Monday 4 April 2022

Reflection for the Palm Sunday (10/04/2022) By: Dn. Roshan Rosario.



झावळ्यांचा रविवार




दिनांक: १०/०४/२०२२

पहिले वाचन: यशया ५०:४-७

दुसरे वाचन: फिलीपैकरांस पत्र २:६-११

शुभवर्तमान: लूक २२:१४-२३:५६




प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, आज देऊळमाता झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहे. आजची वाचने आपल्याला येशू ख्रिस्ताच्या मृत्यूबद्दल सांगत आहेत, ज्याने आपल्याला त्याच्या प्रेमाचा खरा अर्थ आणि देवाचे स्वरूप दिसून येते. आजच्या झावळ्यांच्या मिरवणुकीतील वाचनात जेरुसलेममध्ये प्रवेश करताना येशूचे लोकांनी कसे स्वागत केले ते सांगण्यात आले आहे. पहिल्या वाचनात प्रवक्ता यशया आपल्याला सांगत आहे की, कसे एका सेवकाद्वारे आपले तारण होईल. आजच्या स्तोत्रसंहितेचे शब्द हे प्रभू येशूने वधस्तंभावरून उच्चारलेल्या शब्दातले आहेत. तसेच दुसऱ्या वाचनात येशू पित्याला कशा प्रकारे आज्ञाधारक झाला हे सांगण्यात आले आहे. आजच्या शुभवर्तमानात आपल्याला आठवण करून दिली गेली आहे की, येशूने आपल्या प्रत्येकासाठी कसे दु:ख सहन केले आणि आपले प्राण समर्पित केले.

जल्लोषात प्रवेश केलेल्या येशूला लोकांच्या तिरस्काराला सामोरे जावे लागले. तो क्रुसाच्या भाराखाली चिरडला गेला. कारण तो परमेश्वराच्या योजनेस विश्वासू राहिला. येशू परमेश्वराच्या नावाने आपणास पापमुक्त करण्यास आला. त्याचे आपल्या जीवनात स्वागत करण्यासाठी व त्याला पूर्णतः शरण जाण्यासाठी कृपा मिळावी म्हणून ह्या मिसाबलिदानात आपण विशेष प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन:

आज आपण झावळ्यांचा रविवार किंवा प्रभू येशूच्या दुःख सहनाचा रविवार साजरा करीत आहोत. झावळ्यांच्या रविवार पासून जी दुःखदायी कथा सुरू होते ती मुळात एक मानवी नाट्यमय सत्य आहे; हि आमची कथा आहे. येशू त्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेश करत असताना, तो मानवतेला त्याच्याबरोबर घेऊन जातो आणि प्रत्येक पास्काच्या सणात असे तो करत असतो. आपण फक्त दोन हजार वर्षांपूर्वी घडलेली ऐतिहासिक घटनेचीच आठवण करत नाहीत, तर आपण येशूच्या जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानात भाग घेत असतो.

येरुसेलेम शहरात येशूचा प्रवेश जल्लोष, आनंद आणि आशेच्या प्रचंड लाटेवर सुरू झाला. लोकं रस्त्यावर मोठया रांगेने उभे राहिले; ते झावळ्या हलवून किंवा आपले झगे आणि वस्त्रे जमिनीवर पसरवून त्याच्या नामाचा जयघोष करत होते. ही एक प्राचीन रोमन परंपरा होती, ती अशी की ज्यावेळी सैन्यांनी युद्धात यश मिळाल्यानंतर त्यांचे स्वागत या पद्धतीने लोकं करीत होते. ‘होसान्ना, होसान्ना, जो प्रभूच्या नावाने येतो तो धन्य’ असे मोठ्याने ओरडून लोकांनी येशूचे स्वागत केले.

तरीही, जमलेल्या लोकांचा स्वभाव किती लवकर बदलला, जी लोकं आनंदाने त्याचे स्वागत करतात, तीच लोकं ‘त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर खिळा.’ अशा प्रकारे ओरडू लागली. त्या येरुशेलेम शहरात येशूचा विश्वासघात केला जातो आणि त्याच्या जवळचे शिष्यपण त्याला नाकारतात व बाकीची लोकं धावत पळत सुटतात आणि त्याला सोडून देतात. त्या वधस्तंभावर येशू एकटाच राहिला आहे.

झावळ्यांचा रविवार आणि खरंच संपूर्ण पवित्र आठवडा योग्य प्रकारे साजरा करण्यात आपण हरवून जाऊ शकतो; हा खरा धोका आहे. जर आपण सावधगिरी बाळगली नाही तर आपण कशाची आठवण ठेवतो, काय साजरे करतो आणि त्यात कशा प्रकारे भाग घेतो हे आपण गमावू शकतो. तसेच हा महान सप्ताह सन्मानाने आणि श्रद्धेने साजरा करताना, आपण स्वतःला हे देखील विचारले पाहिजे की, हे सर्व काय घडत आहे आणि प्रत्येकासाठी याचा काय अर्थ आहे?

झावळ्यांचा रविवार किंवा पवित्र आठवड्यापासून तर येशूच्या पुनुरुत्थानाच्या कळसा पर्यत उलगडणार्‍या रहस्यात मी कुठे आहे? ह्याचा आपल्याला भास ठेवायला पाहिजे. येशू गाढवावरून जात असताना मी कुठे आहे? त्याच्या नावाचा जयजयकार करणार्‍या जमावापैकी मी आहे का? मी कोणत्याही प्रकारे यहूदासारखा आहे का? मी इतरांचा किंवा येशूचा विश्वासघात केव्हातरी केला आहे का? पेत्राप्रमाणे, मी येशूला ओळखण्यास नकार दिला आहे का? जेव्हा मी इतरांचा न्याय करतो आणि त्यांना दोषी ठरवतो तेव्हा मी पिलातासारखा आहे का? येशूला त्याच्या गरजेच्या वेळी मदत करणाऱ्या शिमोन किंवा वेरोनिकासारखा मी आहे का? त्याच्या नावाचा जयजयकार करणाऱ्या आणि येशूचे स्वागत करणाऱ्या जमावासोबत उभा राहिल्यानंतर, मी ‘त्याला वधस्तंभावर खिळा! त्याला वधस्तंभावर खिळा!' असे ओरडून मी त्याची निंदा केली आहे का?

जेव्हा आपण झावळ्यांचा रविवार साजरा करतो आणि पवित्र आठवड्याद्वारे आपला प्रवास सुरू करतो, तेव्हा आपण गर्दीत कोण आणि कुठे आहोत असे विचार आजचे शुभवर्तमान आपल्या समोर मांडत आहे. ह्या आठवड्यात आपली ही प्रार्थना व मनन चिंतन असायला पाहिजे कि, आपण कसल्या प्रकारचे ख्रिस्ताचे अनुयायी आहोत किंवा होणार आहोत?

प्रार्थना, धार्मिक विधी आणि समारंभांच्या या व्यस्त आठवड्यात, आपण प्रभू येशूचे दु:खसहन, मृत्यू व पुनुरुत्थान याकडे आपले लक्ष्य केंद्रित करून खुद्द त्यालाच म्हणजेच येशू ख्रिस्तालाच दुर्लक्षित करू नये. आपण या पवित्र आठवड्याची सुरुवात करत असताना, येशू आपला सतत साथीदार असू द्या. आपण विश्वास आणि आशेने येशूच्या जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थानाच्या रहस्यात प्रवेश करू या.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

१)     आपले जीवन देवाच्या कार्यासाठी समर्पित केलेले आपले पोप, बिशप व सर्व धर्मगुरु व धर्मभगिनींना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कामात प्रभूचा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२)     सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कल्याणाची कामे करत असताना विरोधास तोंड देऊन ख्रिस्ताप्रमाणे ठाम उभे राहावे व त्यांना पवित्र आत्म्याचे पाठबळ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३)     हा पवित्र आठवडा चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येशुच्या जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना करूया.

४)     जे तरूण-तरूणी देवापासून दूर गेली आहेत, जे नोकरीच्या शोधात आहेत व ज्यांना जीवन नकोस झालंय ह्या सर्वांवर देवाचा आर्शिवाद असावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

५)     आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

 

No comments:

Post a Comment