Sunday 25 March 2018

 Reflections for the homily of Good Friday (30-03-2018) by Br Robby Fernandes.










उत्तम शुक्रवार


दिनांक: ३०-०३-२०१८
पहिले वाचन: यशया ५२:१३; ५३:१२
दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६, ५:७-९
शुभवर्तमान: योहान १८:१-१९, ४२









 प्रस्तावना: 

     उत्तम शुक्रवार हा खरोखरच उत्तम आहे, कारण प्रभू येशूने आमच्या प्रेमासाठी व तारणासाठी या दिवशी क्रुसावर आपला प्राण दिला. येशूचे क्रुसावरील मरण हे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ठरले आहे, कारण येशूने आम्हा सर्वाना पापमुक्त केले. त्याने असंख्य चाबकाचे फटके व दु:खे भोगिली, ज्यासाठी आपण सर्वजण कारणीभूत आहोत. हा शुक्रवार शुभ मानला जातो; कारण येशूने स्वत:चा प्राण जन-कल्याणार्थ वाहिला; त्याच्या ह्या बलिदानाद्वारे आपणास प्रेरणा आणि कृपा-शक्ती मिळावी म्हणून आपण मोठ्या श्रद्धेने ह्या पवित्र विधीमध्ये सहभाग घेऊया.  

पहिले वाचन: यशया ५२:१३; ५३:१२

     पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परमेश्वराच्या पवित्र वचनावर मनन-चिंतन करावयास सांगत आहे. यशया परमेश्वराच्या पुत्राचे वर्णन करत आहे. आपणा सर्वांना पापातून मुक्त करण्यासाठी देवाच्या पुत्राने सर्वांची शिक्षा स्वत:च्या उरावर घेतली. आमच्या अपराधामुळे तो घायाळ झाला. कापायला नेत असलेल्या कोकराप्रमाणे तो गप्प राहिला कारण त्याने बहुतांचे पाप स्वत:वर घेऊन, अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.

दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६, ५:७-९

     दुसरे वाचन हे इब्री लोकांस लिहिलेले आहे. देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आहे म्हणून सर्वांनी त्याच्या विश्वासात दृढ राहण्याची गरज आहे, कारण तो त्याच्या मरणातून आम्हास तारावयास समर्थ आहे. तो देवाचा पुत्र असूनही त्याने जे दु:ख सोसले त्यामुळे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि जे कोण त्याच्या आज्ञेत राहतात त्यांचा तो तारणकर्ता झाला.

शुभवर्तमान: योहान १८:१-१९, ४२

     शुभवर्तमानामध्ये योहान आपल्यासमोर प्रभू येशूचे दु:खसहन मांडत आहे. येशू ख्रिस्त मरणाला केव्हाच घाबरला नाही. त्याने देवाच्या कार्यामध्ये हर्षरित्या सहभाग घेतला. त्याने देवाच्या कार्याला कधीच नकारार्थी उत्तर दिले नाही. जेव्हा शिपाई पकडायला आले तेव्हा तो त्यांना निर्भीडपणे सामोरे जाऊन त्यांना सांगितले की, “मीच तो, नाझरेथकर येशू.” अशाप्रकारे त्याने स्वत:ला लीन केले.

बोधकथा:

     एका गावामध्ये जीवाला जीव देणारे दोन जिगरी मित्र होते.  आपला आनंद साजरा करण्यासाठी ते एका मद्यपान करण्याच्या दुकानात जातात. ते दोघे दारूच्या धुंदीत एकमेकांना शिव्या घालू लागतात. मारामारी सुद्धा करतात. जे जीवाला जीव देणारे होते ते आता ऐकमेकांचा जीव घेणारे होतात. जेव्हा दोघांमधील एक शुद्धीवर आल्यानंतर त्याला समजते की त्याने त्याच्या मित्राला जीवे मारले होते. त्याचे पांढरे शर्ट रक्ताने माखलेले होते. जेव्हा पुलिस त्याला पकडायला येतात तेव्हा तो पोलिसांच्या हातून निसटून पळून जातो. तो स्वत:चा गाव सोडून दुसऱ्या गावी राहायला जातो. ज्या घरात तो राहतो ते एका ख्रिस्ती बांधवाचे छोटेसे घर असते. तो त्या ख्रिस्ती माणसाला आश्रय देण्यास विनंती करतो पण ख्रिस्ती माणूस सांगतो की ह्या छोट्याश्या घरामध्ये तुला कोठे लपवू, पण तो खूपच आग्रह करतो. त्याची सर्व घटना तो ख्रिस्ती बांधवाला सांगतो.
     थोडा वेळ विचार केल्यानंतर ख्रिस्ती बांधव त्याला त्याचे शर्ट द्यायला सांगतो व स्वत:चे शर्ट त्या खुनी माणसाला देतो व सांगतो, “ह्या माझ्या शर्टवर एक सुद्धा डाग असता कामा नये”. त्या दोघांनी ऐकमेकांची शर्ट अदलाबदल केली. जेव्हा त्या घरामध्ये पोलीस आले, तेव्हा पोलिसांनी ख्रिस्ती माणसाला खुनी समजून घेऊन गेले. त्याच्यावर खुनाची केस झाली, कोर्टामध्ये त्याचा गुन्हा पण सिद्ध झाला. न्यायाधीशाने त्याला मरण दंडाची शिक्षा ठोठावली व उद्याच त्याला फासावर लटकवण्यात यावे असा आदेश दिला.  
     खरा खुनी त्या ख्रिस्ती माणसाच्या घरी सुरक्षित होता. त्याला त्याचाच हेवा वाटू लागला. जेव्हा त्याला समजले की त्या ख्रिस्ती माणसाला मरणदंडाची शिक्षा दिली आहे, तो थोडाही विलंब न करता कोर्टामध्ये गेला पण त्याचा काहीही उपयोग नव्हता. तो नंतर पोलीसांजवळ गेला व त्याचा गुन्हा त्याने कबुल केला. पण खूपच उशीर झाला होता. कारण त्या माणसाला कधीच फाशी दिली होती. त्याने स्वत:ला म्हटले की, ‘त्याने माझा गुन्हा स्वत:वर घेऊन त्याची भरपाई केली.’ त्याला ख्रिस्ती माणसाचे शब्द आठवले: ‘माझ्या शर्टवर एक सुद्धा डाग लावू देऊ नकोस’. अशाप्रकारे त्याने पश्चाताप केला व जीवन बदलले.

मनन चिंतन:  
    
     क्रुसावरील येशूच्या दु:खात सहभागी होण्यास आलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण सर्वजण ख्रिस्ताच्या दु:खसहनामध्ये भाग घेण्यास आलो आहोत. येशूचं दु:ख आपलं करण्यास ह्या पवित्र ठिकाणी मनन चिंतन करावयाव आलो आहोत. ख्रिस्ताच्या जीवनावर एक चांगले गीत आहे.
“मी वेचिले फुलांना काटे, ख्रिस्त मिळाले.
जखमी करुनी तुजला मला सर्व रे मिळाले.
हाती-पायी तुजिया, रुतले खिळे दुधारी.
मी रोगमुक्त झालो, फटके तुला मिळाले”.
ह्या छोट्याशा गायनाच्या कडव्यातून ख्रिस्ताचे वर्णन केलेले आहे. ख्रिस्त स्वत:साठी मेला नाही तर दुसऱ्यांसाठी मेला. आम्हाला रोगमुक्त करण्यासाठी येशूने स्वत:च्या शरीरावर काटेरुपी व खिळेरूपी दु:खे जग कल्याणार्थ वाहिली. आमच्या पापकर्मामुळे तो स्वत: जखमी झाला. आमच्या पापाच्या ओझाखाली तो चिरडला गेला. पण परमेश्वराचे कार्य शेवट पर्यंत म्हणजेच शरीरामध्ये जीव-प्राण असे पर्यंत त्याने कार्यरत ठेवले.
     येशू जीवनाच्या शेवट पर्यंत सत्य बोलला. सत्याला अनुसरून त्याने त्याचे कार्य पूर्ण केले; सत्याला चिकटून राहिला. त्याने सत्याला आपली ढाल बनवली आणि देवाच्या शब्दांना त्याने तलवार बनवून असत्यतेचा संहार केला. येशू सत्याचे जीवन जगत होता आणि असे हे सत्याचे जीवन जगत असताना कुठेतरी शास्त्री-पुरुषांचा ढोंगीपणा चवाट्यावर यायला लागला होता त्यामुळे त्यांना येशूची भीती वाटत होती. त्या कारणास्तव: येशूला जीवे मारण्याचा कट त्या दूषकर्मी माणसांनी रचला. ढोंगी माणसे, स्वत:च्या अभिमानासाठी व उच्च स्थान मिळविण्यासाठी कुठल्याही स्थराला जावू शकतात. कारण सत्य वचन हे कडू व दु-धोरी तलवारी सारखे असते. या माणुसकीच्या जाळ्यात देहाच्या रस्सीचा खेचाखेचि होत असताना तो शांत मेंढरा सारखा होता. का? कारण तो सत्याने वागला होता आणि याच सत्यासाठी त्याने स्वत:चे बलिदान दिले.
सत्य हे ऐका खऱ्या मित्रा प्रमाणे आहे. ते स्वत:चा प्राण देण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. हेच सत्य त्याने त्याच्या शिष्यांना शिकविले. शिष्यांना त्याने मित्र म्हणून संबोधले. म्हणून योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय १५:१३ मध्ये येशू असे बोलतो की, “आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्या पेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.” याच शिष्यांद्वारे आपण सर्वजण त्यांचे मित्र झालो.
     येशूने बारा शिष्यांची निवड केली होती. जेणेकरून त्याचे कार्य पुढे नेण्यास मदत होईल. पण ते सुद्धा निष्फळ झाले. जेव्हा येशूला पकडण्यात आले तेव्हा ते पळून गेले. त्या शिष्यां मधल्या जुदासने येशूला थोड्याश्या पैशापोटी विकूनही टाकले. तर पेत्राने जो ख्रिस्तासाठी मरावयास तयार होता त्याने तर सर्व लोक समुदायांपुढे येशूला नाकारले आणि ते सुद्धा तीन वेळा.
“मित्राच्या मृत्यूपेक्षा, मैत्रीचा मृत्यू हा अधिक दुख:दायक असतो. त्याचप्रमाणे, येशूच्या शरीरावरील घायाच्या वेदनेपेक्षा शिष्यांनी नाकारून व फसवून दिलेल्या वेदना ह्या क्लेशदायक व त्रासदायक होत्या.”
जो विश्वासघात शिष्यांकडून झाला तोच आतापण होत आहे. एका नीतिमान माणसाला क्रुसी खिळले ते आजही होत आहे. एका निष्पाप माणसाला त्याचे शरीर रक्तबंबाळ होईपर्यंत मारणे हे पण आज चालत आहे. जे २००० वर्षा अगोदर झाले ते आजही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण आपण त्या शिष्यांप्रमाणे घाबरून होतो. आजच्या समाजात स्त्रियांवर अत्याचार होतात तसेच समाजाचे विविधप्रकारे शोषण होत आहे त्या विरुद्ध आपण काहीही करत नाही. जीवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे ते म्हणजे सिरीयावर झालेला हल्ला. या हल्ल्यामध्ये हजारो-लाखो लोकांनी व निष्पाप बालकांनी त्यांचा प्राण गमावला; त्यांची घरे, रोजगार, सर्वकाही उध्वस्त झाले. ह्या सर्व अत्याचाराला फक्त माणूस व त्याची लोभमय वृत्तीच जबाबरदार आहे. ह्या लोभमय वृत्तीला विसर्जन करून पश्चातापी हृदयाने परमेश्वराकडे वळूया. जे ख्रिस्ताने केले ते आपल्या जीवनामध्ये अनुसरुया जेणेकरून आपण ख्रिस्तासारखे सत्याचे आणि क्षमेचे जीवन जगून ख्रिस्तासारखे ख्रिस्तमय होवूया. 
          

No comments:

Post a Comment