Friday 21 May 2021

                       Reflection for the PENTECOST SUNDAY (23/05/2021) By Br. Aaron Lobo



पवित्र आत्म्याचा सण

(पेन्टेकॅास्टचा सण)

दिनांक: २३/०५/२०२१

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११

दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र १२:३ब-७, १२-१३

शुभवर्तमान: योहान २०:१९-२३

प्रस्तावना:

आज देऊळमाता पवित्र आत्म्याचा सण साजरा करीत आहे. आजच्या दिवशी शिष्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला व पवित्र आत्म्याच्या वरदानांनी परिपूर्ण होऊन त्यांनी प्रभूची सुवार्ता पसरविण्याच्या कार्यास सुरुवात केली.

असे म्हटले जाते की जे आपल्याकडे नसते ते आपण इतरांना देऊ शकत नाही. गेल्या आठवडयात आपण ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचा सोहळा साजरा केला. प्रेषितांचा सहवास सोडून, येशू ख्रिस्त, आपल्या पित्याजवळ स्वर्गात परत गेला. येशूच्या मृत्यूनंतर, त्याचे शिष्य घाबरले होते, व आता, त्याला त्यांच्या सहवासातून कायमचे निघून गेलेला पाहून अजून हताश झाले. ते भयभीत होऊन त्यांनी स्वतःला एका खोलीत बंद केले. परंतु ख्रिस्ताने त्यांना सोडले नाही तर त्यांच्यावर असलेल्या अफाट प्रेमाकरिता, त्याने त्यांच्यावर आपल्या पवित्र आत्म्याचा वर्षाव केला; या आत्म्यामुळे येशूच्या शारीरिक अनुपस्थितीतसुद्धा, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे, ते त्याची उपस्थिती अनुभवतील.

या मिस्साबलीदानात भाग घेत असताना, आपण प्रार्थना करूया की शिष्यांप्रमाणे, पवित्र आत्म्यावरील आपला विश्वास दृढ व्हावा व आपण सुद्धा आत्म्यात असलेली ख्रिस्ताची जाणीव ओळखून त्याची सुवार्ता इतरापर्यंत पोहचवावी.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की येशूचे शिष्य एकचित्ताने प्रार्थना करीत होते. पवित्र आत्म्याच्या आगमनाची वाट पाहत होते. पेंन्टेकाँस्टच्या दिवशी म्हणजे पास्कानंतरच्या पन्नासाव्या दिवशी ते सर्व एकत्र जमले असताना स्वर्गातून आवाज आला व त्या आवाजाने ज्या घरात ते सर्व बसले होते ते घर भरून गेले आणि अग्नीच्या जीभा प्रत्येकावर बसल्या व नंतर सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तसेच आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.

दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र १२:३ब-७, १२-१३

          दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगतो की पवित्र आत्मा एकच आहे. विविध प्रकारची कृपादाने एकाच उगमापासून, देवापासून येतात. देवानेच ती सर्वांच्या समान हितासाठी दिली आहेत. हाच आत्मा प्रभू व देव ह्यांच्या कडून विविध प्रकारची कृपादाने, देणग्या मिळून सेवाकार्य होत असते. प्रत्येक व्यक्तीला स्वतः साठी नव्हे तर सार्वजनिक हितासाठी आत्म्याचे प्रकटीकरण होते.

शुभवर्तमान: योहान २०:१९-२३

येशू शिष्यांना दर्शन देतो व शिष्यांना आपली शांती देतो. पुनरुथित ख्रिस्ताने उच्चारलेले शांतीचे वचन हेच त्यांच्या आनंदाचे कारण आहे. त्याच्या ह्या शब्दाद्वारे त्याने आपली स्वतःची शांती शिष्यांना दिल्याचे दिसून येते व त्याच्या पुनरुत्थानाविषयी त्यांच्या मनात असलेल्या शंका तो दूर करतो. पित्याकडून मिळालेली शांती शिष्यांना देऊन त्यांना सुद्धा ती इतरांना देण्याचे कार्य येशू त्यांना सोपवितो.

मनन चिंतन:

गेल्या रविवारी आपण येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाचा सोहळा साजरा केला. पुनरुत्थित येशू ४० दिवस आपल्या शिष्यांबरोबर राहिला व आपल्या जिवंत असण्याचे पुरावे त्यांना दिले. येशूच्या दुखःसहन व मरणानंतर, सगळे शिष्य भयभीत झाले होते, परंतु, स्वतः त्यांच्या समोर प्रकट होऊन, त्यांच्या मनातले भय येशूने दूर केले व त्यांचा विश्वास स्थिर व दृढ केला.

आज आपण ‘पेंन्टेकाँस्टचा’ सोहळा साजरा करतो, म्हणजेच येशू ख्रिस्त पुनरुत्थित होऊन, त्यानंतर पन्नासाव्या दिवशी त्याने आपल्या शिष्यांवर आपल्या पवित्र आत्म्याचा, अग्नीच्या जीभांच्या रूपाने वर्षाव केला.

हा पवित्र आत्मा कोण आहे? त्याचे कार्य काय आहे? आपल्या जीवनात त्याचे काय महत्त्व आहे?

एका गावात एक भिकारी होता. आपलं भिक्षापात्र घेऊन तो लोकांच्या दारोदारी जाऊन त्यांच्याकडून भिक्षा मागायचा. एके दिवशी भिक्षा मागत मागत तो गावातल्या सोनाराजवळ पोहचला, व त्याच्यासमोर आपले भिक्षेचे पात्र ठेऊन त्याच्यात काहीतरी टाकण्यास आग्रह केला. त्याची वाईट अवस्था पाहून, त्या सोनाराला त्याच्यावर दया आली व आपल्या खिश्यातले काही शिक्के काढून त्याने त्या माणसाच्या भांड्यात टाकले. त्या पात्रात ते शिक्के पडण्याचा आवाज ऐकून तो सोनार आश्चर्यचकित झाला व त्याने त्या गरीब माणसाकडून ते पात्र घेतले व त्याची पडताळणी केली, व त्याला असा प्रश्न विचारला की तो कटोरा त्याला कुठून भेटला? भिकाऱ्याने त्याला सांगितले की त्याला कोणी तरी एका श्रीमंत माणसाने भेट म्हणून दिला होता. सोनार त्याला उत्सुकतेने म्हणाला, “या गावातला सर्वात श्रीमंत मनुष्य तूच आहे! जे पात्र तू घेऊन भिक्षा मागत फिरत आहेस, ते पात्र पूर्ण सोन्याचे आहे, व अमौल्य असे ते पात्र आहे!”

आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुद्धा असेच काही तरी घडते. परमेश्वराने आपल्या सर्वांनाच पवित्र आत्म्याच्या रूपाने एक उत्तम अशी भेट दिली आहे. परंतु आपण ही भेट आपल्या जीवनाच्या एक कोपऱ्यात, न वापरता तशीच ठेवून देतो आणि अमुल्यवान असलेल्या या भेटीला विसरूनही जातो! आजची उपासना आपल्याला देवाने आपणास दिलेल्या याच पवित्र आत्म्याची जाणीव ठेवण्यास आमंत्रण व संधी देत आहे.

हा पवित्र आत्मा, पवित्र त्रैक्यात असलेली तिसरी व्यक्ती आहे, परंतु तो एकच देव आहे. आपल्या जीवनात कश्याप्रमाणे तो आपली उपस्थिती जाहीर करतो?

१. सर्वात प्रथम, आपल्यामध्ये तो निवासतो व आपणास आपल्या प्रती दिवसाच्या व्यवहारात सहाय्य करतो. १ करिंथ ३:१६ मध्ये आपण वाचतो की आपण देवाचे मंदिर आहोत व देवाचा आत्मा आमच्यामध्ये वास करितो.

२. पवित्र आत्मा आपल्याला, बळ व शक्ती देतो. आपल्या कष्टाच्या वेळेत, परीक्षेच्या वेळेत तो आपणास धैर्य देतो व त्याच्यावर विजय प्राप्त करण्यास मदत करतो.

३. पवित्र आत्मा, आपल्याला संस्कारांद्वारे पवित्र करतो: बाप्तिस्माद्वारे आपल्याला देवाची मुलं म्हणून मान्यता देतो, दृढीकरणाद्वारे आपणास देवाचे खरे शिष्य व साक्षी बनवतो, ख्रिस्तशरीराद्वारे आपल्याला देवाच्या शरीराचा हिस्सा बनवतो, प्रायश्चिताद्वारे पापांची क्षमा देतो व देवाशी तुटलेला संबंध जोडतो, रुग्णभंगाद्वारे आपणास चागले आरोग्य देतो व आपले शरीरिक व आत्मिक आजार दूर करतो, तसेच लग्न व गुरुदीक्षेद्वारे आपले एकमेकांशी व देऊळ मातेशी नाते जुळवण्यास व ते घट्ट करण्यास सहाय्य देतो.

पवित्र आत्माहीन असलेले जीवन हे एका फुटलेल्या किंवा तुटलेल्या चाकाप्रमाणे आहे. त्याचा काहीच उपयोग नसतो. जेव्हा आपण ते दुरुस्त करतो, त्याच्यात हवा भरतो, तेव्हाच ते उपयोगी बनते. त्याच प्रमाणे आपल्या जीवनात पवित्र आत्मा जर नसेल तर आपल्या ख्रिस्ती जीवनाला कसलाच अर्थ नसेल, काहीच किंमत नसेल. खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. तर आजच्या या मिस्साबलीदानात, पवित्र आत्म्याचे दान आपणास मिळावे अशी प्रार्थना करूया व त्याचा सहवास आपणास पुन्हा एकदा एका नवीन रूपाने अनुभवता यावा यासाठी देवाकडे कृपा मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या आत्म्याचे दान आम्हाला दे.

१. ख्रिस्त प्रेमाचा दिवा तेवत ठेवण्यास हातभार लावणारे आपले परमगुरूस्वामी फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, व्रतस्थ व प्रापंचिक ह्यांना चांगले आरोग्य मिळावे व हे कार्य अखंड चालू ठेवण्यास पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरणा द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

२. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कृपा दृष्टी आमच्या देशाच्या सर्व नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर असू दे. त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास मदत कर व त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गांवर चालण्यास मदत कर म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत तसेच जगभरात अनेक लोक कोरोना व्हायरसने बाधित झालेले आहेत, अशा सर्वांना ह्या रोगापासून मुक्तता मिळावी त्यांना पुनरुत्थित प्रभू परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवीन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

४. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत असलेला आपला देश अनेक नैसर्गिक आपत्तीशी सामना करत आहे, हे आपत्ती दूर व्हाव्या व उद्ध्वस्त झालेली त्यांची घरे व जीवन पुनर्स्थापित व्हावीत यासाठी आपण प्रभूकडे विशेष प्रार्थना करू या.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वैयक्तिक गरजा प्रभूकडे मांडू या.



No comments:

Post a Comment