Thursday 18 June 2020


Reflections for the 12th Sunday in Ordinary Time (21/06/2020) by Br. David Godinho.





सामान्य काळातील बारावा रविवार
दिनांक: २१/०६/२०२०
पहिले वाचन: यिर्मया २०:१०-१३
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१२-१५
शुभवर्तमान: मत्तय १०: २६-३३

भिऊ नका
प्रस्तावना:
          आज देऊळमाता सामान्य काळातील बारावा रविवार साजरा करीत आहे.
          प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या प्रकारची भीती असते आणि आजच्या ह्या कोरोना संक्रमित जगात, जेथे प्रत्येक व्यक्तीला ह्या भीतीच्या रोगाने ग्रासले आहे किंवा प्रत्येकाच्या मनात भय/भीती नावाची गोष्ट घर करून बसली आहे, अशा ह्या भीतीदायक परीस्थितीत आजची उपासना आपणा प्रत्येकासमोर आशा किंवा धैर्य धरण्याचे आव्हान करत आहे.
          खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये तीन वेळा, ‘भिऊ नका’ (मत्तय १०: २६, २८, ३१) हे धैर्याचे शब्द आपणास समोर ठेवीत आहे. जणू प्रभू येशू ख्रिस्त आपणांस सांगत आहे, की ह्या कठीण व भीतीदायक परिस्थितीमध्ये तो आपणा प्रत्येका बरोबर आहे. कारण प्रत्येक व्यक्ती त्याच्यासाठी बहुमोलाची आहे, आणि म्हणून आपणास घाबरण्याची गरज नाही.
          ह्या पवित्र मिस्सा बलिदानात भाग घेत असताना आपल्याला असलेली कुठल्याही प्रकारची  भीती आपण प्रभू येशूच्या चरणाशी आणूया व त्याला समर्पित करुया. कारण तो आपणास धैर्य देणार, आणि सर्व भीती पासून आपणांस मुक्त करणार आहे. तसेच त्याला सांगुया, की माझी जीवनरूपी नौका जी कोरोना महामारीच्या वादळातून जात असताना आपण सर्वजण त्या तरणाऱ्याला आपल्या तारणासाठी विनंती करूया म्हणून,
“सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वळाव रे माझी नाव ने किनारी!”

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया २०:१०-१३
          यिर्मया प्रवाद्याच्या पुस्तकातून घेतलेल्या ह्या उताऱ्याला ‘यिर्मयाचे शोक स्तोत्र’ असे म्हटले जाते. कारण येथे यिर्मयाने एखाद्या शोक स्तोत्रकारासारखे देवाकडे आपल्या शत्रूविरुद्ध तक्रार केली आहे व ओळ १३ मध्ये त्याला त्या तक्रारीचे उत्तर मिळते. यिर्मयाला इतरांनी सोडले आहे याचे चित्रण १० व्या ओळी मध्ये केले आहे, येथे वापरलेले ‘इष्टमित्र’ हे शब्द देखील उपरोधिक आहेत. यिर्मयाच्या हातून काहीतरी चूक व्हावी आणि ती त्याच्या अधःपातास कारण व्हावी म्हणून ते वाट पाहतात. परंतु ११ व १२ व्या ओळीमध्ये यिर्मया सांगतो की, ‘देव न्यायी आहे व असणार म्हणूनच तो (यिर्मया) त्याच्याविषयी सत्यानेच कार्य करणार.’ अशा आपल्या मनातील भावना त्याने मोकळेपणाने देवाला सांगितल्या आहेत. ह्यावरून परमेश्वर दीनांना म्हणजेच जो मनुष्य त्याच्या सहाय्यावर अवलंबून असतो त्यास कधी एकटे सोडणार नाही. तो सतत त्याच्या मदतीस धावून येईल असे आश्वासन ह्या उताऱ्यात वाचावयास मिळते.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१२-१५
          आदामाने केलेले आज्ञाभंगाचे कृत्य निरस्त करण्यासाठी ख्रिस्ताच्या आज्ञापालनेचे सामर्थ्य हाच ह्या परीच्छेदाचा थोर विषयमुद्दा आहे. पौलने आदाम व ख्रिस्त ह्यांना ‘प्रातिनिधिक व्यक्ती’ म्हणून पुढे केले आहे. आदामाने पाप केले, आज्ञाभंग केला आणि त्याच्या कृत्याद्वारे जे त्याचे आहेत त्या सर्वासाठी पाप व मरण आणले, याउलट ख्रिस्ताने आज्ञा पाळली आणि त्याच्या या आज्ञा पालनाने जे त्याचे आहेत, त्या सर्वासाठी नितीमत्त्व आणि जीवन आणले आहे. आदमाने केलेल्या पापा आणि आज्ञाभंगा द्वारे आलेली मरणाची अधिसत्ता पौलने येथे गृहीत धरली आहे, त्याचप्रमाणे पौल पुढे आपणांस हेच शिकवितो की, ख्रिस्ताने वधस्तंभावर स्वःताचे प्राण अर्पण करून त्यातून आधीच एक अधिसत्ता प्रस्थापित झाली आहे; परंतु ही अधिसत्ता मरणाची नसून जीवनाची आहे.      

शुभवर्तमान: मत्तय १०: २६-३३
          मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेल्या ह्या उताऱ्यात ‘भय’ धरण्याचे योग्य व अयोग्य प्रकार सांगितलेले आहेत. माणसाच्या विरोधाला घाबरणे म्हणजे चुकीच्या दिशेने विचार करणे, कारण शरीराचा घात करणे याहून अधिक काही लोकांना करता येणार नाही. पण देव मात्र ‘आत्मा आणि शरीर’ ह्या दोहोंचाही नरकात नाश करावयास समर्थ आहे. तसेच जे ‘सत्य’ आहे ते उघडपणे जाहीर केले पाहिजे व ही कामगिरी न करण्याचे भय आपण धरिले पाहिजे. तसेच ह्या उताऱ्याच्या अखेरीस आपणांस सांगितले आहे की, परमेश्वराला आपण खूप मौल्यवान आहोत. त्याला प्रत्येक मनुष्याची काळजी आहे कारण प्रत्येक व्यक्ती हे परमेश्वराचे लेकरू आहे.  

मनन चिंतन:
          जन्माला आलेल्या प्रत्येक माणूसला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते, कोण आजाराला घाबरतो, कोण उंचाईला घाबरतो, कोण जनावरांना घाबरतो, कोण आपल्या भविष्याचा विचार करून घाबरतो, कोण आपल्याला चांगली नोकरी मिळणार की नाही ह्या विचाराने घाबरत असतो, लहान मुलांना आपण परीक्षेत पास होणार की नाही ह्याची भीती असते, अशाप्रकारे मनुष्य कुठल्या तरी वस्तूला घाबरत असतो.
          परमेश्वराला आपल्या ह्या भितीदायक स्वभावाची जाणीव आहे, कारण मानवाला जीवनात अनेक अशा भीतीच्या अनुभवातून जावे लागते आणि म्हणूनच बायबलच्या जुन्या करारापासून ते नव्या करारापर्यंत, उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकापासून ते प्रकटीकरणाच्या शेवटच्या पुस्तकापर्यंत म्हणजेच अब्राहामापासून ते प्रकटीकरणाच्या योहानापर्यंत प्रभू परमेश्वर देव आपणांस ‘भिऊ नका, धीर धरा’ अश्या आशेच्या आणि धैर्याच्या शब्दांनी आपणा प्रत्येकास त्याच्या असण्याची जाणीव करून देत आहे.
          ‘भिऊ नका किंवा धीर धरा’ हे शब्द किंवा ‘घाबरू नका’ ही आज्ञा परमेश्वराने अब्राहामाला दिलेली होती, तसेच तीच आज्ञा इज्राएलला, मौजेसला, दावीदला जो राजा सौलाच्या हातून आपला जीव वाचवण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी बरीच वर्षे इकडे तिकडे गुहांमध्ये लपत होता त्यालाही दिली होती. तसेच दानियेलला ज्याला सिहांच्या गुहेत टाकण्यात आले होते, त्यालाही भिऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे अशी आज्ञा केली होती आणि म्हणूनच तो भुकेलेल्या सिहांच्या तोंडातून वाचू शकला. तीच आज्ञा गॅब्रियेल देवदुताने नव्या करारात मरिया मातेला दिली होती, गालीलाच्या समुद्रात बुडत असलेल्या पेत्राला खुद्द प्रभू येशूने भिऊ नकोस अशी आज्ञा केली आणि समुद्रात बुडताना त्याला वाचविले. अशा प्रकारे संपूर्ण बायबलची पाने जर आपण चाळली, तर बऱ्याच ठिकाणी हे शब्द आपल्या निदर्शनास येतील. आपण का घाबरू नये किंवा भयभीत होऊ नये; याचे कारणही स्पष्टपणे सांगितलेले आहे आणि ते म्हणजे खुद्द परमेश्वर ‘इम्मानुएलम्हणजे आमच्याबरोबर देव’ आपल्या सोबत आहे. (मत्तय १:२३) तसेच यशया प्रवक्त्याच्या पुस्तकात आपण वाचतो, प्रभू म्हणतो, “तू भिऊ नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे, घाबरू नको कारण मी तुझा देव आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्यही करतो, मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सवरितो.” (यशया ४१:१०) अश्या प्रकारे बायबल मधील ही वचने आपणास दिलासा देतात की परमेश्वर देव आपल्या सोबत आहे आणि म्हणून कोणत्याही प्रसंगी आपल्याला घाबरण्याची किंवा भयभीत होण्याची काही गरज नाही.
          आपण केव्हा घाबरतो? जेव्हा आपल्याला आपल्या सोबत परमेश्वर आहे ह्याची जाणीव नसते. जेव्हा आपल्या जीवनात कष्ट, दुःखे, संकटे येतात आणि आपली जीवनरुपी नौका ह्या कष्ट आणि दुःखाच्या वादळांनी हेलकावे घेऊ लागते तेव्हा आपण स्वतःच्या सामर्थ्यावर, शक्तीवर अवलंबून राहतो, मानवी बळावर आवलंबून राहतो आणि म्हणून आपण घाबरत असतो. जेव्हा आपली परमेश्वरावरील नजर हटते, तेव्हा आपण घाबरत असतो, तेच आपण पेत्राच्या जीवनात देखील पाहतो, तो येशूच्या सांगण्यावरून पाण्यावर चालू लागतो जोपर्यंत त्याची नजर येशूवर होती, तोपर्यंत तो सुरळीतपणे पाण्यावर चालून येशूकडे जाऊ शकला आणि जेव्हा त्याची नजर येशुवरून दुसरीकडे जाते तेव्हा तो घाबरतो आणि पाण्यात बुडू लागतो. जर आपली नजर आपण येशूवर ठामपणे ठेवली, तर आपण कुठल्याही भीतीदायक परिस्थितीवर मात करू शकतो.
          यिर्मया प्रवक्त्याच्या पुस्तकात आपण वाचतो की त्याचे जीवन हे शत्रूंनी भरले होते, अनेक ठिकाणी त्याला त्रास आणि कष्ट भोगावे लागले. त्याचे जीवन हे जणू काही काट्यांनी भरले होते, सर्वाकडून त्याला विरोध होता, चहूकडून त्याचा छळ केला जात होता अशा परीस्थितीत तो म्हणतो जे आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की “परमेश्वर बलवान सैनिकाप्रमाणे माझ्या पाठीशी आहे.म्हणून माझा पाठलाग करणारे पडतील, ते माझा पराभव करू शकणार नाही. ते पडतील, त्यांची निराशा होईल.” (यिर्मया २०:११) दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो की येशू ख्रिस्ताच्या आज्ञाधारकपणामुळे मरणाचा नाश झाला आहे आणि त्याने पापावर, मरणावर सैतानावर विजय मिळवला आहे. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात येशू आपणास घाबरू नका किंवा भिऊ नका ह्या शब्दांनी सांगू इच्छीतो की तो आपल्या बरोबर आहे. कारण प्रत्येक मनुष्य त्याला फार महत्वाचा आहे, ह्याची प्रचीती आपणास आजच्या शुभवर्तमानात ऐकावयास मिळते, येशू म्हणतो की तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा मोजलेले आहेत. म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्हीं अधिक मौल्यवान आहात.  (मत्तय १०:३०-३१)
          आज जगभरात कोरोना ह्या संसर्गजन्य आजारामुळे प्रत्येक माणूस घाबरलेला आहे, ह्या रोगावर अजून उपचार किंवा लस सापडलेली नाही, अशा परीस्थितीतही परमेश्वरावरील आपली श्रद्धा आपण दृढ करुया. तो आपल्या सोबत आहे आणि अशा परीस्थितीत तो आपणाला कधीही सोडणार नाही, परंतु पेत्राप्रमाणे आपली त्याच्यावरील विश्वासाची नजर दुसरीकडे न फिरवता त्या परमेश्वराकडे अतिमोठ्या विश्वासाने आणि श्रद्धेने दयेची याचना करुया, कारण तो विश्वासू देव आपला तारणारा आहे, तो आम्हा त्याच्या लेकरांना कधीही अनाथ सोडणार नाही, ह्याची खात्री ठेवूया आणि पुन्हा एकदा पेत्राच्या शब्दात परमेश्वराकडे मदतीचा हात मागुया आणि म्हणूया की, ‘हे प्रभू कोरोनाच्या भयंकर भीतीदायक महासागरात बुडणाऱ्या आम्हा तुज्या लेकरांना वाचव.’ (मत्तय १४:३०)   

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, आम्हला धैर्य दे.
१. पवित्र देऊळमातेचे सेवक पोप फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्म-भगिनी, धर्म-शिक्षक व सर्व ख्रिस्ती प्रापंचिक ह्यांच्याद्वारे तुझी व तुझ्या प्रजेची सेवा करण्यास आणि प्रत्येक कठीण परीस्थितीत तू आम्हा बरोबर आहेस ही जाणीव करून देण्यास लागणारी कृपा त्यांस मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, विशेषकरून आपले राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रीमंडळ व इतर अधिकारी यांनी भारताच्या संविधानातील नियम पाळून देशाचा कारभार चालवावा व निःस्वार्थीपणे देशाची सेवा करावी तसेच नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण नव्हे, तर आशेचे आणि आपलेपणाची भावना उत्पन्न करावयास ते सतत कार्यरत राहण्यास त्यांना आशीर्वादाने भर म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. पवित्र शास्त्राला अनुसरून देऊळमातेच्या शिकवणीप्रमाणे आम्ही खरे ख्रिस्ती जीवन जगावे. आई-वडिलांचा सन्मान, आजारी भाऊ-बहिणींची सेवा, शेजारप्रीती, रंजल्या गांजल्यांना मदत अशी सेवादायी कृत्ये आपल्या हातून घडावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आज जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या विषाणू मुळे लोकांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, म्हणून संपूर्ण जगभर निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या आजारावर लवकरात लवकर लस शोधण्यास संशोधकांना यश लाभावे, व जे लोक ह्या रोगाने पिडीत झाले आहेत त्यांना परमेश्वराने बरे करावे व जे लोक विशेषकरून डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस आणि इतर लोक जे निस्वार्थीपणे कोरोनाग्रस्त लोकांची सेवा करत आहेत त्यांना विशेष आशीर्वादाने भरावे म्हणून आपण प्रार्थना करूया.  
    
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूसमोर ठेवूया.




No comments:

Post a Comment