Thursday 25 November 2021

  


Reflection for the First Sunday of Advent (28/11/2021) By Br. Pravin Bandya


आगमन काळातील पहिला रविवार


दिनांक: २८/११/२०२१

पहिले वाचन: यिर्मया ३३: १४-१६

दुसरे वाचन: १ थेस्सलनी ३: १२-४:२

शुभवर्तमान: लूक २१: २५-२८, ३४–३६





प्रस्तावना:

आज पासून आपण आगमन काळाला सूरवात करत आहोत. आगमन काळ म्हणजे बाळ येशूच्या स्वागताचा काळ आणि बाळ येशू पुन्हा एकदा आपल्या हृदयामध्ये जन्म घेणार आहे, म्हणून आपले हृदय, मन व अंतःकरणाची तयारी करण्याचा काळ आहे. आगमन काळाच्या पहिल्या रविवार पासून ख्रिस्तसभा नवीन उपासना वर्षाला सुरुवात करत असते. यिर्मया संदेष्टा हा नवीन कराराचा संदेष्टा म्हणून ओळखला जातो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण वाचतो कि, बाबिलोनच्या हद्दपारी मध्ये दुःख सहन करीत असलेल्या इस्राएल जनतेला यिर्मया संदेष्टा आशेचा किरण दाखवून, ‘दाविदाच्या घराण्यामध्ये धार्मिक अंकुर फुटेल, यहूदाचा उद्धार होईल व येरुसलेम सुरक्षित राहील’, ह्या शब्दाने त्यांचं सांत्वन करीत आहे. तर शुभवर्तमानात संत लूक आपणाला आपल्या अंतःकरणाची तयारी करण्यास सांगत आहे. तो म्हणतो, “तुम्ही सावध असा. अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी आपली अंतःकरणे भरू न देता तो आपणाला अंतःकरणाची तयारी करण्यास सांगत आहे. आगमन काळानंतर नाताळच्या सणाच्या दिवशी बाळ येशू आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात जन्म घेणार आहे; आपण स्वतःला प्रश्न विचारूया कि, मी बाळ येशूच्या स्वागतासाठी पात्र आहे का? या आगमनकाळामध्ये शक्य तेवढं चांगलं जीवन जगून बाळ येशूला आपल्या हृदयामध्ये जन्म घेण्यास परमेश्वराने आपणाला पात्र करावं, म्हणून प्रार्थना करूया.



मनन चिंतन‌
:

आज आपण आगमन काळामध्ये पदार्पण केले आहे. बाळयेशूच्या जन्माची आपण प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म दोन हजार वर्षांपूर्वी झाला. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सहाशे वर्षांपूर्वी परमेश्वराने यशया संदेष्ट्याद्वारे एक संदेश दिला. "पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल असे ठेवण्यात येईल" (यशया ७:१४ ). आणि तो संदेश सहाशे वर्षानंतर पवित्र मरियेमध्ये पूर्णत्वास आला. हेच आपण संत लूकच्या शुभवर्तमानातील १:३०-३१ मध्ये वाचतो, "देवदूताने मरीयेला म्हटले, ‘मरिये भिऊ नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल त्याचे नाव येशू ठेव’”. यशया संदेष्टा प्रभू येशूख्रिस्ताच्या जन्माविषयी भविष्यवाणी करून बाळ येशूचा स्वीकार करण्यास, त्याचे स्वागत करण्यास आपल्या मनाची, अंतःकरणाची तयारी करावयास सांगतो आणि म्हणतो, कि, "घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की, अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा, प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो, उंच-सखल असेल ते सपाट होवो, खडकालीचे मैदान होवो" (यशया ४०:३-४). नवीन करारात देखील लूक ३:४ मध्ये बाप्तिस्मा करणारा संत योहन आपणाला अंतकरणाची तयारी करण्यास सांगत आहे की, "परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा".

ह्या आगमन काळात आपण ख्रिस्त पुन्हा एकदा येण्याची वाट पाहत आहोत. बाळ येशू नाताळच्या सणाच्या दिवशी पून्हा एकदा आपल्या अंत:करणात जन्म घेणार आहे. त्याच्या स्वागतासाठी आपण तयार असावे म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो.

एकदा नरकामध्ये तीन सैतानांची सभा झाली. त्या तीन सैतानांनी ठरवलं कि, आपण जगामध्ये जाऊन मानव जातीचा देवावरील विश्वास दूर करू. ह्या तिघांची ही सभा चालू असताना त्यांचा मोठा सैतान म्हणजे पुढारी येऊन त्याने त्या तिघांना प्रश्न विचारले. त्याने पहिल्याला विचारलं कि, तू जगामध्ये जाऊन लोकांना काय सांगणार? ह्यावर तो म्हणाला  कि, मी जाऊन लोकांना सांगणार कि, या जगामध्ये देव नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा तो पुढारी त्या सैतानाला मनाला लोकांचा पूर्णपणे विश्वास आहे की या जगामध्ये देव आहे, म्हणून तुझ्या शब्दांवर ते कधीच विश्वास ठेवणार नाहीत.

मग त्याने दुसऱ्याला प्रश्न विचारला तू जाऊन लोकांना काय सांगणार? ह्यावर दुसरा सैतान म्हणाला की मी जाऊन सांगणार, स्वर्ग किंवा नरक नाही, म्हणून पाहिजे तेवढी पापे करा. तेव्हा त्याच्या उत्तराला देखील त्या मोठ्या सैतानाने म्हटले कि, लोकांचा स्वर्गावर आणि नरकावर पूर्णपणे विश्वास आहे. तु सांगतोय ते लोक मान्य करणार नाहीत, म्हणून तुझ्या शब्दांवर ही ते कधीच विश्वास ठेवणार नाहीत.

मग त्याने तिसऱ्याला ही तोच प्रश्न केला. तेव्हा तिसऱ्या सैतानाने उत्तर दिले कि, मी जगामध्ये जाऊन लोकांना सांगणार कि, तुम्हाला मरायला भरपूर वेळ आहे, म्हणून तुम्ही पाहिजे तेवढी पापे करा जेव्हा मरणाची वेळ येणार तेव्हा पश्चाताप करा. तेव्हा त्या मोठ्या सैतानाने म्हटलं कि, हे उत्तर ठीक आहे, आणि आज जगामध्ये काही लोकं तशा  प्रकारेच जीवन जगत आहेत.

सैतान सांगतं कि, आपणाला मरायला भरपूर वेळ आहे, म्हणून पापे करा; पण प्रभु येशूख्रिस्त मार्क १:१५ मध्ये आपणास म्हणतो, “काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा”.

आपलं आयुष्य हे ठराविक दिवसाचंच आहे. मग या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे जगत आहोत? आपण किती जगलो हे महत्त्वाचे नाही, तर आपण कसे जीवन जगलो, हे महत्त्वाचे आहे.

आपण जर परमेश्वराच्या आज्ञे विरुद्ध जीवन जगत असु, तर ह्या आगमन काळामध्ये आपली हृदये, आपली अंतःकरणे स्वच्छ करूया; नाताळच्या सणाच्या दिवशी बाळ येशू जन्मास येणार आहे. त्या बाळ येशचं आपल्या हृदयांत, अंतःकरणात स्वागत करण्यासाठी आपण पात्र व्हावे म्हणून त्या दयाधनाकडे प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, तुझे स्वागत करण्यास आमचे अंतःकरण शुद्ध ठेव.

१.    ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप, बिशप्स, सर्व धर्मगुरू, व धर्म बंधू-भगिनी ह्यांना ख्रिस्त सभेने प्रभूची शुभवार्ता घोषविण्याची जबाबदारी सोपवली आहे. ती त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पुढे चालू ठेवावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    प्रभू येशूच्या आगमनासाठी आम्ही सदैव तत्पर असावे, पापापासून मुक्त राहून ख्रिस्ताच्या आगमनाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यास पात्र ठरावे, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करू या.

३.    जी लोकं देऊळमाते पासून दुरावलेली आहेत व पापांच्या अंधारात खितपत पडलेली आहेत, अशा लोकांना प्रभूच्या जीवनदायी प्रकाशात येण्यास त्याची शक्ती व सामर्थ्य मिळावे आणि त्यांना आपल्या अपराधांची जाणीव व्हावी, म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

४.    ह्या आगमन काळाची सुरुवात करत असताना आपण सर्वांनी ख्रिस्ताचे रूप गरीब, अपंग, लुळे, व बहिरे ह्या सर्वांमध्ये पाहावे व त्यांना त्यांच्या दु:खात व संकटात मदत करावी, ह्यासाठी लागणारी कृपा परमेश्वर चरणी मागुया.

५.    चैनबाजी, अहंकार किंवा आनंद म्हणजे शाश्वत जीवन नाही, ह्याची जाणीव आम्हांला व्हावी व अशा मोहापासून आम्ही दूर रहावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना  करूया.

६.    आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी ठेऊया.

1 comment:

  1. Thank you for publishing the Homily for every Sunday

    ReplyDelete