Thursday 21 May 2020


Reflections for the Homily of Ascension of Our Lord (24-05-2020) By Fr. Wilson D’Souza.





प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सोहळा


दिनांक: २४/०५/२०२०
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३
शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०.



“पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.”
प्रस्तावना:
          आज देऊळमाता प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करीत आहे. पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक मानवाची अपेक्षा असते की, आपण स्वर्गात जावे व अनंत काळचे जीवन जगावे. हे स्वर्गीय सुख प्राप्त करण्यासाठी आपण सदोदित प्रयत्नशील असतो. परंतु, स्वर्गीय जीवन चांगल्या कृती द्वारे मिळत नसून; ती एक देवाची देणगी आहे. ती देणगी प्राप्त करण्यासाठी ह्या प्रभू भोजनात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११
          पहिले वाचन येशूच्या पुनरुत्थाना नंतर त्याने चाळीस दिवस आपल्या प्रेषितांना दर्शन दिले. त्यांने जे जे करायला व शिकवायला हवे ह्याची जाणीव करून दिली आहे. कारण तो त्यांना सोडून स्वर्गात जाणार होता. ते येरुशलेममध्ये एकत्र प्रार्थना करीत असताना त्यांच्या डोळ्यादेखत प्रभू येशू स्वर्गात घेतला गेला. कारण, आता तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो मेलेल्यांचा व जीवतांचा न्याय करील असे आपल्याला वाचायला मिळते.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३
          आजच्या दुसऱ्या वाचनात आपणाला येशूचे स्वर्गारोहण, त्याचे सामर्थ्य, सत्ता, अधिकार व धनीपणा हे दर्शवते. हा अधिकार येशू गाजवतो. कारण, तो देवाच्या उजवीकडे स्वर्गात बसला आहे. तो आपल्याला पवित्र जणांमध्ये वतनाचे वैभवी समृद्धी बहाल करत आहे.

शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०.
          शुभवर्तमानकार मत्तय आपल्या शुभवर्तमानाचा शेवट येशूला असलेल्या अधिकाराची माहिती देतो. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार येशूला दिला आहे. विशेष म्हणजे तो अधिकार येशूने आपल्याला दिले आहेत, ते म्हणजे; शिष्य करणे, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देणे. आणि येशूने जे शिकवले आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यात, युगाच्या समाप्ती पर्यंत पोहचवणे. हे सगळे करीत असताना येशू आपल्या बरोबर असणार आहे ह्याची जाणीव ठेवणे.

बोधकथा:
          एक पारधी (शिकारी) होता. तो सातत्याने जंगलात जाऊन प्राण्याची शिकार करत असे. हे करत असताना तो क्रुर बनला होता. समाजात लोक त्याला तुच्छ मानत असत, ते केवळ त्याच्या स्वभावामुळे. जंगलात तर, प्राणी मात्र त्याला फार घाबरत असत. एक दिवस असाच शिकारीच्या शोधात असताना अचानकपणे काही प्राणी घोळक्यात येऊन त्याच्यावर स्वारी केली. आपला जीव वाचवण्यासाठी तो एका फुलाच्या झाडावर बसला. प्राण्याला घालवून देण्यासाठी आपल्या हातातील बंदूक वापरून आवाज करण्याच्या प्रयत्नात; त्याच्या हातातील बंदुक खाली पडली.
          आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी फुलाच्या झाडावर चढलेला पारधी काही काम नाही म्हणून, फुल वेचून खाली टाकू लागला. फुलाचा ढिगाऱ्यातून वन देवी त्याला प्रसन्न झाली. ती म्हणायला लागली की, आपण वाहिलेल्या फुलांनी मी प्रसन्न झाले. आपणास काय वर हवा आहे तो मागा. वन देवीला पाहून पारधी घाबरला. आपण क्रूर, पापी आहोत, आपल्या जीवनात आपण कोणतीच सत्कर्मे केली नाहीत. तर, वन देवी मला प्रसन्न कशी झाली? तो स्वतःला दोष देऊ लागला. पण वन देवी त्या पारध्याला म्हणाली, “आपल्या संपूर्ण जीवनात आपण काहीही केले असले; तरीही, आपल्या शेवटच्या कृत्याने मी आपल्यावर प्रसन्न झाली आहे. जे पाहिजे ते मागा व आपल्याला दिले जाईल. आपण सदोदित वन देवीबरोबर आनंदात रहावे हा वर त्याने मागितला व तो वन देवीने त्याला बहाल केला.

मनन चिंतन:
“स्वर्ग देवाची मानवाला देणगी.”
          आज आपण प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करीत आहोत. स्वर्गारोहण म्हणजे काय? ह्याचे वर्णन आपण आजच्या पहिल्या वाचनात ऐकले आहे. संत लुक आपल्याला सांगत आहे की, येशू त्यांच्या प्रेषितांच्या डोळ्यादेखत वर घेतला गेला. ते आकाशाकडे निरखून पाहत होते. आणि त्याच्या स्वर्गारोहणाचे देवदूत हे साक्षीदार आहेत. ‘अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहीलात? हा जो येशू तुम्हांपासून वर आकाशात घेतला गेला तोच परत येईल. आपण प्रेषितांचा विश्वाससंगीतकार ह्या प्रार्थनेत म्हणतो; ‘येशू मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला, व पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत व मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल.
          स्वर्ग ही एक जागा नसून आपल्या अस्तित्वाचा भाग आहे. ती एक मानवाच्या जीवनातील स्तिथी आहे. स्वर्ग वर नसून पृथ्वीवर निर्माण करायचा आहे. स्वर्ग मानवाला त्याच्या कृत्यामुळे प्राप्त होत नसतो; तर, ही देवाची येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला बहाल केलेली देणगी आहे. देवा बरोबर राहणे म्हणजे; स्वर्गाचा अनुभव घेणे. आणि आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येशू प्रथम स्वर्गारोहण करतो. आपल्याला स्वर्गात नेण्याचा अधिकार, सामर्थ्य, सत्ता ही येशूकडे आहे.
          कधी-कधी मानवजात प्रयत्न करत असते की, मला मेल्यानंतर स्वर्गात जाऊन अनंत जीवन मिळवायचे आहे. त्यासाठी काही लोक अनेक सत्कृत्ये करतात. रोज प्रार्थना करतात, मिस्साबलीदानात सहभागी होतात, रोजरी म्हणतात, गोर-गरीबांची सेवा करतात. होय ह्या कृत्यांद्वारे आणि प्रार्थनेद्वारे आपण स्वर्ग कमावू शकतो. परंतु, ख्रिस्त स्वतः आपल्याला स्वर्गाची देणगी बहाल करत आहे. “जेथे मी असेल, तेथे त्यांनी असावे.” (योहान १४:३) अशी प्रार्थना सातत्याने त्याने बापाकडे केली आहे. त्यामुळे स्वर्ग मानवाच्या कृतीतून प्राप्त होत नसतो, उलट ती एक दैवी देणगी आपल्या सर्वांना मोफत बहाल केली आहे.
          स्वर्गा विषयी दुसरी चुकीची कल्पना आपल्या मनात आहे. ती म्हणजे देव स्वर्गात आहे. येशू ख्रिस्ताद्वारे देव आपल्या बरोबर आहे. आणि तो आपल्याला पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करायला सांगत आहे. हाच आजच्या शुभवर्तमानाचा गाभारा आहे.
“जेथे प्रेम, दया, शांती तेथे देवाची वस्ती.”
“करशील जे  गरिबांसाठी, होईल ते माझ्यासाठी.
दिले खावया भुकेल्यांना अन प्यायाला तान्हेल्यांना
उघड्याला पांघरावयाला केले सी हे मज साठी
स्वर्गीचे सुख तुझ साठी.”
          स्वर्गाच्या लायकीचे शिष्य करा, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देऊन त्यांना केवळ ख्रिस्ती करू नका. तर, ख्रिस्तामध्ये त्यांना स्वर्गाचा अनुभव घेऊ द्या. जेथे येशू आहे; तेथे स्वर्ग आहे. हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवा; कारण स्वर्ग व येशू युगाच्या समाप्तीपर्यंत आपल्याबरोबर राहणार आहेत.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभू, स्वर्गीय सुख प्राप्त करण्यास आम्हांस साहाय्य कर.”
१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य बहाल करावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आर्शिवाद असावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कृपा दृष्टी आमच्या देशांच्या सर्व नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर असू दे. त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास मदत कर व त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गांवर चालण्यास मदत कर, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
३. जगभरात अनेक लोक करोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना परमेश्वराचा स्पर्श लागून त्यांचे ह्या रोगापासून मुक्तता मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी माणसांसाठी प्रार्थना करितो, त्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे जाण्यास त्यांना शक्ती दे. पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे व सर्व आजारातून त्यांची सुटका करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.


No comments:

Post a Comment