतानी देवाविषयीची कल्पना एका शुद्ध, परिपूर्ण(purer) अग्निसारखी होती. ती अग्नी व पृथ्वीवरील अग्नी यात असाम्य किंवा विसंगती त्यांच्या कल्पनेनुसार ते मानतात.  आपला ख्रिस्ती विश्वास असा आहे कि, आपण सर्व देवा-निर्मित देव-नियंत्रित, देव-रसित व देवाने परिपूर्ण केलेल्या सृष्टीत किंवा जगात राहतो वावरतो.

शुभवर्तमान:

     येशूने केलेल्या बेथसैदा येथील चमत्काराबद्दल आपल्याला परिपूर्ण अशी क्वचितच माहिती मिळते. पवित्र शास्त्रात नैपुण्य मिळविलेले तत्वज्ञानी विल्यम बार्क्ले यांनी मांडलेल्या विचारातून आपण थोडक्यात जाणून घेऊया.
अ) साधारणत: हा येशूने केलेला चमत्कार होता असे आपण मानू शकतो. जिथे येशूने पाच भाकरी आणि दोन माश्याद्वारे पाच हजारांना भोजन दिले. काही विचारवंत याच्याशी सहमत नाहीत कारण ते म्हणतात (मत्तय:४:३,४) मध्ये येशूने त्याला झालेल्या भोजनाच्या मोहाची  तो पुनरावृत्ती का करेल?
आ) कदाचित हे येशूचे सामुदायिक भोजन असेल कारण या पूर्ण अध्यायात येशु शेवटच्या भोजनाविषयी त्याच्या शिष्यांशी संवाद करत आहे आणि तो ‘माझे शरीर सेवन करा व रक्त प्या’ असेही म्हणतो. सामुदायिक भोजनात जसे आपण एकत्र येतो अगदी त्याचप्रकारे येशूला येथे जमलेल्या सर्वांबरोबर हे साक्रमेंतातील भोजन घेऊन त्याच्या दैवीपणाचे सत्य त्याला लोकांसमोर मांडायचे असेल. म्हणून ह्या दैवी भोजनाद्वारे त्यांची हृदये मने तृप्त झाले.
इ) दुसरे विश्लेषण देऊन ते म्हणतात कि, नऊ मैलांचा प्रवास करून आलेल्या लोकांकडे जेवावयास काही उरले नव्हते. त्यातील काहीजण यात्रेकरुंप्रमाणे स्वत:कडे असलेल्या जेवणाच्या सोयीची तरतूद करून आले असतील. परंतु मानवी स्वार्थापोटी ते त्यांनी इतरांना देऊ केले नसेल व स्वत:साठी त्याचा साठा केला असेल येथे येशूने त्यांचा स्वार्थीपणा पाहून स्मितहास्य केले व त्याचा अर्थ त्या लहान बालकाला समजला असावा. म्हणून त्याने उदार हस्ते ते येशूला देऊ केले. तत्काळ त्या मुलाचा उदारपणा, निस्वार्थीपणा पाहून इतरांनीही स्वत:कडे असलेले भोजनाचे गाठोडे एकमेकांबरोबर वाटून घेतले म्हणून येथे खऱ्या सामुदायिक भोजनाचा अनुभव सर्वांना आला व हा त्यांच्या जीवनात केलेला मोठा चमत्कार असावा. हा चमत्कार घडून येण्यामागे येशुबरोबर व खालील विशेष व्यक्तींचा सहभाग होता.
१)आंद्रिय   २) लहान मुलगा
१) आंद्रिय :
फिलीप आणि आंद्रिय मध्ये येथे विसंगती दिसून येते. येशूने जेंव्हा लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी फिलीपला विचारले, तर फिलिपने नकारात्मक उत्तर देऊन म्हटले, ‘अश्या ह्या जागेत कसलीच उपलब्धता होणार नाही’ तर आंद्रिय सकारात्मक उत्तर देत म्हटला, ‘मी जे काही शक्य होईल ते आणण्याचा प्रयत्न करतो आणि बाकी सर्व येशूवर सोपवतो. खरा पाहता आंन्द्रीयनेच त्या बालकाला येशूकडे आणून त्यास त्याच्याकडे असलेले पाच भाकरी व दोन मासे सुपूर्त करावयास सांगितले होते. येशूकडे येणारा प्रत्येक व्यक्ती बालक त्याच्या स्वर्गराजासाठी तो समर्थ करून घेतो आणि येशूच्या प्रेमाने तो व्यक्ती, बालक परिपूर्ण होत असतो.
२) लहान मुलगा:
त्या लहान मुलाकडे फारसे काही नव्हते तरीही त्याने त्याच्या मनाची उदारता दाखवून होते नव्हते ते येशूला अर्पण केले आणि त्यामुळेच स्वत:कडची येशूने त्याचे चमत्कारात रुपांतर केले असावे. येशूला आपल्या अश्याच औदार्याची गरज आहे.

बोधकथा:
१. एक साधू-भिक्षुक भिक्षा मागण्यासाठी एक लहानश्या खेड्यातून फिरत होता. दारोदार फिरल्यानंतर एका झोपडीसमोर येऊन त्याने भिक्षेसाठी त्याची झोळी पुढे केली. तितक्यात एक लहान बालक त्या झोपडीतून बाहेर येऊन त्या साधुस म्हणाला, ‘साधू महाराज आमच्या घरात कोणीही नाही आणि घरातही तुम्हाला देण्यासारखे काहीच नाही म्हणून मला क्षमा करा’. परंतु त्या बालकास त्या साधूने सांगितले कि, ‘ठीक आहे, परंतु तू मला तुझ्या अंगणातील माती गोळा करून माझ्या झोळीत टाक’. त्या लहान बालकाने त्या साधूच्या म्हणण्याप्रमाणे केले. तद्नंतर ते साधू पुढे चालू लागले. हा सर्व प्रकार बाजूलाच उभ्या असलेल्या सद्गृहस्थाने पाहिला होता. मनातील शंका म्हणून त्या साधुस त्या बालकाला झोळीत माती टाकल्याचे कारण विचारले. त्यावर त्या सद्गृहस्थाच्या शंकेचे निरसन करत असत साधू-महाराज उत्तरले, ‘त्या बालकाने माझ्या झोळीत माती टाकली ह्याकडे पाहून नका, परंतु आज मी त्या बालकाला आपल्याकडे जे आहे ते इतरांना देण्याचा धडा शिकविला आहे’.
     आजच्या शुभवर्तमानातही त्या लहान बालकाने दाखविलेल्या पाच भाकरी व दोन माश्यांच्या उदारतेमुळेच येशु पाच हजारांना भोजन देऊ शकला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
२. एक मनुष्याला देवाने मंदिरात सेवा करत असता प्रगट होऊन म्हटले, ‘तू फार भक्तीवान मनुष्य आहेस म्हणून मला तुझ्या घरी तुला भेटायला यायचे आहे’.  त्या मनुष्याला अतिशय आनंद झाला. दुसऱ्या दिवशी देव घरी येणार म्हणून त्याने सर्व घर स्वच्छ केले. चांगले खाद्यपदार्थ तयार करून ठेवले व देवाच्या आगमनाची वाट पाहत दाराशी उभा ठाकला.
हे सर्व चालू असताना, एक भिकारी थंडीने कुडकुडत त्याच्या दरवाजाजवळ आला व पांघरावयास काहीतरी मिळावे म्हणून विचारपूस केली, परंतु त्या व्यक्तीने त्या भिकाऱ्यास हिणवून तेथून हाकलून दिले. दुसऱ्या वेळेस तेथे एक स्री  आपल्या लहान बालकासामवेत काहीतरी खावयास मिळावे म्हणून त्याला विचारले. परंतु त्याने त्यांनाही हाकलून लावले. असे करत असता सायंकाळ झाली, रात्र झाली व देवाच्या आगमनाची वाट पाहून कंटाळून गेलेला मनुष्य झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा त्याने देवाला त्याचे न येण्याचे कारण विचारले तेंव्हा देव त्यास म्हणाला, ‘मी दोन वेळा तुझ्या घरी, एकदा भिकाऱ्याच्या रुपात काहीतरी पांघरावयास मिळावे म्हणून आणि एका स्रीच्या रुपात काहीतरी खावयास मिळावे म्हणून आलो परंतु तू मला दुजोरा दिला नाही याउलट मला हाकलून लावलेस’. त्यावर तो मनुष्य दु:खी झाला व देवाची त्याने क्षमा मागितली.
प्रभू येशु म्हणतो, ‘करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी’.

मनन चिंतन:

   ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे; घेणाऱ्याने घेता घेता, देणाऱ्याचेच हात व्हावे’. आपण दिलेल्या दानांची आपल्याला झळ बसेपर्यंत आपण देत रहावे, असे धन्यवादीत मदर तेरेसा म्हणतात. आजच्या तीनही वाचनातून आपल्याला गरजवंताना मदत करण्यास पाचारण केले जात आहे. संत आंद्रीयाने आणलेल्या त्या लहान बालकाकडे अगदी त्याच्यापुरते पुरेसे होईल इतकेच होते परंतु त्याने ते इतरांच्या हितावह देऊ केले. कदाचित त्याला कल्पना असेल कि, येशूकडे या दोन मासे व पाच भाकरीचे स्वरूप पाच हजारांना देण्याइतके नक्कीच आहे किंवा ते करण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे. पहिल्या वाचनातही असाच चमत्कार देवाने एलीशाद्वारे घडवून आणला; एलीशाने वीस जवाच्या भाकरी शंभर लोकांना पुरवल्या आणि ह्याचीच पुनरावृत्ती आज येशू शुभवर्तमानात करत आहे.
     बायबलच्या अभ्यासकांकडून आपणास कळते कि, येशूला भेटण्यासाठी आलेले लोक कपर्णाहुम ते बेथसैदा असा नऊ मैलांचा प्रवास करून आले होते. साहजिकच प्रवास करून ते थकले असतील आणि भुकेलेही झाले असतील म्हणून येशूने ‘आधी पोटोबा मग विठोबा’ ह्या उक्तीप्रमाणे त्यांना जेवणाची व्यवस्था करावयास सांगितले. येशूने प्रथमत: फिलिपला विचारले, कारण तो बेथसैदामधील रहिवासी असल्या कारणाने, त्याला तेथील भोजन उपलब्धता ठाऊक असावी. फिलिपने सर्व अंदाज लावला असता येशूला नकारात्मक उत्तर दिले. तो म्हणाला सर्वांना जेवण देण्यासाठी एका व्यक्तीच्या सहा महिन्याच्या पगारेतके आहे (थोडक्यात २००/२५० रु.). असे असता येशूचा दुसरा शिष्य आंद्रीयने काहीतरी उपलब्धता शक्य होईल या हेतूने सकारात्मक उत्तर देत, एका लहान बालकाला येशूकडे आणले. त्या बालकाने कसलीही आगेकूच न करता स्वत:कडे असलेली पाच भाकरी व दोन मासे येशूला चमत्कार करण्यासाठी सुपूर्त केली.
     आपण येशूकडे बऱ्याचदा रिकाम्या हाताने येतो आणि त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा आशा धरतो. याउलट आपण देवाला आपल्याकडे जितके आहे तितक्यात भर घालावयास विनंती करायला हवी. कारण येशु म्हणतो ज्याच्याकडे आहे त्याला दिले जाईल व ज्याच्याकडे नाही त्याच्याकडून जे आहे ते देखील काढून घेतले जाईल. आपल्या कडे असलेल्या गोष्टी इतरांच्या भल्यासाठी त्यागने ही प्रेमाचीच एक परिभाषा आहे. म्हणूनच पहिल्या वाचनात संत पौल म्हणतो, ‘एकमेकांना प्रेमाने वागवा; कारण आपल्या देवाने आपल्याला एका विश्वासात, एका बाप्तीस्म्यात व एक शरीराचे बनविलेले आहे आणि आपला मस्तक प्रभू येशु ख्रिस्त होय’. 
बायबलमध्ये आणि आजच्या समाजामध्येही उदरातेविषयक आपल्याला खालीलप्रमाणे तीन प्रकारच्या व्यक्ती आढळून येतात.
१) त्यांच्याकडे आहे पण ते इतरांना देण्यास ते आगेकूच करतात.
उदा. साफिरा आणि तिचा पती (प्रे.कृत्ये ५) ह्यांनी प्रेषितांना न कळवता त्यांच्या जमिनीचा हिस्सा विकला व इतरांना न देता तो स्वार्थी होऊन स्वत: जवळ ठेवला. मदर तेरेसा म्हणतात की, ‘आज आपल्या समाजात गरीब आणि दारिद्र्य आढळते कारण श्रीमंत लोक स्वार्थी आहेत आणि ते त्याची धनसंपत्ती इतरांशी वाटून घेत नाही’.
२) हे लोक इतरांना देतात परंतु त्याचा मोबदला मागतात.
उदा. शास्त्री आणि परुशी. नेते, पुढारी. हे इतरासमोर दान देण्याचे सोंग करतात परंतु त्यामागचा त्यांचा हेतू फक्त स्वत:ची उंचावलेली प्रतिमा पाहण्याचा असतो.
३) स्वत:ला झळ बसेपर्यंत, पुढचा मागचा विचार न करता सढळ हाताने इतरांना मदत करतात.
उदा. आजच्या शुभवर्तमानातील लहान मुलगा, बायबल मधील विधवेचे दान.
खरोखर आम्हाला जेव्हा एकमेकांच्या गरजांची जाणीव होते तेव्हा तेथे देवाचे राज्य प्रस्थापित हेओते असे निक्षून सांगता येईल. २०११-१२ च्या N.G.O. वार्षिक अहवालानुसार ८५० कोटींपेक्षा जास्त लोक उपाशी पोटी झोपतात आणि प्रत्येक सेकंदाला १ मुल भूकेपोटी मरण पावते.  एकीकडे अधाशीपणाने सेवन करून लोकांना लट्ठपणा वाढत आहे न बरे होणारे आजार आहेत तर दुसऱ्या बाजूला भुकेने व्याकूळ होऊन प्राण साडणारी गरीब जनता दिसत आहे. आज जर आम्ही एकमेकांना मदत केली नाही आपल्याकडे असलेले अन्न इतरांना देऊ केले नाही तर येशु आपल्या स्वर्गप्रवेशागोदर (मत्तय २५:३५) प्रमाणे म्हणेल, ‘मी जेंव्हा भुकेला होतो, तेंव्हा तुम्ही मला ख्वयास दिले नाही, उघडा होतो तेंव्हा पांघरावयास दिले नाही म्हणून तुम्ही आता मरणदंडास पात्र आहात.
जगविख्यात तत्वज्ञानी सोक्रेटस म्हणतात, ‘the fewer the wants the nearer we resemble God’ म्हणून स्वत:चा चोचलेपणा कमी करून आपल्या संपत्तीत गरीबांचाही( भूकेलेल्याचा) वाटा आहे असे समजून एकमेकांस मदत करण्यास देऊळ माता आज आपल्याला आमंत्रण करीत आहे. त्यासाठी लागणारी विशेष कृपा ह्या मिस्साबलीत मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो एकमेकांना मदत करण्यास आम्हाला तुझी कृपा लाभू दे.
१) आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ यांना प्रभुने त्याच्या कृपेचे साधन बनवावे व त्यांनी त्यांच्या हातात सोपवलेल्या ख्रिस्ती जनतेची आध्यात्मिक भूक भागवावी म्हणून आपण प्रार्थना  करूया.
२) आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक आहेत, ज्यांना एकवेळचे पुरेसे जेवण मिळत नाही अशा लोकांची शारिरीक तहान भूक भागवण्यासाठी अनेक उदार जनतेने पुढे यावे म्हणून आपण प्रार्थना  करूया.
३) बरेच युवक युवती त्यांच्या शिक्षणायोग्य नोकरीच्या शोधात इतरत्र भटकत आहेत, ह्या युवकांची हाक प्रभूच्या कानी पोहोचावी व त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी मिळावी म्हणून आपण प्रार्थना  करूया.
४) भारतात व महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पावसाची उणीव भासत आहे; प्रभुने त्याची कृपादृष्टी आंम्हाकडे एकवार वळवून पर्जन्यवृष्टी करावी म्हणून आपण प्रार्थना  करूया.
५) आपल्या धर्मग्रामातील सर्व वयस्कर, आजारी, वयोवृध्द आजी-आजोबांना प्रभूच्या दैवी हातांचा स्पर्श व्हावा आणि त्यांना त्यांच्या वेदना सहन करण्यास शक्ती प्रदान करावी म्हणून आपण प्रार्थना  करूया.
६) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतू प्रभूचरणी मांडूया.






No comments:

Post a Comment