Tuesday 8 November 2016


Reflection for the Homily of 33rd Sunday in Ordinary Time (13/11/2016) By Br. Jameson Munis.




सामान्यकाळातील तेहतिसावा रविवार

दिनांक: १३/११/२०१६.
पहिले वाचन: मलाखी ४:१-२.
दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र ३:७-१२.
शुभवर्तमान: लुक २१:५-१९.


"वेळ जवळ आली आहे"


प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील तेहतिसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास प्रभू पुनरागमनाची आणि शेवटच्या न्यायाविषयीचा संदेश देते.
मलाखी या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपल्याला देवाच्या येण्याचा दिवस या संदर्भात ऐकावयास मिळते. थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र ह्यात संत पौल मनुष्याच्या जीवनाविषयक सल्ला देतो. तसेच आजच्या लुकलिखीत शुभवर्तमानात येरुशलेमेचा विध्वंस, युगाची समाप्ती आणि सर्व लोकांचा न्याय ह्याविषयी ऐकतो.
माणूस सुखाचा भुकेला आणि आनंदासाठी सतत आसुसलेला असतो. म्हणून माणूस बऱ्याचदा देवाच्या विरुद्ध जात असतो. परंतु देव माणसाला सतत अवधी देतो. कारण सार्वकालिक जीवनाचा आनंद हे देवाने माणसाला दिलेले एक अलौकिक वरदान आहे. आजच्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना आपली अंतःकरणे आपण शुद्ध करूया व ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा देवावर अधिक प्रेम करावे ह्याकरीता परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: मलाखी ४: १-२.

पहिल्या वाचनात मलाखी परमेश्वराचा येण्याचा दिवस याविषयी सांगत आहे. ह्या दिवशी परमेश्वर सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी लोकांस शिक्षेस पात्र ठरवणार आणि सेवा करणाऱ्या व विश्वासू लोकांवर दया दाखवून तो त्यांस अभय देईल. तसेच जे लोक देवाच्या नावाचा आदर करणारे आहेत त्यांना देवाचा लाभ होईल.

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र ३:७-१२.

प्रस्तुत उताऱ्यात पौल त्याच्या स्वत: च्या जीवनाविषयीचा बोध करतो. तो आळशीपणाने न वागण्याचा सल्ला तसेच त्याविषयीचा असलेला धोका ह्याविषयी सांगत आहे. जे लोक काम व कष्ट करत नाही त्यांना संत पौल अतिशय परखड शब्दांत बजावतो कि, ‘त्यांना खाण्याचा अधिकार नाही’. सुखवस्तूसाठी भुकेल्या असलेल्या आळशी लोकांनासुद्धा इतरांनी काही देऊ नये असे पौल सांगतो.

शुभवर्तमान: लुक २१:५-१९.

     लुकलिखीत शुभवर्तमानात आपल्याला यरुशलेमेचा विध्वंस व युगाची समाप्ती याबद्दल येशूने केलेलं भाकीत ऐकावयास मिळते.
     यरुशलेम येथील मंदिराची भव्य दिमाखदार वास्तुरचना पाहून शिष्य फारच प्रभावित झाले होते. येशूला त्यांच्या प्रशंसेचे काहीच अप्रुफ वाटले नाही. हे मंदिर लवकरच पूर्णपणे नष्ट होईल असे भाकीत त्याने केले. शिष्यांनी विचारले, ‘हे केव्हा घडून येणार, या विनाशाचा इशारा देणारी काही पूर्वचिन्ह असतील का?’ हे ऐकून येशूने त्यांना उत्तर देतो कि, मंदिराचा विनाश होणे ही युगाच्या समाप्तीस होणाऱ्या घटनांपैकी एक असेल, येशूच्या ह्या आरंभीच्या शब्दांवरून या प्रवचनाचा सर्वसाधारणपणे रोष दिसून येतो.  
     तसेच शेवट ताबडतोब होईल असे शिष्यांनी समजू नये.  मंदिराचा विनाश झाला तरी शेवट जवळ आला असा त्याचा अर्थ होत नाही. तसेच आम्ही ख्रिस्त आहोत असे खोटे सांगणाऱ्या येशूच्या शिकवणुकीची नक्कल करणाऱ्या लोकांपासून शिष्यांनी सावध रहावे. येथे शिष्यांसमोर असलेले आव्हान दिसून येते. तसेच छळ तर घरचे लोक आणि मित्रही करतील. त्यातून प्रसंगी प्राणार्पण करून हुतात्मा व्हावे लागेल आणि सार्वत्रिक तिरस्कारही सोसावा लागेल, पण काहीही झाले तरी शिष्य देवांच्या संरक्षक हाताखाली आहेत आणि विश्वासुपणे सर्वकाही सोसून सहन करणाऱ्यांना सार्वकालिक जीवनाचा लाभ होईल असे आवाहन येतेह केले आहे.

बोधकथा:

     जॉन नावाचा मुलगा एक दिवशी रस्त्यावरून चालत असताना त्याने पाहिले कि, एक तरुण मुलगा दुसऱ्या वरिष्ठ माणसाकडून त्यांचे पैशाचे पाकीट जबरदस्तीने चोरण्याचा प्रयत्न करत होता त्याच वेळी जॉन त्याच्याजवळ जातो आणि त्या चोरट्या मुलाला चांगला धडा शिकवतो. त्या भीतीने तो चोर माणूस तेथून पळ काढतो. त्यानंतर तो वरिष्ठ माणूस जॉनच्या चांगल्या कृतीला आणि न्यायाला धन्यवाद देतो आणि १०० रु. बक्षीस म्हणून देतो.

मनन चिंतन:

     आजच्या युगात जे लोक चांगले कृत्ये करतात किंवा त्यांचे जीवन जगतात त्यांचा न्याय नेहमी चांगलाच असतो. परंतु जे लोक दुष्कृत्ये करतात त्यांचा न्याय  नेहमी वाईटच असतो.
     आजच्या तिन्ही वाचने आपल्याला ख्रिस्त लवकर येण्याचा दिवस व लोकांचा न्यायाचा दिवस तसेच संपूर्ण युगाची समाप्ती कशी होईल या विषयी उद्देशून सांगत आहेत. कारण या दिवशी देव सर्व लोकांना त्यांच्या कार्याप्रमाणे न्याय देणार. जे लोक चांगले, प्रार्थनामय व देवाचे अनुयायी आहेत त्यांना येशू ख्रिस्त पुनरूत्थानाचे दान देईल. तसेच जे लोक पापी, कठोर व देवाच्या सानिध्यात नाहीत त्यांना देव न्यायदंडासाठी पात्र ठरवील.
     देव आपल्या मालमत्तेकडे पाहत नाही तर चांगल्या, अनुकूल व शुद्ध हृदयाकडे पाहतो. जे लोक सत्याने प्रार्थनामय जीवन व साधे जीवन जगणारे आहेत ते देवाला आवडतात. जे लोक देवाच्या आज्ञेचे पालन करतात त्याचा न्याय चांगला होणार आणि त्यांना देवाच्या राज्याचे स्थान प्राप्त होईल. कारण आजच्या पहिल्या वाचनात मलाखी सांगतो कि, सत्कृत्ये करणाऱ्याचे पुनरुत्थान होईल आणि दुष्कृत्ये करणाऱ्याचेही पुनरुत्थान होईल. परंतु ते दोषपात्र ठरतील. शेवटचा न्याय प्रत्येक माणसाच्या ऐहिक जीवनातून चागले किंवा वाईट कृत्ये यातून होईल.
तसेच दुसऱ्या वाचनात संत पौल जीवनाविषयीचे मार्गदर्शन व चांगले करताना खचू नका असा सल्ला देतो. त्याने कामावर भर टाकला नाही. इतरांना चांगले उदाहरण व्हावे म्हणून त्याने स्वत: रात्रंदिवस श्रम व कष्ट केले म्हणून जे देवावर विश्वास ठेवतात त्यांनी आपल्या उपजीविकेसाठी व्यवसाय किंवा नोकरी करावी व प्रभूची सेवाही करावी. ज्याला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने उपाशीच राहावे असे पौल परखड शब्दांत बजावतो. शुभवर्तमानात येशू आपल्याला जगाचा शेवट कसा होईल व त्यापूर्वी काय घडेल या विषयी सांगतो. लढाया, भूमिकंप, भयानक रोगाची साथ व दुष्काळ या गोष्टी जगात प्रामुख्याने घडतील. तसेच स्वार्थी मानव आपल्या स्वत:च्या स्वार्थासाठी एकमेकांचा छळ करतील. जगातील शांती नाहीशी होईल व लोक शांतीच्या शोधात इकडे तिकडे भटकतील.
     म्हणून आजच्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना आपण सर्वजण देवाच्या दैवी व प्रेमळ आशीर्वादासाठी प्रार्थना करूया जेणेकरून आपण नेहमी देवाच्या सानिध्यात राहून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागावे व इतरांप्रती सदाचाराने वागावे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, द्या कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना कर.

१. आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ ज्यांनी आपले आयुष्य प्रभूकार्यासाठी त्यागलेले आहे, अशा सर्व लोकांचे पवित्र आत्माच्या कृपेने तारण व्हावे व त्यांना प्रभूपरमेश्वराचे प्रेम, कृपा व आनंद मिळावा तसेच प्रभूच्या सुवार्ता कार्यामध्ये देवाचा भरपूर असा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. जे लोक, युवक चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्या सर्वांना परमेश्वराच्या आशीर्वादाने त्यांच्या कार्यशीलतेनुसार योग्य ते काम मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. जे लोक देवावर श्रद्धा ठेवत नाही तसेच जे कोणी देवापासून दूर जात आहेत अशा सर्व लोकांची प्रभूवरील श्रद्धा बळकट व्हावी आणि त्यांनी देवाच्या सानिध्यात परत यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक आजाराने ग्रासलेले आहेत त्या सर्व लोकांना देवाचा स्पर्श व्हावा व ते त्यांचा आजारातून परिपूर्ण बरे व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे लोक गरीब आहेत, ज्यांना दोन वेळचे पुरेसे अन्न लाभत नाही अशा सर्व लोकांच्या शारिरीक व आत्मिक गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व आध्यात्मिक हेतूंसाठी प्रार्थना करुया.


No comments:

Post a Comment