Monday 10 April 2017


Reflection for the Homily of Maundy Thursday  (13/04/2017) By: Br. Jameson Munis



आज्ञा गुरुवार

दिनांक – १३-०४-२०१७
पहिले वाचन – निर्गम १२:१-८,११-१४
दुसरे वाचन – १करिन्थकरांस ११:२३-२६
शुभवर्तमान – योहान १३:१-१५





 मी सेवा करून घेण्यासाठी नव्हेतर सेवा करण्यासाठी आलो आहे


प्रस्तावना
आज आपण आज्ञा गुरुवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशू ख्रिस्ताचे शेवटचे भोजन, त्याचे बंधिस्तान आणि त्याचे क्रुसावरचे मरण या विषयी उद्देशून सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा गुरु असूनसुद्धा, एक साधा दास झाला आणि आपल्या शिष्याचे पाय धुतले. त्याला त्याच्या जाण्याची वेळ माहिती होती तरी सुद्धा त्याने सर्वावर प्रिती केली. ज्या लोकांसाठी त्याने आपल्या जीवनाचा त्याग केला तीच माणसे त्याच्याविरुद्ध होणार याची प्रभूला खात्री होती.
आजचे पहिले वाचन हे निर्गम ह्या पुस्तकातून घेतले आहे. या वाचनात आपण वल्हांडणाच्या नियमाविषयी ऐकणार आहोत. करिन्थकरांस पहिल्या पत्रातून घेतलेल्या पहिल्या वाचनात संत पौल भाकर आणि प्याला ह्या विषयी सांगत अहि कि. जितक्यांदा आपण हि भाकर व हा प्याला पितो तितक्यांदा आपण प्रभूच्या मरणाची घोषणा करतो. आजच्या शुभवर्तमानात आपण येशूच्या सेवा व प्रेमा विषयी ऐकणार आहोत. आजच्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना आपण आपली मने शुद्ध करून आपल्या शेजाऱ्यावर व वैऱ्यावर प्रिती करण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.
तसेच आज येशू ख्रिस्ताने मिस्साबलीदानाची व धर्मगुरुपदाची स्थापना केली. म्हणून आज धर्मगुरुचा दिवस साजरा करीत असतांना आपण विशेषकरून सर्व धर्मगुरुसाठी प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन – निर्गम १२:१-८,११-१४

आजच्या पहिल्या वाचनात आपण वल्हांडणाच्या नियमाविषयी ऐकतो. वल्हांडण म्हणजे, जेव्हा इस्त्राएल लोक फारोच्या गुलामगिरीत होते तेव्हा इस्त्राएल लोकांतील प्रथम जन्मलेले मरण ओलांडून गेले, या घटनेला वल्हांडण म्हणतात. हि घटना इस्त्राएल लोक तीन प्रकारे साजरा करतात. प्रथम म्हणजे, ते दरवर्षी सात दिवस बेखमीर भाकरीचा सण साजरा करीत होते. दुसरे म्हणजे, बेखमीर भाकरीचा सण साजरा करताना ते एक वर्षाचे कोकरू सेवन करून वल्हांडणाचे स्मरण करीत होते. तिसरे म्हणजे, इस्त्राएल लोकांचे सर्व जेष्ठ पुत्र वाचले म्हणून त्यांचे स्मरण ठेवण्यासाठी गुरे-ढोरे व शेळ्यामध्ये जन्मलेले पहिले नर देवाला अर्पण करीत असत.

दुसरे वाचन – १करिन्थकरांस ११:२३-२६

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौलाने प्रभू भोजनाचे महत्व सांगितले आहे. वल्हांडणाचे भोजन चालू असताना, प्रभूने मेजावरील बेखमीर भाकर घेतली व ती मोडून देवाचे आभार मानले आणि आपल्या शिष्यांना दिली. ख्रिस्ताने स्वतः भाकर होऊन आपल्या तारणासाठी स्वतःचे अर्पण केले. तद्नंतर त्याने द्राक्षरसाचा प्याला घेऊन शिष्यास दिला. हा द्राक्षरसाचा प्याला म्हणजे ख्रिस्ताचे रक्त व त्याद्वारे ख्रिस्ताने पापक्षमेचा नवा करार केला आहे. व त्यामुळे आपण देवाच्या सानिध्यात येण्यास पात्र झालो आहोत. हेच ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त आपण रोज मिस्साबलीदानात साजरे करतो.

शुभवर्तमान – योहान १३:१-१५

आजच्या योहानलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो कि, येशू शेवटच्या भोजनापूर्वी उठून आपल्या शिष्याचे पाय धुतले. ह्या कृतीवरून प्रभूचे आपल्यावरील प्रेम प्रत्ययास येते. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरील मरणाची जाणीव होती तरी त्याने देवाचे कार्य सोडून दिले नाही. ज्या वेदनाच्या दरीतून स्वतःला जायचे होते त्याचा विचार न करता प्रभूने सर्वावर प्रिती केली. यहुदा इस्कर्योत येशूला दगा देणार होता याची जाणीव असून प्रभू हताश झाला नाही; त्याची प्रिती कधीच कमी झाली नाही.

बोधकथा

गुणसंपन्न व अगदी हुशार असा एक मुलगा होता. त्याने खूप यश मिळवले होते. व तो सर्वावर प्रेम करून त्यांना मदत करीत होता. परंतु तो शाररीकदृष्ट्या लंगडा होता. पण तो खूप आनंदी होता व सर्वाना त्याचा अभिमान होता. केवळ त्याचा एक मित्र त्याच्या विरुद्ध होता व त्याचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करीत असे. ह्या अपंग मुलाला ह्याची जाणीव असून सुद्धा त्याने आपल्या मित्राचा कधीच तिरस्कार न करता त्याच्यावर प्रिती केली. त्यामुळे त्या मित्राला आपल्या स्वकृत्याचा तिरस्कार वाटला व त्याने आपल्या अपंग मित्राला विचारले कि, “तू दुसऱ्याना मदत व प्रेम कसे करतो?” त्यावर तो उत्तरला कि, “माझ्या आजाराने माझ्या मनाला व डोक्याला स्पर्श केला नाही म्हणून मी दुसऱ्यावर प्रेम करतो.”

मनन चिंतन

प्रीतीच्या जीवनाला कधीच शेवटची रेषा नाही. प्रेम करण्यास कुठल्याही कारणाची गरज भासत नाही. जी माणसे प्रेमाचे जीवन जगतात ते आनंदी असतात. त्यांच्या पाठीशी देवाची छाया असते. जे प्रेमाला स्वीकारतात ते ख्रिस्ताला व देवापित्याला स्वीकारतात. खरी प्रिती आपल्याला दुसऱ्याकडे वाहून घेते. बोधकथेतील अपंग मुलगा दुसऱ्यावर प्रेम करतो व चांगले जीवन जगतो. येशू ख्रिस्ताच्या जीवनात सुद्धा आपल्याला खरी प्रिती आढळते. त्याची प्रिती हि एका वाहणाऱ्या महानदी सारखी आहे. प्रिती म्हणजेच दुसऱ्यांची सेवा ह्याची जाणीव येशूला होती म्हणून त्याने दास होऊन शिष्याचे पाय धुतले.
येशू ख्रिस्ताच्या विचारात व कृतीत नम्रता व प्रेम होते. ह्याच प्रेमाने त्याने दुसऱ्याची सेवा केली; आजाऱ्याना बरे केले; आंधळ्यास दृष्टी दिली; भुकेल्यास खावयास दिले म्हणूनच असे म्हणतात कि, खरी प्रिती व सेवा करण्यात खूप आनंद मिळतो.
देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे (योहान ३:१६)
येशू ख्रिस्त आपल्या तारणासाठी आला व आपल्याला चांगले कार्य आणि प्रेम करण्यास मार्गदर्शन केले. आपण प्रभूप्रमाणे आपल्या शेजाऱ्यावर व शत्रूवर प्रेम व सेवा करण्यास सुरवात केली पाहिजे. आपण चांगले कृत्य करण्यास कमी पडता कामा नये. कारण प्रभूने आपल्यावर शेवटपर्यंत प्रिती करून वधस्तंभावर मरण स्वीकारले आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रीतीच्या राजा आमची प्रार्थना ऐक.

१)     आपले जीवन देवाच्या कार्यासाठी समर्पित केलेले आपले पोप, बिशप व सर्व धर्मगुरु व धर्मभगिनींना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कामात प्रभूचा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२)     जी माणसे त्यांच्या आयुष्यात निराशून गेली आहेत अश्या लोकांना देवाची प्रिती व धैर्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
३)     जे लोक आजारी आहेत अश्या सर्वांना देवाचा स्पर्श व्हावा व ते त्यांच्या आजारातून मुक्त व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)     जी कुटुंबे विविध कारणासाठी दुरावलेली आहेत अश्या सर्व कुटुंबांवर परमेश्वराचा आशीर्वाद यावा व त्यंची सर्व संकटे दूर व्हावीत व ते पुन्हा एकत्र यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५)     जे लोक गरीब आहेत व ज्यांना पुरेसे अन्न मिळत नाही अश्या सर्व लोकांच्या शाररीक व आत्मिक गरजा पूर्ण व्हाव्यात तसेच त्यांची सर्व दुःखे दूर व्हावीत म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

६)     थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment