Wednesday 1 June 2016


Reflection for the Homily of Tenth Sunday in Ordinary Time  (05-06-2016)  By Glen Fernandes.






सामान्य काळातील दहावा रविवार


दिनांक: ०५-०६-२०१६.
पहिले वाचन: १ राजे १७:१७-२४.
दुसरे वाचन: १:११-१९. 
शुभवर्तमान: लूक ७:११-१७.

                                

“मुला, मी तुला आज्ञा करतो, उठ”



प्रस्तावना:

     आज आपण सामान्य काळातील दहावा रविवार साजरा करीत आहोत. देवाच्या करुणेचा अपरंपार दयेचा आणि निरपेक्ष प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आजची उपासना आपल्याला आमंत्रित करीत आहे.
     १राजे ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण एकतो की, परमेश्वराने एलियाची प्रार्थना ऐकली व सारफाथ येथील विधवेच्या बालकाचा प्राण त्याच्याठायी पूर्वरत येऊन तो पुनरजिवित झाला. गलतीकरांस पत्र यातून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात आपणांस मनुष्यापासून नव्हे, तर येशू ख्रिस्तापासून शुभव्रत प्राप्त झाले आहे असे संत पौल म्हणतो. तर आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की प्रभूने नाईन गावी मरण पावलेल्या एका विधवेच्या मुलास जिवंत केले, कारण प्रभूला तिचा कळवला आला.
पवित्र शास्त्र आजच्या उपासनेद्वारे आपणास आवर्जून सांगत आहे की ‘आपला देव मृतांचा नसून जिवंताचा देव आहे’. आपण जिवंत देवाचे उपासक आहोत हि भावना आपल्या मनी दृढ असावी म्हणून ह्या मिस्साबालीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: १ राजे १७:१७-२४

     दुष्काळ पडला असताना संदेष्टा एलिया परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे       सारफाथ नगरांत जाऊन राहत होता. तेथे काहीही नसताना त्या विधवेने मडक्यातील मुठभर पीठाने व कुपीतील थोड्याश्या तेलाने भाकऱ्या करून एलीयाची भूक भागवली. परंतु काही दिवसांनी तिचा मुलगा आजारी पडला व त्याचा रोग इतका वाढला कि त्याचा श्वास बंद झाला. त्या विधवेने केलेला शोकांत पाहून एलियास गहिवरून आले. तिची दयनीय अवस्था पाहून एलियास फार वाईट वाटले. त्याने त्या विधवेस आपल्या बाळाला घेऊन येण्यास सांगितले व संदेष्टा एलीयाने परमेश्वराचा धावा केला. परमेश्वराने एलीयाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण वाचविला.
एलिया संदेष्टाने केलेल्या चमत्कारांपैकी हा एक महत्वाचा चमत्कार आहे कारण त्याने मरणातून परत उठविणे, हि अशक्य-प्राय बाब प्रभूठायी करून दाखविली. तसेच एलिया संदेष्टा हा ज्या विधवा स्रीच्या घरी राहत होता ती यहुदी नव्हती, तरीसुद्धा तीने एलीयाचा आपल्या घरात स्विकार केला. स्वत:कडे काहीही नसताना, थोडेसे जे होते ते तिने एलियास खावयाला व प्यावयास दिले. तसेच एलीयाला सुद्धा परिस्थितीची जाण होती; त्यामुळे पर्जन्यवृष्ठी होईपर्यंत तिचे पीठ व तेल आटले नाही आणि तिचा मुलगाही जगला. परमेश्वराच्या माणसाचा तिने केलेला स्विकार म्हणजेच परमेश्वराचा केलेला स्विकार होता. म्हणून ती व तिचे कुटुंब जगले. दुष्काळ असुनही तिच्या घरात आनंदाच्या सरी बरसल्या.  
दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र १:११-१९ 

     गलतीकरांमध्ये अनेक बाबींमुळे फुट पडत होती. अधिकार, हेवेदावे तसेच सूडबुद्धी यामुळे त्याच्यात दुरी माजली होती. पौलाला ह्या गोष्टीचे फार वाईट वाटले. ज्याने त्यांस ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले, त्याच्यापासून ते इतक्या लवकर अन्य  सुवार्तेकडे वळत होते. हे पाहुन खंत पौल व्यक्त करत आहे. मनुष्यापासून नव्हे तर येशू ख्रिस्तापासून, ज्याला मेलेल्यांतून उठविले तो देवपिता ह्याच्यापासून आपल्याला शुभव्रत प्राप्त झाले आहे असे तो तो गलतीकरांस सांगतो. जरी धर्मात इतरांपेक्षा पुढे गेलो तरी देवाने आपल्याला मातेच्या उदरांतून जन्मल्यापासून वेगळे केले होते व कृपेने बोलाविले होते असे सांगून पौल गलतीकरांस पटवून देतो की, ‘सुवार्ता प्रकट करणे ही देवाची इच्छा होती’. प्रेषितांमध्ये महान कोण ? मोठा कोण ? ह्या बाबतीत गलतीकरांमध्ये पेच पडला होता. पौल आपल्या पत्राद्वारे गलतीकरांस समजावून सांगतो कि, तुम्ही प्रभू एकत्र राहा व प्रभूमध्ये चांगले जीवन जगा.

शुभवर्तमान: लूक ७:११-१७

     एकुलत्या एक मुलासाठी आकांताने टाहो फोडणारी विधवा स्त्री पाहून येशूच्या हृदयात करुणेचा पाझर फुटला. तिला पाहून प्रभूला तिचा कळवला आला. त्या स्त्रिच्या जीवनातील एकमेव संपत्ती, सुख-समाधान, आधार तिच्यापासून हरवला होता. अनंतामध्ये विलीन झालेल्या त्या शवाला तिरडीवर घेऊन जात असताना तिच्याबरोबर गावचे पुष्कळ लोक होते. नाईन गावी आपल्या शिष्यांबरोबर जात असताना वेशीजवळ प्रभूने त्या मृत व्यक्तीला व त्याच्या आईला पाहिले.
प्रभूला कळवला आला कारण तो करुणेचा सागर आहे. त्याला गहिवरून आले कारण त्याला त्या विधवेच्या दु:खाची जाणीव झाली. तो तिला म्हणाला, “बाई रडू नकोस.” मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला. प्रेताला स्पर्श करणे ही गोष्ट विटाळ समजली जात असे. येशून तिरडीला स्पर्श करून यहुदी समाजातील स्पर्श्या-स्पर्श्याचा नियम धाब्यावर बसवला. तसेच विधवा मातेसाठी मरणाचे बंधनही तोडून टाकले. तो म्हणाला, “मुला, मी तुला आज्ञा करतो, उठ.” तेव्हा तो मेलेला तरुण लगेच उठून बसला आणि बोलूही लागला. येशूने त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केले तेव्हा लोक देवाचा महिमा गात म्हणाले, “आमच्यामध्ये एक मोठा संदेष्टा निपजला आहे आणि देवाने आपल्या लोकांवर कृपादृष्टी केली आहे.”
 जुन्या करारात संदेष्टा एलीयाने ज्याप्रमाणे विधवेच्या मुलास मरणातून उठविले होते त्याचप्रमाणे प्रभू येशुनही विधवेच्या मुलास उठविले. फक्त येशूच्या वेळेस मोठा लोकसमुदाय उपस्थित होता, ज्यांनी देवाचा महिमा गाईला.

बोधकथा:

     एकदा एक व्यक्ती सुप्रसिद्ध अभिनेत्याकडे आली व त्यांना म्हणाली माझ्या गावाला दुष्काळाने पछाडलेले आहे. कृपा करून काही मदत करा. त्या अभिनेत्याने होकार दिला व जेव्हा तो त्या गावात गेला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच  बसला. अनेक मुली त्यांच्या पतिच्या आत्महत्येमुळे विधवा झाल्या होत्या. छोट्या मुलांच्या जीवनातील आधार हरवला होता. गावात पाण्याचा हलाखीचा प्रश्न होता. हे सारे पाहून त्या अभिनेत्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. आपण काहीतरी केले पाहिजे. कोणालातरी आपली गरज आहे. समाजाला आपले काहीतरी देणं आहे, अशी भावना त्याच्या मनात उत्पन्न झाली.
     अशा प्रकारे सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर ह्यांनी इतर सहकाऱ्यांबरोबर “नाम” ह्या संघटनेची स्थापना केली. उन्हाळ्यात दुष्काळग्रस्त परिसरात त्यांनी केलेले कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे आणि आपणा सर्वांना ठाऊकच असेल.

मनन चिंतन:

     मृत्यूची आपल्याला भीती वाटते कारण मरणाला आपण कधी आसपास फिरकू दिलेलं नसते. मृत्यूचा अनुभव घेणे म्हणजे जीवनाची ओळख पटणे. जीवन प्रभूपासून असेल तर मृत्यूदेखील प्रभूपासूनच आहे. जीवन आहे, म्हणून मृत्यू आहे; मृत्यू आहे म्हणून जीवन आहे. संत पौल म्हणतो, ‘आम्ही जगलो किंवा मेलो तरी प्रभूचेच आहोत’. हे प्रभूमय होणे म्हणजेच मृत्यूवर विजय मिळवणे आहे.
     घरातल्या माणसाचे अचानक निघून जाणे आपल्याला फार हादरवून जाते. आपण शोक करतो. आपलं रडणं थांबत नाही. जेव्हा जिवलग सोडून जातात तेव्हा आपलं घर रिकामं होते. त्याचं असणं, त्याचं वावरणं, त्याच्या वस्तू, त्याच्या सवयी बोलणं-चालणं हे सारं एकत्र गुंफलेलं असते. आपल्या जगण्यात अचानक पोकळी निर्माण होते. प्रिय व्यक्ती मारून जातात. ते मरून जातात पण आपला देखील थोडाथोडा मृत्यू होत असतो.
 आजच्या शुभवर्तमानात ऐकले कि, एका विधवेने आपल्या एकुलत्या एका मुलाला गमविले होते. ‘मातृत्व’ हा स्त्री म्हणून शोक करीत होती व लोकसमुदाय तिला घेऊन जात होता. जगातील कोणत्याही पाषाणह्रदयी मानवाचही अंत:करण पाझरावा अशी ती करुणामय परिस्थिती होती. दु:खाचा जेवढा विचार करावा तेवढा ते वाढतच जात असते. विस्मृती हा एकमेव उपाय त्यावर परिणामकारक ठरतो. विस्मृती ही निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे. फक्त विस्मृतीची आशा बाळगून जगत असलेल्या त्या बाईची अवस्था हलाखीची होती.
     मृत्यू हा सर्वांना अटळ आहे. केवळ मृत्यू हीच एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला समान पातळीवर आणते. मृत्युपासून काढलेला पळ म्हणजे मृत्युच्या दारात स्वत:हून हजर होणे होय. मृत्यूला ठाऊक नसतो राजा किंवा रंक, सुंदर किंवा दुरूप त्याच्यापुढे सारे समान असतात हे एक कटू सत्य आहे. परंतु ह्या सर्व बाबींमध्ये प्रभू येशूची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्याच्या वागण्यावरून सर्वांना कळून चुकते की तो करुणेचा सागर आहे. परमेश्वर असुनही त्याने स्वत:साठी काहीही चमत्कार केलेला  नाही.  भूक लागलेली असुनही त्याने दगडाची भाकर केली नाही. परंतु विधवेचे अश्रू पाहून त्याला कळवला आला. फार वाईट वाटले. परंतु तेथेच न थांबता त्याने तिचे सांत्वन केले आणि युवकाला हाक मारून उठविले.
     ह्या जगात आपण तीन प्रकारच्या व्यक्ती पाहतो. पाहिले ज्यांना ह्या जगातील दु:ख पाहून, अन्याय पाहून, अंधकार पाहून काहीही वाटत नाही. जे आहे ते आहे व असेच होत राहणार अशी त्यांची धारणा असते. मी काहीही करू शकत नाही व करणारही नाही असे त्यांना वाटत असते. त्यांचे हृदय पाषाणाप्रमाणे कठीण असते. दुसऱ्या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे ज्यांना दुसऱ्याच्या दु:खाबद्दल वाईट वाटते. अन्यायाचा किळस येतो. मनामध्ये चलबिचल होते. परंतु ते सहकार्य करायला पुढे येत नाही. जगामध्ये जो अहंकार माजला आहे, त्याविरुद्ध कोणीतरी काहीतरी करावे असे त्यांना वाटते. परंतु मी काहीही करू शकत नाही, मला काहीही करता येणार नाही असे त्यांचे तत्व असते. व तिसऱ्या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे जे दुसऱ्याच्या दु:खात, वाईट प्रसंगात सहभागी होतात. समाजातील अन्याय पाहून ते गप्प बसू शकत नाही. आपण काहीतरी केलं पाहिजे असे वाटून दुसऱ्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे असे त्यांना वाटते. दुसऱ्यांच्या आनंदात ते सहभागी होतात व इतरांचे दु:ख, ते स्वत:च समजतात. निस्वार्थीपणे ते दुसऱ्यांच्या संकटात धावून येतात. प्रयत्नांची पराकाष्टा करून ते इतरांना मदत करत असतात.
     प्रभूला त्या विधवेचा कळवला आला परंतु तेथेच न थांबता त्याने तिचे सांत्वन केले ‘बाई रडू नकोस.’ पुढे जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला. जे यहुदी धर्मात अनिष्ट मानले जात असे ते त्याने केले व त्याने त्या मृताला उठविले व त्याच्या आईकडे सुपूर्त केले.
      आपणही समाजात राहत असताना इतरांच्या आनंदात व दु:खात त्यांना मदत करावी म्हणून ख्रिस्तसभा आपल्याला बोलावीत आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना: 

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
२. जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आज जगात अनेक गरीब राष्ट्रातील लोकांना तसेच आपल्या समाजात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे अन्याय व छळ सहन करावा लागत आहे. अशा सर्व लोकांनी त्यांच्यावर अन्याय व छळ करणाऱ्यांना क्षमा करावी व प्रभूचा आशीर्वाद त्याच्यावर यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. येथे जमलेल्या भाविकांनी निस्वार्थीपणे जीवन जगावे. आपल्या जीवनात प्रार्थनेला प्राधान्य द्यावे आणि उदार मनाने आपल्या शेजाऱ्यांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
     







No comments:

Post a Comment