Thursday 7 February 2019


Reflection for the Homily of 5th SUNDAY IN ORDINARY TIME (10-02-19) By Br. David Godinho    



सामान्य काळातील पाचवा रविवार

दिनांक: १०/०२/२०१९
पहिले वाचन: यशया ६:१-२अ, ३-८
दुसरे वाचन: करिंथीकरांस पहिले पत्र १५:१-११
शुभवर्तमान: लुक ५:१-११


भिऊ नको कारण येथून पुढे तू माणसे धरशील

प्रस्तावना:
“तू बोलाविले, सेवा कराया प्रभू आलो आनंदे”
आज आपण सामान्य काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला पाचारण ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास आमंत्रण करत आहे. प्रभू परमेश्वर आपल्या उदारतेने आपल्या प्रत्येकाला त्याची आणि त्याच्या लोकांची सेवा करण्यास पाचारण करीत असतो.
सर्वप्रथम चांगला माणूस बनण्यासाठी व एक चांगले वैवाहिक जीवन जगण्यासाठी, आदर्श कुटुंब बनविण्यासाठी, तसेच धर्मगुरू किंवा धर्म-भगिनी होऊन देव राज्याची सुवार्ता सर्व जगभर पसरविण्यासाठी अशा वेगवेगळया कार्यासाठी परमेश्वर आपल्याला बोलावीत असतो.
आजची तिन्ही वाचने देखील ‘पाचारणा विषयी’ बोलत आहेत. पहिले वाचन दैवी दर्शनातून यशयाला प्रवक्ता होण्यास झालेले पाचारण ह्यावर आधारित आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल त्याला प्रेषित म्हणून झालेल्या पाचारणाविषयी बोलत आहे. तर शुभवर्तमानात खुद्द येशू ख्रिस्त ‘मासे नव्हे, तर माणसे धरण्यासाठी’ पेत्राला आणि त्याच्या सहकाऱ्यांना बोलावीत आहे.
परमेश्वर आपल्याला बोलावीत आहे, याची जाणीव आपल्याला व्हावी व त्या हाकेला आपण उत्फूर्तपणे व स्व: खुशीने होकार देण्यास पवित्र आत्म्याची कृपा आणि सामर्थ्य आजच्या मिस्साबलिदानात परमेश्वर चरणी मागुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ६:१-२अ, ३-८
दैवी दर्शनात इस्राएलच्या पवित्र देवाशी झालेल्या यशयाच्या भेटीचे वर्णन आजच्या वाचनात केलेले आहे. ह्या दर्शनात त्याने सेनाधीश प्रभू भव्य व उंच सिंहासनावर आसनस्थ असलेला पाहिले. आणि परमेश्वर जणू कोणाला तरी शोधत आहे अशी परमेश्वराची वाणी त्याला ऐकावयास आली. ती वाणी अशी होती की, “मी कोणाला पाठवू? आमचा प्रवक्ता म्हणून कोण जाईल?” आणि ह्या परमेश्वरी हाकेला यशया स्व: खुषीने होकार देतो. असे आपणांस सांगण्यात आलेले आहे.

दुसरे वाचन: करिंथीकरांस पहिले पत्र १५:१-११
          ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे मरतात तेव्हा त्यांचा शेवट असतो, ते पुन्हा जिवंत होत नाहीत. असे शिकविणारे खोटे शिक्षक करिंथ येथील ख्रिस्ती मंडळीत शिरले होते. त्यांचे शिक्षण किती खोटे आहे, हे संत पौलाने विस्ताराने दाखविले आहे. ख्रिस्ती श्रद्धेच्या महत्त्वाच्या बाबीची म्हणजेच ख्रिस्त आपल्या पापासाठी मरण पावला आणि त्याला कबरेत ठेवण्यात आले आणि तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित झाला व त्याने केफाला (पेत्राला) आणि इतर प्रेषितांना दर्शन दिले ह्या विषयी संत पौल खात्रीपुर्वक आपल्याला सांगत आहे. तसेच आपणास प्रेषित म्हणून झालेल्या पाचारणाविषयी येथे नमूद केलेले आहे. म्हणूनच संत पौल म्हणतो की, “जो काही मी आहे, तो देवाच्या कृपेने आहे.”

 शुभवर्तमान: लुक ५:१-११
चार प्रेषितांच्या विशेषतः शिमोन पेत्राच्या पाचारणाविषयी येथे सांगितलेले आहे. त्याच्या पाचारणाची सुरुवात अशा प्रकारे होते. शिमोन पेत्र आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपली जाळी समुद्रावर साफ करत होता. येशू येतो आणि त्याच्या मचव्यात चढून लोकांना शिकवण देतो. ही शिकवण पेत्राने नक्कीच ऐकली असेल. शिकवण देऊन झाल्यानंतर येशू पेत्राला म्हणतो, मासे पकडण्यासाठी तुझा मचवा खोल पाण्यात ने. पेत्र म्हणतो रात्रभर कष्ट करून आम्हाला काही मासळी भेटली नाही, परंतु ‘तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून मी माझी जाळी समुद्रात टाकतो.’ आणि जाळी फाटेपर्यंत त्यांना मासळी मिळते. आणि पेत्राच्या तोंडून नकळत शब्द निघतात, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी आहे. आणि येशू त्याला प्रेषित होण्यास पाचारण करतो. आणि सर्व काही सोडून ते त्याच्या मागे गेले, असे आपणास आजच्या शुभवर्तमानाच्या शेवटी सांगण्यात आले आहे. ह्यावरून आपल्याला असे दिसून येते की, प्रभू जर आपल्याला बोलावित असेल, तर आपण सगळ्या वस्तूचा त्याग करून ख्रिस्ताचा पाठलाग करावयास उत्सुक असले पाहिजे.

बोधकथा:
          एका राजा जवळ एक सुंदर असा मौल्यवान हिरा होता. त्याला त्या हिऱ्याचा एवढा अभिमान होता की त्याने तो हिरा आपल्या राज्याचं राष्ट्रीय प्रतिक म्हणून ठेवला होता. हा हिरा एवढा सुंदर व आकर्षित असतो की, तो हिरा पाहण्यासाठी पुष्कळ लोक त्या राज्यात येऊ लागले. तो हिरा आता त्या राज्याची प्रतिष्ठा बनला होता.
एके दिवशी दुर्दैवाने हा हिरा खाली पडतो व त्याला बारीकशी केसाएवढी तडा किंवा फट पडते आणि त्याची आकर्षकता किंवा सुंदरता कमी होते. म्हणून राजाला फार दुःख होते व खूप वाईट वाटते. मग राजा त्याच्या राज्यातील नामांकित कुशल व्यक्तींना बोलावतो व त्यांचा सल्ला घेतो. त्यांनी राजाला सांगितले की, त्या हिऱ्याने त्याचे वैभव आणि मूल्य गमावले आहे. तेव्हा निराशेमध्ये राज्याने संपूर्ण राज्यात घोषणा केली की, “जर कोणी हा हिरा दुरुस्त करेल, तर त्या व्यक्तिला खूप मोठे बक्षीस देण्यात येईल.” परंतु कोणीही तो हिरा दुरुस्त करण्यास पुढे आला नाही. शेवटी राजा तो हिरा दुरुस्त होणार ही आशा सोडणार एवढ्यात हिऱ्यावर कोरीव काम करणारी एक गरीब म्हातारी बाई राजाजवळ आली आणि म्हणाली, “तो हिरा मला द्या, हिरा घेऊन ती बाई म्हणाली की, हया हिऱ्यावरील ही लहानशी तडा ज्यामुळे ह्या हिऱ्याची सौंदर्यात नष्ट झाली आहे, तीच तडा ह्या हिऱ्याच्या प्रतिष्ठेला किंवा सौंदर्यतेला कारणीभूत ठरेल.” असे म्हणून तो हिरा घेऊन ती बाई राजाच्या नजरे आड झाली.
थोड्या दिवसानंतर ती बाई हा हिरा घेऊन राजाकडे परत आली आणि हिरा पाहताच राजा खूपच आश्चर्यचकित झाला. त्या हिऱ्याला आता पहिल्यापेक्षा खूप सुंदर असे नवीन आकर्षित रूप मिळाले होते. त्या बाईने त्या हिऱ्यावर हस्तकलेने सुंदर असे गुलाबाचे फुल कोरलेले होते आणि  त्या फुलाचा देठ म्हणून तडा गेलेल्या त्या फटीचा उपयोग केला होता. त्यामुळे तो हिरा आता पहिल्यापेक्षा अधिक आकर्षित दिसत होता.
तात्पर्य : देव वाईटापासून चांगले निर्माण करू शकतो.  
       
मनन चिंतन:
          जर आपण आजच्या जगात नजर मारली, तर आपल्याला समझेल की, जगात खूप अशी स्पर्धा चालू आहे. कुठल्याही क्षेत्रात म्हणा, प्रत्येकाला पहिलं यायचं आहे. आणि जर ह्या जगातील स्पर्धेत टिकायच असेल तर, चांगल्या कुशल माणसांची किंवा प्रशासकांची गरज आहे. जर आपल्याकडे चांगले ज्ञान असेल, व्यवस्थापनाचे कौशल्य असेल, तरच आपण ह्या जगातील स्पर्धेत भाग घेऊ शकतो. जर एखाद्याची चांगली कंपनी असेल व जर त्याला ही कंपनी ह्या जगात टिकवायची असेल, तर चांगल्या कुशल, उच्च शिक्षण असलेल्या, हुशार, बुद्धिमान आणि अनुभव असलेल्या माणसांची निवड करणे गरजेचे आहे. तेव्हाच त्याचा ह्या जगातील स्पर्धेत ठाव लागेल नाहीतर कालांतराने ती कंपनी बंध होईल.
          परंतु, काहीतरी विपरीत असं आपल्याला येशूच्या शिष्यांच्या बाबतीत ऐकायला मिळते. येशूने त्याच्या राज्याची स्थापना करून त्याचा कारभार पाहण्यासाठी अशिक्षित, अनपड मासेमारी करणाऱ्या लोकांची निवड केली. असे नाही की, त्यावेळी चांगले शिकलेली माणसे नव्हती, शास्त्री-परुशी हे खूप शिकलेले होते, त्यांना सखोल असं ज्ञान होतं, तसेच खूप वकील सुध्दा होते. ह्यांची निवड न करता ख्रिस्ताने ह्या अनपड, न शिकलेल्या कोळ्यांची निवड केली. त्यांना त्याने त्याचे सहकारी बनवले व त्यांच्या हातात स्वर्ग राज्याच्या चाव्या दिल्या.
          देव त्याचे कार्य पुढे नेण्यास कोणाला पाचारण करतो, हे आपल्याला आजच्या शुभवर्तमानात सांगितलेले आहे. खरे पाहता पाचारण हे देवा कडून येत असते. त्याची सेवा करण्यासाठी आणि त्याचे राज्य पुढे नेण्यासाठी देव त्याच्या इच्छेप्रमाणे लोकांची निवड करत असतो. बायबलमध्ये आपण पाहतो कि, अब्राहाम, मोशे, दावीद राजा, मरीया आणि संत योसेफ ह्यांना झालेल्या पाचारणात देव पुढाकार घेतो असे आपणास पहावयास मिळते. गेल्या रविवारी यिर्मया प्रवक्त्याच्या पुस्तकातून घेतलेल्या वाचनात प्रभू म्हणतो, “तुला जीवन देण्या अगोदरच, मी तुझी निवड केली आहे” (यिर्मया १:५). तसेच शमुवेलच्या पाचाराणात आपणास दिसून येते कि परमेश्वर त्याला हाक मारतो (१ शमुवेल ३:३). योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू म्हणतो, “तुम्ही माझी निवड केली नाही, परंतु मीच तुमची निवड केली आहे” (योहान १५:१६). यावरून आपल्याला समजते की, परमेश्वर आपल्याला बोलाविण्यास पुढाकार घेत असतो आणि तोच आपली निवड करीत असतो.
          परमेश्वर कोणाची निवड करतो? अनुवाद ७:७ मध्ये इस्रायेल प्रजेविषयी सांगितले आहे, प्रभू म्हणतो, “प्रभूने तुमच्यावर प्रेम केले, तुम्हाला निवडून घेतले, ते तुम्ही इतर राष्ट्रांपेक्षा बहुसंख्य होता म्हणून नव्हे, वास्तविकता तुम्ही तर सर्वांत अल्पसंख्य होता म्हणून.” म्हणजेच परमेश्वर सर्व सामान्य माणसांना त्याची सेवा करण्यास आणि त्याचे कार्य पुढे नेण्यास बोलावीत असतो. म्हणजेच देव हा जगाच्या ज्ञानी किंवा बुद्धिवान लोकांची निवड करीत नाही, तर देवाचे शहाणपण हे जगाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. त्याचे सुवार्तिक बनण्यासाठी आपल्याला त्याची हाक ऐकणे फार गरजेचे आहे. ही हाक आपल्याला कोठे ऐकावयास मिळते?
१. कुटुंब: कुटुंबामध्ये देवाच्या हाकेचे बी आपल्या हृदयात पेरले जाते. म्हणून आई-वडिलांनी आपल्या लेकरांना देवाच्या प्रेमाची, प्रार्थनेची ओढ लावणे गरजेचे आहे. त्यासाठी दररोज कौटुंबिक प्रार्थना करणे गरजेचे आहे.
२. देव शब्द: प्रभू शब्दाचे वाचन करणे आणि त्यावर मनन चिंतन करणे फार महत्त्वाचे आहे. कारण बायबल द्वारे देव आपल्याशी सवांद करीत असतो. आणि त्याच्या योजना आपल्याला कळवीत असतो.
जेव्हा आपण कौटुंबिक प्रार्थेनेला आणि देव शब्दाला प्रथम स्थान देऊ तेव्हा आपल्यामध्ये त्याची सेवा करण्याची आणि त्याच्या सान्निध्यात राहण्याची भावना उत्पन्न होईल आणि ही भावना म्हणजेच परमेश्वरी हाक असते. आजच्या शुभवर्तमानात शिकवण देवून झाल्यानंतर म्हणजेच देव शब्दा नंतर येशूने पेत्राला बोलावले. जेव्हा आपण पेत्राप्रमाणे देवाच्या हाकेला स्वः खुषीने होकार देतो, तेव्हा देव आपल्याद्वारे अदभूत अशी आगळीवेगळी कार्य करतो. तेव्हाच आपण बोलू शकू,
“ऐकुनी देवा हाक तुझी, चरणाशी तुझिया आलो मी.”
  
 विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, तुझी सेवा करण्यास आम्हाला कृपा दे.

१. पवित्र देऊळमातेचे सेवक पोप फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्म-भगिनी, धर्म-शिक्षक व सर्व ख्रिस्ती प्रापंचिक ह्यांच्याद्वारे तुझी व तुझ्या प्रजेची सेवा करण्यास आणि त्यांना केलेल्या पाचाराणात ते विश्वासू राहण्यास लागणारी कृपा त्यांना मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, विशेषकरून आपले राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रीमंडळ व इतर अधिकार यांनी भारताच्या संविधानातील नियम पाळून देशाचा कारभार चालवावा व निःस्वार्थीपणे देशाची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. हे प्रभू तू म्हणतो, “पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत.” म्हणून तुझ्या मळ्यात काम करण्यासाठी अनेक तरुण-तरुणींनी स्व: खुशीने पुढे यावे व आई-वडिलांनी त्यांच्या ह्या निर्णयाला पाठींबा व प्रोत्साहन द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. पवित्र शास्त्राला अनुसरून देऊळमातेच्या शिकवणीप्रमाणे आम्ही खरे ख्रिस्ती जीवन जगावे. आई-वडिलांचा सन्मान, आजारी भाऊ-बहिणींची सेवा, शेजारप्रीती, रंजल्या गांजल्यांना मदत अशी सेवादायी कृत्ये आपल्या हातून घडावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण विशेष प्रार्थना करूया अशा लोकंसाठी जे कामा-धंद्याच्या शोधात आहेत. जे आजारी आहेत, व्यसनाधीन आहेत, ज्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ज्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात, जे अनाथ आहेत व ज्या जोडप्यांना लेकरे नाहीत. अशा सर्व लोकांना देवाने भरपूर असा आशीर्वाद द्यावा आणि सतत त्यांच्या पाठीशी राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूसमोर ठेवूया.

No comments:

Post a Comment