Friday 6 October 2023

Reflections for the 27thnd Sunday in Ordinary Time (08/10/2023) by Br. Rakesh Ghavtya

सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार




दिनांक: ०८/१०/२०२३

पहिले वाचन: यशया :-

दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र :-

शुभवर्तमान: मत्तय २१:३३-४३

प्रस्तावना

आजच्या उपासनेमध्ये भक्ती भावाने सहभाग घेण्यासाठी जमलेल्या तुम्हा सर्व भाविकांचे स्वागत. आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेत आपण देवाच्या चांगुलपणाचा, सहनशीलतेचा अपार दयेचा अनुभव घेणार आहोत. देव सर्वांवर कृपेचा वर्षाव करतो सर्वांनाच आशीर्वादाने भरतो. देवाच्या राज्यात कसलाच भेदभाव नाही. देवराज्य हे सर्वांसाठी बहाल केलेले वरदान आहे. देवाचे राज्य हे प्रेमाचे भंडार, दयेचा सागर क्षमेचा प्रवाह असल्यामुळे प्रत्येक ख्रिस्ती भाविकांनी देवाच्या सतत सानिध्यात रहावे. याच देवाला प्रसन्न करायचे असेल तर आमचे जीवन प्रामाणिकपणे, नीतीने शांतीने जगावे. त्यासाठी आपल्याला देवाच्या सहाय्याची गरज आहे.

जरी मानवाने देवाशी आपले नातेसंबंध तोडले, तरीसुद्धा देवाने मानवाच्या उद्धारासाठी त्याच्या तारणप्राप्तीसाठी हे नातेसंबंध जोडले. याच देवाच्या जवळ जाऊया आपला त्याच्यावरील विश्वास वाढवून ह्याच देवाशी विश्वासू राहण्यास त्याच्याकडे प्रेरणा मागूया.

मनन चिंतन

उत्पत्ती ह्या पुस्तकात असे नमूद करण्यात आले आहे की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला (उत्पत्ती :२७). देवाने मानवावर असंख्य असे उपकार केले. देवाने मानवाला कशाचीही कमतरता केली नाही. त्याला अधिकार दिला, स्वातंत्र्य दिले. पण मानवाने स्वार्थामुळे देवाने दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगला. कारण मानवाला देवासारखे व्हायचे होते. मानवाने वाईट मार्ग निवडला सैतानाच्या पापी राज्यात तो सहभागी झाला. अशाप्रकारे मानवाने देवाने दिलेल्या चांगुलपणा गमावला.

परंतु देवाने आपल्या चांगुलपणाने मानवाशी करार केला. मानवाचा धिक्कार केला नाही. तर मानवाचे तारण व्हावे म्हणून तारण प्राप्तीचा मार्ग राबवला. या तारण प्राप्तीच्या मार्गात मानवाने देवाबरोबर सहकार्य केले नसताना सुद्धा देवाने सर्व काही सहन केले उलट मानवावर दया दाखवून त्याच्या तारणासाठी उत्तम असा मार्ग  ख्रिस्ताद्वारे तयार केला.

आजची तिन्ही वाचणे देवाच्या चांगुलपणाविषयी साक्ष देतात. देवाचा मार्ग त्याच्या कल्पना संकल्पना आगळ्यावेगळ्या आहेत.

पहिल्या वाचनात, प्रतिसाद स्तोत्रात, द्राक्षमळ्याची तुलना इस्राएल घराण्याविषयी केली आहे. तर शुभवर्तमानात द्राक्षमळ्याची तुलना देवाच्या राज्याविषयी केली आहे.

पहिल्या वाचनात यशया संदेष्टा द्राक्षमळ्याचा दृष्टांताद्वारे असे वर्णन करतो की देवाला निवडलेल्या लोकांची काळजी आहे. पण हे लोक देवाच्या विरुद्ध जातात देवाची आज्ञा पाळत नाहीत. जरी देवाने त्यांच्यावर अनेक उपकार केले तरी ते सर्व विसरून देवाशी अप्रामाणिक अविश्वासू जीवन जगले. त्यांना ठाऊक आहे की देव त्यांना उध्वस्त करू शकतो याची त्यांना भिती आहे. पण जर का त्यांनी सावधगिरी बाळगली तर नक्कीच देव त्यांची भीती काढून आपल्याजवळ घेईल. हाच तर देवाचा चांगुलपणा आपल्या दृष्टीस पडतो.

दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीप्पैकरांस पत्रात म्हणतात की देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. सतत प्रार्थना विनंती करा म्हणजे देव तुमच्या बरोबर राहील. तसेच चांगले आचरण धारण करा म्हणजे तुम्हाला मन शांती मिळेल. तुमच्या गरजा देवासमोर प्रार्थना विनंती द्वारे सादर करा. कारण प्रार्थनेचा उद्देश म्हणजे देवाला भजने. दुसरा उद्देश म्हणजे देवाला धन्यवाद देणे. यामध्येच मानवाला खरी देवाची शांती लाभते यामध्येच खरा आनंद आहे. हाच तर आपल्या देवाचा चांगुलपणा आहे.

शुभवर्तमानात प्रभू येशू द्राक्षमळ्याच्या दृष्टांताद्वारे देवराज्य प्रस्थापित करताना देवाच्या चांगुलपणाची जाणीव करून देत आहे. प्रभू येशू या दृष्टांतात गृहस्थाची तुलना देवाबरोबर करतो, द्राक्षमळ्याची तुलना देवराज्य बरोबर करतो, माळ्याची तुलना निवडलेल्या लोकांबरोबर करतो, दासांची तुलना संदेष्ट्याबरोबर  करतो मुलाची तुलना स्वतःबरोबर करतो.

परमेश्वर देवाने संपूर्ण मानवजात रचली. हा आपला देव मानव जातीशी विश्वासू राहिला. पण मानव जातीने देवाचे ऐकता ते देवाच्या विरुद्ध गेले. देवाने अनेक संदेष्टे  पाठवले तरी त्यांनी त्याचे ऐकले नाही. मग शेवटी देवाने आपल्या पुत्राला या भूतलावर पाठवले. या मानव जातीने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. त्यांनी येशू ख्रिस्ताला मारले. देवाने मानवाच्या तारण प्राप्तीसाठी सर्व सहन केले मानवावर दया दाखवून त्याला नवीन संधी दिली आहे.

प्रत्येक मानवामध्ये देव आपला चांगुलपणा ओततो. पण तो आम्ही टिकवून ठेवला आहे का? जर देवाने बहाल केलेला चांगुलपणा कायमचा टिकवायचा असेल तर देवाशी विश्वासू राहायला हवे. त्याच्या आज्ञा पाळायला हव्यात. आमच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर त्याच्या इच्छेप्रमाणे जगायला हवे. तसेच आमचे जे कर्तव्य आहे जी जबाबदारी आम्हाला दिली आहे ती योग्य रीतीने आम्ही पार पाडावी. जसा सूर्य  प्रकाश देतो, नदी पाणी देते, शिक्षक शिक्षण देतात, आई-वडील मुलांना घडवतात, त्याचप्रमाणे प्रत्येक ख्रिस्ती भाविकांनी देवाचे राज्य या धरतीवर प्रस्थापित करण्यासाठी, आपले कर्तव्य, जबाबदारी पार पाडावी.

ज्याप्रमाणे देवाने आम्हाबरोबर विश्वासूपणा दाखवला आहे त्याप्रमाणे आम्हीही देवाशी सदा सर्वदा विश्वासू राहायला हवे. संत मदर तेरेसा यांच्या शब्दात म्हणायचं झालं तर देव आपल्याला यशस्वी बनण्यासाठी सांगत नाही तर विश्वासू राहण्यासाठी सांगत आहे.

ज्याप्रमाणे चांगल्या झाडाची ओळख त्याच्या गोड फळावरून केली जाते त्याचप्रमाणे चांगल्या माणसाची ओळख त्याच्या वागण्यातून, स्वभावातून, आचरणातून त्याच्या चांगल्या जगण्यातून केली जाते. आजच्या उपासनेत सहभाग घेताना देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेऊया आपण चांगुलपणाने भरावे म्हणून देवाकडे प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा दया करून तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

) आपले पोप महाशय, कार्डिनल, बिशप्स, धर्मगुरू, व्रतस्थ बंधू भगिनी व प्रापंचिक यांना ख्रिस्त सभेची जबाबदारी पार पाडताना चांगले आरोग्य लाभावे त्यांच्या ईश्वरी सेवा कार्यात त्यांना चांगली फळे उत्पन्न करण्यास प्रभू येशूने प्रेरणा दयावी  म्हणून प्रार्थना करूया.

) सर्व राजकीय सामाजिक पुढाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सतत झटावे त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचा स्पर्श होऊन त्यांना चांगले कार्य करण्यास कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

) प्रत्येक कुटुंबात देवाची शांती, प्रेम दया प्रस्थापित व्हावी. तसेच एकमेकांना समजून घेऊन सहनशील अंतकरणाने कुटुंबात नितीचे आणि धार्मिकतेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

) येथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांच्या सामुदायिक व खाजगी गरजा देवाच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात प्रत्येकाला मनशांती सुख - समाधान मिळावे म्हणून प्रभू चरणी प्रार्थना करूया.

 . थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या इतर विविध गरजांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया.


1 comment: