Thursday 5 August 2021

                                  


Reflection for the 19th Sunday in Ordinary Time (08/08/2021) By Bro. Roshan Rosario


सामान्य काळातील एकोणिसावा रविवार 


 दिनांक : ०८/०८/२०२१

पहिले वाचन - १ राजे १९:४-८

दुसरे वाचन – इफिसकरांस पत्र ४:३०- ५:२

शुभवर्तमान – योहान ६:४१-५१


स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल


प्रस्तावना

आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करीत आहोत आणि आजची उपासना आपणास प्रभू येशुख्रिस्त, जिवंत भाकर, जी स्वर्गातून उतरलेली आहे, ह्यावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे.

भाकर ही मानवी जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. भाकर आपली भूक भागविते, आपल्याला तृप्त करते, तसेच पुढचे कार्य करण्यास प्रबळ बनवते. हेच आज आपण पहिल्या वाचनात ऐकणार आहोत. एलिया संदेष्ट्याने एका दिवसाची वाट चालून जेव्हा तो थकून झोपी गेला तेव्हा परमेश्वराने त्याला भाकर व पाणी दिले; जिच्या बळावर तो चाळीस दिवस व चाळीस रात्र चालून देवाच्या पर्वतावर म्हणजे होरेब पर्वतावर गेला.

आजच्या शुभवर्तमानामध्ये लोकांनी येशू जिवंत भाकर, जी स्वर्गातून उतरलेली आहे, ह्यावर विश्वास न ठेवता त्याच्याविषयी कुरकुर करतात व संशय धरतात. ह्यावरून येशू त्यांना उघड सांगतो कि, जो माझ्यावर विश्वास ठेवणार त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल करण मीच जीवन देणारी स्वर्गीय भाकर आहे, आणि ही भाकर जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.

प्रभू येशूख्रिस्त हा स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, ह्यावर विश्वास ठेऊन तीचा आपल्या अंतःकरणात स्वीकार करावा म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू या.

 

बोधकथा

आजच्या वाचनाविषयी मला एका गोष्टीची आठवण येते: एकदा एका व्यक्तीने एका वर्तमानपत्राच्या संपादकाला असे लिहिले की, तो गेल्या तीस वर्षापासून चर्चमध्ये जात आहे व त्याने हजारो प्रवचन ऐकले आहेत आणि त्यातले त्याला एकही  प्रवचन आठवण नाही. तर त्याला असे वाटले की चर्चमध्ये जाण्याची त्याला गरज नाही आणि आणखी उपदेश ऐकण्याची गरज नाही. ह्यावर कोणी एका व्यक्तीने त्याला उत्तर दिले की, तुझ्या लग्नास तीस वर्षांहून अधिक वर्षे झाले असतील आणि तेव्हापासून तुझ्या पत्नीने बरेच पदार्थ बनवले असतील आणि तिने सर्व बनवलेले पदार्थ तुला आठवत आहेत का? तेव्हा तो व्यक्ती त्याला नाही असे म्हणाला. ह्यावर पुन्हा प्रश्न विचारात दुसरा व्यक्ती त्याला म्हणाला, “मग तू आता तुझ्या पत्नीच्या हाताचे अन्न कधीच खाणार नाही?” त्यावर पहिली व्यक्ती म्हणाली, “परंतु त्यातून मला रोजचा आहार मिळतो.” तेव्हा दुसरी व्यक्ती त्या पहिल्या व्यक्तीला म्हणते कि, जेव्हा तू पवित्र मिस्सामध्ये प्रभूचा शब्द ऐकतोस, पवित्र भाकर स्वीकारातोस तेव्हा तुझे आध्यात्मिक पोषण होते जे तुला आध्यात्मिक जीवन जगण्यास मदत करते.

बालच्या संदेष्ट्यांशी लढाई झाल्यानंतर संदेष्टा एलीयाला प्रोत्साहन आणि पाठिंब्याच्या स्वरूपात पोषणाची गरज लागते. राजा अहाबची पत्नी ईजबेलने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याचा जीव धोक्यात होता. अश्या वेळी एलीयाला एकाकीपणाचा अनुभव झाला म्हणून त्याने प्रभूकडे प्रार्थना केली कि, परमेश्वरा, मला आता मरु दे; माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे? त्याच्या मृत्यूची वाट बघत तो झोपी गेला; परंतु परमेश्वराची प्रेमळ नजर एलीयावर होती. त्याच्या प्रेमाखातर त्याने त्याला भाकर व पाणी पुरविले.

जेव्हा आपण परमेश्वराकडे रोजची भाकर मागतो, तेव्हा आपण फक्त सामान्य भाकर किंवा शारीरिक अन्नच मागत नाही, तर आत्म्याला पोषण देणारे आध्यात्मिक अन्न मागतो. एलीयाप्रमाणेच आपण कधीकधी एखाद्या संकटात सापडतो; ती संकटे आर्थिक किंवा वैवाहिक असू शकतात. त्या क्षणी आपण आध्यात्मिक आहाराची इच्छा जोपासतो धरतो आणि ते आहार आपल्याला प्रभू येशू मिस्साबलीदानात देत असतो, जे आपल्याला संदेष्टा एलीयासारखे  जीवनात पुढे जाण्यासाठी पोषण देते.  

ह्या जगाचा निरोप घेन्यागोदर प्रभू येशूने आपल्या शिष्यांना शेवटचे भोजन दिले जिच्यात त्याने भाकरीला आशीर्वाद देऊन स्वतःचे शरीर त्यांस दिले. प्रत्येक मिस्साबलीदानात प्रभू येशू स्वतः आपणास त्याचे शरीर भाकरीच्या रुपात देतो. हे आध्यात्मिक अन्न जे खातात ते येशुबरोबर आध्यात्मिक रूपाने एक होतात. म्हणूनच गलतीकरांस पत्र २: २० मध्ये संत पौल म्हणतो, “ह्या पुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो”.

ज्या प्रमाणे परमेश्वराने एलीयाला भाकर दिली, त्याच प्रमाणे प्रत्येक मिस्साबलीदानात प्रभू येशू आपल्यालाही जीवनाची भाकर देत असतो, ज्याच्याने आपल्याला एलीयासारखे सामर्थ्य व कृपा मिळते.

जसं परमेश्वराने आपणास स्वतःच शरीर देऊन आपलं तारण केलं, आपल्याला कृपा सामर्थ्य दिलं, त्याचप्रमाणे आपण ही इतरांना त्यांच्या कामात त्यांना सहाय्य करून, व त्यांना मदतीचा हात देऊन, त्यांच्या जीवनात आनंद आणावा म्हणून प्रार्थना करू या.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, स्वर्गातून उतलेली जिवंत भाकर आम्हांस दे.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व धर्मभगिनी व व्रतस्थ ह्यांनी सर्व भाविकांची अध्यात्मिक तयारी करावी व स्वर्गीय भाकरीचा अनुभव घेण्यास मदत करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. ख्रिस्त आपली जिवंत भाकर आहे, यावरील आपला विश्वास बळकट व्हावा व प्रत्येक मिस्साबलिदानामध्ये ही जिवंत भाकर खऱ्या अर्थाने सेवन करण्यास प्रभूचे सामर्थ्य लाभावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया कि, जेणेकरून या धर्मग्रामातील प्रत्येक भाविकाला प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव यावा व त्यांनी परमेश्वराच्या कृपेने एकत्र येऊन, एक कुटुंब म्हणून कार्य करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. आपल्या धार्मिक जीवनात येशूला ओळखण्यास व त्याच्या अधिक जवळ जाण्यास सामर्थ्य लाभावे, म्हणून प्रार्थना करूया.

५. जे लोक आजार, अन्याय, यातना, हिंसा यांना बळी पडले आहेत अशा सर्वांना स्वर्गीय भाकरीद्वारे कृपेचा अनुभव यावा, म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजासाठी प्रार्थना करूया.




No comments:

Post a Comment