Friday 4 March 2022

Reflection for the First Sunday of Lent (06/03/2022) By: Br. Rockson Dinis.



उपवासकाळातील पहिला रविवार

 


दिनांक: ०६/०३/२०२२.

पहिले वाचन: अनुवाद २६:४-१०.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १०:८-१३.

शुभवर्तमान: लूक ४:१-१३.

 

विषय: विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल” (रोमकरांस पत्र 6:9)


 

प्रस्तावना:

आज आपण उपवास काळातील पहिला रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूवरील विश्वासात वाढ करून आपणांस मोहांवर विजय मिळविण्यास पाचारण करीत आहे.

अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराने इस्रायली लोकांची आरोळी ऐकून त्यांना मिसऱ्यांच्या छळातून मुक्त करून दुधा-मधाचे पाट ज्या देशात वाहतात त्या देशांत सुखरूप आणिले असे ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल ‘जो अंत:करणात येशूवर विश्वास ठेवतो व तोच विश्वास त्याच्या मुखाने कबूल करतो त्याचे तारण होईल’ असे सांगत आहे. तर लूकलिखित शुभवर्तमानात अरण्यात सैतानाने घेतलेली येशूची परीक्षा व येशूने मोहांवर मिळविलेला विजय ह्याविषयी ऐकावयास मिळते.

येशूवर विश्वास ठेवणारा कधीही जीवनात नाराज होणार नाही. येशूमोहावर विजय मिळवल्यामुळे तो आपल्याला एक आदर्श बनला आहे. म्हणून त्याच्यावर असलेला आपला विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व दैनंदिन जीवनात जे मोह आपल्याला परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात त्या मोहांवर मात करण्यासाठी ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो आज संपूर्ण ख्रिस्त सभा प्रायश्चित काळातील पहिला रविवार साजरा करीत आहे. व आजची उपासना, आपल्याला विश्वास वाढविण्यासाठी आमंत्रण करीत आहे. कारण पवित्र शास्त्र म्हणते, “प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकाची कधीच फजिती होणार नाही.” आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो, की इस्रायल लोकांना मिसर देशामध्ये निर्दयपणे वागविले, परंतु इस्राएल लोकांनी विश्वास ठेवून आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा धावा केला, तेव्हा इस्राएल लोकांची आरोळी देवानी ऐकली, व त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. दुसऱ्या वाचनात आपल्याला, विश्वास ठेवणे म्हणजे काय, ह्या विषयी शिकवण देते. ख्रिस्त हा आपला प्रभू आहे. व त्याचा स्वीकार करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण फक्त ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आपले तारण होईल. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली होता.” म्हणून तो प्रत्येक परिस्थितीला व परीक्षेला तोंड देऊ शकला. त्यांने मोहावरती विजय मिळविला.

“जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभुने देवू केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.” (याकोबाचे पत्र १:१२) या जगात प्रत्येक मनुष्य मोहाचा सामना करतो. तसेच देवाच्या पुत्रालाही मोहाचा सामना करावा लागला. पवित्र शास्त्रामध्ये आपण वाचतो की, पवित्र आत्म्याने प्रभु येशूला सार्वजनिक जीवन सुरू करण्यापूर्वी वाळवंटात नेले. तेथे प्रभु येशूने अनेक प्रकारच्या मोहांवर मात केली. मोह ही अशी परिस्थिती आहे जेथे मनुष्य दोन विरुद्ध दिशेने दोन शक्तींमध्ये ओढला जातो, एक चांगली आणि दुसरी वाईट. अशा परीस्थीतीमध्ये, प्रत्येक मानवाने परीक्षेच्या वेळी देवाच्या बाजूने उभे राहण्याचे स्वतंत्रपणे ठरवावे अशी देवाची इच्छा आहे. परंतु जुन्या करारात आपण ऐकतो कि, अनेक वेळा इस्राएल लोक देवाच्या बाजूने उभे राहण्यास व अचूक असा निर्णय घेण्यात अयशस्वी ठरले व ते मोहास बळी पडले.

जुन्या करारात आपण वाचतो कि, जरी इस्राएल लोक हे मोहात पडले तरी सुद्धा परमेश्वराने त्यांच्यावर प्रीती केली. त्याने संदेष्टे पाठविले जेणेकरून मनुष्य देवाकडे आकर्षिला जावा. असे असूनही मनुष्याने देवाविरुद्ध जाण्याचे निवडले. सरते शेवटी देवाने आपला सर्वात प्रिय एकुलता एक पुत्र या जगात पाठवला. तो मोह आणि परीक्षांचा काळ संपवण्यासाठी नाही तर मोहाला कसे सामोरे जावे व परीक्षेच्या वेळी देवाच्या बाजूने कसे उभे राहावे हे शिकवण्यासाठी देवाने आपल्या पुत्राला पाठविले.

बायबलमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची माणसे आपल्याला आढळतात. एक अशा प्रकारची जी, जीवनातील मोहांवर मात करतात आणि दुसरी जी मोहांना बळी पडतात. अब्राहामाला विश्वासाचा पिता असे म्हटले जाते. कारण, त्याने आपला मुलगा इसहाक अर्पण करण्याच्या आज्ञेचे पालन केले. तसेच दुसरे म्हणजे, दावीद राजा हा शारीरिक वासनांच्या मोहात पडल्याचे वर्णन करते. नवीन करारात, जुडास इस्करिओतबद्दल लिहिले आहे, ज्याने तीस चांदीच्या नाण्यांच्या मोहात पडून प्रभु येशूचा विश्वासघात केला. पवित्र शास्त्रात आणि चर्चच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, जेथे मानव हा मोहांना सामोरे न जाता तो बळी पडलेला आहे.

प्रभु येशूने अनेक प्रकारच्या मोहांवर मात केली, जे काही आदाम, करू शकला नाही. ते प्रभु येशूने, केले. दगडाचे भाकरीमध्ये रूपांतर करण्यास आणि, ते खाण्यास त्याने नकार दिला. अशा प्रकारे आदामाकडून हरवलेले एदेन बाग आपल्याला परत मिळवून दिली. तसेच देवाला इस्रायलद्वारे संपूर्ण जगाला वाचवायचे होते, परंतु ते वारंवार मोहात पडून राहिले, म्हणून इस्रायल लोक देवाची योजना पूर्ण करण्यास योग्य राहिले नाहीत. परंतु प्रभू येशूने वाळवंटातील परीक्षांवर मात करून पित्याने त्याच्यावर सोपवलेले कार्य पूर्ण केले. ही शक्ती प्रभु येशूला त्याच्या चाळीस दिवस आणि रात्रीच्या प्रार्थनेच्या परिणामी प्राप्त झाली. अशी परिस्थिती, प्रत्येक माणसाच्या श्रद्धेची परीक्षा घेत असते व अशा अनुभवातूनच माणूस परिपक्व होतो. या अनुभवात व परिस्थीतीत असताना आपल्याला अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागते, कारण तेथे आपली विश्वासाची परीक्षा होत असते. जशी सोन्याची परीक्षा आगीत जळून होत असते, तशाच प्रकारे आपल्या विश्वासाची परीक्षा होत असते. म्हणून प्रभू येशूच्या वाळवंटातील अनुभवातून जाण्यासाठी, आपन नेहमी तयार असलो पाहिजे. कारण आपल्याला शाश्वत जीवन मिळविण्यासाठी अडचणी आणि मोहांवर नेहमी मात करावी लागेल.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो, मोहांवर मात करण्यास आम्हाला सहाय्य कर.”

१.    आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना ख्रिस्ताशी व ख्रिस्तसभेशी विश्वासू राहण्याचा जो वारसाहक्क प्राप्त झाला आहे, तो त्यांनी इतरांसमोर त्यांच्या जीवनाद्वारे आदर्श म्हणून ठेवावा ह्यासाठी आपण प्रार्थना करूया.

२.    ‘पाहणे म्हणजे विश्वास ठेवणे’, ह्या आजच्या नवीन पिढीच्या धारणेमुळे अनेक लोकांचा देवावरील व येशूवरील विश्वास लयास जात आहे, अशांना नव्याने प्रभूने त्यांच्या सानिध्यात आणून त्यांचा विश्वास बळकट करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    ‘देव आपल्यापासून नव्हे, तर आपण देवापासून दूर जात असतो’. ह्याची जाणीव आंम्हा प्रत्येकाला व्हावी व ह्या प्रायश्चित काळात आम्ही सर्वांनी देवाच्या अधिकाधिक जवळ येण्याचा प्रयत्न करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    आपल्या समाजातील, धर्मग्रामातील जे लोक व्यसनाधीन झाले आहेत, त्या सर्व लोकांना प्रभूच्या आशेचा किरण दिसावा व देवाने सोपवलेली त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    आपल्या धर्मग्रामातील ज्या व्यक्ती आजारी, निराशा आणि बऱ्याच व्याधींनी पिडलेल्या आहेत ह्या सर्वांनी हताश किंवा हतबल न होता दैवीदयेवर विसंबून प्रभूच्या सानिध्यात रहावे व त्यांचे जीवन प्रभूप्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६.    ‘पापांस बळी पडणे म्हणजे देवापासून विभक्त होणे’, म्हणून आपल्या मोहांवर विजय मिळवता यावा ह्यासाठी प्रभू येशूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण ‘प्रार्थना’ व ‘बायबल वाचन’ ह्यामध्ये सातत्य राखावे म्हणून प्रार्थना करूया.

७.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment