Friday 5 August 2022

 Reflection for the Homily of 19th SUNDAY IN ORDINARY TIME (07-08-22) By Br. Gilbert Fernandes
सामन्य काळातील एकोणिसावा रविवार

“जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.”



दिनांक: ०७ /०८/२२ 
पहिले वाचन: शालमोनाचा ज्ञानग्रंथ १८: ६-९
दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र ११: १-२ ; ८-१०
शुभवर्तमान: लुक १२: ३२-४८ 

प्रस्तावना:

          आज आपण सामान्यकाळातील एकोणिसावा रविवार आणि संत जॉन मेरी व्हियानी यांचा सण साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला नेहमी तत्पर व तयार राहून देवाच्या सेवेत मग्न राहण्यास आमंत्रण करीत आहे.

          आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, परमेश्वर आपले शत्रूपासून तारण करतो जेणेकरून आपण त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकू. दुसऱ्या वाचानात इब्रीलोकांस पत्र ह्यात आपल्याला विश्वासाच्या दोन बाजू आहेत असे सांगण्यात येते आणि त्या म्हणजे, आशा आणि भरवसा. हि गोष्ट प्रत्येक श्रद्धावंतासाठी अतिशय आनंददायक व आशादायक  आहे असे आपणास सांगण्यात आले आहे. तर शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, नेहमी चांगल्या सेवकाप्रमाणे आपल्या धन्याची सेवा करा व पुढे येशू म्हणतो, “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल.

          आज आपण धर्मगुरूंचा दिवस साजरा करीत असताना, ह्या पवित्र मिस्साबलीदानात आपल्या ख्रिस्ती जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व धर्मगुरुंसाठी आणि विशेष करून आपले प्रेमळ प्रमुख धर्मगुरू फा......... आणि त्यांचे सहाय्यक धर्मगुरू फा........ ह्यांना देवाने त्याच्या प्रेमाचा, शांतीचा आणि क्षमेचा संदेश जगजाहीर करण्यासाठी व देवाच्या वैभवात सहभागी होण्यासाठी कृपाशक्ती तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य प्रदान करावे म्हणून प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

          आफ्रिकेत उबंतू नावाची एक प्रथा आहे व त्या मागचे प्ररेणास्थान ही त्यांची उबंतू संस्कृती आहे. एकदा एका मानववंशशास्त्रज्ञानी आफ्रिकन मुलांसाठी खेळ ठेवला. त्याने झाडाजवळ मिठाईची एक टोपली ठेवली आणि मुलांना १०० मीटर अंतरावर उभे केले. मग घोषित केले की जो प्रथम पोहोचेल त्याला टोपलीतील सर्व मिठाई मिळेल. जेव्हा त्या व्यक्तीने त्यांना जा म्हटले तेव्हा माहिती आहे काय झाले असेल? त्या सर्व मुलांनी एक दुसऱ्याचे हात पकडले व सर्व एकत्र त्या मिठाई जवळ पळाले व सर्वानी बरोबरीने वाटून आनंदाने ती मिठाई खाल्ली. जेव्हा त्या महाशयाने विचारले त्यांनी असे का केले तेव्हा ते म्हणाले ‘उबंतू’ म्हणजेच इतर जेव्हा दुःखी असतील तेव्हा मी कसा काय आनंदी राहू शकतो?

          त्यांच्या भाषेत उबंतू म्हणजे, “मी आहे कारण आम्ही आहोत.”

          प्रिय बंधू-भगिनींनो, नेहमी प्रमाणे आजही प्रभू येशू आपल्या शिष्यांसमोर एक नवीन आव्हान व कठिण असा पर्याय ठेवत आहे. ख्रिस्ताने त्यांच्याकडून एक मुलभूत जीवन शैली  निवडण्याची अपेक्षा केली. कारण आजकाल समाज्यात पाहतो प्रत्येक व्यक्ती जीवनात अल्प कालावधीत, शक्य तितकी संपती मिळविण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा येशूने आपले शिष्य निवडले तेव्हा त्याने त्यांच्या समोर कठीण पर्यायच ठेवले होते. लोकांचा पैश्यासाठी, संपत्तीसाठी, अधिकार गाजवण्यासाठी चाललेली धडपड पाहून ख्रिस्त आपल्या शिष्यांना सर्व काही त्याग करावयास सांगतो व गरिबांना द्यावयास सांगतो. “तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि गरिबांना पैसे दया. जुन्या न होणाऱ्या व स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी करा कारण तेथे चोर जाऊ शकणार नाही व कसर ही त्याचा नाश करू शकणार नाही.” (लुक १२: ३३).                     

          असिसिकार संत फ्रान्सिस ह्यांनी येशूचे तंतोतंत अनुकरण केले व त्यामुळेच त्यांना आज आपण आलतेर ख्रिस्तूस किंवा दुसरा ख्रिस्त म्हणून संबोधतो. त्याने आपले सर्व कपडे काडून फेकून दिले व आपले जे काही होते नव्हते ते गोर गरिबांना देऊन टाकले. इतकेच नव्हे तर त्याने आपले आई-वडील, घरदार सोडून येशूची सुवार्ता लोकांना सांगितली व इतरांची सेवा केली. महात्मा गांधी ह्यांनी सुद्धा आपले चांगले कपडे टाकून धोतीचा स्वीकार केला. कारण भारतात असंख्य लोक गरिब आहेत व त्यांच्याकडे घालावयास पुरेसे कपडे नाहीत म्हणून त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्या बरोबरीने जीवन जगण्यास त्यांनी धोती परिधान केले.

          येशू ख्रिस्त म्हणतो, जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा. कारण ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल.

          आपले जीवन हे परमेश्वराकडून आपल्याला मिळालेले दान आहे. परमेश्वराने आपल्याला त्याच्या गौरवासाठी आणि इतरांच्या सेवेसाठी निर्माण केलेलं आहे. आपल्याला अनेक वरदाने, कलागुण, बुद्धिमत्ता वैगेरे देऊन देवाने आपणास सर्वगुण संपन्न केले आहे. आपल्या बुद्धीचा, कलागुणांचा योग्य तो वापर करून आपण आपले जीवन घडविणे रास्तच आहे. देव आपल्या जीवनाद्वारे इतरांच्या जीवनात सुख समाधान असावे म्हणून योजना तयार करीत असतो. आपल्या जीवनाद्वारे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हीच ईश्वराची इच्छा आहे.

          जी व्यक्ती आपल्याला मिळालेल्या दानांचा वापर इतरांच्या भल्यासाठी करते, त्या व्यक्तीला परमेश्वर भरपूर कृपादाने देऊन वैभवसंपन्न करीत असतो. आपण ज्या मापाने द्याल त्याच मापाने आपल्याला परमेश्वराकडून त्याची परतफेड मिळत असते. प्रभू येशू आज म्हणतो, ‘ज्याच्याजवळ पुष्कळ आहे त्याला पुष्कळ दिले जाईल’ म्हणजेच जो आपल्या कलागुणांचा विकास करून त्याचा सदुपयोग करील त्याला जास्त कृपादाने प्राप्त होतील. आपण ज्यांना सहाय्य करतो व ज्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो, त्यांच्या प्रार्थनेद्वारे आपल्याला देवाकडून प्रतिफळ मिळत असते. आपले जीवन हे आपले नाहीच ते परमेश्वराने त्याची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी दिलेले जणू उसने ‘दान’ आहे म्हणूनच दु:खी, कष्टी, असहाय्य व संकटग्रस्त अशा सर्वांच्या मदतीला धावून जाणे आपले परमकर्तव्य आहे.

          येशूने शिष्यांस नेहमी सावध व जागृत राहण्यास सांगितले. कायम सज्ज व तयारीने राहा ज्या प्रमाणे एखादा नोकर आपल्या मालकाच्या परत येण्याची वाट पाहत असतो. देव कुठल्याही वेळी आपल्या भेटीला येऊ शकतो. ज्याप्रमाणे येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, “मनुष्याचा पुत्र कुठल्याही वेळी येईल, जेव्हा तुम्ही त्याची अपेक्षा करीत नाही.” आध्यात्मिक मनुष्य नेहमी तत्पर व देवाच्या येण्यासाठी तयार असतो. तो देवाला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वीकारतो.

          आजच्या शुभवर्तमाना धनी व दासाचा दाखला देऊन प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आपल्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करून देत आहे. आपण आजच्या शुभवर्तमानावर मनन-चिंतन करीत असता आपल्याला परमेश्वराने कोणकोणत्या देणग्या दिलेल्या आहेत हे तपासून पाहूया. त्या देणग्यांच्या आधारे स्वत:चे कुटुंब व समाज या संबंधाने आपण आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतो का? परमेश्वराने प्रत्येकाला जीवनाचे वरदान देऊन ते समृद्धपणे जगता यावे म्हणून अनेक देणग्या बहाल केलेल्या आहेत. त्या देणग्यांचा योग्य तो वापर करून आपण आपले स्वत:चे तसेच इतरांचे जीवन सुखकर समृद्ध बनवायला हवे. परमेश्वर आपल्याला ह्या दिलेल्या जबाबदारीबद्दल जाब विचारणार आहे व त्याप्रमाणे आपणास योग्य ते बक्षीस देऊन त्याच्या आनंदात सहभागी करणार आहे.

          आज आपण ह्या पवित्र मिस्साबालीदानात सहभागी होत असताना प्रार्थना करूया कि, हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमची कर्तव्ये व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यास व सर्वकाळच्या आनंदात सहभागी होण्यास आम्हाला पात्र बनव.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरु–धर्मभगिनी व व्रतस्त ह्या सर्वांनी प्रभूच्या आनंदात सहभागी होऊन, त्याच्या सेवेची घोषणा करून लोकांना मार्ग तयार करण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी व पिडीत आहेत, खाटेला खिळलेले आहेत त्यांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांचे दुःख सहन करण्यास त्यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. आज बरीचसी युवक पीडी वाम मार्गाला जात आहे, बेरोजगारी वाढत आहे अश्यांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगले कार्य करून आपला व समाजाचा विकास करावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी परमेश्वराने दिलेल्या दानांचा योग्य वापर स्वत:साठी न करता इतरांसाठी करावा व परमेश्वराचा आनंद इतरांना द्यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.


No comments:

Post a Comment