Monday 21 March 2016

Reflections for the homily of Easter Vigil  (26/03/2016) By: Minin Wadkar.







पुनरुत्थित रविवार

‘जागरण विधी’







दिनांक: २६/०३/२०१६.
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१अ
चौथे वाचन: यशया ५४:५-१४
पाचवे वाचन: यशया ५५:१-११
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११
शुभवर्तमान: लूक २४:१-१२.


'व्यर्थ न हो बलिदान '






आजच्या या विधीचे चार मुख्य भाग आहेत.
पहिला भाग: प्रकाश विधी:
प्रकाश अंधकार नाहीसा करतो. याच प्रकाशाचे चिन्ह म्हणून पुनरुत्थित येशूला आपण जगाचा प्रकाश आहे असे घोषित करतो.
दुसरा भाग: प्रभूशब्दविधी:
देव साऱ्या सृष्टीचा निर्माता आहे. त्याचे प्रेम अपार आहे. ह्याच प्रेमाचा उल्लेख आज आपल्याला जुन्या व नवीन करारातील निवडक वाचनाद्वारे कळून येते.  
तिसरा भाग: पाण्याला आशीर्वाद:
या विधीत बाप्तीस्म्यासाठी लागणाऱ्या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. बाप्तिस्माद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याचे वरदान प्राप्त होते.

प्रास्ताविक:
      
      प्रिय ख्रिस्त भाविकांनो, हि रात्र आहे प्रकाशाची, हि रात्र आहे दिव्य तेजाची. हा प्रकाश व दिव्य तेज आहे पुनरुस्थित येशू ख्रिस्त, ज्याने मरणावर विजय मिळविला आणि आम्हांला पाप मुक्ती दिली. येशूचे क्रूसावरील मरण हे व्यर्थ गेले नाही तर त्या क्रुसावर टांगण्यात आलेला येशू पुनरुत्थित झाला आणि ह्याच क्रूसाला आपण मानवंदना करतो आणि येशूला आपण आपला तारणारा घोषित करतो. या शुभ प्रसंगी ख्रिस्तसभा सर्वांना जागरण व प्रार्थना करण्यासाठी एकत्र बोलावीत आहे. येशूच्या शब्दावर व त्याने केलेल्या दैवी चमत्कारावर आपण विश्वास ठेऊया आणि त्याच्या बरोबर शाश्वत जीवन जगण्यासाठी प्रवास सुरु करूया.

सम्यक विवरण: 

       आजचा विधी हा ‘पास्काचा जागरण विधी’  म्हणून ओळखला जातो. हे नाव व दिवस यहूद्यांच्या पास्काच्या सणावरून देण्यात आलेले आहे.
अ)जुन्या करारातील सात वाचनांद्वारे आपल्याला देवाने मानवाच्या जीवनासाठी व कल्याणासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींची ओळख करून देतात. देव जगाची निर्मिती करून तो मानवास आपल्याच प्रतीरुपाप्रमाणे निर्माण करतो व त्याच्या हातात साऱ्या सुष्टीची   देखरेख करण्याची जबाबदारी सोपवितो. पाप मानवाला देवापासून दूर नेते. परंतु देव मानवाच्या तारणासाठी संदेष्टे पाठवून मानवास आपल्या जवळ आणतो. मानवाने केलेले पाप व देवाने मानवाची केलेली पापातून मुक्तता यांची पुनरावृत्ती या वाचानांद्वारे होते.
ब) संत पौलाचे रोमकरांस पत्र ह्याद्वारे सर्व ख्रिस्ती बांधवाना प्रभूमध्ये जीवन जगण्यास सांगत आहे. तो म्हणतो, “स्नानसंस्काराद्वारे, प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्तामध्ये मरतो व ख्रिस्ताद्वारे पुनरुत्थित होतो.” त्याचे सर्व जीवन हे ख्रिस्तात सुरु होते व ख्रिस्तामध्येच संपते. ख्रिस्ती लोकांनी आपले जीवन चांगल्या रितीने जगावे व त्यांनी कुमार्ग सोडून ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार चालावे म्हणून पौल सांगत आहे. तो म्हणतो, स्नान संस्काराद्वारे मानवाने आपला पूर्वीचा कुमार्ग सोडावा व तो अशाप्रकारे सोडावा कि, त्याने जणू म्हणावे मी पापासाठी मेलो आहे. स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक व्यक्ती देवाचे लेकरू होत असते.
क) लुकलिखीत शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी ऐकतो. यहुदी लोक मृत व्यक्तीस काळजीपूर्वक दफन करीत असत. विविध गंधरस लावून ते प्रेतास जपत असत. शब्दाथ दिवस आड आल्याने प्रभू येशूचा मृतदेह घाईत दफन केला गेला होता. या कारणामुळे स्त्रियांना यहुदी रीतीप्रमाणे गंधरस लावता आले नव्हते. ह्यासाठीच त्या भल्या पहाटे ही उत्तरक्रिया पूर्ण करण्यासाठी थडग्यापाशी गेल्या होत्या. परंतु त्यांना येशू ख्रिस्ताचे शरीर सापडले नाही. येथे लुक, स्त्रिया आणि लखलखीत वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष यांच्यात झालेल्या येशूच्या पुनरुत्थानाविषयीच्या संभाषणाबद्दल सांगतो. पुढे स्त्रियांनी कबरेपासून परत येऊन अकरा प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना येशूच्या पुनरुत्थानाविषयी सांगितले.   

बोथकथा:

रोहिणी सरकार ही साहवीत शिकणारी मुलगी. घरातील आर्थिक परिस्थिती हलाकीची होती. वडील तुटपुंजा पगारावर काम करत होते. नववीत शिकणाऱ्या मोठ्या भावाची एक किडनी पूर्णत: निकामी झालेली तर दुसरी त्याच वाटेवर. आठवीतील मोठी बहिण मोणिका आणि रोहिणी यांच्या हुड्यांचे टेंशन डोक्यावर असलेल्या वडिलांचे डोळे अधू होत चाललेले होते. या सगळ्या समस्यावर रोहिणीने एक ‘जालीम’ उपाय शोधून काढला. आपण आत्महत्या केली, वडिलांना डोळे, भावाला किडनी देता येईल आणि हुड्यांचा खर्च वाचेल असे तिच्या डोक्यात आले. तिने आपल्या मनातील हा विचार मोनिकाजवळ बोलूनही दाखवला. मात्र तिने ही गोष्ट हसण्यावारी नेली. रोहिणी पूर्ण गांभीर्याने हा विचार करत होती, हे मोनिकाला तिच्या मृत्युनंतर समजले. रोहिणीच्या अचानक जाण्याने सगळ्या घराला धक्काच बसला होता. आणि त्यात भर म्हणून आपल्या अवयांचा भाऊ-वडिलांसाठी उपयोग व्हावा, अशी इच्छा व्यक्त करणारी तिची चिट्ठी मिळाली. आपल्या लाडक्या बहिणीचा आदर, सन्मान व आठवण ठेवण्यासाठी तीची ती शेवटची इच्छा पूर्ण करण्यात आली. आजूबाजूच्या लोकांनी रोहिणीच्या मरणाबद्दल दु:ख व्यक्त करून ‘मरणाने जग जिंकले, मरण जीवन देऊन गेले’ असे घोषित केले.  
‘ही आत्महत्या नव्हे तर देहदान होय’. आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी व त्यांचे ओझे हलके करण्यासाठी रोहिणीने स्वत:चा विचार न करता, सर्वस्व बहाल केले. ही कथा आत्महत्तेसाठी प्रवृत्त करत नाही तर दुसऱ्यांना आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्यासाठी प्रेरणा देते.
‘भावाला किडनी आणि वडिलांना डोळे मिळावेत अशी तिची इच्छा होती.’


मनन चिंतन:
‘ व्यर्थ न हो बलिदान ’

जीवनाची सुरुवात जन्माने होते आणि शेवट मरणाने. जन्माच्या वेळी पाळण्यात किंवा आईच्या कुशितील नवोदित बाळ रडत असते आणि आजूबाजूची माणसे मात्र आनंदाने गाणी गात असतात. तर मरणाच्यावेळी दफन भूमीजवळ एकत्र जमलेली माणसे, दु:खाचा तांडव मांडत असतात पण त्यावेळी मात्र शवपेटीतील मृत व्यक्ती गप्प निपचित पडलेली असते, केवढा हा विरोधाभास. ह्याचे कारण म्हणजे मेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होत नाही. कुठल्याही प्रकारचे मरण असो, युद्धातील मरण, आजारामुळे मरण, आत्महत्येचे मरण, नैसर्गिक आपत्तीने आलेले मरण, हे सर्व मरण, मरण असते.
‘ज्याप्रमाणे पेटती मेणबत्ती अचानक वाऱ्याच्या झोकाने विझुन जाते तसे मानवी जीवन हे कोणत्याही क्षणी संपू शकते, कारण मरण हे मरण असते आणि मरणावर आपला ताबा नसतो.’ आपल्याला एका महत्वाच्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे आणि ती म्हणजे मरण हे एक ‘मोठे बलिदान’ आहे. माणसाची खरी ओळख त्याच्या मरणानंतर होते. जिवंत असताना बऱ्याच हालअपेष्टा काढाव्या लागतात, त्याच हालअपेष्टांचे फळ चांगले असेल तर जीवन हे सदोदित फुललेले असते. असे म्हणतात की, ‘जीवन हे देवाचे दान आहे आणि जीवनात आपण जे काही करतो, ते आपले देवासाठी दान असते.’ आपण जे देवासाठी करतो ते नेहमी चांगलेच असते. म्हणूनच मरणानंतर आपलं बलिदान व्यर्थ न जाता त्या मरणाला एक नवीन जीवनाची पालवी फुटली पाहिजे. माणसाचे मरण अटल आहे. मरणापासून वाचविण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. कारण मरण हे मानवाच्या हातात नाही.
आज आपण येशू ख्रिस्ताच्या बलिदानाबद्दल विचार करीत आहोत. ख्रिस्ताचे क्रूसावरील बलिदान हे त्याचे ‘मरण’ होते. परंतु येशूचे मरण हे ख्रिस्ती लोकांसाठी शोकांतिका राहत नाही, तर एका शाश्वत सुकांतीकेची सुरुवात ठरते. कारण प्रभू येशु ख्रिस्त, देवाचा पुत्र, मरणानंतर तिसऱ्या दिवशी, मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला. यामुळे ख्रिस्ती धर्मामध्ये पुनरुत्थान सणाला महत्व प्राप्त झाले आहे. आणि हेच आम्ही आज ह्या शुभरात्री, मोठ्या विश्वासाने प्रकट करतो. संपूर्ण उपवासकाळ आणि विशेषत: पवित्र आठवड्यातील तीन दिवस म्हणजेच आज्ञा गुरुवार, उत्तम शुक्रवार आणि पवित्र शनिवार (पास्काची पूर्व संध्या) येशूच्या जीवनातील दु:खसहन, मरण आणि पुनरुत्थान या प्रमुख रहस्यावर प्रकाश झोत टाकून आपल्याला एक नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी आव्हान व प्रेरणा देतात.  
मानव जातीचे तारण करण्यासाठी प्रभू येशु या जगात आला आणि त्याच्या स्वर्गीय देवबापाची ओळख आपणास करून दिली. प्रभू येशु ख्रिस्ताने स्वत:च्या जीवनाद्वारे, आदर्श मानवी जीवन कसे जगावे याचा कित्ता आपल्याला दिला आहे. आणि हे त्याच्या त्यागी जीवनातून स्पष्ट होते. पुनरुत्थित नवजीवन प्राप्त करून घेण्यासाठी अथक परिश्रम, दु:ख, हालअपेष्टा, निंदा, अपमान यांसारख्या गोष्टीला येशूला सामोरे जावे लागले. ‘खरोखर आमच्या व्याधी व क्लेश त्याने आपल्या खांदी घेतले. खरे पाहता! तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हांस आरोग्य प्राप्त झाले’ (यशया ५३:४-५).
 संत नामदेव म्हणतात, -“निंदा स्तुती त्याला समान पै झाली! त्याची स्थिती आली समाधीला! माती आजी सोने ज्या बासे! तो एक निधान योगीराज!
ज्या येशूने आंधळ्यांना डोळस केले, मुक्यानं बोलकं केलं, पक्षघाताने आजारी असलेल्यांना चालतं केलं, कुष्ट रोग्यांना शुद्ध केले, मेलेल्यांना जिवंत केले, इतकच काय तर वादळालादेखील शांत केलं. पण एवढं चांगल कार्य करून सुद्धा येशूला मरणाची शिक्षा देण्यात आली. येशूच्या मरणाला कारणीभूत होते, ते म्हणजे येशूच्या काळातील मुख्य याजक, परुशी व शास्त्री; ज्यांनी नियमशास्त्राचा अभ्यास केला खरा परंतु ते त्याप्रमाणे वागले नाहीत. आपल्या सोयीनुसार त्यांनी त्याचा अर्थ लावला. येशु हाच देवाचा पुत्र आहे, ह्याचे आकलन ते करु शकले नाहीत. दुसरी गोष्ट त्यांना कळून चुकली होती की, येशुमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येणार. कारण तो लोकांना प्रवचन देत असे, सभास्थानात शिकवत असे व देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत असे. त्यामुळे जनसमुदाय येशूच्या मागे चालला होता. ह्याच कारणामुळे मुख्य याजक, परुशी व शास्त्री यांनी येशूचा नाश केला. परंतु येशू मरणातून उठला आणि आपल्याला नवजीवन दिले. म्हणूनच येशूचे बलिदान हे व्यर्थ बलिदान ठरू शकत नाही.
आज पर्यंत ह्या जगामध्ये अनेक राजे महाराजे, साधू-संत, महात्मे व महापुरुष होऊन गेले. परंतु फक्त प्रभू येशूने मरणावर विजय मिळविला. तो तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. मेलेल्यामधून ख्रिस्ताचे जिवंत उठणे या घटनेसारखी दुसरी अजब आणि महत्त्वाची घटना नाही. या विश्वाच्या उत्पत्तीपासून कधीच अशी घटना घडली नव्हती आणि घडणारही नाही. ख्रिस्त मेलेल्यातून उठला नसता, तर ख्रिस्ती धर्म अस्तित्वात आलाच नसता. ख्रिस्ती समाज किंवा लोकही नसते आणि मनुष्यांना तारणाची आशाही नसती. येशूच्या पुनरुत्थानानंतर येशूने वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांना दर्शन दिले हे आपल्याला बायबल मध्ये वाचवयास मिळते. उदाहरणार्थ: मग्दालीया मरिया (मार्क १६:९), अम्माउस वाटेवर दोन शिष्य (मार्क १६: १२), संत पौल दिमिष्काच्या वाटेवर असताना (प्रे. कृत्ये ९:३-८).
संत पौल सांगतो, ‘येशु प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबुल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल (रोमकरास पत्र १०:९). मृताला पुन्हा जिवंत करण्याची शक्ती येशुमध्ये आहे. नाईन गावातील विधवेच्या मुलाला येशूने जिवंत केले (लुक ७:११-१७). चार दिवस मृत अवस्थेत असलेल्या लाजरसला त्याने जिवंत केले (योहान ११:३८-४४). येशूने स्वत: मरणावर विजय मिळविला. म्हणून त्याच्या स्मरणार्थ आपणही मरणावर विजय मिळविणार असा विश्वास आज आपण सर्वांनी प्रकट करण्याची गरज आहे. येशूचे पुनरुत्थान ही जगाच्या इतिहासातील सर्वात महान घटना आहे. येशू देवाचा पुत्र आणि जगाचा उद्धारक आहे. हे त्याने मृत्यूतून पुनरुत्थित होऊन लोकांना पटवून दिले. त्याच्या पुनरुत्थानामुळे आपल्याला आजही सार्वकालिक जीवनाची आशा आहे.
भयभीत झालेल्या स्त्रियांना दोन पुरुषांनी विचारले की तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करिता ? तो येथे नाही, तर उठला आहे. मनुष्याच्या पुत्राला पापी जनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे (लूक २४:५-७) असे येशूने आधीच भाकीत केले होते. ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि आजही तो आपल्यामध्ये जिवंत असून कार्यरत आहे. प्रभू येशूचे क्रुसावरचे मरण हे मानवजातीसाठी केलेले सर्वोच्च बलिदान होय. ह्यामुळे आपल्याला पापांची क्षमा व परमपित्याच्या समीप पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला. आम्ही ख्रिस्ती आहोत याचा आपल्याला गर्व आहे. आजकाल आपल्या कार्याद्वारे आपण विविधरीत्या, विविध क्षेत्रात येशूचे कार्य प्रकट करत आहोत. हे कार्य करत असताना आपल्याला हाल अपेष्टा सोसाव्या लागतात. धार्मिक बंधू-भगिनी येशूच्या प्रेमापोटी आपले सर्वस्व पणाला लावून गरजवंताच्या मदतीला सावली सारखे धावून येतात. येशूची दया, प्रीती, करुणा ते त्यांना देतात. पण काहीवेळा कठीण परिस्थितीला मान खाली घालून व गुढघे जमिनीला टेकून आपल्याला जीवनाचे बलिदान द्यावे लागते. येशूचे क्रूसावरील शब्द, ‘बापा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात ते त्यांना ठाऊक नाही’ हे प्रत्येक व्यक्तीला नवजीवन प्राप्त करून देत असते. संतपदावर पोहोचलेल्या पवित्र माणसांच्या जीवनातदेखील अनेक कष्ट आले होते. परंतु त्यांनी येशूचे राज्य प्रस्थापित करण्याची जिद्द कधीच सोडली नाही.
येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा ख्रिस्ती महामंडळाचा आधारस्तंभ असून सुवार्ता कार्याची गुरुकिल्ली आहे. ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. याच पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख सर्वत्र पसरविण्यासाठी, आज देऊळमाता आपणा सर्वांना प्रेरणामय आव्हान करत आहे. ह्या दयेच्या वर्षी, पुनरुत्थित येशूची शांती, करुणा व दया हाती घेऊन आपण सर्वांनी पुन्हा एकदा येशूचे कार्य नव्या जोमाने सुरु करण्याची गरज आहे. यामुळे आपल्या जीवनाला नव्या जीवनाची पालवी फुटून, जीवन अर्थपूर्ण होईल आणि आपले बलिदान व्यर्थ न जाता ते पुनरुत्थित येशूच्या सुखाने, आनंदाने व प्रेरणेने भरून जाईल.
‘मी कुठेही कसा ही असो, पुनरुत्थित ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो.’ 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: प्रभो आंम्हास कृपेचे नवजीवन दे.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू आणि धर्मबंधूभगिनींना पुनरुत्थित प्रभूचा आनंद व आशा त्यांच्या प्रेषितीय कार्यात सतत मिळावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. आपला ख्रिस्ती समुह पापांच्या दरीतून मुक्त होऊन, परस्पर प्रेम व सौख्यभावनेने प्रफुल्लीत होत रहावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. आज ज्यांनी नव्याने स्नानसंस्कार स्वीकारला आहे अशांनी प्रभूठायी विश्वासू राहून एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. ज्या लोकांना ख्रिस्ताची अजूनही ओळख पटलेली नाही अशांना प्रभूच्या प्रेमाची ओळख त्याच्या निवडलेल्या लोकांद्वारे व्हावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपण सर्वांनी विश्वासात घेतलेला पुनरुत्थित प्रभूचा अनुभव सर्वकाळ आपल्या मनी बाळगून त्याच्या सार्वकालिक जीवनात सहभागी व्हावे म्हणून आपण प्रार्थना करुया.


No comments:

Post a Comment