Friday 12 January 2018

Reflection for the Homily of Second Sunday in Ordinary Time ( 14-01-2018) 
By Fr. Malcolm Dinis







सामान्य काळातील दुसरा रविवार


दिनांक: १४-०१-२०१८
पहिले वाचन: १ शमुवेल २:३, १०, १९
दुसरे वाचन: १ करिंथ ६:१३, १५, १७, २०.
शुभवर्तमान: योहान १:३५-४२





प्रस्तावना:

     आज आपण सामान्यकाळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला देवाची वाणी ऐकण्यासाठी आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करण्यासाठी बोलावत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, देव सॅम्युएलला हाक मारून बोलावतो. पण आपल्याला देव बोलावत आहे हे सॅम्युएलच्या लक्षात येत नाही म्हणून तो आपला गुरु ‘एली’ ह्याच्याकडे धाव घेतो व ‘एली’ त्याला मार्ग दाखवतो. आपण देवासाठी आहोत म्हणून आपण आपल्या शरीराचा आदर बाळगायला हवा असे आपल्याला संत पौल दुसऱ्या वाचनात सांगत आहे. आजच्या शुभवर्तमानात पहिल्या शिष्यांना योहान बाप्तिस्ता मार्ग दाखवतो. व ते येशूच्या मागे जातात, त्याच्या निवासस्थानी राहतात व ख्रिस्ताचा अनुभव घेतात.
आपणसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात देवाची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करूया आणि त्याप्रमाणे पावले टाकण्यास ह्या पवित्र मिस्साबलिदानात विशेष देवाची कृपा मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: १ शमुवेल २:३, १०, १९

     शमुवेलला हाक आली आणि प्रत्येक वेळा तो उठून गेला. “मला कुणीतरी हाक देत आहे. कुणाला तरी माझी गरज दिसतेय. मला उठलं पाहिजे. काहीतरी महत्वाच असेल.” ही एलीची हाक असेल असे त्याला वाटले. एलीच्या हाकेला तात्काळ उठणारा मुलगा परमेश्वराच्या हाकेला उठला नसता तर ते नवलच!
     शमुवेलला हाक आली तेव्हा तो म्हणाला, “प्रभू बोल तुझा दास ऐकत आहे” (३:१०). जीवनात जे येईल ते स्वीकारण्याची शमुवेलची तयारी होती. परमेश्वराच्या कार्यासाठी हा दास तयार होता. ही परमेश्वराची हाक दहशतवादाविरुद्ध लढा उभारण्यासाठी, भ्रष्टाचाराचा बिमोड करण्यासाठी, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी तसेच अनिष्ट रूढी परंपरा जमीनदोस्त करण्यासाठी होती. ह्या हाकेला मी सर्व शक्तीनीशी उभा राहून होकार देणे म्हणजेच पाचारण स्वीकारणे.

दुसरे वाचन: १ करिंथ ६:१३, १५, १७, २०.

     “तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत” असे संत पौल वाचनात सांगत आहे. ख्रिस्ताने दामदुप्पट मोल देऊन आम्हांला विकत घेतले आहे. आणि आम्हांला स्वत:सारखे करावे हा त्याचा हेतू आहे.
     आमची शरीरे प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरून सोडवून घेतली आहेत, तर आता त्यांच्यावर आमची मालकी नाही, ती आता आपल्या मौल्यवान रक्ताचे मोल देऊन विकत घेणाऱ्याच्या मालकीची आहेत म्हणजेच आता आपले शरीर पवित्र आत्म्याचे दान बनले आहे म्हणून ते आता स्वच्छ ठेवण्यासाठी व आपल्या शरीराने देवाचा गौरव व स्तुती करण्यासाठी आपण सज्ज बनलो पाहिजे.

शुभवर्तमान: योहान १:३५-४२

     योहानाने ख्रिस्त कोण आहे हे दाखविण्याची संधी सोडली नाही. त्याने येशूला जाताना पाहिले व तो कोण होता हे जाहीर केले. असे करून त्याने ऐकणाऱ्याचे लक्ष स्वत:कडे नव्हे तर ख्रिस्ताकडे केंद्रित केले. योहानाने ख्रिस्ताकडे न्याहाळून पाहिले व म्हटले, “हे पाहा देवाचे कोकरू”. हे ऐकून योहानाने त्यांना अडविले नाही. त्याच्या नम्र वृत्तीचे हे चित्र आहे. योहानाच्या साक्षीमुळे या दोन शिष्यांना ख्रिस्ताची अधिक ओळख व्हावी असे वाटू लागले व ते येशूच्या मागोमाग निघाले. ख्रिस्ताबरोबर राहून त्यांनी त्याचे ऐकले तेव्हा तो मसीहा (ख्रिस्त) आहे हे त्यांनी ओळखले. त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी लगेच ख्रिस्ताविषयी सांगण्यास सुरुवात केली.
     शुभवर्तमनाच्या शेवटी आपण बघतो की, येशू ख्रिस्ताचे व पेत्राचे नाते घनिष्ट बनते. येशूख्रिस्त पेत्राला ‘केफा’ म्हणजे (खडक) असे नाव देतो. येशूने पेत्राला नाव देऊन त्याच्या कार्यास पाचारण केले होते. येशूने हाक मारताच त्याने लागलीच जाळी व मचवा सोडून तो येशूच्या मागे गेला. पेत्र कसा होता हे महत्वाचे नसून येशूने त्याच्या मनोहृदयात काय पाहिले व त्याचे कसे निरीक्षण केले ह्याला महत्व आहे. मनुष्य कसा आहे इतकेच तो पाहात नाही तर मनुष्य काय बनू शकतो ह्याकडे त्याचे लक्ष असते.

मनन चिंतन :

देवाचे कोकरू :

जग पापी आहे, माणूस पापी आहे ह्याची योहानाने आठवण करून दिली. हजारो वर्षानंतरही माणूस आपल्या पापांतून स्वत:चे तारण करू शकला नाही, म्हणून ख्रिस्ताचे आगमन झाले. “तो आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील” (१ योहान १:१). योहानाची भाषा अर्पणाची आहे. कोकरू ह्या शब्दात समर्पण आहे ह्यात शंका नाही. बायबलच्या पंचग्रंथामध्ये (पहिल्या पाच पुस्तकात) कोकरू अर्पण केले जावे ह्याची नोंद नसली तरीही जुन्या करारात यशया व यिर्मया संदेष्ट्यांनी दु:ख यातना सहन करणाऱ्या सेवकाविषयी कल्पना मांडली आहे  (यशया १२:४६). नव्या करारात ही कल्पना स्पष्ट झाली आहे. माणूस पापमुक्त झाल्यास तो देवामध्ये सहज एकरूप होतो.
जुन्या परंपरेनुसार येरूसलेमच्या मंदिरात रोज सकाळी आणि संध्याकाळी कोकरू अर्पण केले जाई. माणूस गरीब असो अथवा श्रीमंत असो त्याने आपले अर्पण करायलाच हवे, अशी प्रथा रूढ झाली होती. वर्षानुवर्षे मानवाच्या पापासाठी ही अर्पणे वाहिली जात होती. तरीही पापांचा नाश होत नव्हता. योहानाच्या मते तशी लाखो कोकरे अर्पण करुनही पाप नष्ट होणार नव्हते; मात्र येशूच्या एकाच अर्पणाने पापांचे उच्चाटन होणार होते.
परमेश्वर मानवाला निवडतो केवळ सिंहासनावर बसण्यासाठी नव्हे तर एका अतिउच्च ध्येयासाठी निवडतो. जगाच्या मुक्तीसाठी निवडतो. जगाच्या तारणासाठी मात्र आपली तयारी हवी. आज आपल्या परिसरात कोणत्या बाबतील मुक्तीची गरज आहे. भ्रष्टाचार, दहशतवाद, साठेबाजी, महागाई, हिंसाचार सक्तीचे कुटुंब नियोजन वगैरे शत्रूंचा नाश करण्यासाठी आत्मसमर्पणाची गरज आहे. हे देवा तुझे कोकरू बनण्यास मला धाडस दे.

तुला केफा म्हणतील (योहान १:४२)

जेव्हा देव नाव ठेवतो तेव्हा त्या नावामध्ये तीन गोष्टी अंतभूर्त असतात. पहिल्या प्रथम त्या नावाला अर्थ असतो. नावात एक विशिष्ट कार्य असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो माणूस देवाचा असतो. विशिष्ट हेतूसाठी देवाने त्याला पाठवलेले असते. त्याचे देवाशी वेगळे आणि नवीन नाते असते.
देवाने नावे ठेवण्याच्या घटना इतिहासामध्ये आपणास दिसतात. उदा. आब्रामचे नाव त्याने आब्राहाम ठेवले. (उत्त्पती १७:५). याकोबचे नाव त्याने इस्रायल ठेवले (उत्त्पती ३२:२८). येशूचे नाव देवानेच दिले होते (लूक १).
केफा ह्या नावाचा अर्थ खडक होता. खडक मजबूत असतो. तो वाऱ्या-वादळांनी हलत नाही व फुटत नाही. पेत्राची श्रद्धा आणि निष्ठा इतकी अगाध होती की, ती खडकासारखी मजबूत होती.
पेत्र चुकला तरी तो तात्काळ येशूकडे धाव घेतो. प्रभूयेशु आपल्या जीवनाचे सर्वस्व आहे ह्याची त्याला पुरेपूर कल्पना होती. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण पाहतो की पवित्र आत्म्याचे आगमन झाल्यानंतर पेत्र कोणत्याही सत्तेला आणि अधिकाराला किंवा शक्तीला घाबरत नव्हता. प्रभूची सुवार्ता सांगत असताना त्याला तुरुंगात टाकले, मारहाण केली, राजकर्त्यांनी त्याला दहशत दाखवली परंतु तो कुणापुढेही वाकला नाही. कोणत्याही अनिष्ट प्रवृतीला तो शरण गेला नाही. त्याने ख्रिस्तसभेचा खरा पाया भक्कम बनविला व ख्रिस्तसभेची वाढ झाली.
पेत्र हा श्रद्धेचा खडक होता. ख्रिस्ताचा तो पहिला प्रेषित होता. येशूने पेत्राला नाव देऊन त्याच्या कार्यास पाचारण केले होते. पेत्राचा व्यवसाय बदलला होता, त्याच्या कार्याची दिशा बदलली होती. एकाच दिवशी त्याने १५३ मासे पकडले होते. परंतु एकाच दिवशी त्याने तीन हजार व पाच हजार माणसे धरली होती (प्रे. कृ. २:४१, ४:४). यावरून पेत्राचे भाषण हृदयस्पर्शी, परिवर्तन आणि माणसे खेचणारे असावे.
     आज ख्रिस्त सभेत पेत्रासारखे ‘केफा’ असतील तरच ख्रिस्तसभेची मान आणि शान उंचावेल. ख्रिस्तसभेत आज दगडी किंवा पोलादी नेतृव्त हवे. आपली श्रद्धा पहाडी असली, कृती ख्रिस्तानुरूप असली तरच श्रद्धाबांधणीस मदत होईल.

बोधकथा:

     आशाबाई एका श्रीमंत कुटुंबातील असूनही गावात आणि समाजात त्या प्रसिद्ध समाजसेविका, एक दयाळू व दानशूर बाई म्हणून नावाजलेल्या होत्या. मानवतादृष्टीनेच त्यांनी आतापर्यंत शेजाऱ्यांनकडे, गरजवंताकडे पाहिले होते. तिची करुणामय नजर आणि सतत आजारी, दु:खी लोकांना भेटण्याची वृत्ती ह्यामुळे प्रभावित होऊन तिला उद्देशून लोक म्हणत “ही आपली मदर तेरेजा”. मोठ्या अभिमानाने व भक्तीने लोक तीला नमस्कार घालीत. नम्रपणा, त्यागी वृत्ती, सतत हसरा चेहरा आणि कोणत्याही क्षणी सहकार्य करण्याची वृत्ती पाहून प्रत्येकाला हा अनुभव येत होता. सर्व कामातून वेळ काढून ती इतरांच्या घरी पोहचत असे. तीला काही स्त्रिया विचारात असत, “तुला हे सर्व कसे जमते?” ती त्यांना म्हणाली, माझं तुमच्यावर प्रेम आहे व तुमच्यामुळेच हे माझं सेवेच कार्य मी सिद्धीस नेत आहे. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही हेच प्रेम इतरांना द्या व त्यांचे जीवन आनंदीत करा. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. आपले पोप फ्रान्सीस, आपले महागुरू, धर्मगुरु, व्रतस्थ बंधुभगिनी यांनी आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे देवाचे वचन आपल्या पुढे सादर करावे म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया.
२. आजच्या युगात तरुण तरुणींनी देवाचे पाचारण स्वीकारावे, त्याच्या हाकेला प्रतिसाद द्यावा व अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी तयार व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी शांतता व न्यायासाठी एकत्र यावे. संपूर्ण शहरातच नव्हे तर जगात शांतता नांदावी म्हणून त्यांनी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. ज्या ज्या लोकांना मिशन भागात हालअपेष्टा आणि छळ सोसावा लागतो त्यांना देवाने सहनशक्ती व कृपा द्यावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.
५. जी कुटुंबे किंवा माणसे एकमेकांपासून दुरावलेली आहेत, एकमेकांशी बोलण्याचे त्यांनी टाळले आहे अशा लोकांना परमेश्वराच्या कृपेचा लाभ व्हावा आणि त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. 

No comments:

Post a Comment