Thursday 10 November 2022

  Reflection for the Homily of 33rd  SUNDAY IN ORDINARY TIME (13-11-2022) By Br. Roshan Nato.


“जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्या मार्गाने चालतो तो धन्य तू आपल्या श्रमाचे फळ खाशील; तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.” (स्तोत्र २८:१-२)





सामान्य काळातील ३३ वा रविवार

दिनांक: १३/ ११/२०२२

पहिले वाचन: मलाखी ३: १९-२०

दुसरे वाचन: थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र ३: ७-१२ 

शुभवर्तमान: लुक २१: ५-१९

प्रस्तावना:

आज देऊळ माता सामान्य काळातील तेत्तीसावा रविवार साजरा करीत असताना, आजची उपासना आपळयाला देवाच्या नामावर भिस्त ठेऊन, विश्वासू राहण्यास बोलावत आहे. कारण नितीसुत्र १: ७ मध्ये सांगितल्या प्रमाणे, “देवाचे भय हे ज्ञानाचे उगम आहे”. त्याच प्रमाणे आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला येशू ख्रिस्ताच्या वचनाची आठवण करून देत आहे ती म्हणजे, ‘माझा पिता आज पर्यंत काम करीत आहे आणि मी ही काम करीत आहे’ (योहान ५:१७) ह्या वाचनाची आठवण करून देत अस्ताना आपणाला  बजावत आहे कि, स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खा. तर आजच्या शभवर्तमानात खुद्द येशू ख्रिस्त आपल्याला जगातील मोहांपासून अलिप्त राहून, बहकून न जाता, देवाच्या तारणदायी वचनावर म्हणजेच, ‘तुमच्या एकही केसाला दगा लागू देणार नाही’ ह्या वचनावर विश्वास ठेवण्यास पाचारण करीत आहे. 

मनन चिंतन:

“जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्या मार्गाने चालतो तो धन्य तू आपल्या श्रमाचे फळ खाशील; तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.” (स्तोत्र २८:१-२)

ख्रिस्तात माझ्या प्रिय भाविकांनो, आज देऊळमता सामान्य काळातील ३३ वा रविवार साजरा  करत आहे. आजची उपासना आपल्याला देवाच्या नामावर भिस्त ठेऊन, आपल्या एका केसाचाही नाश होणार नाही, ह्या आश्वासनावर विश्वास ठेवण्यास व त्याने केलेल्या आज्ञाचे विश्वासुपणे अनुकरण करण्यास पोचारण करत आहे. भाविकांनो प्रत्येक दिवस हा देवाने आपल्याला दिलेली एक देणगी आहे, म्हणून जीवनात कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका. अस म्हणतात, : ‘उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात, म्हणून प्रत्येक दिवशीं देवाला धन्यवाद द्या त्याच्या नामाची स्मृति करा, त्याच्या नामाचा गौरव करा, कारण परमेश्वर जेव्हा आपल्या बरोबर असतो तेव्हा आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही.

आजच्या पहिल्या वाचनात सेनाधीश परमेश्वर आपल्याला सांगतो कि ‘पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे, आणि या भट्टीत सर्व गर्विष्ठ, दुराचारी धसकट बनतील, परंतु जे माझ्या नामाचे भय धरतात, माझ्या आज्ञा पाळतात ते धन्य, कारण त्यांच्यावर न्यायत्त्वाचा सूर्य उदय पावेल, त्यांच्या पंखात आरोग्य असेल. त्त्याचप्रमाणे आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल येशू ख्रिस्ताच्या नामाने आपल्याला आज्ञा बोध करून सांगता की कुणावार अवलंबून राहू नका, फुकट बसून खाऊ नका. श्रम करा, घाम गाळा आणि स्वस्तपणे काम करून स्वतःचे अन्न खा. कारण काम ही एकमेव गोष्ट आहे की, जी आपल्याला मनुष्य होण्याची जाणीव करून देते. कामामध्ये कुठल्याही प्रकारचा दर्जा नसतो. म्हणून हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे की : “कोई भी धंधा छोटा नही, और धंधे से बडा कोई धर्म नही. विश्वासुपणाने केलेल्या कामात तोटा मिळत नाही, तर परमेश्वराच्या कृपेने आपली भरभराट होते.

आजच्या शुभवर्तमानांमध्ये येशू ख्रिस्त आपल्याला सांगतात कीं या जगात काय चालले आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ नका, तर माझ्या नामाने तुम्हाला कोणी बहकवू नये म्हणून काळजी घ्या. माझ्या नावा मुळे तुमचा छळ करतील तुम्हाला तुरुंगा टाकतील, परंतु भिऊ नका, कारण, मीच तुम्हाला या सर्व गोष्टींतून बाहेर पडण्यास समर्थ करीन. माझ्या नामा मुले सर्वजण तुमचा द्वेष करतील, काहीकांना ठार मारतील, परंतु भिऊ नका, धीर धरा, आणि विश्वास ठेवा, कारण तुमच्या डोक्याच्याका केसालाही मी दगा लागू देणार् नाही.

भाविकांनो, आज येशू ख्रिस्त आपल्याला निडर होऊन त्याच्यावर विश्वास ठेवण्यास पाचारण करत आहे. जे पाचारण त्याने आपल्या प्रेषितांना केलं, जे पाचारण त्याने सर्व संतांना केल, ते पाचारण आज येशू ख्रिस्त आपल्याला देत आहे. ज्याप्रमाणें प्रेषितांनी आणि संतांनी देवाच्या नामाचा प्रसार सर्व जगभर करण्यास आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा येशू ख्रिस्त, घाबरून किंवा जगाच्या या मोहजाळ्यात बहकून न जाता परमेश्वराच्या नामावर विश्वास ठेवून त्याने दिलेल्या आज्ञा पाळून, एक विश्वासू आणि खंबीर जीवन जगण्यास सांगत आहे.

 ही गोष्ट आहे एका बाईची, जिणे आपल्या जीवनात किती तरी दुखांचा, कष्टांचा आणि छळांचा सामना केला. बालपण गरीबी काढलं, शिक्षण गरीबी मुले अर्धवट राहिलं, वयाच्या दहाव्या वर्षी एका वयस्कर व्यक्तीबरोबर लग्न झालं. गरीबीने तर छळ केला होता, पण लग्न होऊन सासरचा छळ सुद्धा वाट्याला आला, परंतु तिने कधी आपल्या विधात्याला दोष दिला नाही तर उलट सर्व सहन करण्याची शक्ती मागितली. वयाच्या विसाव्या वर्षी बाळंत असताना पतीने लाथाबुक्क्यांनी मारून गोठ्यात जनावरांच्या पायाखाली बेशुद्धावस्थेत मरायला सोडलं. तेव्हा जनावरांकडून माणुसकीचा धडा शिकली.पतीने तर सोडलंच, पण आपल्या बाळाला आणि स्वतःला एक आसरा म्हणून माहेरी आली तेव्हा स्वतःच्या आईने सुद्धा तिला नाकारलं. तेव्हा ती आपल्या मुखातून शोक-उद्गार काढत म्हणाली हे विधात्या  जीवन खूप कठिन आहे रे, आपल्या लोकांनी सोडलं, पण तुझ्या आश्रयाखाली मात्र सदैव ठेव.”

तिच्या जीवनात दुःख तर होतीच, पण आता तिला कष्टांनासुद्धा सामोरे जावे लागत होते. पोटाला भूख आहे, पण खिशात दमडी नाही म्हणून गैरसोयीमुळे भीक मागून स्वतःचं आणि आपल्या बाळा पोट भरलं. इतकच नाही तर पोटभर जेवण मिळणार् या आशेवर रात्रभर भजनंसुद्धा गायली. परंतु या कष्टांना घाबरून न जाता आपल्या विधात्याच्या विश्वासात धृढ राहिली. आश्रयासाठी आणि जगातील दृष्टांपासून दूर राहण्यासाठी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यास बस वाहनाचे तिकीट मिळाले नाही, म्हणून बसमधून खाली उतरताच, बस पेटून राख होत बघता तिच्या मनात स्वतःला म्हणाली देव तारी त्याला कोण मारी. होय, माझ्या भाविकांनो म्हणून त्या बाईने आपले जीवन आपले नसून देवाने दिलेली एक देणगी आहे म्हणून ते जीवन गरीब व अनाथांसाठी अर्पण केलं आणि ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून अनाथांची माय म्हणून संबोधलेली सिंधुताई सपकाळ होय. 

होय, माझ्या भावीकानो, सिंधुताईंनी आपल्या वाईट दिवसात कधीही आपल्या विधात्याला किवा परमेश्वराला दोष दिला नाही, तर ती तिच्या कठीण परिस्थितीत सुद्धा विश्वासू राहिली . तीने कोणाची चोरी किंवा लबाडी केली नाही, तर आपल्या विधात्याच्या आज्ञेत राहिली. आणि त्याच परमेश्वराने तीला बक्षीस म्हणून एक नवीन जीवनाची देणगी दिली. म्हणून भाविकांनो, आपण सुद्धा आपल्या जीवनात प्रेषिताप्रमाणे, संतांप्रमाणे आणि सिंधुताईप्रमाणे निडर होऊन, श्रद्धेने विश्वासाने देवाच्या अग्नेचे पालन करून त्याने दिलेल्या अनंत जीवनाच्या वचनांवर विश्वास ठेवण्यास त्याच परमेश्वराकडे व विधात्याकडे सामर्थ्य मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे ख्रिस्ता तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक”

१. ख्रिस्त सभेची अखंडितपणे सुवार्ता जगाला पोहोचविणारे पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स,बिशप्स, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ यांना सर्वांना ख्रिस्ताचे प्रेम, कृपा व दया मिळून ख्रिस्ताची सुवार्ता जगभर जोमाने पसरविता यावी  म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. देशात अत्याचार, काळाबाजार, अन्याय व वैराचार ह्यासारख्या गोष्टी घडत आहेत, त्यामुळे देशाची उन्नती होत नाही. अशा वेळी आपल्या राजकीय नेत्यांनी होत असलेल्या वाईट गोष्टीवर आवाज उठवून, देशाला योग्य दिशा द्यावी व देशाची चांगल्यारितीने वाटचाल व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. रशिया उक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे त्यामुळे अनेक निष्पाप लोकांना या बळी पडाव लागत आहे, अनेकांना बेघर राहाव लागत आहे अश्या लोकांना परमेश्वराने दिलासा द्यावा त्यांचे सांत्वन करून त्यांना सहनशक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आज युवक-युवती जीवनात योग्य साथीदार व नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना योग्य साथीदार व नोकरी मिळून त्यांचे जीवन आनंदित व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जे लोक अतिशय आजारी आहेत, ज्यांची सेवा करायला कोणीही नाही. अशा सर्व लोकांना ख्रिस्ताचा करुणामय स्पर्श व्हावा व त्यांची आजारातून मुक्तता व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment